नृसिंह जयंती - प्रल्हादाचा पंथ

श्रीयुत विनायक वासुदेव साठे यांनी रचलेली श्रीदत्त भजन गाथा.


चालेना उपाय बाळ तो मरेना । खिन्न्त्व ये मना दैत्याचीया ॥१॥
मग उपाध्याय दैत्यासी प्रार्थिती । मानुं नये खंती बालकाची ॥२॥
बालबुद्धि आहे शिकवूं पुन्हां त्यासी । म्हणुनि आश्रमासी नेती पुन्हा ॥३॥
परोपरी तया द्विज शिकविती । भौतिकशास्त्ररीती निजबुद्धी ॥४॥
परी तयासि ते कांहीच रुचेना । करित भजना रात्रंदिन ॥५॥
दैत्यबाळांलागी उपदेश करी । भजावा श्रीहरी सर्वाठायी ॥६॥
विषय-भोग तुच्छ त्यांत नाही सुख । परिणामी विख त्याच्यामधी ॥७॥
आजवरी सांगा अमर कोण झाले । कोणा सुख झाले संसारात ॥८॥
शिकवित पोरा नारायण म्हणा । नामसंकीर्तना करा म्हणे ॥९॥
चळवळ केली दैत्यांच्या पोरांत । तयां शिकवित हरिभक्ती ॥१०॥
बाप माय यांचे कोणी न ऐकावे । हरीसी भजावे रात्रंदिन ॥११॥
भलतेच गुरु तुम्हां शिकविती । तेणे निरय-गति प्राप्त होय ॥१२॥
नका ऐकूं तुम्ही गुरुवच कांही । हरिला लवलाही सेवा म्हणे ॥१३॥
जन्म मरणाचा होय परिहार । सांगतसे सार भजनाचे ॥१४॥
विनायक म्हणे पोरे फ़ितविली । भजना लाविली श्रीहरीच्या ॥१५॥

N/A

References : N/A
Last Updated : January 26, 2020

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP