लघुभागवत - अध्याय ९ वा
लघुभागवत हे एक उपपुराण आहे.
आतां कृष्णाचें बालचरित्र । ऐका तुह्मी परम पवित्र ।
ज्याच्या योगें तुमचे श्रोत्र । पावन होतील निर्धारें ॥१॥
लेंकुरें मारावीं ऐशी । सूचना रुचली कंसासी ।
मग नेमिली पूतना राक्षसी । त्या कार्यासी तत्काळ ॥२॥
ती जाऊनि प्रतिसदनीं । तान्हुलें बाळ देखोनी ।
आया मोहूनि मधुर वचनीं । घात करी बाळांचा ॥३॥
सुंदर वेषें विवशी । पूतना आली गोकुळाशी।
कोणासी नुरे संशय मानसीं । देखुनि सौदर्य तियेचें ॥४॥
नंदसदनीं रुदनस्वर । ऐकूनि आली तेथ सत्वर।
ह्मणे बालक मनोहर । कैसें तुझी रडवितां ॥५॥
तेव्हां नव्हता नंद सदनीं । यशोदेसी घातली मोहिनी ।
बाळ घॆऊनि लाविलें स्तनीं । विष भरलें ज्यामाजी ॥६॥
कृष्ण सर्वज्ञ परमेश्वर । त्यासी ठावें कपट साचार ।
जो वस्तुमात्रासी आधार । विष बाधा त्या कैंची ॥७॥
तेणें शोषून पूर्ण विष । रक्ताचाही केला नाश ।
पूतना झाली मृत्युवश । थोर नवल सकलांसी ॥८॥
करुं इच्छिती पराची हानी । तेचि स्वयें मरती निदानीं ।
ये विषयीं संशय कोणी । धरुं नये अंतरीं ॥९॥
कृष्णलीला अपार । आणि लोकोत्तर चमत्कार ।
वर्णू जातां ग्रंथविस्तार । होईल भय वाटतें ॥१०॥
तथापि कांहीं आवश्यक । सांगतो मनोरंजक ।
तुम्हांसी होईल कौतुक । प्रतिज्ञेचें वचन हें ॥११॥
एकदां कृष्णासी मांडीवरी । घेऊनि बैसे यशोदा नारी ।
तंव तेणें जडत्व शरीरीं । पर्वतप्राय आणिलें ॥१२॥
एकदां दह्यांचे थोर हांडे । जे उचलूं न शकती मल्ल गाढे ।
ते उचलूनी भलतीकडे । सहज कृष्णें ठेविले ॥१३॥
कृष्णासी वधावया धाडी कंस । तृणावर्त नामें राक्षस ।
कृष्णें केला त्याचा नाश । क्षणामाजी सहजचि ॥१४॥
एकदां कृष्णें भक्षिली मृत्तिका । यशोदा ह्मणे उघडीं मुखा ।
आंत इंद्रादि चतुर्दश लोकां । यशोदेनें देखिलें ॥१५॥
कृष्णाचीं सदा गार्हाणीं । यशोदेसी सांगती गौळणी ।
चोरुनि खातो दहिं दुध लोणी । करणी याची अचाट ॥१६॥
गोदोहना आधीं वासरें । सोडूनि पळतो दूर त्वरें ।
हरले आमुचे उपाय सारे । हा नावरे कोणासी ॥१७॥
घरोघरीं करितो खोडी । तान्ह्या बाळांसी चिमटे काढी ।
दुभत्याचीं गाडगीं फोडी । किती चहाडी सांगावी ॥१८॥
चोरुनि मारितो खडे । सवेंचि जाऊनि दूर दडे ।
शोधूनि पहावें चहूंकडे । तरी न सांपडे कोणासी ॥१९॥
ऐसा हा कृष्ण दांडगा । सार्या मुलुखाचा भांडगा ।
कितीही बोला परी कोडगा । स्वभाव याचा निर्लज्ज ॥२०॥
ऐकूनि कृष्णाची निंदा । क्रोधें बोले त्यासी यशोदा ।
कागाळी आणिसी सदा । किती ह्मणूनि ऐकावें ॥२१॥
येरु म्हणे सर्वस्व खोटें । उघडीं देखूनि कपाटें।
मार्जार उलथी दह्यांचे लोटे । आळ घेती मजवरी ॥२२॥
लपविती माझा चेंडू । सकळ मज पाहती कोडूं ।
मग कां नको त्यांसीं भांडूं । तूंचि सांग हे माते ॥२३॥
आधीं काढूनि आपण खोडी । उलट माझी करिती चहाडी ।
मज त्रास देती घडिघडी । म्हणूनि खडे मारितों ॥२४॥
उगाचि लाविती मज बोल । ऐकूनि हांसल्या गौळणी सकल ।
विनोदें चुरुनि त्याचे गाल । म्हणती बाळ शाहणें ॥२५॥
कृष्णाग्रज बलिराम । उभयीं बंधुप्रेम उत्तम ।
खेळ खेळती मनोरम । गोपांसहित सर्वदा ॥२६॥
मुरली पांवे घेउनी । मुलें क्रीडती नित्य वनीं ।
अद्भुत वर्तलें एके दिनीं । वत्सें धेनू चारितां ॥२७॥
कृष्णासी मारावया गुप्त । वत्सरुपें दैत्य अवचित ।
आला, देखूनि नेत्रसंकेत । कृष्ण करी रामातें ॥२८॥
बलिराम थोर पराक्रमी । धरुनि दैत्य फेंकिला व्योमीं ।
भूमीसी पडतां जैसा कृमी । पादतळीं चिरडिला ॥२९॥
एकदां धेनु पीतां उदक । बकरुपें आला दैत्य एक ।
कृष्णें धरुनि त्याचें मुख । मध्यभागीं विदारिलें ॥३०॥
पुनरपि एक निशाचर । होऊनि आला अजगर ।
त्याचें मुखीं गोपकुमर । कृष्णासहित अटकले ॥३१॥
तेव्हां कृष्णें निजशरीर । वाढविलें भयंकर ।
त्या योगें तत्काळ अजगर । मेला श्वास कोंडुनी ॥३२॥
ऐसे गोपाळ कांतारीं । धेनु चारितां यमुनातीरीं।
क्रीडा करिति नानापरी । वर्णू येथ तें किती ॥३३॥
एकमेकांची शिदोरी । एकवटूनि मुलें सारीं ।
सप्रेम भक्षिती दोन प्रहरीं । भेदभाव विसरुनी ॥३४॥
प्रत्यहीं सायंकाळपर्यंत । वनीं गोपाळ समस्त ।
धांवत हंसत खेळत । क्रीडा करिती आनंदें ॥३५॥
बहु पराक्रमी रामकृष्ण । राक्षसांपासूनि गोपरक्षण ।
केलें त्यांनी, हें वर्तमान । कळतां चकित जन झाले ॥३६॥
श्रीकृष्णाची अद्भुत शक्ती । वर्णावया प्रत्यक्ष सरस्वती ।
तीही असमर्थ मग मी किती । मंदमति मानव ॥३७॥
श्रीकृष्ण प्रभु एके दिनीं । गाई चारितां वृंदावनीं ।
इतर गोपाल प्यावया पाणी । यमुनातीरीं पातले ॥३८॥
त्या यमुना नदीच्या डोहीं । कालिया नामें एक अही ।
वसतसे म्हणूनि जलप्रवाहीं । विष भरलें सर्वत्र ॥३९॥
तेंचि उदक गोपाळ । प्राशन करितांचि सकळ ।
मरण पावले तत्काळ । देखूनि कृष्ण घाबरे ॥४०॥
उतरुनि त्यांचें विष । त्यांसी जीवंत करी हृषीकेश ।
परी तेथूनि पुढें कोणी क्लेश । भोगूं नये यासाठीं ॥४१॥
त्या सर्पासी कोठें दूर । घालवूं ऐसा करुनि विचार ।
कळंबवृक्षीं यशोदाकुमर । चढोनि उडी घे डोहीं ॥४२॥
तेव्हां उंच उसळे जळ । त्या गर्जने सरिसा व्याळ ।
देई विळखा सबळ । कृष्णदेहासी आवेशें ॥४३॥
हें देखोनि सर्व गोपाळ । घाबरोनि झाले व्याकुळ ।
हंबरती धेनु सकळ । उतावीळ धांवती ॥४४॥
अस्तासी गेला दिनमणी । तरी गोप गाई येती ना सदनीं ।
म्हणूनि सर्वांसि चिंता मनीं । गौळणी वनीं धांवल्या ॥४५॥
तैसेचि धांवले गोप । कृष्णदेहीं पाहिला सर्प ।
सर्वांसी भयें सुटला कंप । नेणती प्रताप कृष्णाचा ॥४६॥
कृष्णाचे सारेचि स्रेही । परी बुडी घेऊनि डोहीं ।
कृष्णासी सोडवूं ऐसा नाहीं । पराक्रम कोणासी ॥४७॥
येतां कठिण अवसर । आप्तेष्ट सर्व पळती दूर ।
ऐसा अनुभव पूर्वापार । जगीं सर्वत्र येतसे ॥४८॥
त्यापरी यमुनातटीं । गोकुळवासी जनांची दाटी ।
मुखें करिती वटवटी । कोणीं पुढें जाईना ॥४९॥
सकळांचे भरंवसे । जाणावयाचेनि उद्देशें ।
कौतुक केलें हृषीकेशें । पुढील चोज आइका ॥५०॥
कृष्णाचा नेणूनि आवांका । सर्पे दिधला तदंगीं विळखा ।
देणें देऊनि एक तडाखा । कालिया दूर फेंकिला ॥५१॥
पुनरपि सर्प धांवूनि आला । घालावया कृष्णासि घाला ।
परी येरुने उलट मर्दिला । पादतळीं तुडवुनी ॥५२॥
कालियाच्या फडेवरी । अपार नाचे श्रीहरी ।
तेव्हां सर्वाग भरलें रुधिरीं । तया कालिया सर्पाचें ॥५३॥
ऐसा सर्प होऊनि घायाळ । तेथूनि काढी दूर पळ ।
निर्विष केलें यमुनाजळ । श्रीकृष्णानें तेधवां ॥५४॥
ऐसें कालिया-मर्दन । करिता झाला मधुसूदन ।
गोपगोपी सकळ जन । आनंदले त्या समयीं ॥५५॥
थोर सामर्थ्य कृष्णाअंगीं । प्रकटलें आणिक प्रसंगीं ।
इंद्र ताठला गर्वे स्वर्गी । चरित्र पुढें तें परिसा ॥५६॥
पर्जन्यवृष्टि एके काळीं । झाली नाहीं गोकुळीं ।
म्हणूनि नंदादि गोपमंडळी । यज्ञ करुं बोलिले ॥५७॥
केलिया पर्जन्ययज्ञ । इंद्र होईल प्रसन्न ।
तेणे सर्वत्र वृष्टी पूर्ण। निश्चित होईल गोकुळीं ॥५८॥
तेव्हां कृष्ण म्हणे तो पुरंदर । आपणापासूनि आहे दूर ।
गोवर्धन गिरी निकट फार । त्यासी नैवेद्य अर्पावा ॥५९॥
हें श्रीकृष्णाचें वचन । ऐकूनि, सर्वासी समाधान ।
झाले, परी हा अपमान । होय असह्य इंद्रासी ॥६०॥
बहुत कोपें पुरंदर । मोकळे सोडी जलधर ।
पर्जन्यवृष्टीचा कहर । केला सर्वत्र गोकुळीं ॥६१॥
मुसलप्राय पर्जन्यधारा । पडूं लागल्या प्रचंड गारा ।
भयंकर तुफान वारा । कडकडाट विजांचा ॥६२॥
तडाग वापी नदी नाले । सर्व गोकुल जलमय झालें ।
शुष्क स्थळ नाहीं उरलें । आश्रयासी कोठेंही ॥६३॥
तुडुंब भरलीं घरें दारें । मरों लागलीं गुरें वासरें ।
सचिंत होय गोकुळ सारें । काय करावें सुचेना ॥६४॥
हें इंद्राचें कपट । ओळखूनि यदुश्रेष्ठ ।
युक्ति योजी अचाट । प्राप्त संकट टळावया ॥६५॥
गोवर्धन पर्व समूळीं । उचलूनि धरिला करांगुळीं ।
मग आश्रयासी त्याचे तळीं । गोपगोपी राहिले ॥६६॥
गाई वासरें समस्त । पर्वतातळीं सुरक्षित ।
राहिलीं, तेव्हां पुरुहूत । अत्यंत लज्जित जाहला ॥६७॥
पूर्ण सात दिवसपर्यंत । करांगुळीं धरुनि पर्वत ।
कृष्ण उभा देखूनि सतत । आश्चर्य वाटलें सर्वासी ॥६८॥
ऐसें कृष्णाचें बळवैभव । देखूनि इंद्राचा गर्व ।
तत्काळ उतरला सर्व । गेलें गौरव तयाचें ॥६९॥
ऐसे अनेक चमत्कार । करीत एक गौळीकुमर ।
कंसासी हा समाचार । कर्णोपकर्णी पावला ॥७०॥
परी जयापासूनि निजवात । तो देवकीचा आठवा सुत ।
हें वृत्त नव्हतें विदित । तिलमात्रही कंसातें ॥७१॥
परी नारद लावूं गेला कळी । म्हणे कंसा काय भूमंडळीं ।
चाललें याची तुज मुळीं । वार्ताचि नाहीं वाटतें ॥७२॥
अगा गोकुळीं नंदसदनीं । वसुदेवाचे पुत्र दोनी ।
बलिराम कृष्ण यदुकुलमणी । पराक्रमी अत्यंत ॥७३॥
मारिले त्यानीं राक्षस किती । नाहीं याची कोणा गणती ।
ऐसें असतां तूं स्वस्थ, चित्तीं । अद्यापि अससी नवल हें ॥७४॥
हे कोण असती हें अणुमात्र । तूं नेणसी, हें दिसे विचित्र ।
तरी ऐक कंसा हे दोघे पुत्र । वसुदेवाचे जाण पां ॥७५॥
कृष्ण उपजल्याक्षणीं । वसुदेवें नंदसदनीं ।
गोकुळीं त्यासी नेउनी । सुरक्षित ठेविला ॥७६॥
देवकीचा आठवा कुमर । जो तुझा करणार संहार ।
तोचि हा जाण निर्धार । शत्रु तुझा दैत्येंद्रा ॥७७॥
कंस आधींच महादुष्ट । ऐकतां वसुदेवाचें कपट।
वह्रि जैसा घेई पेट । घृतबिंदु सिंचितां ॥७८॥
तैसा क्रोधानळें संतप्त । कंस होऊनि अत्यंत ।
म्हणे येचि क्षणीं करीन अंत । वसुदेवाचा निश्चयें ॥७९॥
तेव्हां नारद वदे त्यासी । येणें होय अकीर्ति तुजसी ।
म्हणूनि करीं तूं गोष्ट ऐसी । बंदिस्थ त्यांतें करावें ॥८०॥
याहूनि नको विशेष । इतुक्यानें चुके सर्व त्रास ।
त्यापरी ठेवी बंदींत कंस । देवकी आणि वसुदेव ॥८१॥
नारदाचा उद्देश केवळ। कंसासी घडतां पाप पुष्कळ ।
दुष्कर्माचें त्यासी फळ। भोगणें पडेल सत्वरीं ॥८२॥
कृष्णाचा करावया घात । कंस योजी उपाय बहुत ।
मुष्टिक चाणूर दैत्य गुप्त । त्या कार्यासी नेमिले ॥८३॥
मग गोकुळीं धाडिला अक्रूर । आणावया वसुदेवकुमर ।
धनुर्यागाचा समारंभ थोर । निमित्त मात्र करुनि ॥८४॥
अक्रूर सच्छील सज्जन । तथापि राजाचें वचन ।
पाळावया गोकुळीं गमन । निरुपायें करीतसे ॥८५॥
परी अक्रूर इच्छी अंतरीं । या निमित्तें एकवार तरी ।
नयनीं पाहीन गोजिरी । सांवळी मूर्ति श्रीहरीची ॥८६॥
अक्रूरासी देखूनि गोकुळीं । आनंदली नंदादि मंडळी ।
स्वागत करुनि सकळीं । सन्मानिला बहुमानें ॥८७॥
कंसाज्ञा केली नंदासि विदित । आणि कंसाचा गुप्त हेत ।
श्रीकृष्णासी अक्रूर साद्यन्त । एकीकडे जाणवि ॥८८॥
कंसाज्ञेपरी सानंद । उभय पुत्र घेऊनि नंद ।
मथुरेसी जावया सिध्द । झाला राजोपचारेंसीं ॥८९॥
भागवत ग्रंथ प्रसिध्द । तेथील सार सुबोध ।
गातसे गोविंद सानंद । बालहिताकारणें ॥९०॥
याचें करितां श्रवण पठण । आयुरारोग्य ऐश्वर्य पूर्ण ।
प्राप्त होईल विद्या धन । ऐसें वरदान व्यासाचें ॥९१॥
इति श्रीलघुभागवते नवमोऽध्याय: ॥
॥श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
N/A
References : N/A
Last Updated : January 02, 2018
TOP