श्रीगुंडामाहात्म्य - अध्याय दहावा

प्रस्तुत ग्रंथ शके १८३६ यावर्षी कै. गुरूभक्त व्यंकटरमणा मच्छावार यांनी प्रसिद्ध केला होता.


॥ श्रीगणेशायनम: ॥ ॥ श्रीगुरवे नम: ॥

ॐ नमो भगवते गजानना । कार्यारंभीं मंगलस्तवना । शारदाशक्ति नमोनि जाणा । श्रीगुरुराणा प्रार्थिला ॥१॥
आतां पूर्वाध्यायाचे अंतीं । विप्रासी गुंडा अर्पी सती । संगें नेत विप्र राजाईप्रति । जाहली ख्याति ऐका पुढें ॥२॥
एका पर्वताचे दरींत । विप्र सतीसी नेऊनि ठेवित । आपण गुप्त जाहला अकस्मात । अंत पाहत सतीचा ॥३॥
जेंवि लावोनियां कसवटी । परीक्षक पाहे हेमपाठी । तेंवि ही सती सगुण गोमटी । कसोनी जगजेठी पारखी ॥४॥
वैद्य पथ्य करवी रोगनाशास । बागुलभय बोध बालकास । तेंवि कृपावंत असोनि ईश । सतीची खास परीक्षा पाहे ॥५॥
जेव्हां सती पाहे विलोकून । न दिसे कोठेंही तो ब्राह्मण । घाबरी म्हणे कर्म गहन । कैसें जाण माझें जाहलें ॥६॥
अरण्य पाहतां भयानक । मार्ग दिसेना न कोणी लोक । माझें दान घेऊनि एकाएक । लाविला शोक विप्रानें ॥७॥
हे दीर्घारण्य महा कठिण । येथें मनुष्याचें नाहीं दर्शन । व्याघ्र वृक रीस अतिदारुण । भूतगण किंकाळती ॥८॥
यक्षकिन्नर भूतें कराल । वनदेवता धांवती बळ । एकाएकीं निघे घन ज्वाळ । अतिप्रांजळ होवोनी ॥९॥
माध्यान्ह रात्र आली होत । दीर्घ शब्द भयानक वाजत । भालू तरसे ओरडती दिवाभीत । मांडिला आकांत पिशाचांनी ॥१०॥
अधम भाग्य हें माझें केवढें । प्रभो आतां मी जाऊं कोणीकडे । स्वामीकडे जातांचि निवाडें । पाहूनि पुढें कोपतील ॥११॥
योग्य हेंचि शोधावा विप्रोत्तम । तेणेंचि साधती सकल धर्म । जो येथें सोडिला माझें कर्म । अति अधम जाणोनि ॥१२॥
सती घालोनि एकांत आसन । प्रथम आठविले गुंडाचरण । मग आठवी ब्राह्मण । प्रेमेंकरुन ध्यानांत ॥१३॥
नमोनि पदीं प्रज्ञानमार्तंडा । सर्व साधूंमाजी धन्य तूं गुंडा । मज प्रेमावरी ठेवूनि धोंडा । बैसलासि अखंडा आनंदरुप ॥१४॥
म्हणे मी परदेशी या वेळां । माझा कां केला हो कंटाळा । तेव्हांचि करें तुम्हीं माझा गळा । कां न दयाळा कापिला ॥१५॥
तुम्हीं मज दान दिलें विप्रासी । त्यानें केली मद्दुर्दशा ऐशी । परीक्षावया या दूरदेशीं । सोडिलें मजसी दरींत ॥१६॥
शिवशिव काय हो विप्रोत्तमा । आज उपवास घडला कीं तुम्हा । मज पापिणीसंगें अत्यंत श्रमा । पावलां ती सीमा जाहली ॥१७॥
तुमची कांहीं केली नाहीं सेवा । व्यर्थ देह हा जळो देवा । दासी अपराध क्षमा करावा । यावें सदैवा विप्रवर्या ॥१८॥
मी स्वकरें पाद प्रक्षाळीन । पुष्पसुगंधें करीन पूजन । तुम्हांसी भोजन करवून । उच्छिष्ट सेवीन तुमचें मी ॥१९॥
ऐसी विप्रभजनीं समरस । माध्यान्हीं आला असे चंडांश । तेव्हा चमत्कार दावी विश्वेश । तो सावकाश परिसावा ॥२०॥
इकडे गुंडानें स्त्रीदान केलें । निरामय गंगातटीं बैसले । दानाचें स्मरणही विसरले । भजनीं राहिले अभेद ॥२१॥
अंतरध्यानीं लावोनि नेत्र । श्रीहरिपद स्मरती पवित्र । मायामोह त्यागूनि स्वतंत्र । स्वानंदमात्र उरले ठायीं ॥२२॥
स्त्रीअंगींच सकल संसार । गृहपुत्रधनादि व्यापार । मायामोहादि तेणेंचि भार । नसतां जोजार कोण सोसी ॥२३॥
गृहिणीच असे गृहाचें मूळ । कांताचि नरककारण केवळ । कांताचि बुडवी सकळ कुळ । मोहजाल घाली कांता ॥२४॥
परवशता स्वतंत्र पुरुषा । मृषा कामादि धनाशा । मी माझे आप्तेष्ट दुर्दशा । हर्षामर्षा कांता मूळ ॥२५॥
हा ऐसा आत्मानात्मविचार करुन । गुंडा विसरला देहभान । क्षुधातृषा मानापमान । कुलाभिमान सोडिला ॥२६॥
गंगातटीं बैसला एकला । ब्रह्मानंदीं तल्लेन झाला । देहेंद्रियगण बोळविला । स्वरुपीं रमला निजबोधें ॥२७॥
कोणा नसे ठावी ही मात । तेथें पुन्हां पातला जगन्नाथ । गुंडा देखिला तंव ध्यानस्थ । भाव यथार्थ जाणिला ॥२८॥
धन्य गुंडाचा एकभाव । हा नायके जरी ये ब्रह्मदेव । यासी स्त्री द्यावया काय उपाव । करुं लाघव न सुचे मज ॥२९॥
तंव विप्र म्हणे नम्र होऊन । ऐकगा गुंडा माझें वचन । मी याचक आलों तुजकारण । कांहीं दान मागावया ॥३०॥
ऐसें श्रवणीं पडतां अक्षर । गुंडा उघडोनि पाहे नेत्र । तों द्विज देखिला सुपात्र । स्त्री सुगात्र अर्पिली ज्या ॥३१॥
सवेंचि विप्रपदीं वंदिला । कर जोडोनि उभा राहिला । म्हणे इच्छा काय सांगा मजला । अर्पीन तुम्हांला यथानुकूल ॥३२॥
विप्र म्हणे धन्य गुंडा समर्था । तुजऐसा नाहीं देखिला दाता । मज तूं अर्पिली पूर्वी कांता । परी आतां मागतों एक ॥३३॥
ऐशा या क्षेत्रासी येऊन । त्वांही करावें स्वपिंडदान । मी अर्थेच्छु आहें ब्राह्मण । करीं अर्पण देह तुझा ॥३४॥
तुझा देह देवोनि परकीया । अमर करीन ही माझी काया । तूं उदार देहासी म्हणोनियां । मागतों मी राया देहलोभें ॥३५॥
देह कायावाचामनोभावें । अर्पोनी सांगेन असें वर्तावें । नसतां काय तें उत्तर द्यावें । जातों पहावें निघालों मी ॥३६॥
गुंडा म्हणे हा देह तुम्हां अर्पिला । काय आज्ञा जी सांगा मजला । विप्र म्हणे मज संगें चला । अवश्य बोलिला गुंडा येतों ॥३७॥
गुंडा चालिला विप्रसंगतीं । गिरीमहावन उल्लंघिती । तंव भयानक दरींत सती । बैसली होती ध्यानस्थ ॥३८॥
दोन्ही जोडूनि करकमला । विष्णुपुढें जशी कमला । अत्रिपुढें अनुसूया विमला । सीता कोमला रामापुढें ॥३९॥
तशी राजाई झांकूनि नेत्र । विप्रध्यानीं बैसली पवित्र । देहभ्रांति नाहीं अणुमात्र । विगलित गात्र जाहलें ॥४०॥
धांव विप्रा आला अंतसमय । पतिनें अर्पिला तुम्हां हा काय । प्रत्यक्ष ईश्वर होसी सदय । पूजीन पाय आनंदे ॥४१॥
तुझ्या अर्चनासी केवळ । वांछिती देवही सकळ । तुमच्या सेवेनें नरा तत्काळ । वैकुंठमूळ हाता ये ॥४२॥
हव्य अर्पितां अग्निमुखीं । तेणें श्रीविष्णु होय सुखी । एक ब्राह्मण तृप्त होतां त्रिलोकीं । कोटी यज्ञांचें कीं फळ मिळे ॥४३॥
सती उभय नेत्र झांकोनी । द्विजासि आठवी अंत:करणीं । गुंडासी सांगे द्विजकर्णीं । महाज्ञानी हीं साध्वी पाहें ॥४४॥
इच्या पूर्णधैर्याची ठेव । सावित्रीलक्ष्मीपार्वती सर्व । कीर्ति गातील मानूनि अपूर्व । अत्यंत गौरव करितील ॥४५॥
सतीचें धैर्य कैसें हें दावावया । तुम्हासी आणिलें येथें राया । आतां सांगणें हें तुम्हां उभयां । जाणूनि समया वर्तावें ॥४६॥
भूतभविष्यवर्तमान । जाणतों मी सामुद्रिक चिन्ह । आतां करोनी गयावर्जन । ग्रामासी येथूनि तुम्हीं जावें ॥४७॥
तुम्हां दोघांचे दान मीं घेतलें । मदाज्ञें तुम्हीं पाहिजे वर्तलें । आतां स्त्री सांभाळीं ऐसें बोलिले । कथूं लागले भविष्यासी ॥४८॥
तुम्ही ग्रामासी गेल्यावरी । आरोप येईल तुम्हावरी । त्यायोगें जाल अरण्यांतरीं । वास्तव्य निर्धारी होय तेथें ॥४९॥
तेथे महासंकट येईल । तेव्हां श्रीहरी भेट देईल । अपूर्व भजनमार्ग लागेल । प्रसाद होईल तुम्हांवरी ॥५०॥
श्रीहरिकृपा होतां अभंग । प्रत्यक्ष भेटेल पांडुरंग । मग आनंद होईल अव्यंग । तो प्रसंग ऐका पुढें ॥५१॥
सती बैसली ध्यानस्थ होवून । विप्र बोले गुंडा लागून । सतीसी करावें सावधान । हें कार्य पूर्ण तुम्हांकडे ॥५२॥
गुंडा म्हणे हो वेदमूर्ति । म्यां अर्पिली आहे तुम्हांप्रति । सावध करावें तुम्हीं निश्चिती । योग्य रीति असे हेचि ॥५३॥
विप्र म्हणे रे गुणवंता । मान्य करी आज्ञा उठवी कांता । मी जें सांगेन तें तत्वतां । करावें आतां लागे तुज ॥५४॥
कांता ही मज अर्पण केली । तुझी कायाही माझी झाली । मग जे कां मीं आज्ञा दिधली । पाहिजे मानिली दोघांसी ॥५५॥
ऐसी विप्राज्ञा ऐकून । हांक दिली कांते लागून । गुंडाचें ऐकतां मधुर वचन । उठोन तेव्हां पाहे ॥५६॥
चकोरासी भेटला चंद्र । कीं चातकासी साह्य धनसमुद्र । भिल्लिणीसा गिवसे रुद्र । भणगा देवेंद्र भेटला ॥५७॥
तेंवि विप्रासह गुंडासि पाहे । कृपाकर जो पुढें उभा राहे । राजाई तेव्हां पाहोनि लवलाहें । मिठी मोहें दे पायीं ॥५८॥
कमळासी लुब्धला मिलिंद । तेंवि धरितसे विप्रपद । जेंवि संकटीं भेटला मुकुंद । तैसा आनंद राजाईसी ॥५९॥
विप्र म्हणे सती लागून । तुम्हां दोघां मदाज्ञा प्रमाण । ज्याची ठेव त्या मीं दिली पूर्ण । करोनि पालन गुंडा तुज ॥६०॥
तुमची मीं परीक्षा पाहिली । सत्वधीरता तुमची देखिली । जगीं कोठें नाहीं आढळली । किंवा ऐकिली नाहीं कोठें ॥६१॥
हा गुंडा दानशूर यथार्थ । ज्ञाता विरागी असे समर्थ । याचें नित्य तूं घेईं तीर्थ । येणें परमार्थ पूर्ण साधे ॥६२॥
आतां तुम्ही माझ्या आज्ञवरुन । सत्वर करा गयावर्जन । या कर्मभूमीसि कर्में करुन । ईश्वरार्पण तें करावें ॥६३॥
पूर्वी चूडामणि सद्गुरु । ब्रह्मज्ञान बोधी सविस्तारु । आतां ज्ञानोत्तर भक्ति विचारु । सांगतों निर्धारु ऐकावा ॥६४॥
देवतीर्थ पितृभजन नेम । अखंड हरिचिंतनीं कर्म । नित्योत्सव गुरुसेवा उत्तम । दानधर्म क्रिया हेचि ॥६५॥
मनीं भजावें कुलस्वामिया । स्ववर्णाश्रमीं झिजवावी काया । सर्वां भूतीं ठेवावी दया । नेमीं इंद्रियां हरिभजनीं ॥६६॥
भक्तिज्ञान शुध्द वैराग्य । त्रिलोकीं हेंचि महाभाग्य । येणेंचि सकल काया आरोग्य । यथायोग्य वेदविधि ॥६७॥
साधावया सनातनमार्ग । आदौ स्ववर्णाश्रमधर्म सांग । नंतर गुरुसेवा ती अभंग । मग अनुराग स्वरुपीं ॥६८॥
कामक्रोधादि षड्‍वैरी । निवटोनी घालावे बाहेरी । शांतिक्षमादयादि परिवारीं । नांदावें शरीरीं मूळवर्म ॥६९॥
विप्र म्हणे सिध्दांत एकवचन । कलियुगीं मुख्य भगवद्भजन । येणेंचि होय मन समाधान । सकल साधनें यांत येती ॥७०॥
साधावया नामप्राप्तीचा अर्थ । कलियुगीं अवतरले संत । त्या संतांची कीर्ति अद्भुत । अतर्क्य होत देवासुरां ॥७१॥
यदर्थीं एक जुनाट कथा । संतांची सादर ऐकिली समर्था । दुष्टांयोगें भूभार होतां । शरण जगन्नाथा गेली धरा ॥७२॥
तव भूभारहरणासाठीं । विप्रसदनी यमुनातटीं । हरिहर अवतरले शेवटीं । भक्तकोटि महासंत ॥७३॥
विष्णुअंशें जाहला अग्रदास । दुजा किल्लेदास तो महेश । या दोघांची कीर्ति असंमास । नये कोणास वर्णावया ॥७४॥
यांची भक्तिज्ञानवैराग्यकीर्ति । संतमालिकेंत वर्णिली असती । ती येथें पुन्हां वर्णितां कीर्ति । ग्रंथ अति वाढेल ॥७५॥
ती कथा ज्या भाविका वाटे ऐकावें। त्यानें संतमाळिकेग्रंथीं विलोकावें । सारांश दोघेही संत जाणावे । भक्त स्वभावें महासिध्द ॥७६॥
पुन्हां करावें सिंहावलोकन । गुंडासी म्हणतसे तो ब्राह्मण । जैसे अग्रदासकिल्लेदास जाण । अंशपूर्ण हरिहरांचे ॥७७॥
तेंवि तूं जाण गुंडा नारदांश । अवतरलासी भक्त तारावयास । तुझी कीर्ति होईल असंमास । सुरवरांस अतर्क्य पैं ॥७८॥
विप्र म्हणे तूं नारदांश पूर्ण । त्यासी असे तुझा अभिमान । तो बोधील तुज इतक्यांत येऊन । तैसें वर्तन योग्य तुज ॥७९॥
असें बोलून विप्र स्तब्ध राहिला । तंव साधु एक प्रगटला । कंठीं वीणा चिपळ्या हातीं धरिला । गाऊं लागला रामकृष्ण ॥८०॥
गुंडा सद्गद होऊनि मनांत । साष्टांग केला प्रणिपात । ऐक्यभावें होती आनंदित । एकांश निश्चित दोघेही ॥८१॥
साधूसी जाहला अत्यंत हर्ष । म्हणे धन्य तुम्ही स्त्रीपुरुष । तुम्हां उभयांसमान निर्दोष । ऐक कथा संतोषदायक जी ॥८२॥
पिपाजी आणि सीताबाई दोघें । विरागी भक्त हें ऐंकिलें मागें । संतमाळिकाग्रंथीं कथा निघे । पहावी अवघे भाविकहो ॥८३॥
जेंवि पिपाजीस स्त्रीसह गाती । तेंवि राजाईसह तुझी कीर्ति । सप्रेम गातील त्रिजगतीं । संत येती भाविकजन ॥८४॥
ज्यासी साह्य झाला देव । तेथें राबती सकल वैभव । भक्तिज्ञानवैराग्य स्वयमेव । घेती धांव आपोआप ॥८५॥
जैसी सती सीता स्त्री पिपाजीची । तैशीच स्त्री राजाई तुझी साची । आताम योग्यता परमार्थाची । झाली तुमची नि:सीम ॥८६॥
एक सांगतों तुज कारण । गुंडा तूं ठेवीं गुप्त खूण । सकल गुह्यांचें गुह्यज्ञान । करी भजन निरंतर ॥८७॥
रामाकृष्णा हरी । मुकुंदा मुरारी । अच्युता नरहरी । नारायण उच्चारी बीजमंत्र ॥८८॥
इतर साधन न साधावें । मंत्रतंत्रीं न गुंतावें । कलिमाजी साधन जाणावें । नाम गावें हेंचि वर्म ॥८९॥
न करावें तीर्थाटण । वृध्द जाहलें वैराग्यज्ञान । कलियुगीं भक्ति तरुण । असे पूर्ण प्रफुल्लित ॥९०॥
या युगामाजी श्रेष्ठ भक्ति । तिची दासी असे मुक्ति । ज्ञानवैराग्य सहजयुक्ति । लाभे आत्मस्थिति आपोआप ॥९१॥
असो यापरी करुनि कथना । गुंडाचें कंठीं घातला वीणा । हातीं चिपळ्या देऊनि जाणा । लाविलें भजना निरंतर ॥९२॥
आतां त्वरें गयावर्जन करावें । मग कांतेसह स्वग्रामा जावें । सदा हरिभजनीं रहावें । मुखें स्मरावें रामकृष्ण ॥९३॥
असें बोलूनि उभयमूर्ति । जावया गुंडासी निरोप पुसती । गुंडा सप्रेमें विव्हल चित्तीं । केली स्तुति अपरंपार ॥९४॥
यावरी दोन्ही मूर्ति तत्काळीं । अंतर्धान पावल्या ते वेळीं । गुंडा विस्मयें मनीं तळमळी । गेले अंतराळीं सोडूनि मज ॥९५॥
धन्यधन्य देवा तुझी लीला । विप्ररुपें तुम्ही भेटलां । राजाईस गुंडा बोलता जाहला । मुख्य लाधला प्रसाद आम्हां ॥९६॥
विप्र कैचा तो शूलपाणि । साधु जाणावा नारदमुनि । आम्हांवरी कृपा करोनि । भेट देऊनि गेले कीं ॥९७॥
अंतर्धान पावल्या दोन्ही मूर्ति । राजाईसह गुंडा त्यांची कीर्ति । आठवूनि करुनि देवपूजन । सद्गुरुभजन स्वानंदें ॥९९॥
ज्या गृहीं गुंडा उतरले । त्यांनीं पाक सर्व सिध्द केले । माध्यान्हान्त वाट पहात राहिले । सर्वशोधिलें काशीक्षेत्र ॥१००॥
शोधितां विप्र जाहला कष्टी । कोठें असती न पडती दृष्टी । अकस्मात देखिले वाळवंटीं । जान्हवीतटीं ध्यानस्थ ॥१॥
विप्र वदे देऊनि हाक । गुंडा चला सिध्द जाहला पाक । वाट पाहती विप्र सकळिक । करितां आणिक विलंब कां ॥२॥
कालचि निश्चय केला आपण । करावें ब्राह्मणसंतर्पण । त्या अन्वयें पाक करुन । भोजना ब्राह्मण बोलाविले ॥३॥
उठा त्वरें देवालयीं चलावें । विश्वनाथा अभिषेकें पूजावें । नैवेद्य वैश्वदेवादि करावें । मग बसावें स्वस्थ तुम्ही ॥४॥
अवश्य म्हणोनि गुंडा उठिला । कांतेसह देवालयीं आला । मंत्रोदकविधीनें अभिषेक केला । शिव पूजिला यथासांग ॥५॥
ब्राह्मण सुवासिनी पंक्तीसी । घेऊनि सारिलें भोजनासी । विडा दक्षिणा देऊनि त्यांसी । गुंडा मानसीं आनंदले ॥६॥
पुढें एक मासपर्यंत । स्त्रीसह गुंडा राहिले काशींत । नित्य येतसे तेथें अयाचित । प्रयोजनें होत थाटानें ॥७॥
प्रात:स्नानसंध्या करोनि । ब्राह्मनपंक्ति बैसती तत्क्षणीं । गुंडा देवालयीं जाऊनि । नाचे भजनीं हरिनामें ॥८॥
संपतांचि तेथें एकमास । कांतेसहित गेले गयेस । दृष्टांत झाला तेथील पंडयास । गुंडापितरांस मुक्त करा ॥९॥
पंड्ये गुंडासी हुडकीत आले । गृहासि नेऊनि बिर्‍हाडा दिलें । गुंडानें तेव्हां गयावर्जन केलें । मुक्त जाहले पितृऋणातुनी ॥११०॥
विष्णुपदीं करोनि पिंडदान । आनंदवनासी येऊन । ब्राह्मणाची आज्ञा घेऊन । निघाले परतूनि स्वग्रामा ॥११॥
गुंडा येऊनि ग्रामाप्रति । तीच धरिली हरिनामीं प्रीति । ग्रामस्थ साहू येऊनि भेटती । प्रेमें गाती कीर्तिं त्यांची ॥१२॥
गुंडा एके बिर्‍हाडीं राहून । राहे हरिनामीं निमग्न । सुखदु:खभोगादि दारुण । टाकी जाळून ज्ञानाग्नींत ॥१३॥
असो गुंडा झारींत एका । क्षेत्रींचें तीर्थ आणिलें जें का । अभिषेकिल्या गुरुपादुका । पूजिलें देखा यथासांग ॥१४॥
ग्रामस्थ मिळूनि थोरथोर । शेटी महाजन सावकार । अयाचित मिळवूनि अपार । मावंदें सुंदर पैं केलें ॥१५॥
ब्राह्मनसुवासिनी साधुसंत । यतिभिक्षुक आले समस्त । आबालवृध्दाप्रसाद घेत । पात्र होत सहस्त्रवरी ॥१६॥
असो ऐसा जाहला प्रसंग । नित्य गुंडा वदे अभंग । भजन करितां नाचे पांडुरंग । पहावया रंग श्रोते येती ॥१७॥
नित्य प्रात:कालीं उठोन । शीतोदकें गुंडा करी स्नान । संध्याजपदेवतार्चन । उभा सारुन भजनासी ॥१८॥
कोणा कधीं अधिक न बोले । अखंड स्वानंदें अंतरीं डोले । अयाचिती आलें अथवा न आलें । जैसें घडलें तैसें वागे ॥१९॥
जरी अयाचित मिळे कांहीं । याचकपंक्तिवीण कदा न घेई । मुखें न म्हणे कोणा कधीं नाहीं । न म्हणे देही कोणासी ॥१२०॥
आठही प्रहर निशिदिनीं । गुंडा राहे श्रीहरिभजनीं । न बोले नायके इतर वाणी । नामध्यानीं निरंतर ॥२१॥
नित्य चालतां ऐसा क्रम । तव एक चमत्कार परम । झाला तो पुढें ऐका अनुपम । पुरुषोत्तम परीक्षा पाहे ॥२२॥
भवभयहरणा कृपाकरा । अनंतकृपें तुलसीप्रियकरा । प्रेरकनारायणा होशी दातारा । जगदोध्दारा जगद्गुरु ॥२३॥
इति श्रीगुंडामाहात्म्य मधुर । गुंडादेहदान विश्वेश्वर । घेऊनि देत राजाई सुंदर । कथा साचार । दशमाध्यायीं ॥१२४॥
॥ श्रीसद्गुरुगुंडार्पणमस्तु । श्रीरस्तु ॥

अध्याय १० वा समाप्त.

N/A

References : N/A
Last Updated : September 14, 2022

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP