मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीगुंडामाहात्म्य| अध्याय अकरावा श्रीगुंडामाहात्म्य अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा अध्याय सतरावा अध्याय अठरावा अध्याय एकोणिसावा अध्याय विसावा अध्याय एकविसावा अध्याय बाविसावा अध्याय तेविसावा अध्याय चोविसावा श्रीगुंडामाहात्म्य - अध्याय अकरावा प्रस्तुत ग्रंथ शके १८३६ यावर्षी कै. गुरूभक्त व्यंकटरमणा मच्छावार यांनी प्रसिद्ध केला होता. Tags : gunda mahatmyaगुंडा माहात्म्य अध्याय अकरावा Translation - भाषांतर ॥ श्रीवरदमूर्तये नम: ॥ ॥ श्रीगुरवे नम: ॥श्रीमन्महागणेशाय नम: । नमिला विघ्नेश प्रथमत: । तोचि देवो देवी शारदा स्वत: । गुरु सर्वत: व्यापक ॥१॥पूर्वाध्यायी वर्णिले कथानक । गुंडाची कथिली वर्तणूक । आतां पुढें ऐका श्रोते भाविक । अरिष्ट एक आलें तें ॥२॥चौर्यांशीलक्ष योनींमाझारीं । मनुष्यदेह दुर्लभ निर्धारीं । श्रुतीनें योजिले त्याहीवरी । वर्ण चारी यथानुक्रम ॥३॥ब्राह्मण क्षत्रियवैश्यशूद्रादि । यांत श्रेष्ठ ब्राह्मण ते अनादि । ब्राह्मण हे असती चार वेदी । पृथक भेदी शाखागोत्र ॥४॥क्षत्रियवैश्य गुप्त दोन्ही वर्ण । शूद्रांत भेद भिन्नभिन्न । यांचे कर्मधर्म साधारण । गांधर्व लग्न तांत्रिकें ॥५॥विप्राचे कर्मधर्म अवघड । श्रुत्युक्त ऋषींनी केले उघड । अविधि होतां कर्मलोप द्वाड । नाहीं सवड विधींत ॥६॥अचुकविधी कधीं कर्म नोहे । यासाठी प्रतिकार्यीं चिंता राहे । कारण विधीनें स्वर्ग लाहे । अविधीनें आहे नरकप्राप्ती ॥७॥स्वर्गनरक हा शास्त्रनिर्णय । कोणासी कैसा कोठील काय । हें न कळूनि वाटे अतिभय । विवेकें निर्भय सहजचेइ ॥८॥ज्योतिषशास्त्री गणित करुन । घटित पहाती सुज्ञ ब्राह्मण । यथाविधि होय पाणिग्रहण । वैधव्यपूर्ण दैवें न चुके ॥९॥अपूर्ण होतां वासना दुर्धर । विषयवांच्छा होय निरंतर । म्हणोनि परद्वारीं नारीनर । स्वाधीन साचार अनंगा ॥१०॥कित्येक स्त्रिया परद्वारत । करिती दुर्धर गर्भपात । ऐसे सूक्ष्म विचार अद्भुत । वर्णितां ग्रंथ वाढेल ॥१२॥असो आतां पूर्वानुसंधान । गुंडा नित्य करितां भजन । स्वानंदीं मन राहोनि निमग्न । नामीं संलग्न जिव्हा जाली ॥१३॥ग्रामस्थ जनांची होतसे दाटी । भजनीं नाचतां आनंद पोटीं । गुंडाची होऊनि अभेद दृष्टी । श्रीजगजेठी आठवितां ॥१४॥ग्रामीं एक विधवा बाला । तीसी विषम काळ पातला । कर्मधर्मसंयोग बळावला । गर्भ राहिला जारकर्में ॥१५॥गर्भासी जाहले पंचमास । वार्ता कळली सर्व जनांस । गुप्त बोलती एकमेकांस । कोणी त्रासे देती शब्दें ॥१६॥म्हणती या रांडेसी काय करावें । नासिक छेदूनि बाहेर घालावें । खरावरी इजला बैसवावें । मिरवावें सर्वग्रामीं ॥१७॥ग्रामस्थ मिळोनि सभेप्रति । जो तो मानी मीच प्रजापती । विधी कर्मधर्म सांगती । ही योग्य म्हणती शिक्षा तिशी ॥१८॥आणिलें अपराधी गर्भिणी स्त्रीला । सभाजनांनीं इत्यर्थ केला । आतां नेवोनि कचेरीला । द्यावी हिला शिक्षा मोठी ॥१९॥तीतें दाविला सरकारवाडा । निराधार स्त्रीसी घातला खोडा । केल्या कर्माचा करीं निवाडा । म्हणूनि उघडा ताप देती ॥२०॥संगे घेऊनि राजदूत । अबला फिरे भिक्षा मागत । गुंडाचे मठासमीप येत । भजन होतां ऐकू आलें ॥२१॥अन्न सेवितां तडागावरी । एकाग्र भजनश्रवण करी । तिसी वाटे जावें मठावरी । ते दुराचारी न सोडिती ॥२२॥दूतांसी अबला करी प्रार्थना । दयाळा मज न्या गुंडादर्शना । मग जाऊं राजसदना । द्रव मना आला दूतांच्या ॥२३॥दूतांनीं नेलें गुंडादर्शनासी । विधवा नमूनि विनवी गुंडासी । विटंबिती लोक ग्रामवासी । आपुली दासी रक्षावी ॥२४॥नेत्र भरोनी आणिलें पाणी । म्हणे दयाळा बलात्कारेंकरुनि । जारकर्मे जाहलें गर्भिणी । दुर्घट करणी घडली ही ॥२५॥मुख्य केलें जारानें हें कर्म । त्याचें सांगा म्हणति जातिनाम । मजसी लाज वाटे परम । काय वर्म करुं सांगा ॥२६॥सकळ मिळोनि ग्रामाधिकारी । मज बळेंचि नेलें राजद्वारीं । दंड करिती नानापरी । म्हणती लौकरी जार सांगें ॥२७॥तुम्ही आहां दयावंत एक । जगीं नसे तुम्हांविण आणिक । मातापिता तुम्ही तारक । रावरंक सम तुम्हां ॥२८॥या भवभयाब्धींतूनि अबला । तारावी सत्वर दीनदयाळा । आतां प्राणांतसमय पातला । तारक मजला कोणी नसे ॥२९॥तुम्हाऐशा थोराचें हे कर्म । म्हणूनि सांगावें वाटे नाम । तुमच्या भयें बंधन परम । तुटेल वर्म हें यथार्थ ॥३०॥गुंडा म्हणे मी होईना कां दु:खी । याउपायें जरी होशी सुखी । तरी माझें नाम घ्यावें मुखीं । हें घे शेखीं वचन माझें ॥३१॥तुजसाठीं जो राजद्वारीं ताप । होय तो मी भोगीन सुखरुप । कंठछेदाचा जरी असे संकल्प । तरी तो स्वल्प मानीन मी ॥३२॥गुंडा म्हणतां माते जाई । ऐकतांचि तेव्हां ती लागे पाई । धन्य म्हणे गुंडा तूं बापआई । संकटसमयीं साह्य केलें ॥३३॥मस्तक ठेवितां चरणावरी । गुंडा शांतवी अभय करीं । अनुतापें तापूनि सुंदरी । जात सत्वरीं निर्भयपणें ॥३४॥सज्जनदुर्जनादि सकळी । राजद्वारीं जमली मंडळी । दूत कोरडा आणूनि जवळी । म्हणती या वेळीं जार सांग ॥३५॥थांबा मी सांगतें म्हणे अंगना । नित्य जात होतें गुंडाभजना । मजला पाहूनि त्यांचे मना । दुष्टवासना उपजली ॥३६॥भजन करितो दांभिक वरी । परी पाप भरलें अंतरीं । मेला दुष्ट दुर्जन दुराचारी । घात निर्धारीं केला माझा ॥३७॥चांडाळा दुषिलें मी एक । तरी तुज न मिळे कधीं परलोक । अपकीर्तिं गातील सकळ निंदक । आशीर्वाद देख तुज माझा ॥३८॥ती निर्लज्जा आक्रंदोनि रडे । निंदक हंसोनि आले पुढें । म्हणती तेव्हां सुख केंवि घडे । रडसी वेडे आतां कां ॥३९॥आतां कां होसी व्यर्थ दु:खित । केल्याचें भोगीं प्रायश्चित्त । खदखदां हांसती समस्त । अधो पाहत दीन अबला ॥४०॥जार नाम गुंडाचें ऐकून । हंसूं लागले कुटिल जन । खेद पावले तेथील सज्जन । निष्कारण आळही म्हणती ॥४१॥आज गुंडा म्हणजे महासंत । त्यास दुषिती हे अरण्यपंडित । कोठेंही बोलूं हेंचि निश्चित । आमुचा अंतहोकां जरी ॥४२॥पुढें सरसावोनि म्हणती खळ । काय हें बोलणें पक्षपात केवळ । गुंडा साधु भासे परी चांडाळ । याचा विटाळ नहो कधीं ॥४३॥प्रार्थूनि म्हणती अधिकार्यांसी । गुंड्यासी आणावें आतां सभेसी । दूतीं जाऊनि आणिलें त्वरेंसी । प्रत्यक्ष निर्दोषी धरोनियां ॥४४॥खळ चवताळले गुंडावरी । जारिणीस म्हणती यासी धरीं । दोघांसी बांधोनि दृढपदरीं । फिरवूं बाजारीं खरावरतीं ॥४५॥हा गुंडा परम चांडाळ । नरनारी भ्रष्टविले सकळ । लावोनि टिळाटोपी माळ । बहू चोंढाळ केला यानें ॥४६॥अधिकारी म्हणे ऐसा अनर्थ । केला कैसा त्वां सांग यथार्थ । दुष्कर्माचें प्रायश्चित्त येथ । घेईं व्यर्थ काय आतां ॥४७॥तूं असोनि सुज्ञ परम । असें कां केलें अनुचित कर्म । पापपुण्य जाणसी धर्माधर्म । सांग वर्म काय याचें ॥४८॥तंव गुंडासी झाला अतिहर्ष । म्हणे कर्ताकरविता सर्वेश । जडदेह काय करील दोष । भोगूनि निर्दोष आत्मा तो ॥४९॥ज्याची असे अघटित घटना । तेथें किती ब्रह्मांडकल्पना । खाणी वाणी भोगादि रचना । हेळामात्रें जाणा घडामोडी ॥५०॥येथें कवणाचा कोण कारक । कवणासी कोण मारक । कवणाचा कोण तारक । आज्ञाधारक सर्व त्याचे ॥५१॥अनंत व्यापार अनंत लीला । नकळे त्याची ब्रह्मादिकाला । त्यानेंचि योग भोगादि केला । शेखीं राहिला वेगळाचि ॥५२॥तुम्ही केवळ सुज्ञ असोन । देहासी लावितां व्यर्थ दूषण । ऐसें ऐकतं गुंडावचन । खळ दुर्जन क्षोभले ॥५३॥म्हणती अरे त्रिभुवनीं एक । हा गुंडयाची असे ज्ञाता भाविक । प्रत्यक्ष करोनि ऐसें पातक । दावितो आणिक कौशल्य ॥५४॥हा चांडाळ करुनि करणी । कैसी पहा करितो संपादणी । जिरवितो मोठे शब्द बोलुनि । चुकेना करणी करावया ॥५५॥असो शास्त्रें बोलती उदंड । आतां शिक्षा सामभेददंड । व्यर्थ यासी कां करावा वितंड । लावावा दंड योग्य जो कां ॥५६॥राजनितिग्रंथे निश्चित । चौदा अन्याय महापंडित । बोलिले ते घडतां राज्यांत । विघ्न होत राज्यपदा ॥५७॥चोरपैशून्यमारणदंड । उच्चाटणकर्मभ्रष्ट उदंड । पाप अनिवार करिती षंढ । क्षुद्रप्रचंड मल्लयुध्द ॥५८॥हिंसा आणि शत्रुदंड अधर्म । मृत्युदंड जारदंड परम । चौदावें आवरणादि कर्म । ऐसा नियम राजनीति ॥५९॥त्यांत जारकर्म अतिदोष । तेणें गर्भधारण होतां स्त्रियेस । रक्षिलें पाहिजे राजानें त्यास । प्रसूतमासपर्यंत ॥६०॥मग प्रसूत जाहल्यावरी । घटस्फोट करावा तिचा निर्धारी । यातीचा तडफा तोडूनि वरी । जारिणी नारी विडंबावी ॥६१॥अशा संततीची जाति गोळक । किंवा शूद्रस्त्रीसंगें पातक । करितां प्रजा विदुर देख । भोगिती नरक कुपुत्र कर्में ॥६२॥मदांध पुरुष जो पातकी । भलत्या स्त्रीस्थानीं वीर्य टाकी । पुत्र कुकर्मे जाय कुंभिपाकीं । शेवटी नरकीं दु:ख भोगी ॥६३॥ऐशा प्रजादोषेकरुन । राजासी येतील महाविघ्न । यासाठीं जातिवर्णस्थापन । देऊनि धन करावें राजा ॥६४॥लग्न करोनि यथाविधी । कामबंधन करावें आधी । विद्याध्ययनादि धर्मसंबंधीं । शास्त्रसिध्दि करवावी ॥६५॥नुसतेच दोष लावून । राजानें न करावें प्रजापीडन । अन्यायासी यथायोग्य दंडन । करावें जाण राजानें ॥६६॥ऐसें जें कां महापातक । प्रजाकर्में राज्यासी घातक । शिक्षापालनादि नियामक । करण्याएक राजा समर्थ ॥६७॥असो माध्यान्ह समय आला । सभाजन गेले स्वगृहाला । अधिकारी जावें म्हणे गुंडाला । प्रमाण याला पाहूं उद्यां ॥६८॥गुंडा उठोनी गृहासी येत । तंव एका गृहीं प्रयोजन होत । गृहधनी निमंत्रण देत । गुंडासी म्हणत या अवश्य ॥६९॥ग्रामांतील विप्र बोलाविले । तत्काळ सर्वही जमले । गुंडा बोलावितां तेही आले । त्यांसी बैसविलें सन्मानें ॥७०॥तव एका गुंडासी सोडून । पात्र मांडूनि वाढिलें अन्न । संकल्प सोडावया कारण । तो यजमान बोलाविला ॥७१॥यजमान येऊनि ब्राह्मणांसी । म्हणे अन्न पोंचलें कीं सर्वांसी । पाहूं म्हणोनि आपण त्वरेसी । निघे पंक्तीसी पहात ॥७२॥तंव गुंडा तेथे बैसला । पात्र वाढिलें नाहीं त्याला । यजमान म्हणे ब्राह्मणाला । थांबा आला गुंडा आता ॥७३॥यांचें वाढूनि सत्वर पात्र । मग संकल्प सोडूं पवित्र । तंव ब्राह्मण बोलती सर्वत्र । हा अपवित्र नको पंक्ति ॥७४॥जरी यासी बैसवाल येथ । तरी आम्ही जाऊ समस्त । हें वचन ऐकतांचि दु:खित । मनीं होत घरधनी ॥७५॥यजमान करी बहु स्तवन । अतिनिग्रही सर्व ब्राह्मण । म्हणती या दुष्टासी भोजन । देतां दूषण आम्हां ये ॥७६॥सर्व तिष्ठति पात्रांवरी । गुंडापाशीं यजमान सत्वरी । येऊनि पुसे यासि कांहीं तरी । युक्ति बरी सांगा आतां ॥७७॥गुंडा म्हणेरे भक्तप्रिया । तूं आतां सोडीं या संशया । ब्राह्मणां आज्ञा दे जेवावया । विलंब वायां करुं नको ॥७८॥मी श्रीजगदीशाचे मनीं । परान्न न घ्यावें आजपासोनी । म्हणोनि केली ही ऐसी करणी । संशय व्यसनीं पडूं नको ॥७९॥विन्मुख न जावा आला अतिथी । हा असेल संशय तुझे चित्तीं । तरी तीर्थप्रसाद तुझे हातीं । देईं निश्चिती जातों मी ॥८०॥घरधन्यानें बोल मान्य केला । तीर्थप्रसाद गुंडासी दिधला । गुंडा माघारी गृहासि आला । भजनीं जाहला निमग्न ॥८१॥गजमाथां जेंवि सुमन । भार न होती कदापि जाण । तेंवि निंदेचें लोकभाषण । न रुचती जाण गुंडासी ॥८२॥गुंडा येवोनियां स्वगृहीं । कांतेसह निरशन केलें पाही । निशिदिनीं लागला हरिपायीं । खंड नाहीं नामीं जिव्हा ॥८३॥असो तो दिवस गेल्यावरी । निंदक पातले राजद्वारीं । म्हणती गुंडातें शिक्षा द्या बरी । मग देशांतरीं धाडावें ॥८४॥हा अधर्मी अनाचारी जाणावा । सहसा आमुचे ग्रामीं नसावा । याच्या दोषें करुनि आम्हां सर्वां । घातक पहा होईल ॥८५॥या दोघांतें खरारुढ करुन । विटंबावा जारजारीण । मृत्तिका अंगीं उधळून । ग्रामीं मिरवण काढावी ॥८६॥हीच शिक्षा मानली सर्वांसी । आनंद जाहला दुष्टांसी । खेद होतसे सज्जनमानसीं । अहर्निशीं अत्यंत ॥८७॥सभेंत आणिली स्त्री गरोदर । दुष्ट मिळोनि तेथें अपार । गुंडा येतांचि अविंध फार । विटंबिती पौरजन सर्व ॥८८॥गुंडा घेऊनि चिपळ्यावीणा । कांतेसह आले सभास्थानां । तंव कोणी शेण कोणी चुना । माखिती वदना कज्जलादि ॥८९॥कोणी दुष्ट मारिती खडे । एक पुढें वाजवी डफडें । त्या त्रिवर्गासी घालूनि पुढें । मिरविती साडे चहूं हटां ॥९०॥आश्चर्य मानिती स्वर्गी देव । धन्य गुंडाचा एकाग्रभाव । विस्मित सिद्धचारणगंधर्व । पहाती अपूर्व विमानारुढ ॥९१॥माध्यान्हीं ग्रामांत फिरविलें । तसेंच तेव्हां बाहेरी आणिलें । पौरजनीं बहु विटंबिलें । माघारे गेले नरनारी ॥९२॥स्मशानभूमि ग्रामाबाहेर । पारिभद्र वृक्ष असे थोर । तेथें बैसले घटिका चार । परतले पौरग्रामांत ॥९३॥दटावूनि सांगती राजदूत । पुन्हां तुम्हीं न यावें ग्रामांत । अधिकार्यांसी कळविला वृत्तांत । परी दु:खित मनीं झाले ॥९४॥अतिउष्णीं फिरविलें माध्यान्हीं । तेणें बहु व्याकुळ गर्भिणी । तेव्हां राजाई चिंता करी मनीं । पुढें करणी केविं होय ॥९५॥गुंडा स्त्रीसीं सांगे ही महामाया । जगदुत्पत्तीचा मूळ पाया । मज परमार्था लावूनि ये समया । विरागीं काया बळावली ॥९६॥आतां इच्या कृपें प्रखर । परमार्थ घडे वाटतो साचार । नसतां मी आळसी पामर । कैंचा भवसागर तरतों ॥९७॥तंव गुंडा नमोनि तिचे पायीं । वदे सांग वो काय इच्छा आई । वाटतां फिरुनि ग्रामांत जांई । अथवा येईं आम्हांसवें ॥९८॥गर्भिणी म्हणे धन्य गुरुमूर्ति । मी वृथा आळ तुम्हावरतीं । घातला हा अन्याय जगतीं । माझा निश्चिती जाहला ॥९९॥दुर्धर कर्माचें ओझें । वृथा घातलें स्वामीं माथां तुझे । दयाब्धि तूं गहन सर्वस्वी जे । अपराध माझे साहिले ॥१००॥जो अन्याय विधिहरिहर । आकाश धरणी न घे भार । न केला सुरासुरीं अंगिकार । तो तूं दुस्तर स्वीकारिसी ॥१॥येरु सद्गद जाहली चित्तीं । रोमांचित पायीं लागोनि पुढती । म्हणे भो तारक तूं गुरुमूर्ति । सांगसी त्या रीतीं वर्तेन ॥२॥आतां योग्य जें वाटे तुजला । तारीं कां मारी श्रीगुरु मजला । गुंडानें कृपाकर शिरीं ठेविला । चला म्हणाला स्वमुखें ॥३॥उत्तरपंथ लक्षूनि केवळ । उठोनि जाती त्रिवर्ग तत्काळ । पर्जन्यवृष्टि ग्रीष्मकाळ । पूर तुंबळ सरितेसी ॥४॥दुष्ट दुर्जन मागें पळती । चमत्कार पाहूं हे कोठें जाती । सकळ जन मिळोनि भोवतीं । पाहूं म्हणती करितो काय ॥५॥तिघेही गेले उद्दालिकातीरीं । गुंडा ध्यानस्त मुहूर्तभरी । उभा राहूनि आठवी हरी । सद्भाव अंतरीं धरोनि ॥६॥गुंडासी नमूनि सती गर्भिणी । उदकीं रिघाली जयगुरु म्हणोनि । किंचित जल न लागतां चरणीं । गेली तरोनि पैलतीरा ॥७॥महापूर तरोनि सती गेली । ते सर्वांनी दृष्टी पाहिली । जाऊनि दिव्य विमानीं बैसली । मुक्त झाली गर्भासह ॥८॥विमानी बैसली जेव्हां गर्भिणी । तेव्हां पाहिली सज्जनें नयनीं । जळ न लागतां गेली तरोनी । एवढें दुर्जनीं विलोकिलें ॥९॥असो भक्ताभिमानी भगवंत । कधीं न मोडी भक्तमनोरथ । आज्ञाधारक होऊनि राबत । तेव्हां न गणित पापपुण्य ॥११०॥निंदोनियां सिध्दपुरुष परम । जो करी यज्ञदानादि कर्म । त्यातें नेदी पद उत्तम । पुरुषोत्तम कदापि ॥११॥ज्यावरी होय सत्पुरुषप्रसाद । त्यातें हरि दे कैवल्यपद । हेंचि गुह्य मूळ असे विशद । शास्त्रवेदपुराणींही ॥१२॥असो ऐसा प्रसंग पाहून । आश्चर्य करिती सकल जन । म्हणती ही परम जारीण । नदी तरोन गेली केंवि ॥१३॥सज्जन मनीं अत्यंत कळवळा । गुंडाकीर्ति गाती वेळोवेळां । ज्याचे स्वाधीन घनसांवळा । त्याचा आगळा प्रताप लोकीं ॥१४॥दुष्टांनीं त्यासी व्यर्थ दूषिलें । म्हणोनि काय लघुत्व आलें । आपुलें पदीं धोंडे घातले । ऐसें जाहलें त्यांचें त्यांसी ॥१५॥दुष्ट सहवास कधीं श्रीहरि । आम्हां न घडो गा निर्धारीं । साधुसंतसेवा घडो करीं । ऐसें करीं दयाळा ॥१६॥पुढें श्रोते व्हावें सावधान । होय चवदा अभंगांचें भजन । कर्ताकरविता होऊनि आपण । नारायणा पूर्णनिमित्त देसी ॥१७॥इति श्रीगुंडामाहात्म्यविख्यात । उध्दरिली गर्भिणी आरोपित । नंतर गुंडागमन अरण्यांत । अध्याय समाप्त एकादश हा ॥११८॥॥ श्रीसद्गुरुगुंडार्पणमस्तु । श्रीरस्तु ॥अध्याय ११ वा समाप्त. N/A References : N/A Last Updated : September 14, 2022 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP