॥६१८१॥
एक करी शक्तिपूजा । यंत्र वोजा अवर्ण ॥१॥
काय त्याचें थोरपण । ठायीं अन्नपान तें ॥२॥
मद्यपात्र मुखीं जाण । अपषोण बुडाले ॥३॥
तुका सांडुनी आचार । अनाचारें वर्तती ॥४॥

॥६१८२॥
नेणे आपुलिया हित । नेणे शाक्त मांजर ॥१॥
मद्य पितां माजे रेडा । तैशा पाडा दिसत ॥२॥
देहभाव नाहीं शुद्धि । भली बुद्धि भ्रंशिली ॥३॥
तुका ह्मणे भ्रांत वेडा । तैशा जाडा चाळवे ॥४॥

॥६१८३॥
अंगीं लावूनी विभूती । चौक शक्ति अर्चिली ॥१॥
घट मांडियले यंत्रीं । माळा सुत्रीं लोंबती ॥२॥
गंध धूप दीप फुलें । परीमल सुगंध ॥३॥
दीपपरी चहुं कोनीं । गुरुध्यानीं बैसती ॥४॥
शिष्या सांगे उपदेश । पुजेस तें दिव्यान्न ॥५॥
पात्रमुखीं मागे पुजा । दिव्य वोजा आणवी ॥६॥
तुका म्हणे गधडीचे । शाक्त वुचे वर्तती ॥७॥

॥६१८४॥
नाहीं वेदांची मर्यादा । वर्ते अनाचार सदा ॥१॥
काय ह्मणावें तयासी । मूर्तीमंत पापराशी ॥२॥
नाहीं द्यावया उपमा । दुजा पापी झाली सीमा ॥३॥
तुका ह्मणे शाक्त । बेटा भोगी अध:पात ॥४॥

॥६१८५॥
जातां तयाचिया गांवा । गुण तयाऐसा व्हावा ॥१॥
देखे शाक्ताचें जो कर्म । सांडी धर्म पडे भ्रम ॥२॥
नेणे शुची स्नानसंध्या । वादी प्रवर्तक भेदा ॥३॥
तुका ह्मणे संग । संगें नर्का जाणें लागे ॥४॥

॥६१८६॥
पर उपकारा साठीं । शक्ती वेंची बुडे सृष्टी ॥१॥
सदा आठोदी पदरीं । पूजा आत्मा कृष्ण हरी ॥२॥
पार नाहीं भाग्य ऐसें । पुण्यलाभ नाहीं ऐसे ॥३॥
तुका ह्मणे सोपी । वाट अंतीं सुखरुपी ॥४॥

॥६१८७॥
दया तया नांव । दंभ क्रोध मारी जीव ॥१॥
देवा पायीं सर्व शक्ति । दुणी वाढवावी प्रीति ॥२॥
दाविलिया वाट । दिलें खाय जाय नीट ॥३॥
दाता ऐशा नांव । तुका ह्मणे वेंची जीव ॥४॥

॥६१८८॥
जगा सुख करी । जाणे साधु तो श्रीहरी ॥१॥
जगामाजि राहे सदा । करी विरहित धंदा ॥२॥
जन्मले भूतळीं । दीप उजळीला कुळीं ॥३॥
तुका ह्मणे दाता । भुक्ति मुक्तीचा जनिता ॥४॥

॥६१८९॥
सांगतों या लोकां रांडा पूजूं नका । वैकुंठनायका भजा वेगीं ॥१॥
काय असे चंडी शक्तीचिये हातीं । अध:पाता नेती अंतकाळी ॥२॥
म्हणोनीयां भाव धरा पांडुरंगीं । भवसिंधू वेगीं पार पावी ॥३॥
तुका ह्मणे ज्याच्या नामें हे पतीत । पावले त्वरित वैकुंठासी ॥४॥

॥६१९०॥
टंवकारुनी दृष्टी लावूनियां रंग । दावी झगमग डोळ्यापुढें ॥१॥
ह्मणती शिष्यासी लागली समाधि । लटकीचि उपाधी झकविती ॥२॥
दीपाचिया ज्योति कोंडियेलें तेज । उपदेश सांज रात्री माजी ॥३॥
रांगोळिया चौक शृंगारुनी वोजा । आवरण आसनीं मुद्रा दावी ॥५॥
नैवेद्यासी ह्मणे करावें पक्वान्न । पात्रासी दिव्यान्न परवडी ॥६॥
झाला उपदेश कवळ घ्यारे मुखीं । आपोन शेखीं बुडविलें ॥७॥
पाषांड करोनी मांडिले जीविका । बुडवी भाविकां लोकांप्रती ॥८॥
कायावाचा मनें सोडवी संकल्प । गुरु गुरु जप प्रतिपादी ॥९॥
शुद्ध परमार्थ बुडविला तेणें । गुरुत्वभूषणें भोग भोगी ॥१०॥
विधिचाही लोप बुडविला वेद । शास्त्रांचा ही बोध हरविला ॥११॥
योगाची धारणा नाहीं प्राणायाम । सांडी यम नेम नित्यादिक ॥१२॥
वैराग्याचा लोप हरिभजनीं विक्षेप । वाढविलें पाप मतिलंडें ॥१३॥
तुका ह्मणे गेलें गुरत्व गुखाडी । पूर्वजांसी धाडी नरकवासा ॥१४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP