अध्याय तिसरा - समास पहिला
श्रीसद्गुरुलीलामृत
न लिंपे कदा बालक्रीडा उपाधी । विवेकें सदा ज्ञान वैराग्य साधी ॥
जया सद्गुरु भेटिची होय स्फूर्ती । नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ति ॥३॥
श्री गणेशायनम: । श्रीसीतारामचंद्रायनम: श्रीगुरुभ्योनम: । श्रीरामसमर्थ ।
ॐनमोजीगुरुमूर्ती । स्वयंसि ज्ञान ज्योति । त्रिभुवनी चमके दीप्ती । चैतन्यरुप ॥१॥
अंतरबाह्य व्यापुनी असे । परी चर्मचक्षूंते न दिसे । दिसे म्हणतांचि पिसें । साक्षित्वें होय ॥२॥
तुझे प्रकाशाचा विलास । निरसी अष्टधेचा भास । द्र्ष्टा आणि दृश्य यास । स्वतेजीं मेळवी ॥३॥
प्रकास आणि दीप । भिन्न ठाव नसे अल्प । करितां ध्यानाचा संकल्प । ध्येय ध्याता नुरेची ॥४॥
स्वयंप्रकाश परंज्योती । तेजी सहस्त्र सूर्य लपती । उष्ण शीत विकार स्थिती । मुळीं नाहीं ॥५॥
परप्रकाशें पाहों जातां । प्रकाश फिते मागुता । तेथें दुजाची सत्ता । अल्पही नचले ॥६॥
तुझ्या स्वरुपाची कोटी । अनंत ब्रह्मांडे सांठवी पोटीं । परी भक्त ह्र्दय संतुष्टीं घालोनि पूजिती ॥७॥
तव तेजासी आडवी । ऐसा नस गोसावी । दुजेपणाची यादवी । नाही तेथें ॥८॥
ज्योत चालली अढळ । नसे मैस ना काजळ । वायुचा आधार जोंजाळ अणुभरी असेना ॥९॥
तूं होवोनी तुज पाहावें । भावभक्तीनें जाणावें । एरवई ते व्यर्थ गोवें । सद्गुरूपद भेटेना ॥१०॥
कोणी पाजळी ना विझवी । आदिमंध्यांत ना बरवी । अखंड चालली सतरावी । स्नेहेविण ॥११॥
माया मोहाचे दर्पणीं । बिंब राहिलें बिंबोनीं । सवेची वाढलीं दोनीं । गंधर्व नगरें ॥१२॥
जड चंचल माया । चैतन्य जाणीव बिंबकाया । अधिष्ठाना सारिखें जया । विकार दिसती ॥१३॥
परी तें विकारवंत नोहें । मुळीं असिजे तैसेंची आहे । जरी भिन्न भासताहे । अज्ञानिया ॥१४॥
अज्ञान निरसिल्यावरी । बाह्य आणि अभ्यंतरीं । एकचि रुप निर्धारी । ज्ञान ज्योती ॥१५॥
प्रकृतीचा संग घडला । सगुणत्वाचा आळ आला । आला म्हणोनी लाधला । स्तुति सेवा कराया ॥१६॥
विशेष जाणिवेचें स्थान । तेंचि सद्गुरूचें अधिष्ठान । ऐसें बोलती सज्जन । ठाई ठाई ॥१७॥
तीच जाणीव ज्ञान ज्योती । सद्गुरू ब्रह्मचैतन्यमूर्ती । गोंदवलें ग्रामीं आम्हां प्रती । भेटली थोर भाग्यें ॥१८॥
निर्गुण सगुणत्वां आलें । आंधळयांनींही देखिलें । कांही जे डोळस झाले । अंतर्बाह्य पाहती ॥१९॥
पाहतां पाहुणें विरालें । गुरुरुप होऊनि ठेले । जन्ममरण फेरे चुकले । धन्य पुरुष ॥२०॥
गुरूबोधांजन घेतलिया । आंधळेपण जाय विलया । द्रष्टैपण ही वाया । होउनी जाय ॥२१॥
सगुणी सगुण भजावें । चित्तशुध्दीते पावावें । ज्ञान दृष्टीनें पाहावें । सद्गुरूसी ॥२२॥
भोळे भाविक आंधळे जन । यासी उपासनेलागोन । ज्ञानज्योति झाली सगुण । मनुष्यरुपीं ॥२३॥
आमुचे घरा पाहुणी आली । आम्हां सारखी वागली । वागली परी राहिली । वेगळीच ती ॥२४॥
जैसे सोनपितळ आणि सोनें । सगट दिसती दागिने । शहाणा तो पारखूं जाणे । खरे खोटे कोणाचें ॥२५॥
मृत्तिका आणि कस्तुरी । मानूं नये एकसरी । कस्तुरी कोंदे अंबरीं । सुगंधयुक्त ॥२६॥
गृहीं लाविलीया दीप । जीव जंतू धांवती अमूप । फिरफिरोनि घालिती झांप । पोट धंदा सोडोनी ॥२७॥
तैसी ही ज्ञान ज्योति । भोंवतीं असंख्य जीव जमती । झडपणीं तदाकार होती । संसृतीचे सोडोनि ॥२८॥
रजनी दृश्य दीप दावी । अज्ञानिया सद्गुरूगोसावीं । ज्ञान तेजें समूळ घालवी । तिमिर राशी ॥२९॥
तिमिर गेलियापाठीं । लोभमोहादि चोरटी न येती समोर दृष्टी । साधकांते नाडाया ॥३०॥
निर्गुण गुणात्वा आलें । गुणसाम्यें वर्णन केलें । नातरी वर्णिता भागले । थोर थोर ॥३१॥
सिध्द होवोनी सिध्द पहावें । जाणते होवोनी जाणावें । शब्द ज्ञानें पडेना ठावें । सद्गुरूरुप ॥३२॥
अनुभवी ना व्युत्पन्न परी । स्तवनीं गुंतलें मन । आवडी सारिखें सजवोन । निववूं चित्त ॥३३॥
सूर्या दाविती निरांजन । ऐसें भक्तीचें लक्षण । तैसेचि ज्ञान निधान । वर्णू आतां ॥३४॥
आवडि सारिखें सजवूं । ज्ञानेंद्रियांची साक्ष घेऊं । अंतरी सदगुरुचे पद ध्याऊं । निरंतर प्रेमभरें ॥३५॥
चला गोंदवले ग्रामासी । रावजीगृहीं सत्वरेसी क। बाळलीला आहे कैसी । पाहूं नेत्र भरोनि ॥३६॥
एक वर्ष झालें बाळा । वाढ दिवसाचा सोहळा । आनंदें यथासांग झाला । रावजीगृहीं ॥३७॥
गणपती बोबडे बोले । ऐकता श्रवण संतोषले । उचलोनि कडिये घेतले । ज्यानीं त्यानीं ॥३८॥
राहेना माउली घरीं । घेऊनि जातीं शेजारीं । खेळूं लागती नाना परी । त्या सवेची ॥३९॥
जया आपपरभाव नाहीं । जिकडे नेती तिकडे जाई । मुख न्याहाळीना कांहीं । आपुलें कीं पराचें ॥४०॥
सर्वत्रासी वाटे घ्यावें । वाटणी येईना स्वभावें । ज्यानें पहावें त्यानें न्यावें । आपुलें गृहीं ॥४१॥
तेथेचि जेवूं घालावें । मऊ शय्ये निजवावें । पुन्हां माउलीसी पुसावें । बाळ कोठें म्हणोनि ॥४२॥
मूल पहतां पडे भूल । वरी गोजिरें आणि सोज्वळ । हास्यमुख आणि प्रेमळ । मग काय उणें ॥४३॥
जरी ओंगळ आणि तुसड । जागचें हालेना जड । रडतमुखीं खादाडा । अतिशयेची ॥४४॥
हटवादी आणि त्रागीं । पाय शीर आपटी वेगीं । जें सदा असें रोगी । कांहाना कांही ॥४५॥
नकटें काळे कुळकूळीत । मधुरसेवनी अतृप्त । विधी वमन करीत । चिळसवाणें ॥४६॥
माउलीसी सोडिना । कामकाज करुं देईना । म्हणती फेडोन घेतो नाना । उपकार पूर्व जन्मीचे ॥४७॥
तयासी कोणी न घेती । प्रसंग आल्या कंटाळती । वदती ऐसी कां जन्मतीं । दु:ख द्यावया कारणें ॥४८॥
मस्तकीं उवा आणि खवडे । खरूज नायटे पैण चिपडें । झांपडा होऊनि सदा रडें । वैरी म्हणती पूर्वीचे ॥४९॥
तैसा नव्हे गणपती । दर्शनें आनंद होय चित्ती । प्रेमें उचलोनि घेती । करिती हास्य विनोदे ॥५०॥
रावजी गृही प्रतिदीन । होत असें कीर्तन भजन । गणपती चित्त देऊन । श्रवण करी स्थीरत्वें ॥५१॥
माउली संनिध निजेना । निजवितां रडता राहेना । भजनाची आवडी मना । तेथे खेळ स्वच्छंदें ॥५२॥
म्हणती तुज समजतें काय । बालपणीं प्रिय माय । खेळखेळोनी दिवस जाय । बालकांचा ॥५३॥
आजा पोथी वाची नित्य । श्रवणा जावोनि बैसत । म्हणती पहाहो यावें चित्त । श्रवणीं स्थीर होतसें ॥५४॥
अशा वय़ीं क्रीडेची जोडी । गोड खावयाची आवडी । मौज पाहावया घेती उडी । पोरासवें धांवती ॥५५॥
यासी दिधल्या खाईना । क्रीडेचा हटट धरीना । श्रवणा बैसतो पहाना । चित्त देउनी ॥५६॥
याची बुध्दि दिसते भारी । सांगितली गोष्ट न विसरी । याचेपाशी फसवेगिरी । कांही चालेनां ॥५७॥
हळूंहळूं दिवस गेले । तीन संवत्सर पालटले । बुध्दी देखोनी चकित झाले । म्हणती कोणा न बोलावें ॥५८॥
कोणी ठेवितील नावें । कोणी स्तुति करतील भावें । दृष्ट होईल स्वभावें । बालकासी ॥५९॥
धुळी अक्षरें घालोन देती । तैसीच काढी शीघ्रगती । लिहिण्या वाचण्या गणपती । शिकला त्वरीत ॥६०॥
दंतकथा होते सांगत । एकपाठी दुपाठी पंडित । भोजसभेसीं नांदत । कालिदासादिक ॥६१॥
दंतकथा म्हणता खोटी । करुनी दावितो गोष्टी । नवल पहा एकपाठी । पूर्वार्जित ज्ञान ॥६२॥
पूर्व जन्मी हा साधू । असेल कोणी प्रसिध्दू । वासनाशेषें जन्म संबंधू । घडला असेल ॥६३॥
नानापरीनें कल्प्ना । करिता तर्क वितर्क नाना । दृष्टांत आणोनि ध्याना । स्वस्थ राहती ॥६४॥
सपलत्वें वाटे दूड । परी दूड ना द्वाडा । पाराव्याची न काढी खोड । मैत्री राखी सर्वदा ॥६५॥
नित्य हरिभजनीं नाचे । रामनामे घेई वाचें । बालपणी आयुष्य न वेचए । क्रीडेमाजीं ॥६६॥
इति श्रीसद गुरुलीलामृते तृतियाध्यायांतर्गत । प्रथम: समास समाप्त: ओंवीसंख्या ६६
॥ श्रीसद गुरूचरणारविंदार्पणमस्तु ॥
॥ श्रीराम समर्थ ॥
N/A
References : N/A
Last Updated : October 18, 2019
TOP