श्री गणेशायनम: । श्रीसरस्वत्यैनम: । श्रीसीतारामचंद्रायनम: । श्रीसद्‍गुरुवेनम: । श्रीरामसमर्थ । जयजय श्रीआत्माराम ।
भूतां व्यापूनि रिकामा । अखंड आनंद सुखधामा । ह्र्दयनिवासी ॥१॥
जवळीं असोनि उमजेना । विषयीं धांवे वासना । विभक्तपणें नमितों चरणा । ध्यान राहे हो अखंड ॥२॥
व्रतबंधना उपरी । गणपती नाना क्रीडा करी । बटुवेष कौनिनधारी । चित्त वेधी पाहतां ॥३॥
गृही वृध्द लिंगोपंत । बाललीलें होती मुदित । पुनरपी गीताई प्रसूत । पुत्र कन्या लाधली ॥४॥
अण्णा असे पुत्र नाम । मुक्ताई कन्या सुरुप परम । सकळांचे अति प्रेम । गणपतीवरी ॥५॥
तैसे कुलगुरू सखाराम भटट । पाठक उपनामें कर्मनिष्ठ । पत्रिका वर्तविली नीट । विद्वान होते बहु गुणी ॥६॥
याचे पुत्र वामन बुवा । हेवि कर्ते होते तेव्हां । पुत्र खेळगडी चिंतूबुवा । गणपतीचे ॥७॥
अप्पा पाटिल गांवकर । पुत्र दाजिचा चतुर । बाला तयाचा कुमर । कुलकर्ण्यावरी अति प्रीति ॥८॥
चरित्रामाजीं संबंध । येईल म्हणोनी विशद क। नामें केली प्रसिध्द । उभय कुलांची ॥९॥
पंतोजी अण्णा खशींकर । व्यवहार विद्येमाजीं चतुर । परी नेणती अधिकार । गनपतीचा ॥१०॥
एके समयीं ऐसें झालें । गुरूजी स्वल्प गृही आलें । इकडे भजन आरंभिलें । शिष्यवर्गे ॥११॥
पंतोजीसी राग आला । छडी मारिती सर्वाला । मुलें म्हणती गणपतीला । कैसा विचार करावा ॥१२॥
येरू वदे सर्वासीं । स्वस्थ रहावें मानसी । राम द्वेषी नरासी । शिक्षा होईल त्वरित ॥१३॥
संवगडयांतील मुलांनीं । अप्पा पाटिला भेटुनि । वृत्तांत कथिला मृदुवचनीं । पंतोजी़चा ॥१४॥
तुझिये वेश्येपासी । पंतोजी जाती अहर्निशी । भुलतें भासतें आम्हासी । तुमचें तुम्हीं पाहावें ॥१५॥
पाटील होतां विषयग्रस्त । कर्णी वाक्यें झोंबत । दांतओठ खात खात । निघाला तेथोनी ॥१६॥
इकडे गुरुजींची स्वारी । शाळेंतूनि जातां घरीं । बैसले तेथें क्षणभरी । पान खात ॥१७॥
बोलाफुला गांठ पडली । पाटलाची स्वारी आली । तळची आग मस्तकां गेली । निष्ठुरपणें मारित ॥१८॥
मारमारोनि केला विकळ । लोक धांवले सकळ । वृत्तांत परिसोनी नवल । अत्यंत भासलें ॥१९॥
ऐसे नव्हे पाटिलबुवा । गणपतीनें केला पुंडावा । पंतोजी तुम्ही त्याचें नांवा । कदापि काढूं नये ॥२०॥
तो असे भगवतभक्त । श्रीकृष्णा सारिखा धूर्त । जाणावें हें सत्य । त्याचे वाटे नच जावें ॥२१॥
शाळा सोडिली अण्णानी । निघाले गाडी भरोनी । मार्गी तयासी गांठोनी । उपदेशी ब्रह्मचारी ॥२२॥
राम भक्तासी वैर । करितां दु:ख होतें फार । आतां तरी रघुवीर । स्मरत जावा ॥२३॥
दो दिवसाची चाकरी । रामकृपेची भाकरी । तोचि तारी आणि मारी । शरण जावें तयासी ॥२४॥
ऐशी क्रीडा नाना परी । करितसे ब्रह्मचारी । मित्रांचा जो कैवारी । संकटसमयीं ॥२५॥
धावण्या माजी चपल । हास्य मुखीं सोज्वल । तनू दिसे कोमल । उड्या घेई वृक्षावरी ॥२६॥
विनोदी असोनि निश्वल । धीट आणि कोमल । वक्तृत्वे भुलवी सकल । लहान थोर ॥२७॥
राम नाम हाचि छंद । हीच क्रीडा विनोद । अंतरीं ध्यायी सद्‍गुरुपड । कै देखेन डोळा ॥२८॥
शाळेसी निमित्त मात्र जाई । विद्या येतसे सर्वही । आश्चर्य मानिती पाही । बुध्दिप्रभाव देखोनी ॥२९॥   
कोळशाची शाई करोनि । अर्क पत्रें काढी लिहोनी । रामनामें वृक्ष भरोनी । प्रदक्षिणा करितसे ॥३०॥
पाहोनि क्रीडा कौतुक । आश्चर्य करिती लोक । लिगोपंत धूर्त तार्किक । विचार करी मानसीं ॥३१॥
हा होईल भगवद्भक्त । प्रपंचीं राहील विरक्त । उदासीन वागे सतत । वय सान असोनी ॥३२॥
तरी हा हातिच जाईल । रानीं वनीं फिरेल । विरक्तपणें वागेल । जनामध्यें ॥३३॥
यास्तव शीघ्रचि लग्नग्रंथी । घाली म्हणे रावजी प्रती । मानली सकलासि युक्ति । गीता आदि करोनी ॥३४॥
शोधूं लागले नोवरी । कुलवंत स्वरुपें बरी । जाणोनिया वतनदारी । पाहो येती अनेक ॥३५॥
गोडसे उमनामी संभाजीपंत । कुलकर्णी खातवळी वसत । तयांची कन्या नेमस्त । केली असे ॥३६॥
वय सान गौरवर्ण । कुलशील शुभलक्षण । वर द्वादशीं एक न्यून । जोडा शोभे साजिरा ॥३७॥
वाडनिश्चय सीमंत पूजन । विवाह होम अन्नदान । सरस्वती ठेविलें नामाभिधान । समारंभ सांग केला ॥३८॥
परी गणपती उदासीन । म्हणें कासया हें बंधन । कै देखेन सद्‍गुरुचरण । भवसिंधू तारक ॥३९॥
विवाह म्ह्ण्दजे सजीव वेडी । जी थोर थोरास करी वेडी । सद्वासना धडपुडी । असेल तीही घालवी ॥४०॥
नरदेहाचा अधिकार । स्वये व्हावें विश्वंभर । परी करित किंकर । बहुतांचा बहुपरी ॥४१॥
भलतियाचे आर्जव करवी । कोणा दुरुत्तरें बोलवी । नसताचि मोह लावी । पाठीमागें ॥४२॥
सुकर्मी वा दुष्कर्मी । प्रवृत्त व्हावें धनागमीं । एवं आयुष्य प्रपंच कामीं । अहंकार युक्त लाववी ॥४३॥
ऐसा हा मोहपाश । बहुत झाले कासाविल । भाग्यवंत क्वचित्पुरुष । तरला ऐसा विरळा ॥४४॥
जैसा वाइट तैसा चांगला । परी लाभे क्वचिताला । सोमल औषधी असें भला । जाणत्यासी ॥४५॥
गृहस्थाश्रमाची महती । बहूत गाईली धर्मग्रंथी । परी विषयीं लंपट होती । बहुतेक जन ॥४६॥
अतिथी सेवा अन्नदान । तिन्ही अश्रमां विश्रांतीस्थान । पितरदेवतांसी हवन । गृहस्थाश्रमा मिळतसें ॥४७॥
पितृऋण मातृऋण । फिटे होताची संतान । विद्याकलांचे पालन । गृहस्थाश्रमा कारणें ॥४८॥
एवं चतुर्विध पुरूषार्थ । ज्ञानिया लाभली येथ । अज्ञानें होता असक्त । अधोगती निश्चायें ॥४९॥
जरी असेल विवेक वैराग्य । तरी हें लाभेल भाग्य । परी कलियुगी ऐसा योग । घडणें कठीण ॥५०॥
ज्ञानें व्हावे विरक्त । तरी संसारी अलिप्त । सद्‍गुरू विना ज्ञान प्राप्त । होणार नाही ॥५१॥
या गृहस्थाश्रमा कारणें । देवादिका जन्म घेणें । विद्या कालादि आयतनें । याजसाठीं ॥५२॥
हें सृष्टीचे उगमस्थान । याचेनि सृष्टीचें पालन । नीति न्याय दंडण । याचे करिता ॥५३॥
ऐसा विवेक उदेला । हळूं हळूं वाढो लागला । सचिंत दिसे बैसला । ठायीं ठायीं ॥५४॥
जें देवांचे दैवत । ऐसे संत महत । तेच अधिकरी येथ । वेदनिधी दावाया ॥५५॥
वेद अनंत अपार । शब्दज्ञाने न पडे पर । कलियुगीं अल्पायुषी नर । धृती हो अल्प जहाली ॥५६॥
तैसा आहार विहार । दुर्जन संगती अनिवार । बुध्दी सुचे तदनुसार । देह सुखाची ॥५७॥
वेदशास्त्रपठण केलें । परी देह सुखानें नाडले । कामधेनूपाशी घेतले । तक्र जैसें ॥५८॥
ऐसा कालाचा महिमा । ध्यानीं नये परमात्मा । सुखाऽसक्तीची सीमा । जाहली असे ॥५९॥
देह सुखाची साधनें । शोधिती ते शहाणे । बहु द्रव्य मिळवूं जाणे । तो पुरूष उत्तम ॥६०॥
पंच भूतांचे मिळवणी । सुखसोयी साधिती झेणी । तीच म्हणती ज्ञानीं । जनरुढी ॥६१॥
जो भूतांचा जनिता  । त्रिभुवनीं जयाची सत्ता । तयासी न पाहतां । प्रकृती सुखें धुंडाळिती ॥६२॥
प्रकृतीमाजीं सुख इच्छिलें । ते पुरूष अज्ञानी गणले । रावणादिक भले भले । सत्य लोकी सत्ता ज्यांची ॥६३॥
वशिष्ठ विश्वामित्रांची कथा । पाहतां कळे ज्ञानसत्ता । सद‍गुरुकृपें येई हातां विमल ज्ञान ॥६४॥
मुळीं प्रकृति नाशिवंत । तिचीं कर्मे हीं अशाश्वत । ठायी पाडावें शाश्वत । तरी ज्ञानी म्हणवावें ॥६५॥
वेद अनंत बोलिले । प्रवृत्ति ज्ञान विशद केलें । निवृत्ती संकेतें दाविलें । अगोचर जया ॥६६॥
वेदा जें अगोचर । ते संतासी गोचर । मूळ धरितां तरुवर । हाती येई ॥६७॥
गुरूकृपेवाचूनि कांही । सर्वथा सार्थक होणें नाहीं । खूण गांठ बांधोनि ह्र्दयी । न्याहाळितसे सूक्ष्म दृष्टी ॥६८॥
कोणी येता साधूसंत । म्हणे दाखवा भगवंत । वेद शास्त्राचा मतितार्थ । उकलोनि दावा ॥६९॥
चार वेद सहा शास्त्रें । अठरा पुराणें उपसुत्रें । शिकवा समग्र मंत्र तंत्रे । येके दिनीं ॥७०॥
ऐसा करितां प्रश्न । म्हणती आम्हां नसे ज्ञान । गुरु चरणी व्हावे लीन । ज्ञान येईल तुजलागी ॥७१॥
येरू वदे ऐसे संत । कोणे ठायीं नांदत । ठाऊके तरी पुरवा हेत । कृपा करोनी ॥७२॥
भवतारक सद‍गुरूसंत । गृही गुंतता नोहे प्राप्त । लोभ सांडोनी गिरिगव्हारांत । तीर्थी क्षेत्री शोधावे ॥७३॥
जयाची होता कृपादृष्टी । अज्ञान ज्ञानासह उठी । जन्ममृत्यु आटाआटी । भवग्रंथी तुटेल ॥७४॥
गुरू शोधाचा निश्चय केला । सोबत्यासी निवेदिला । जे न वदती कवणाला । विश्वासू परम ॥७५॥
चुलत बंधू दामोदर । दुजा वामन म्हासुर्णेकर । दोघां मानवला विचार । सांगते येऊं म्हणती ॥७६॥
तंव गृहीं लिंगोपंत । जरेनें जाहले ग्रस्त । मृत्यु चिन्हे उमटली जेथ । ते गेले निजस्थाना ॥७७॥
कोणी हळहळू लागले । कोणी म्हणती भले झाले । पुत्रपौत्रा देखत गेले । कलियुगीं अलभ्य ॥७८॥
लिंगोपंत पुरुष भला । कार्यकर्ता होऊनि गेला । ईश्वर तयाचे आत्म्याला । शांति देवो ॥७९॥
लिंगोपंत निघोन गेले । अप्पारावजी कर्ते झाले । गणपतीवरी खेळ खेळे । मनीं ध्याय़ीं श्रीगुरू ॥८०॥
गुरू शोधाया कारणें । शिघ्रचि गृहे त्यागणें । सार्थाक अन्य साधनें । होणार नाहीं ॥८१॥
व्रतबंध शुभ वेळीं । मातापित्यांची आज्ञा झाली । विद्य गुरुसेवा वहिली । करोनी तुवां शिकावी ॥८२॥
भिक्षा मागोनि उदरपूर्ती । अखंडा धरावी शांती । ब्रह्मवर्य पाळोनि क्षितीं । विचरावें सकळ ॥८३॥
ऐशा आज्ञेतीची पूर्तता । झाली नसे तत्वता । तीच मानोनि आतां । सांग करावी ॥८४॥
आधीं उपजत ज्ञान । वेदशास्त्र निमित्त जाण । पुढील कार्या अनुलक्षुन । निश्चय केला जाण्याचा ॥८५॥
द्वादश वर्षाचें वय । क्रीडासक्तीचा समय । परी वैराग्य उदय । दृढ झाला ॥८६॥
तिथीवार निश्चित केला । प्रात:कालीं उठोनी गेला । सोबती धांवले साह्याला । मागील दोघे ॥८७॥
गुरू भेटीची आरत । धरूनी चालिले वनांत । तोडिली मायेची मात । दुर्जय दुर्निवार ॥८८॥
सरिता सागर संगम । समरसे पावेल विश्राम । श्रवण केलिया हरती श्रम । भाविकांचे ॥८९॥
पुढील अध्यायीं ऐसी कथा । सद्‍गुरु होईल बोलवितां । वत्स धेनूसी पितां । गळती सेवू ॥९०॥
इति श्रीसद्‍गुरुलीला । श्रवणीं स्वानंद सोहळा । पुरविती रामदासीयांचा लळा । कृपा कटाक्षें ॥९१॥
 इति श्रीसद‍ गुरुलीलामृते तृतियाध्याय समाप्त: । ओंवीसंख्या ॥३१०॥
॥ श्रीसद‍ गुरूनाथार्पणमस्तु ॥
॥ श्रीराम समर्थ ॥
॥ इति तृतीय अध्याय समाप्त ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 18, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP