श्री गणेशायनम: । श्रीसीतारामचंद्रायनम: । श्रीरामसमर्थ ।

श्रीगणेशा तुज नमन । करोनि रघुपती स्मरण । श्रीगुरूलीला कथन । करितों मी यथामती ॥१॥
नित्य शेळया चारावयासी गणपती जातसे वनासी । तेथे क्रीडा करी कैसी । पाहतां असाधारण ॥२॥
जमवी दगड बहुत । रचोनी भिंती करीत । माजी तीन खडे बैसवीत । नामें सांगे तयांचीं ॥३॥
मध्ये उभा श्रीराम । जो भक्ता देई आराम । सव्यभागी भक्त परम । लक्ष्मण उभा असे ॥४॥
वामभागी सीताबाई । जगद्वंद्य जगाची आई । पुढें मारुती वज्रदेही । एक खडा ठेवित ॥५॥
मित्रांची मांदी मेळविली । दगडांचीं देउळें केलीं । मग क्रीडा आरंभीली । कैसी पहा ॥६॥
हातांतील काष्टासी । विणा म्हणोनि स्कंध प्रदेशी । घेवोनि दगड टाळेसी । मेळविती अनेक ॥७॥
रामनामाचा गजर करिती । छोटया पाउलीं नाचती । दगडी दगड वाजविती । भजन करिती आनंदें ॥८॥
मित्रामाजी मित्र खरा । नामे बापू फडतरा । गणपतीवाचोनिया जरा । दुरी न राहे ॥९॥
गणपती जी जी आज्ञा करी । सुलभ कठीण आदरी । न विसंगती क्षणभरी । एकासी एक ॥१०॥
वाटे हा पहिला शिष्य । गुरुवचनी विश्वास । नामाचा बहु हव्यास । सद्‍गुरू बोधें ॥११॥
असो ऐसी भजन स्थिति । नित्य नवी आवडी चित्तीं । गणूबुवा ऐसे म्हणती । बाळमित्र कौतुकें ॥१२॥
उपजत ज्ञान ज्योती । न झाके झाकितां दीप्ती । गणूबुवा म्हणोनि वंदति । चरण सद्‍गुरूचे ॥१३॥
जैसा मैलागिती चंदन । सुवासेसी पैसावोन । वेधी पराव्याचें मन क। स्वतेजें आपणाकडे ॥१४॥
पंचाननाचे छाव्यासी । सलगी न करवे जीवासी । वयें अल्प परी सर्वासी । नमवितो स्वसत्तें ॥१५॥
नागरीकजन आश्चर्य करिती । पोरें यासवेचि धांवती । रानीं जाऊन भजन करितीं । धाक न मानिती आमुचा ॥१६॥
रावजीपंत तुमचा पुत्र । मधुत वचनीं जगामित्र । बालकें जमवी सर्वत्र । नायकतीं गृहकाजें ॥१७॥
घरीं अल्पही न राहतीं । गणूबुवा म्हणोनि धांवतीं । मायबापाहुनी चित्तीं । प्रिय वाटतो सकळांसी ॥१८॥
यासी बोध करावा कांही । अथवा बैसवावें गृहीं । वेडालाविले सकळांसी । स्वच्छंदपणें ॥१९॥
तैसा शाळेसी जातां । सकळांसि म्हणे तुम्हीं आतां । रामराम म्हणोनि कित्ता । मजलागी दावावा ॥२०॥
तेचि काढेनी दावितीं । पंतोजी बहु बोध करिती । कांही केल्या गणपती । नायकेची ॥२१॥
पंतोजी बोले तयासी । न यावे तुवां शाळेसी । सकल बाळें बिघडविसी । आमुचा धंदा बुडेल ॥२२॥
पंतोजीनें धाक दाविला । गणपती वेडावी तयाला । दुजे दिनीं डाव मांडिला । गडयांसह गोठयावरी ॥२३॥
लहान थोर सवंगडी । क्रीडा करीती आवडी । राम भजनाची परवडी । मांडिली कौतुकें ॥२४॥
पंतोजी शाळेमाजीं पाहती । परी एकही नसे विद्यार्थी । चिंता उपजली चित्तीं । आतां कैसें करावें ॥२५॥
गृही वृतांत निवेदिला । गणपतीनें पुंदावा केला । समजाऊनि पाठवा त्याला । विद्यालयीं ॥२६॥
आजा चुलता उपदेशिती । पुन्हां शाळेसी धाडिती । माय उपदेशी गणपती । तुवां ऐसें न करावें ॥२७॥
वडिलार्जित कुलकरणवृत्ती । चालविळी पाहिजे यथा निगुती । विद्या करावी पुरती । न करीं कुचराई ॥२८॥
गणपती बोले गे प्रमाण । सर्वही येतें मजलागोन । काळजी न करवी वतन । सांभाळीन दक्षत्वें ॥२९॥
राम नामाची आवडी । काय सांगूं तुज गोडी । श्राण करी एक घडी । प्रेमे कैसें उफाळें ॥३०॥
ऐसी वदोनि उत्तरें । राम नाम मंजुळ स्वरें । घेऊं लागला प्रेमभरें । माय राहे तटस्थ ॥३१॥
राम नामाची गोडी । चाखितां चालिली घडी । वृत्ती गुंतली आवडी । सांज झाली कळेना ॥३२॥
सकळांसी लाविली चट । रामनामाचा घडघडाट । दुरितें सोडिली वाट । गोंदावलीची ॥३३॥  
नऊ वर्षाचे अवसरी । रावजीं मनी विचार करी । व्रतबंधन कराया वरी । वयसीमा ॥३४॥
कुलगुरुसी पाचारोनी । उच्चनीच ग्रह बघोनी । मुहूर्त ठरवा उपनयनीं । योग्यायोग्य ॥३५॥
मुहूर्त बरवा शोधिला । द्रव्यनिधी मोकळा केला । मातापितयां आनंद झाला । मनींची हौस पुरवूं वदती ॥३६॥
सोयरे जमविले सकळ । याज्ञिकी विप्रांचा गोंधळ । मौजीबंधनाची वेळ । आली म्हणती समीप ॥३७॥
वाद्यें वाजतीं धडधडा । मातृभोजनीं न दवडा । घटका भरली वेळ थोडा । सावधान म्हणती ॥३८॥
पितापुत्र बोहल्यावरी । मंगलाष्टकें सुस्वरी । द्विज म्हणती सावध सत्वरी । मंगल मुहूर्ती असावें ॥३९॥
गणपती विचारी मानसीं । सावध म्हणती आम्हासी । असावध कोणेविशीं । राहिलों काय ॥४०॥
चित्त देऊनी करी श्रवण । मंत्रार्थ पाहे विवरोन । कोठें असती उपनयन । द्विजत्व तेही दिसेना ॥४१॥
गायत्री मंत्र उपदेशिला । एक चित्तें पठण केला । ॐतत्सत अनुभवाला । आलें पाहिजे ॥४२॥
अनुभवी तोचि ब्राह्मण । एर कुलधर्म पालन । ऐसें करितसे मनन । मनामाजीं ॥४३॥
परिधानासी कौपिन । प्रावर्णासी कृष्णाजिन । वैराग्य द्योतक चिन्ह । मनीं म्हणे ॥४४॥
कंठी घालिती यज्ञोपवीत । जें ब्रह्मग्रंथीनें ग्रथित । अनुसंधान ठेवावें हा हेत । स्वस्वरूपी ॥४५॥
कर्मफलानें बांधला । मौजी बंधनें व्यक्त केला । विवेकें पाहिजे सोडाविला । जीवात्म्यासी ॥४६॥
यमनियम दंड देती । भिक्षाहारे उदरपूर्ती । लोभ न धरावा चित्तीं । कोणा विषयीं ॥४७॥
भिक्षा घालोनि म्हणे जननी । चहु वेद षड‍दर्शनीं । निपुण होई आठरा पुराणीं । गुरूबोधें ॥४८॥
आप्तइष्ट कुलगोत । भिक्षा घालोनि निरोप देत । गृहकृपें ज्ञानोन्नत । व्हावें तुवां ॥४९॥
बोलती सकल मंत्र मुखें । परी अर्थारे कोणी न देखे । विरळा सद्‍गुरु सारिखे । अर्थ विवरिती ॥५०॥
बोलणें एक करणें एक । तो न म्हणावा विवेक । परी कालचक्राचें कौतुक । ऐसेंचि आहे ॥५१॥
कण जावोनि भूस राहिलें । भूषणावाचूनि छिद्र उरलें । जाणते पुरुषी जाणिलें । अवघे म्हणती सोहळा ॥५२॥
कुलगुरू तेची सांगती । संध्योपासना शिकविती । अग्निकार्य करावें म्हणती । नित्यनेमें ॥५३॥
प्राणायामीं नासिकासी । करविती हस्त स्पर्शासी । न जाणती योगासी । मार्गमळण ॥५४॥
जैसा गुरु तैसा चेला । निपट बोध वाया गेला । गणपती मनी खोचला । समाधान नाहीं ॥५५॥
गुरू स्वयें अनधिकारी । शिष्यातें कैसा उध्दरी । सद्‍गुरुदयाळांची सरी । येणार नाहीं ॥५६॥
भिडेभिडे भिडो जातां । न सुटे कर्माकर्म गुंता । सद्‍गुरूपद तत्वतां । शोधिलें पाहिजे ॥५७॥
ऐसे बहुता प्रकारीं । गणपती विवेकें विवरी । चटका लागला अंतरी । उपनयनाचा ॥५८॥
इतर मिष्टान्नें जेविती । नित्य उठती ब्राह्मणपंक्ती । दक्षणा देऊन बोळविती । याचकांसी ॥५९॥
व्रतबंध सांग झाला । सकला आनंद वाटला । पाहुणे समुदाय बोळविला । वस्त्रे देउनी ॥६०॥
गणपती बाळ ब्रह्मचारी । संध्या वंदनादी कर्मे करी । म्हणे मागावी माधुकरी । आज्ञा असे गुरुची ॥६१॥
चारी वेद शिकावें । षड्‍दर्शना जाणावें । पुराणी व्युत्पन्न व्हावें । ब्रह्मपद पावावया ॥६२॥
चहू वेद किती असती । शास्त्रे कैशीं शिकोयेती । गुरुसेवेची कैसी स्थिती । मज निरुपावी ॥६३॥
उपाध्ये बोलती बाळा । वेद अनंत आगळा । एकही न वचे शिकला । आयुषवरी ॥६४॥
शास्त्रेंही असतीं अपार । तैसचि पुराणांचा विचार । कलियुगी उतरी पार । ऐसा नाही ॥६५॥
गुरूसी द्यावे धन । मानावें गुरुवचन । कार्याकार्य विद्या पठण । करोनी स्वस्थ असावें ॥६६॥
जेणे राहे वतन वृत्ती । ती विद्या करावी पुरती । अधिकारी तोषवावे चित्तीं । मधुर वचनीं ॥६७॥
आमुचा तो हाचि धंदा । यजमान कल राखो सदा । उदरपूर्ती वाचुनि कदा । आन नेणों ॥६८॥
येणें नव्हे समाधान । अंतरती श्रीचरण । उत्तम नरदेह पावोन । व्यर्थ होय ॥६९॥
वेदें जैसें आज्ञापिलें । तैसें पाहिजे वर्तलें । लौकिकी नसे बोलिलें । भगवद‍वाक्यें प्रत्यक्ष ॥७०॥
तरी ऐसा जो का ज्ञानराशी । तोचि शोधू दिवानिशीं । हिंडूं आतां दशदिशीं । सद्‍गुरुपद शोधाया ॥७१॥
सद‍गुरुकृपा होतां पाहीं । जगीं दुर्लभ नसे कांही । सज्जन कथिती ठायीं ठायीं । भगवद‍वाक्यें ॥७२॥
जें वेदाविद्येचें दैवत । परमगुह्य गुह्यातीत । होता सद्‍गुरुपदांकित ठाई पडे ॥७३॥
इति श्रीसद‍ गुरुलीलामृते तृतियाध्यायांतर्गत । द्वितीयसमास: ओंवीसंख्या ७३
॥ श्रीसद‍ गुरूनाथार्पणमस्तु ॥
॥ श्रीराम समर्थ ॥

N/A

References : N/A
Last Updated : October 18, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP