मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|श्रीसद्गुरुलीलामृत|पूर्वार्ध|अध्याय तिसरा| समास दुसरा अध्याय तिसरा समास पहिला समास दुसरा समास तिसरा समास चवथा अध्याय तिसरा - समास दुसरा श्रीसद्गुरुलीलामृत Tags : pothisanskritपोथीसंस्कृत अध्याय तिसरा - समास दुसरा Translation - भाषांतर श्री गणेशायनम: । श्रीसीतारामचंद्रायनम: । श्रीरामसमर्थ । एकदा वृध्द लिंगोपंत । नातवासी पाचारित । म्हणती ऐकरेमात । विचारितो सांगपा ॥१॥तुजसी एक हंडाभरी । मोहरा दिधल्या जरी तरी काय करिसी सत्वरी । सांग मज ॥२॥वांटोन टाकीन समस्त । अंध पंगू रोगग्रस्त । गोरगरीब अनाथ । भिकार्यासीं ॥३॥ऐसें देता प्रत्युत्तर । आजा संतोषला थोर । म्हणे करील परोपकार । दु:खभार हरील ॥४॥लिंगोपंत सुसंकृत । म्हणोनि ऐसें बोलत । उधळया म्हणतील समस्त । प्राकृतजन ॥५॥बहुतेक मुलांची जात । हातीचे कोणा न देत । दुसर्यांचें घेऊं पहात । लोभनोहें ॥६॥ऐसीं नव्हें सात्विक जाती । परदू:खे दुखावती । परसुखें संतोष चित्तीं । होतसे तयासी ॥७॥पुनरपी म्हणे आजा । तुज केलीया राजा । काय करिसी कुलध्वजा । सांग बापा ॥८॥येरु वदे झडकरी । न ठेवीन देशी भिकारी । अन्नछत्र राजद्वारीं । ठेवीन नित्य ॥९॥सहज विनोदें पुसिलें । मुलानें प्रत्युत्तर दिलें । ऐकोनी अश्रू आले । नयनी तयाच्या ॥१०॥पंच वर्षाचें बालक । पाहाहो यावें कौतुक । सात्विक ज्ञान नि:शंक । जाहालें यासी ॥११॥न म्हणी घेऊन घोडा । खोपट काढोनी बांधीन वाडा । उंची वस्त्रें रथगाडा । दासदासी दागिनें ॥१२॥विषय भोग वांछीना । भूत दयेहोनि बोलेना । वैराग्य कैसें पाहाना । विवेके सहित ॥१३॥वयें दिसतो सान । परी जोडलें निधान । उपजत लाधलें ज्ञान । सत्यसत्य ॥१४॥तपांच्या करितां कोडी । न सुटे मोह लोभ वेडी । भलीं भलीं जाहलीं वेडी । याजसाठीं ॥१५॥क्रियेवाचून वटवट । घरोघरीं बोलती पोपट । उभयकर्मी वर्ते नीट । ऐसा विरळा ॥१६॥अनंत जन्माचिया पोटीं । विषयाची झाली भेटी । न सुटे सोडितां गांठी । देह काष्टें केलीया ॥१७॥या कलियुगा माझारी । वेदान्त भरला घरोघरीं । आचार पाहतां अणुभरी । शुध्द नाहीं ॥१८॥आम्हां वृध्दास लाजवी । ऐसी क्रिया करुन दावी । प्रौढपणीं घेईल पदवी । सायुज्याची ॥१९॥देहांसी वृध्दपण आलें । लोभ मोह तैसेचि ठेले । चिंतेनें चित्त भ्रमलें । असें नित्य आमुचें ॥२०॥यासी बाळ म्हणो नये । बुध्दीनें हा वडील होये क। भक्तियुक्त नाम गाये । रामराम म्हणोनी ॥२१॥आमचे घरी कुलदैवत । पंढरीनाथ नेमस्त । परि हा दिसे रामभक्त । पूर्व संस्कारें ॥२२॥जन्मार्जित तप केलें । अथवा रामदूत अवतरले । उपजत ज्ञान कैसें आलें । याजपासी ॥२३॥पहा हो याचा आचार । उष:कालीं जडे सत्वर । चूळ भरावया नीर । त्वरित आणी ॥२४॥म्हणे म्हणा हो श्रीहरी । आरती भूपाळी सत्वरी । श्रवण करोनि चरण चुरी । दक्षता कैसी पाहावी ॥२५॥असो तदनंतर । माउली संनिध जाय कुमर । गोड बोलोनि तोष थोर । देतसे तिजलागी ॥२६॥बोलिलें वचन नुल्लंघी । आळसा न देई अंगी । वाटे हा बाल योगी । पावला गृहीं ॥२७॥तुळशी आणावयास धावें । म्हणे देवपूजन करावें । धूपदीप लावा बरवे । दाखवा नैवेद्य ॥२८॥गीतेचा नित्य पाठ घरीं । चित्त देवोनि श्रवण करी । अंतरीं अर्थ विवरी । बाह्य धरी मौनत्व ॥२९॥निमुटपणे भोजनीं बैसे । गोड तिखटाची हांव नसे । घालिती तें खात असे । आसक्तिरहित ॥३०॥खेळावयासी नेमस्त । जाईए संवगडया समवेत । खोडी कुटाळी न काढित । सदा प्रेमळ सकळांसी ॥३१॥सर्वांसी वाटे हा हवा । याचे संगें खेळ बरवा । नित्य नवा खेळावा । सुखदायक ॥३२॥सायंकाळी स्तोत्रे बरवी । मधुर वाणी म्हणोनि दावी । भजनीं आवडी नित्य नवी । असे जया ॥३३॥भजन झालिया वाचोनी । न जाई जो शयनीं । सत्कर्मी निशिदिनीं । काळ करी सार्थक ॥३४॥बाळपणीं साधकवृत्ती । अंगिकारिली ज्यांनीं चित्तीं । तयां वर्णितां मती । कुंठित झाली ॥३५॥सांप्रत असें कलियुग । अधर्मी प्रवर्तलें जग । न लागे लावितां मार्ग । सध्दर्माचा ॥३६॥पांचवें वर्षी एकेदिनीं । पाचारिलें आजोबांनीं । भगवद्गीता काढोनि । एक श्लोक सांगितला ॥३७॥पाठ म्हणोनि दाविला । तैसा अर्थही निरुपिला । आजा मनी संतुष्ट झाला । अतिशयेसी ॥३८॥पुत्र होईल ब्रह्मज्ञानी । कुळें उध्दरील दोन्हीं । ऐसे अणोनिया ध्यानीं । ईशस्तवन करितसे ॥३९॥असो ऐसी गृहस्थिती । प्रौढ झाला गणपती । मेळवी अनेक सोबती । खेळायासे ॥४०॥दगड मांडोनी देव करिती । फुलें घालोनि पूजिती । आरती धुपारती म्हणती । तयांपुढें ॥४१॥मातापित्यांची सेवा करी । आज्ञा नुल्लंघी क्षणभरी । हूडपणें न भरे भरी । क्रीडा विनोदें ॥४२॥ऐसें असतां वर्तमानी । मध्यसमय झाली रजनी । उठोनि पहातसे जननी । तवं गणपती कोठें दिसेना ॥४३॥शेजेवरी गणपती नाहीं । गृह शोधिलें सर्वही । कथिलें रावजीसी लवलाही । गणपती कोठें पाहाहो ॥४४॥उभयतां बहू शोधिती । सर्वत्रासी जागे करिती । गलबला ऐकोनि राती । बहुत लोक मिळाले ॥४५॥म्हणती कोठें गेलाहो बाळ । पहा पहाहो सकळ । लागली सर्वास तळमळ । तर्क करिती आपुले परी ॥४६॥कोणी म्हणती तस्करें नेला । जिनसा पाहोनि भुलला । घेऊन सोडील तयाला । चिंता कांही नसावी ॥४७॥शाकिनी डाकिनी गृहस्कंध । यक्षापिशाच्च समंध । रात्रौ विवरती प्रसिध्द । बालकासी पछाडती ॥४८॥कोणी म्हणती झोंपा भारी । कुंभकर्णा सारिख्या अघोरी । बाळ नेलें निशाचरीं । ठाउके नाहीं ॥४९॥द्वार बंद नाहीं केलें । असावधपणें निजलें । तस्करें मुलासी नेलें । खचित खचित ॥५०॥भजनांचा छंद बहुत । ध्वनी परिसोनि गेला खचित । प्रात:काली गृहप्रत । येईल स्वस्थ रहावें ॥५१॥कांही मिळाले धीट । म्हणती पुरे पुरे ही वटवट । शोधूं चला हो नीट । चहूं दिशेसी ॥५२॥मध्यरात्र समयासी । पाहती सांदी सिध्दिसी । कोणी नेलें बालकासी । कांही विचार सुचेना ॥५३॥रात्रौ फिरती निशाचर । सर्पवृश्चिक दुर्धर । श्वापदें आणि तस्कर । निर्भयपणें ॥५४॥शोधितां शोधितां थकले । कांही नदीकडे निघाले । मार्गी अकस्मात देखिलें । गणपतीसी ॥५५॥समाधीचें केलें आसन । वरी घातलें सिध्दासन । नासिकग्र दृष्टी देऊन । रामनाम घेतसे ॥५६॥पाहूनी मानसी चकित । योगी असे हा निश्चित । दुरोनि चरण वंदित । सिध्द पुरुष जाणोनी ॥५७॥हाती धरोनी आणिला । सकाळासी आनंद झाला । बहु प्रकारें बोध केला । निबिड अंधारी नच जावें ॥५८॥कोणी म्हणती उपदेशासी । पात्राता नसे आम्हांसी । कारणिक अवतरले ऋषि । ज्ञानरुप केवळ ॥५९॥सहा वर्षाचा बालक । बैसला सिध्दासनीं एक । अपरात्रीं नदी तटाक । स्मशानस्थान विशेष ॥६०॥यासी काय म्हणावें । दंडावें कीं वंदावें । स्तवावें कीं बोधावें । धाक भीती दोवोनी ॥६१॥गणपती बोलें वचन । एकांती स्थीर होय मन । नामस्मरणीं अनुसंधान । प्रेमपूर वाहतो ॥६२॥चित्त वाहे भलतीकडे । मुखें नाम हें कोरडें । ऐशीयानें आयुष्य थोडें । पुरणार नाही ॥६३॥वयें अससी सान । उद्यमीं घालवें मन । वृध्दपणीं अनुसंधान । स्वस्थपणें करावें ॥६४॥बहुत विद्या शिकावी । आणि भाग्यशी भोगावी । जगी कीर्ती मिळवावी । मग भजन करावें ॥६५॥इंद्रिये विषय सोसावें तृप्त करोनि भजावें । नातरी लागेल मुकावें । दोहीकडे ॥६६॥विषयोर्मी येतां पाही । भाव साधनी न राही । अत्याचारे भवडोहीं । बुडतोए नर ॥६७॥प्रपंच करोनी परमार्थ । करावा बोलती संत । वासना झालिया निवृत्त । सुलभ होयें ॥६८॥आधी विद्या शिकावी । इंद्रियें अतृप्त न ठेवावी । मग ती परमार्थ पदवी । साधनानें साधावी ॥६९॥उपदेश नानापरी । करिती ते नरनारी । भूताखेतांची भीती भारी । सांगूं लागलें बाळाते ॥७०॥ऐसे आपुल्यालामतीं । अधिकार नेणोनि बोध करिती । अघटित करणी वद्ती । परिसिली नाहीं ॥७१॥कांही दिवस गेल्यावरी । गणपती नसे शय्येवरी । रावजी विचारी अंतरी । एकनिष्ठ वैष्णव हा ॥७२॥पुत्र स्नेहें कळवळला । धुंडधुंडाळोनी आला । म्हणे हा कोठें लपला । न कळेची ॥७३॥पहाटेच्या समयासी । बाळ आला गृहासी । रावजी पुसे तयासी । कोठे आसन घातलें ॥७४॥येरू वदे नदी थडी । खडकांच्या पडल्या दरडी । माजी असती भगदाडी । उपाधीरहित ॥७५॥अरे सर्प विंचू फिरती । क्रुर श्वापदें नेणो किती । कैसी होईल देहस्थिती । न विचारिसी ॥७६॥देह प्रारब्धाधीन । कोण चुकवूं शके मरण । समय प्राप्त झालिया जाण । मादूसी हीन टिके ॥७७॥ ननाशिवंत नासणार । जाणोनिया निर्धार । आहे तंव जगदश्विर । शाश्वत तो ओळ्खावा ॥७८॥ऐकोनि ऐसी उत्तरें । रावजी नेत्री नीर झरें । म्हणे होईल तें तें खरें । स्वस्थ राहोनी पाहावें ॥७९॥अगाध ज्ञान पाहोन । रावजी मानी समाधान । म्हणे धन्य गणपती निधान । ईशकृपें लाधलें ॥८०॥ इति श्रीसद गुरुलीलामृते तृतियाध्यायांतर्गत । द्वितीय: समास समाप्त: ओंवीसंख्या ८०॥ श्रीसद गुरूनाथार्पणमस्तु ॥॥ श्रीराम समर्थ ॥ N/A References : N/A Last Updated : October 18, 2019 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP