मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीगुंडामाहात्म्य| अध्याय दुसरा श्रीगुंडामाहात्म्य अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चवथा अध्याय पाचवा अध्याय सहावा अध्याय सातवा अध्याय आठवा अध्याय नववा अध्याय दहावा अध्याय अकरावा अध्याय बारावा अध्याय तेरावा अध्याय चौदावा अध्याय पंधरावा अध्याय सोळावा अध्याय सतरावा अध्याय अठरावा अध्याय एकोणिसावा अध्याय विसावा अध्याय एकविसावा अध्याय बाविसावा अध्याय तेविसावा अध्याय चोविसावा श्रीगुंडामाहात्म्य - अध्याय दुसरा प्रस्तुत ग्रंथ शके १८३६ यावर्षी कै. गुरूभक्त व्यंकटरमणा मच्छावार यांनी प्रसिद्ध केला होता. Tags : gunda mahatmyaगुंडा माहात्म्य अध्याय दुसरा Translation - भाषांतर ॥ श्री गणेशाय नम: ॥ श्रीगुरवे नम: ॥ॐ नमोजी गणेशाद्या । निर्गुणसगुणा वेदप्रतिपाद्या । तूंचि शारदा विद्याविद्या । स्वसंवेद्या सद्गुरुराया ॥१॥तुज वर्णितां श्रुतिस्मृति । थकल्य नेतिनेति म्हणती । परी संत तुज आकळोनि चित्तीं । लीला गाती स्वानंदे ॥२॥असो पूर्वानुसंधान आतां । श्रोते व्हावे सावधचित्ता । श्रीगुंडामाहात्म्य श्रेष्ठ कथा । भवव्यथानाशक जे ॥३॥असो एकदां एकांतसदनीं । योगध्यानीं श्रीगुरु चूडामणी । तेथें त्र्यंबकेश्वर प्रगटोनी । प्रत्यक्ष वदनीं बोलती ॥४॥ऐक चूडामणि योगिराज । एक मागतों तुजला मी आज । तें काहीं मोठेंही नाहीं काज । घडे सहज कीर्तिप्रद ॥५॥कन्या उपवर म्हणोनि चिंता । बहु करीतसे तुझी कांता । यासाठीं एक येतें माझे मता । विलंब आतां न करावा ॥६॥तुझा शिष्य गुंडा महाभक्त । सत्कीर्तिकर होईल विरक्त । तुझी कन्याही सुशील अनुरक्त । जोडा युक्त उभयतांचा ॥७॥जेवीं रतीसि शोभे मदन । कीं सीताराम रुक्मिणीकृष्ण । तेवीं उभयतां रुपसंपन्न । गुणनिधान अवतरले ॥८॥आतां तुझी कन्या राजाबाई । विलंब न करीं गुंडासि देंई । कुलस्वामी आज्ञा वंदोनि पाई । ठेवली डोई चूडामणी ॥९॥ध्यानधारणा सारुनि तात्काळ । स्त्रीसि कळवी वृत्तांत सकळ । माझ्याही मनीं पूर्वीच पुष्कळ । परी चित्तीं मूळ यावें तुझें ॥१०॥कौतुकें स्त्री म्हणे हें काय । किती महत्व तरी देणें माय । स्वामिमतेंचि होणें हा न्याय । अबला उपाय पतिचरणीं ॥११॥माझ्या मनीं हेंचि सांगावे वाटे । साधनीं तुम्हां सवड कोठें । परी देवाचे उपकार मोठे । हें तरी खोटें करु नका ॥१२॥स्वामी म्हणती सुदिन सत्वरीं । आजचि साहित्या आरंभ करीं । स्त्री वदे मुहूर्ता झडकरी । पहा सुंदरी बोलावितें ॥१३॥गृहीं आरंभिती साहित्याला । स्वामीनीं एक शिष्य बोलाविला । म्हणे पाचारीं थोर ब्राह्मणाला । गुंडाही आणिला पाहिजे आतां ॥१४॥शिष्यमूल त्वरें धांवले । थोर ब्राह्मण तत्काल आले । गुंडासीही तेव्हां आणिलें । पद वंदिलें गुंडानें ॥१५॥चूडामणीनें प्रार्थना केली । म्या गुंडासी राजाई दिधली । तिथी पाहिजे समीप ठरली । आप्तमंडळी ये ऐसी ॥१६॥दशवर्षे वधू राजाबाईस । वर गुंडासी पंचदशवर्षे । सर्वजिन्नामसंवत्सर चैत्रमास । शुध्दपंचमीस दहाघटि ॥१७॥शके सोळाशेंएकोननवद । लग्नतिथी नेमिली ब्रह्मवृंदें । स्वजनसोयरे आले विशद । वाद्यनाद घेवोनी ॥१८॥साधा म्हणती लग्नघटी । विप्र करिती धांदल मोठी । कोणी सर्वांसी अक्षता वांटी । अंतरपटीं वधूवर उभे ॥१९॥विप्र म्हणती सावधान । गुंडा पाहे श्रीगुरुचरण । स्वामी करिती समाधान । करावें स्मरण प्रभूचें ॥२०॥असावधा सावधत्व न भेटे । सावधा सावध म्हणणें खोटें । स्वरुप एकटें दोन्हीं ठायीं ॥२१॥असो यथासांग दिवस चार । पाणिग्रहणविधी सर्वोपचार । सालंकृत कन्यादानविचार । घडला साचार सोहळा ॥२२॥पांच दिन भोजनदानरंग । वधूवर मिरवले अव्यंग । जन म्हणती पाहोनि प्रसंग । रतिअनंग शोभती दुजे ॥२३॥मग घेवोनि शकुनताट । वधूवर गृहीं आणिले नीट । सुखकाळ जातसे अतुट । कथा चोखट ऐका पुढें ॥२४॥चूडामणि स्वस्थ एके दिवशीं । बैसले असतां आलें मानसीं । आज ग्रहणपर्वणी माध्यान्हासी । गंगास्नानासी जावें अवश्य ॥२५॥कोणा न सांगतां एकटे पायीं । त्वरें निघाले प्रात:समयीं । तें शिष्यांसी सांगतां राजाबाई । गांठिलें लवलाहीं सद्गुरुसी ॥२६॥तेव्हां गुंडा येवोनि इकडे । सद्गुरुसी पाहे चहूंकडे । नाहींत म्हणोनी स्त्रीमुखाकडे । विलोकितां दडे गृहामाजी ॥२७॥गुंडा म्हणे आतां कोणा पुसावें । राजाई वदे गंगेसी गेले भावें । तुम्ही जातां हे लाडूमात्र न्यावे । म्हणतां द्यावे घाली पदरीं ॥२८॥गुंडा तत्काल पंथे निघाला । मार्ग क्रमोनी जातसे एकला । सद्गुरुशोध पुसे पांथिकाला । म्हणती गंगेला गेला साधु ॥२९॥गुंडा जातसे अतितांतडी । मार्गी पर्वत सघन झाडी । क्रमोनि त्रियोजन व्दादशघडी । गंगाथडीं पातले ॥३०॥तंव सद्गुरु ग्रहणस्नान । सारिलें योगदेवतार्चन । स्वयें बोलती शिष्यालागून । फराळा कारणें त्वरं आणा ॥३१॥एकाचें मुखएक पहाती । सर्वशिष्यांची खुंटली मती । घरींच जरि काहीं गोष्ट कळती । फराळा सांगाती ती आणतों ॥३२॥गुंडा धांवत येतां पाहोनी बाळा । म्हणति कांही आणिलें कीं फराळा । पुढें ठेवितां घेतला गोळा । गुरुदयाळा प्रेम नावरे ॥३३॥त्यांतील एक घेतला ग्रास । गुंडामुखीं घातला शेष । राहिले चार गुंडाहातीं खास । प्रसाद सर्वांसी वांटिला ॥३४॥तेव्हां सर्व शिष्यांतें आला क्रोध । गुंडयासींच कां दिला प्रसाद । आम्हीं अप्रिय तो प्रिय प्रसिध्द । येणें सिध्द होऊं पाहे ॥३५॥असो दिन आला तीन प्रहर । शिष्य क्षुधेनें व्याकुळ समग्र । हा सद्गुरुसी कळतां समाचार । नवल अपार वर्तलें ॥३६॥गंगास्नाना आले विठ्ठलशेटी । संगे घेऊनि साहित्य कोटी । समीप उतरले वाळवंटी । बिर्हाड निकटीं स्वामींच्या ॥३७॥श्रीविठ्ठल स्वयें होवोनि साहू । चूडामणीसी गुह्य बोले बहू । करावा पाक आम्ही जेवूं । मग जावूं आपल्याठायीं ॥३८॥शिष्यांसी स्वामी आज्ञा करी । पाक करावा तुम्ही झडकरी । साहित्य पुरवी साहू हरी । उठा विचारीं पडूं नका ॥३९॥भुकेनें सर्वही खवळले । तत्काल पाक सिध्द केले । सर्व शिष्य भोजना बैसले । गुंडा राहिले वाढावया ॥४०॥भोजनीं गेली प्रहररात्र । मार्गक्लेशग्लानीनें सर्वत्र । ठायींच झोपेनें झाकले नेत्र । लोळतां गात्रशुध्दि नाहीं ॥४१॥गुंडा मात्र जागृत जेवित । चूडामणी ध्यानस्थयोगांत । तों श्रीविठ्ठल आले ध्यानांत । गुंडासहित त्या वेळीं ॥४२॥चूडामणी हातीं गुंडाशिष्य । देवोनि म्हणे देईं उपदेश । कृपा यावर विशेष । स्वमुखें ईश बोलिला ॥४३॥घेतले एकग्रास सुदामपोहे । साठीं राज्य दिलें भार मी वाहें । तीन ग्रास घेतां त्रिलोक पाहे । द्यावें राज्य हें कां न लागतें ॥४४॥तैसा त्वां ग्रास एक घेतला । प्रत्युपकार करणें योग्य तुला । उपदेश देवोनि शांतविला । पाहिजे या काला माझा गुंडा ॥४५॥आणीक वांटिले लाडू सर्वांस । गुंडा तेणें तृप्त केला सर्वेश । ते फेडील नारदोपदेश । पुढें त्यास भेटूनी ॥४६॥तिसरा ग्रास गुंडा स्वयें खात । त्यायोगें जाहला आत्मा शांत । तो प्रत्युपकार मी भगवंत । स्वतां निश्चित फेडीन ॥४७॥सुदाम्या दिले इहलोकराज्य । गुंडा हा करीन त्रिलोकीं पूज्य । भजक गुंडा भजनीं मी भज्य । नाचे निर्लज्ज प्रीतिस्तव ॥४८॥कारण मी प्रेमाचा भुकेला । मद्भक्तिस्तव जेणें देह विकिला । मग मजविण माझ्या गुंड्याला । कोण भुकेला पुसे सांग ॥४९॥गुंडासी चूडामणिपदरीं । घालोनि घेतलें वचन करीं । मग अदृश्य जाहला श्रीहरी । ध्यानांतरीं न दिसे ॥५०॥चूडामणि ध्यान विसर्जूण । पहाता गुंडा बैसला जेऊन । हांक दिली बापा गुंडा ये म्हणोन । तत्काळ उठोनपातला ॥५१॥आज्ञा काय म्हणोनी लागे पायीं । या माध्यान्हरात्रीं एकांतठायीं । सद्गुरु म्हणती मंत्र तूं घेईं । हा जांवई स्मृति ही नसे ॥५२॥गुंडा अत्यंत हर्ष पावला । स्वामी आणितों पूजासाहित्याला । गुरु म्हणती या दाक्षिण्याला । कां भुलला अससी तूं ॥५३॥मार्गानें मानसपूजा गुंडा । करुनि नैवेद्य अर्पिला उंडा । आणि तृप्त केलें विप्रझुंडा । पुन्हां त्या वितंडा न पवत ॥५४॥गुरुआज्ञा वंदूनि शिरीं । मंत्र घेतला नवाक्षरी । विलामृततृप्ति उदरीं । जाहली निर्धारीं गुरुकृपा ॥५५॥घडला हस्तमस्तकसंयोग । तेव्हांचि साधले सकल योग । लाजोनि योगयागादिस्वर्ग । पळाले भवरोग तत्क्षणीं ॥५६॥गुंडा स्तब्ध अति आल्हादें । सावध होईरे गुरु वदे । स्वात्मज्ञानावीण बोलिले वेदें । भोंडकीं सुप्तिमदें श्रम ऐसा ॥५७॥आत्मानंदे मनीं स्तब्धता घडे । गुण त्यागितां निर्गुणत्व जोडे । सगुणमूर्ति ध्यातां रोकडें । उभें पुढें हरिरुप ॥५८॥या नांव जाण समाधि परम । इतर समाधि केवळ श्रम । सावध आचरी स्वधर्मकर्म । जाणोनि वर्म निष्काम वागे ॥५९॥ऐसा बोध करुनि निश्चिती । अनुग्रह देवोनि गुंडाप्रति । मूळपरंपरा सांगती । ऐका म्हणती सद्गुरु ॥६०॥मूळसांप्रदायमंत्रविधी । कोणापासूनि कोणा सिध्दि । जाहली हें जाणावें तुवां आधीं । म्हणोनि बोधी चूडामणि ॥६१॥गुंडागुरुपरंपरेचे कथन । श्रोतीं ऐकावें सावधान । चूडामणि तेव्हां मूळापासून । गुंडालागून बोधिती ॥६२॥एकदां शिव कैलासीं असतां । पुसती झाली स्कंदमाता । तुमची मुख्य कोण देवता । मंत्र आदिनाथा सांगावे ॥६३॥शिव म्हणे यांसी एकांतस्थान । पाहून तुजला करीं कथन । तेव्हां नंदी आणिला शृंगारुन । त्यावरि बैसून निघाले ॥६४॥गेले ओलांडून क्षीरसिंधूंत । मच्छेंद्रनाथ होते गुप्त । त्यांसी तो मंत्र जाहला श्रुत । करणी अद्भुत जयाची ॥६६॥मग ते तीर्थयात्रेसी निघाले । सप्तशृंगपर्वतावरी आले । तेथें चौरंगीनाथ पडले । तुटोनि गेले हस्तपद ॥६७॥मच्छेंद्रनाथाचें होतां दर्शन । पूर्ववत् झाले करचरण । तें नवनाथचरित्रीं कथन । असे पूर्ण पहावें ॥६८॥असो ऐसे मच्छेंद्र फिरतां । एक ग्रामीं भिक्षा मागतां । दु:खित बाईसी म्हणती माता । काय आता दु:ख तुज ॥६९॥ते सांगे नाही संतान । तव रक्षा दिली अभिमंत्रोन । तिने कुभावें उकिरडीं नेऊन । दिलीअ टाकून तत्काळ ॥७०॥पुन्हा व्दादशवर्षानंतर । मच्छेंद्र पुसती कोठें वो कुमार । तिनें घाबरुण दिलें उत्तर । केला अविचार स्वामी मीं ॥७१॥भस्म उकिरड्यामाजीं टाकिलें । कोठें पुसतां नेवोनि दाविलें । मच्छेंद्रांनी पाचारिलें । उत्तर दिधलें गोरक्षें ॥७२॥श्रीगुरु बोलावितां तत्काळीं । गोरक्ष आला तेव्हां जवळी । उपदेश देऊनि त्यावेळीं । आपुल्या स्थळीं शोभत ॥७३॥गुरुसेवा करोनि दिन काहीं । पुढें तीर्थयात्रेसी गेला तोही । वाटे जातां गहिनी त्यासमयें । भेटला डोई नांगर ज्याचे ॥७४॥तो योगियासी म्हणे साधन काय । करुनि पावलासि योग निर्भय । सांग वो मजला उपाय । जेणें अभय होईन मी ॥७५॥गोरक्ष म्हणती हेंचि करावें । कधीं मनाचें नायकावें । तेणे सकळही योग पावे । मुख्य जाणावें वर्म हें ॥७६॥नांगर शिरीं होता तेव्हां जैसे । उभे राहिले तेथेंचि तैसे । व्दादशवर्षे जातां ऐसें । आले अनायासें गोरक्ष ॥७७॥तैसाचि उभा गहिनी त्या वेळीं । पाहूनि गोरक्षें येऊनि जवळी । नांगर उतरविला तत्काळीं । मुख कुरवाळी तयाचें ॥७८॥त्याशींकरितां मंत्रोपदेश । योग पावला सकळ निर्दोश । गेले तीर्थयात्रेसि अनायास । स्वयंप्रकाश जाहला ॥७९॥गहिनीनें निवृत्तिनाथ बोधिला । गुरुसांप्रदाय उपदेश केला । मंत्रसामर्थ्य अंगीं लाधला । पूर्ण जाहला सिध्द स्वयं ॥८०॥तो उपदेश ज्ञानदेव । निवृत्तीनाथापासून घे ठेव । ज्यानें केली अपूर्व । भक्तासि भव तराया ॥८१॥ज्याची समाधी अलंकापुरीं । महाइंद्रायणी वाहे शेजारीं । सुवर्ण अश्वत्थ अक्षय्य द्वारीं । जेथें निर्धारीं अजानवृक्ष ॥८२॥असो ते ज्ञानेश्वरी घेऊन । देवनाथ करी नित्य पठण । शेवटीं त्या उपरती होऊन । वनीं जाऊन बैसला ॥८३॥म्हणे सप्तदिन लोटोनि गेले । अजूनि ज्ञानेश नाहीं भेटले । हें वृथा मी कासया वाचिलें । व्यर्थ गेले श्रम सर्व ॥८४॥ऐसें बोलोनि तेव्हां झडकरी । तीक्ष्ण चाकू घेतला करीं । जिव्हा छेदितां पुसती जरी । सांगूं शरीरीं कुष्ठ लोकां ॥८५॥जिव्हा छेदितां स्वयमेव । तत्काल प्रगटले ज्ञानदेव । जिव्हेसी जिव्हा लागोनि तंव । केला अपूर्व उपदेश ॥८६॥गुरुकृपा होतां निर्धारीं । गुह्य ज्ञान पावला सत्वरीं । नित्य वाचितां ज्ञानेश्वरी । आनंद अंतरीं न समाये ॥८७॥तोचि प्रज्ञान उपदेश । चूडामणीशीं अविनाश । लाधला तेणें जाहला संतोष । क्रीडा निर्दोष पैं केली ॥८८॥तेथूनि गुह्यज्ञान गुंडासि पूर्ण । गुरुकृपें प्राप्त झालें निधान । ऐसी गुरुपरंपरा ऐकून । गुंडामन संतोषलें ॥८९॥ही ऐसी गुरुपरंपरा बोलतां । सद्गुरुचरणीं ठेविला माथा । धन्य मानूनि श्रीगुरुनाथा । जाहला बोलता अभंग ॥९०॥अभंग ॥धन्य गुरु चूडामणि । नामासारखी करणी ॥नाम सोनाबाई बाळा । हातीं कथिलाचा वाळा ॥तैसा नोहे स्वामी माझा । सकळ योगियांचा राजा ॥काय उतराई होऊं त्याला । जेणे हातीं विठ्ठल दिला ॥त्याच्या चरणाचा किंकर । गुंडा सराफाचा पोर ॥१॥तेव्हां झाला उष:काल । उठले शिष्यगण सकल । सद्गुरु स्नान करोनी तत्काळ । ध्यानस्थ केवळ बैसले ॥९१॥पूजासंध्या सारोनी जप । स्वपुरा जाण्याचा केला संकल्प । तो येऊनि विठ्ठलवणिग्रूप । अयाचित अमुप दे पुन्हां ॥९२॥शिष्यें केली पाकनिष्पत्ती । साहूसहित भोजन करिती । विडादक्षिणा देऊनि पुढती । करी विनंती साहू तो ॥९३॥योगी अंतरसाक्षी तूं सुज्ञ । बहुदिसां भेटी तृषित कर्ण । आज ऐकावें वाटतें कीर्तन । गतदिनीं भजन ऐकिलें ॥९४॥चूडामणि म्हणे विठ्ठलशेटी । उत्कंठा तुम्हां कीर्तनासाठीं । आज गुंडा कीर्तन वाळवंटी । करील जगजेठी साह्यत्वें ॥९५॥तों बध्दपाणी बोले गुंडा । सद्गुरुसमर्था ज्ञानमार्तंडा । तूं कृपेनें बोलविशी धोंडा । मग या मूढा अशक्य काय ॥९६॥मीं कधीं शास्त्र देखिले नाहीं । किंवा श्लोक आर्यापाठ कांही । एकमात्र साचें सद्गुरुपायीं । ठेविली डोयी कृपा इच्छे ॥९७॥तंव सद्गुरु कृपाकर । मस्तकीं ठेवोनि देतसे धीर । आतां गुंडा न करी विचार । कीर्तननिर्धार करी येथे ॥९८॥ज्या प्रभुइच्छे वायु हाले । आकाश स्तंभावीण धरिलें । समुद्र मर्यादें आकळिलें । हा गुंडा बोले नवल काय ॥९९॥बृहस्पतिवत् बोलेल मुका । जन्मांध पाहिल त्रिलोका । पूर्वापरसाह्य प्रभु साधकां । जाणोनि तूं का मग भिशी ॥१००॥पूर्वी मी कीर्तन करितां मागें । तूंचि राहोनि पद अभंगें । साह्य केलेंस श्लोकादि अंगें । तूं त्याचयोगें कथा करी ॥१॥तंव गुरुवाक्य ऐकून हे । गुंडा नमूनि उभा राहे । साहूनें सिध्दता केली आहे । आटोपली पाहे सायंसंध्या ॥२॥त्यांत कांही शिष्य होते दुष्ट । गुंडा कीर्तनाची ऐकतां गोष्ट । हंसू लागले धरुन पोट । म्हणती चावट गुंडा असे ॥३॥काय हा गुंडा कथा करिल आज । मग मात्र फजिती पावे पैज । अहो हा मूर्ख खरा वाटे मज । लोक तर सहज म्हणतील ॥४॥एक म्हणे गुंडाची काय कथा । समर्थ कांपती सभा पाहतां । आणीक समक्ष सद्गुरुनाथा । हें सर्वथां न घडेची ॥५॥त्यांत ज्यांसी गुंडा सौजन्य । ते म्हणती व्यर्थकां दौर्जन्य । गुंडा सद्गुरुसेवे जाहला मान्य । बुध्दिशून्य नीच तुम्ही ॥६॥इतक्यांत गुरुंनी दिली हांक । तत्काळ पातले शिष्य भाविक । कथा गुंडाची आज नियामक । साह्य सकळिक व्हावें तुम्ही ॥७॥तवं शिष्य गुरुआज्ञा वंदून । सिध्द टाळमृदंग घेऊन । पुढें गुंडा उभा राहे जाऊन । सद्गुरुसी नमून तत्काळ ॥८॥यात्रेकरु श्रोते सघन दाटी । बैसले भोवतीं त्या वाळवंटी । वृध्द विप्रवेश घेऊनि काठी । कथेसाठीं आले हरिहर ॥९॥गुंडानें आरंभिली कथा । वंदूनि सद्गुरु पंढरिनाथा । रंग चढतां डोलविती माथा । सद्गुरुसमर्था हर्ष नावरे ॥११०॥कथेसी आला अत्यंत रंग । शास्त्री पंडित जाहले दंग । अनुमोदन देती अव्यंग । पाहूनि प्रसंग कथेचा ॥११॥जेव्हां कथेसी उभा गुंडा । गुरुकृपेचा फडकला झेंडा । एकमेक पाहती जनझुंडा । पुढें काय तोंडा येती बोल ॥१२॥दावीत पंचीकरणशोध । जीवशिवब्रह्म अद्वयबोध । भक्तिज्ञानवैराग्य वृत्तिरोध । साधक विविध वर्तनही ॥१३॥चहूं वेदांचे चार महावाक्य । येणें बोधिलें आत्मानात्म ऐक्य । अन्वयव्यतिरेके बोले शक्य । समाधि मुख्य प्रज्ञानंब्रह्म ॥१४॥ऐशा बोधें श्रोतें मंडळी । स्वानंद प्रत्ययें पीटिती टाळी । प्रणवविठ्ठल देती आरोळी । नसे त्या काळीं देहभान १५॥ज्ञानादेव तु कैवल्यं । श्रुतिचा डांगोरा ज्ञानचि स्वयं । पुरुषसूक्तीं यद्भुतं यच्च भव्यं । आत्मा अयं जगद्रूप ॥१६॥श्रीगुरुच्या कृपेंकरुन । श्रोते स्वानंदी जाहले निमग्न । नाहींच राहिलें देहभान । संपवी कीर्तन तें गुंडा ॥१७॥गुंडानें श्रीसद्गुरु नमिला । चूडामणीनें कृपाहस्त ठेविला । पुढें नमी सभासद ब्राह्मणांला । मग श्रोत्यांला सर्वही ॥१८॥श्रोतेमंडळी स्वस्थाना जाती । साहुविठ्ठलशेठी आज्ञा घेती । बिर्हाडासह अदृश्य होती । शिष्य पाहती अकस्मात ॥१९॥आतांच साहु बिर्हाडाजवळ । होता तो नाहींसा झाला केवळ । स्वामीसी शिष्य पुसती सकळ । येरु मायाजाळ नेणों म्हणे ॥१२०॥गुंडा म्हणे हा होय परमात्मा । अयाचित देऊनियां आम्हां । तृप्त केला प्रत्यक्ष अंतरात्मा । गुरुमहिमा अगाध हा ॥२१॥गुंडामुखें कळतां समाचारु । म्हणति धन्य आमुचा श्रीगुरु । संकटीं साह्य जयातें ईश्वरु । तो दयावरु न करी जाय ॥२२॥कृपाकटाक्षें मिळेल सायुज्य । दैवहीनातेंही हे साम्राज्य । आम्हां न कळोनी महिमापूज्य । निंदिले निर्लज्ज गुंडासी ॥२३॥असो होतांचि अरुणोदय । स्नानसंध्या सारिती सद्गुरुराय । स्वग्रामा जाती जनसमुदाय । वंदूनि पाय श्रीगुरुचे ॥२४॥हेही आपल्या ग्रामासी निघाले । गुंडा सद्गुरुसंगें राहिले । इतर शिष्य मागेंपुढें चालिले । येवोनि पातले स्वगृहासी ॥२५॥आतां कथा पुढें सुंदर । श्रीगुंडाची ऐका सादर । जेणें सुलभतर भवसागर । ऐकतां निरंतर भाविकां ॥२६॥इति श्रीसद्गुरु गुंडामाहात्म्य । सेवोत श्रोते भाविक परम । जें भक्तिज्ञानप्रद वैराग्यवर्म । महाभवश्रमनाशक ॥२७॥भक्तवरदा लक्ष्मीरमणा । तारक होसी तूं नारायणा । अनंतकृपाकर सद्गुरुराणा । प्रेरकमना तुलसीप्रिया ॥२८॥इति श्रीगुरुगुंडामाहात्म्य । गुंडालग्न अनुग्रहादि सप्रेम । द्वितीयाध्यायीं कथा उत्तम । गोड परम संपली ॥२९॥॥ श्रीसद्गुरुगुंडार्पणमस्तु । श्रीरस्तु ॥अध्याय २ रा समाप्त. N/A References : N/A Last Updated : September 13, 2022 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP