आदिप्रकरण - अध्याय पहिला

निरंजन माधवांच्या कवितेतील काव्यस्फूर्ति उच्च दर्जाची असून, भाषेत रसाळपणा व प्रसाद सोज्वळता आहे.


॥ श्रीमत्सुंदरकृष्णाय नम: ॥ श्रीमहागणाधीशाय नम: ॥
॥ श्री शारदांबायै नम: ॥ श्रीलक्ष्मीधरगुरुभ्यो नम: ॥
॥ श्रीमहागौळीपूर्णानंदगुरुभ्यो नम: ॥ ॐ श्रीज्ञानेश्वरगुरुभ्यो नम: ॥

ज्ञानेशो भगवानविष्णु निवृत्तिभगवान्हर: ।
सोप नो भगवान्ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मण:कला ॥१॥

जें ईटेवरि शोभतें कटितटी हस्तांबुजे ठेउनि
धाले जे सनकादि शंकरमुनी ध्यानामृता सेउनी ।
हें मी वंदितसे निरंतर दिसे दृष्टीस या सावळें
जें अत्यंत सुवर्ण गोड विलसे चिन्मात्र जें कोवळें ॥१॥
या लोकी गणनाथ बोधमय या भावोनियां पूजिजे
किंवा यासचि शारदा म्हणुनियां विद्यात्मिका भाविजे ।
शुद्धानंदविलास यासचि गुरु हें नामही ठेविजे
ते मद्दैवत हृत्सरोजभुवनी सर्वात्मका ध्यायिजे ॥२॥
श्रीलक्ष्मीधर बापदेव करुणें चित्तत्व जें जोडले
ते ज्ञानेश्वर नामकें सगुण या लोकत्रयी रूढले ।
त्याचे दिव्य विलास वर्णिन मुखें संतोष देती जना
यावें या चरितार्णवासि सुजनीं सानंद उन्मज्जना ॥३॥
नमीन मी सद्‍गुरु आदिदेवा । ज्ञानेश्वरा पुण्यतमप्रभावा ।
वर्णीन तुझ्या चरितामृतातें । जिती सदा जें त्रिदशामृतातें ॥४॥
कृष्णे गीतार्थ पार्था कथुनि अत्तितमा नाशिले त्या विषादा
तेव्हां तो विश्वरुपा निरखुने नयनी पावला पूर्ण बोधा ।
त्याचा तो अर्थ सोपा प्रकट कलियुगी प्राकृतातें कराया
झाला तो देहधारी हरि उघड पहा । सादरे ज्ञानराया ॥५॥
कृपा करावी मज बुद्धि द्यावी । ज्ञानेश्वरा । कीर्ति तुझी वदावी ।
तुझ्या प्रसादें जडा चेष्टवितें । जडासि नाहीं नवलाब येथें ॥६॥
चित्ता चेतविसी मना मनविसी सर्वेंद्रिया चाळिसी
प्राणा हालविसी गुणा प्रकटिसी विद्या स्वयं दाविसी ।
मोहातें हरिसी मतीस वरिसी तूं अंतरी राहसी
जिव्हे बोलविसी असें घडविसी चिच्छक्ति तूझी असी ॥७॥
लोंकी या घडते जनांत असतें तूं वेगळें कोणते
नेत्री जे दिसते श्रुती परिसतें जे बोलते चालते ।
दे घेतें उठते तसेंचि बसते जे नीजते हांसते
विज्ञानात्मक तूंचि एक अससी भावासि या जाणतें ॥८॥
यासाठी मम हृत्सरोजभुवनी अव्यक्त हो ऊघडा
दावीं या रसनापथें तव जना सन्मार्ग हा रोकडा ।
यातें जे निरखोनि चालति पुढें तद्धाम ते पावती
ऐशी हे मज बुद्धि दे त्रिभुवनाधारा अळंदीपती ॥९॥
देवा ! त्यां पाहलेंचि पादकमळा सेवावया लाविलें
यालोकी निजदास रुढउनियां सर्वांसि त्यां दाविलें ।
आतां तेंचि मनी धरोनि सदया ! त्वकीर्तिं हे बोलवी
कैसा आजि मला उपेक्षिसि विभू त्वां घेतले पालवीं ॥१०॥
===========
कुसुमशर वृत्त.
नमन तुज नमन तुज देवा !
परम गुणनिधि अससि अगुण विभुदेवा !
न कळसिच विकळ बहु हुडकिति तुला ते
श्रुति अझुणिवरि विवरि तव गुणकला ते ॥११॥
घडसि जरि सकृप तरि कळति सुजनातें
करिति परि अमुप तप न दिससि जनातें
शरण तुज निघति मनिं धरुनि पदपद्मा
नमिति तरि लभति गदरहित सुखसद्मा ॥१२॥
श्रोते सज्जन सांख्ययोगनिपुणा सज्ञानवंता जना
वेदाभ्यासपरायणा सुविबुधां पांडित्यसद्‍भूषणा ।
नाना याज्ञिक श्रौतकर्मकरणा नाना तपस्वी गणा
भावें किंकर निरंजन करीं वंदोनियां प्रार्थना ॥१३॥
आहे की भगवंत सर्वगत हा सर्वस्वरुपी हरी
सर्वांमाजि वसोनि सर्व परिच्या क्रीडा विचित्रा करी ।
तो ज्ञानेश्वर नांस साच घडला तारावया सज्जना
त्याचें सच्चरितार्थ वर्णिन असी मी इच्छितों कामना ॥१४॥
नेणें काव्यकलाकलाप अथवा कौशल्य नेणें कसें
योगीं तों गति ठाउकीच न दिसे, वेदांत ठावा नसे ।
वैराग्याप्रति भेटि तों मज नसे ते भक्ति नेणे कसी
ध्यातों श्रीगुरुज्ञानदेवचरणांभोजासि या मानसीं ॥१५॥
तो प्रेरी रसनेसि यास्तव यथाज्ञाने यथाधीपणा
वर्णावी चरितें ह्मणोनि धरिले म्यां धैर्य हें भाषणा ।
टाकावे बहु दोष काव्यरचनीं एका गुणा आदरा
सद्भावार्थ असे जगद्‍गुरुपदी हा साच चित्ती धरा ॥१६॥
मूळापासुनि सर्व वृत्त कथणें याकारणें लागले
संदर्भाविण कोण लोक उमजे जाणे कसें चांगले ।
यासाठी पुरुषत्रयादि बरवी घेवोनि वर्णीतसें
तें सद्भक्तचरित्र पूर्ण विभवें शोभे भजा मानसें ॥१७॥
================
॥ अथ कथाप्रारंभ ॥
श्रीगोदातट रम्य पावन असे मोक्षार्थ दे या जना
आपेगांव अपूर्व पुण्य वसती सौख्यासि ये सज्जना ।
तैं गोविंद महानुभाव विलसे सद्विप्रचूडामणी
गैनीनाथकृपे अलभ्य मिनला सज्ञानरुपी मणी ॥१८॥
सारी सत्कर्मयोगा विधिसहित सुखें आश्रमी योगनिष्ठा ।
नीरायी नाम भार्येसह भजत गुरु नाम गैनी वरिष्ठा ।
भक्तिप्रेमानुबंधे विरति अतिशयें वर्ततां काळकर्मे
झाली गर्भासि धर्ती द्विजवरवनिता वर्ततां नित्य धर्मे ॥१९॥
आनंदांकुर तो प्रकाशित दिसे त्या भक्तीगर्भी जसा
आला विठ्ठल तोचि दिव्य उदरा वाटे मला भर्वसा ।
झाले नौ महिने निशा हरुनियां व्याली उषा ज्या परीं ।
लोकीं सद्रविबिंब, हे प्रसवली पुत्रा तसी सुंदरी ॥२०॥
लोकीं विठ्ठल नामे ठेउनि पिता तो नामकर्मे करी
बालत्वावरि मुंजबंधन विधी सानंद तो आदरी ।
वेदाध्यापन धर्मशास्त्र विहितें श्रौतादि सांगे पिता
हा वैराग्यविलासवंत न धरी संसारचिंताकथा ॥२१॥
वैराग्यें सदृढे नमोनि पितरां ता स्त्रातकार्थी घडे
केली उत्तरमानसादि सकळें तीर्थे सुभावे पुढें ।
आला द्वारवतीस सुंदर हरी पूजोनि भक्ती तया
शंखोद्धारक तीर्थराज निरखी दिंडारका चिन्मया ॥२२॥
देखे दिव्य सुदामविप्रनगरी हे द्वारका दूसरी
जेथें श्रीधर मूळमाधव असे तो देखिला श्रीहरी ।
ये त्याहोनि पुढें प्रभास विलसे तेंही दिठी देखिलें
देखेते मुचकुंदभूपतिगुहा हें चित्त तें रंगलें ॥२३॥
ऐसा मार्गे उलंघितां निरखिलें त्या सप्तशृंगाचळा
तेथें जे विलसे सदा भगवती दाक्षायणी चित्कळा ।
तीतें सेउनि पातला द्विज सुखें गोदावरीच्या तटीं
शोभे पंचवटी निरीक्षण करी श्रीरामसीता ढिठीं ॥२४॥
कापालेश्वर पूजिला मग निघे श्रीत्र्यंबकालोकना
पाहे ब्रह्मगिरी कुशावत महातीर्थी करी मज्जना ।
भीमाशंकर ज्योतिलिंग निरखी आला अलंदीपुरा
इंद्राणी अवलोकिली सुरनदी साक्षातत्रिलोकोद्धरा ॥२५॥
केलें स्नान अतीव पावन जळीं श्रीचक्रतीर्थी तदा
भस्मोद्‍धूलित आसनावरि बसे संध्याजपार्थी मुदा ।
सिद्धोपंत महानुभाव वसती तद्‍ग्रामवासी सदा
जो सिद्धेश्वर तोचि हा द्विजतनूधर्ता दिसे सर्वदा ॥२६॥
सदाचार निष्ठा करी अग्निहोत्रा । सदा मान्य जो विप्रधुर्यां पवित्रा ।
स्वधर्मासि या नित्य पाळोनि राहे । महाज्ञान संपन्न चिद्वस्तु पाहे ॥२७॥
घरी सुंदरी धर्ममार्गानुकूला । पतीच्या मनासारिखी पुण्यशीला ।
असें दिव्य दांपत्य धर्मी विराजे । सदाभ्यागता पूजिती भक्तिभोजें ॥२८॥
तयांनी दिठी देखिलें या द्विजातें । सदा ब्रह्मचर्यें विराजे अशातें ।
दिसे सूर्य भूमंडळा काय आला । असी सत्प्रभा देखतां स्तब्ध झाला ॥२९॥
म्हणे कुंभजन्मा असे तीर्थवासी । ऋषी सांख्यकर्ताचि वाटे मनासी ।
अहो ! मुनी आणखी कोण आहे । जया देखतां पाप कोठें न राहे ॥३०॥
नमस्कार साष्टांग केला द्विजेंद्रा । चला मंदिरा माझिया ज्ञानचंद्रा ।
अम्हां मानसी वेधली रुपमुद्रा । घडे तोष अत्यंत चित्ता समुद्रा ॥३१॥
पुसे पाय कोठूनि आले वदावें । मला धन्य या लोकमार्गी करावें ।
चलावें गृहा आजि हा लाभ द्यावा । मना आवडे साधिजे पादसेवा ॥३२॥
वदे विप्र आम्ही असों तीर्थवासी । अम्हांलागि जाणें असे पंढरीसी ।
जधीं देखिली शुद्धभीमा मनाला । तदारभ्य अध्यास ऐसा उदेला ॥३३॥
असें ऐकतां तोषचित्ते घरातें । बहु प्रार्थिला ने तदा विठ्ठलातें ।
महाभावसंपन्न देखोनि तोषें । घरा चालिला श्रीमुखी नामघोषें ॥३४॥
घरी पूजिला ठेविला दीस कांही । तदां पाहिली रम्यचर्या तयांही ।
बरा दंपतीलागि चित्तासि आला । परामर्ष या सत्कुळाचाच केला ॥३५॥
ययां स्वप्नही दाविलें विठ्ठलाने । घरी कन्यका यासी दीजे विधानें ।
मना आवडे तोचि स्वप्नार्थ वाटे । तदा दंपतीच्या मना हर्ष वाटे ॥३६॥
पुसों लागले सर्व वृत्तांत यातें । कुलाचार सद्गोत्रवृत्ती समेतें ।
वदे ग्राम गोदातटी दिव्य आहे । पिता माय माझी असे तेथ पाहे ॥३७॥
घरी वृद्ध मातापिता क्षेत्रवासी । अपेगाविची वृत्ति तेथील जोशी ।
यजुर्वेद वाजीसनी शुद्ध शाखा । असें बोलतां तोष पंतासि देखा ॥३८॥
तदां बोलती हे वधू सुंदरांगी । जशी रुक्मिणी रुक्मवर्णा शुभांगी ।
तुम्हां अर्पिजे हेंचि आलें मनाला । पहा आमुच्या गोत्रजां सज्जनाला ॥३९॥
म्हणे मार्गिच्या तीर्थिका दिव्यकन्या । कसी अर्पितां आपुली लोकमान्या ।
घरी मायबापाविना लग्नसिद्धि । कसी ते घडे हे नव्हें बोलणें योग्य हें ज्ञानदक्षा ॥४०॥
तईं दंपती बोलती या द्विजेंद्रा । यथायोग्य हें सांगसी धीसमुद्रा ।
तुला देखतां चित्त ऐसेंचि मानी । बरी अर्पिजे हे वधू सद्विधानीं ॥४२॥
ज्ञानी रुपस सत्कुलीन तरणा साधू तपस्वी असा
विद्यावंत विचारशील शुचितासौजन्यसिंधू  तसा ।
गांभीर्यादिगुणें सदा विलससी सत्पात्र भाग्यें अह्मां
जामाता हरिनें दिल्हा न करितां सायास ये आश्रमा ॥४३॥
नांगीकार करी मला ह्नणतसे तीर्तासि जाणें पुढें
श्रीरामेश्वर मुख्य दक्षिण दिशे आहेच कीं रोकडें ।
हें मी साधुनि कृत्य येइन पुन्हा संवत्सरें आलया
तेव्हां मान्य करीन गोष्टि तुमची पित्रां मना आलियां ॥४४॥
तेव्हां खिन्नमनें निशीथ समयीं अत्यंत जायापती
देखे विठ्ठल स्वप्न रात्रिसमयी वृंदावनी सन्मती ।
" हा तुझाचि विभाग सत्य विलसे पूर्वीच हा नेमिला
ब्रह्मयानें तुजकारणेंचि घडिला आहे द्विजा ठेविला" ॥४५॥
आला ब्राह्मण वृद्ध रुप धरुनी प्रत्यक्ष तैसा वदे
अंगीकार करोनि दिव्य ललना तीर्थासि जाईं मुदें ।
हा तूझाच विभाग निर्मित असे या अन्यथा कैं घडे
आहे कार्य विचित्र फार जगतीं सत्कीर्ति वाढे पुढें ॥४६॥
अंगीकार करीं न आग्रह धरीं होणार कैसें चुके ?
कीजे लग्नविधान त्यावरि पुन्हा तीर्थासि जावें सुखें ।
तीन्ही देव इच्या कुसीं प्रकटती ऐकोनियां चोजला
’होणारा प्रति कोण काय चुकवूं लाहे’ असे बोलिला ॥४७॥
केलें मान्य तदां सुतोषमनसें ते सोयिरे धायिरे
पंती लग्न करावयासि समुद्रें ते आळविले बरे ।
सामग्री समुदी यथास्थित घडे ज्या नेमिल्या वासरीं
झाली सिद्ध यथेष्ट सुंदर वधू अर्पावया साजिरी ॥४८॥
सालंकारयुता सुता द्विजवरा सिद्धेश्वरा सन्निधी
जैसा क्षीरनिधी रमा स्वतनया विष्णूसि अर्पी विधी ।
ज्येष्ठीं लग्न घडे तदां मग पुढें आषाढ आला भला
झाला उत्सवकाळ पंढरपुरीं ज्याला मिळेना तुला ॥४९॥
जामाता श्वशुरीं प्रयाण करितां ते पावले पंढरी
श्री ईटेवरि शामसुंदर उभा तो देखिला श्रीहरी ।
आले वैष्णवभार फार करिती सत्कीर्तनें सादरें
वीणा ताळ मृदंग नाम कडके टाळ्या अनेकास्वरें ॥५०॥
तोही उत्सव पाहिला मघ निघे तीर्थाटणा दक्षिणे
सिद्धोपंत ’अवश्यमेव’ ह्मणती जावें सुखें आपणें ।
याव शीघ्र बहूत दीस न लवा श्रीविठ्ठलाज्ञा अशी
आहे यास्तव म्यां निरोप दिधला नस्तां अह्मां मानसीं ॥५१॥
नमुनि विठ्ठ्ल जाय पुढें तया । करि बिजे जगदीश सवें जया ।
परम सौख्य गमे हरिकीर्तनें । करित तीर्थ फिरे मनचिंतनें ॥५२॥

आर्या
ज्ञानेश्वरविजयाभिध सुंदर योगी निरंजने केला ।
ग्रंथ गुरुस्मरणे हा मान्य घडो सर्व साधु पुरुषांला ॥५३॥
॥ इति श्री ज्ञानेश्वरविजय माधवनंदन कवि बनाजि विरचित
प्रथमाध्याय समाप्त ॥ श्रीज्ञानदेवार्पणमस्तु ॥ श्रीरस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : February 28, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP