॥६१७४॥
कर्मी न धरिती शंका । जाय नर्का आनंदें ॥१॥
शक्ति पूजा चौक माळा । त्या रांगोळ्या विचित्रें ॥२॥
पुजा कलशादि हारी । पात्रें बरीं ठेविलीं ॥३॥
तुका ह्मणे दीप पुढां । पोरें रांडा मेळवी ॥४॥

॥६१७५॥
एके ठायीं करी काळा । नाहीं भ्याला वेदासी ॥१॥
नाहीं भीड लाज संता ॥ लोलिंगता आवडी ॥२॥
देवी देव रात्रीं पुजी ॥ आशा माजी द्रव्याची ॥३॥
तुका म्हणे शाक्त साचे ॥ खाती मोचे यमाचे ॥४॥

॥६१७६॥
अंगी आणोनी महंती ॥ द्रव्यपुजेसी मागती ॥१॥
जिच्या नांवें भोग धन ॥ तिचें नाहीं अभिधान ॥२॥
जिची वाणी जगीं कीर्ति ॥ नाहीं भेटी तिची प्रिती ॥३॥
तुका ह्मणे थोर ॥ नाहीं जोडला आधार ॥४॥

॥६१७७॥
शक्ति पुजितसे रांड ॥ सुळी भांड मांगीण ॥१॥
कुंकु लावी कपाळासी ॥ सुशोभेसी शोभत ॥२॥
यंत्र पुजी रांड लेकां ॥ भुली लोकां कौतुकें ॥३॥
तुका ह्मणे सांगों किती ॥ नर्का जाती सायासें ॥४॥

॥६१७८॥
चौक रांगोळीया साधी । रांडमांदी भोंवती ॥१॥
एकमेकां नाहीं चवी । करी गोंवी विषयीं ॥२॥
नाहीं शुद्धवरी पाय । पापें जाय नर्कासी ॥३॥
तुका ह्मणे ऐशा जना । यातना त्या यमाची ॥४॥

॥६१७९॥
वांकडीच मान वांकडी पगडी । मद्यपी आवडी पाप दृष्टी ॥१॥
तोंडें बडबडी नाहीं शुद्ध बुद्धी । वर्ते नाना छंदीं नेणे कांहीं ॥२॥
तुका ह्मणे ऐसें करितांचि आधीं । पडले समुद्रीं काळाचिया ॥३॥

॥६१८०॥
रांगोळीया चौक माळा । शिष्य मेळा मेळवी ॥१॥
यंत्र पुजा घट मांडी । साधे जोडी अधर्म ॥२॥
आगमांचें ह्मणे ज्ञान । मागे धन पुजेसी ॥३॥
तुका ह्मणे पडे रिता । खोडा थिता आपण ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : April 12, 2019

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP