लघुभागवत - अध्याय २ रा

लघुभागवत,पुराण,laghubhagavat,puran,मराठी,marathi


थट्टेचा परिणाम खोटा । भल्याभल्यांसी लागे बट्टा । ह्यणूनि करुं नये चेष्टा । कदा काळी कोणाची ॥१॥
येविषयी एक सुरस । ऐका पवित्र इतिहास । भागवताचा  कर्ता व्यास । पूर्वाध्यायी हें कथिलें ॥२॥
तेंचि व्यासापासूनि पूर्ण । शुक्राचार्यें करुनि पठण । प्रसंगे केलें निरुपण । परीक्षितीरायातें ॥३॥
तो प्रसंग कवण सांगतो करा श्रवण । करुनि अंत:करण । एकाग्र आतां ॥४॥
परीक्षिती एके दिनीं मृगयेसी गेला वनी । तेथी थोर श्रम पावुनी । तृषाक्रांत जाहला ॥५॥
आढळेना कोठे जळ । परी ऋषीचा आश्रम जवळ । पाहूनि, आला उतावीळ । उदकपान करावया ॥६॥
ऋषि ध्यानस्थ नेणे कांही । ह्मणूनि आतिथ्य केलें नाही । राजासी भासलें हृदयीं । सकळ कपट ऋषीचें ॥७॥
पहावया सत्य गोष्टी । मृत सर्प होता निकटीं । तो घालूनि ऋशीच्या कंठी । चेष्टा करुनि नृप गेला ॥८॥
तेचि काळी ऋषिकुमर । ऋंगी येऊनि देखे प्रकार । तापे जैसा वैश्वानर । क्रोधे अत्यंत खवळला ॥९॥
त्या आवेशें शापवाणी । वदे येथूनि सातवे दिनीं । सर्पदंशें यमसदनीं । जाईल नृप निश्चित ॥१०॥
करितां ध्यानविसर्जन । ऋषीसी कळलें वर्तमान । पाहूनि दोघांचे वर्तन । अत्यंत खिन्न तो होय ॥११॥
परीक्षितीचा अपराध । आणि पुत्राचा शापशब्द । दोहीं कारणीं विषाद । अंत:करणी वाटला ॥१२॥
ह्मणे होऊनि गेली गोष्ट । आतां वृथा किमर्थ कष्ट । चुकेना कदापि अदृष्ट । कांही केल्या कवणाचें ॥१३॥
परी मनीं उपजली कृपा । शापोक्ति कळविली नृपा । रायें नेमिला मार्ग सोपा । सात दिवसपर्यंत ॥१४॥
येऊं न शके सर्प जवळी । ऐशा प्रासादीं उंच स्थळीं । बैसे नृप घेऊनि मंडळी । भागवत शुक्र सांगे ॥१५॥
ऐका दैवाचा चमत्कार । तेथ येऊनि एक विप्र । बोरें देऊनि प्रचुर । आशिर्वाद अनुवादे ॥१६॥
त्या फळाआंत होता कीटक । तोचि झाला दंदशूक । तेणें दंशूनि नृपनायक । यमसदनीं धाडिला ॥१७॥
हा थट्टेचा केवळ । परिणाम आहे सकळ । परीक्षितीचा देह अमोल । बळी घेतला थट्टेनें ॥१८॥
ह्मणूनि तुह्मी निरंतर । थट्टेपासूनि रहा दूर । आरंभी वाटे थट्टा मधुर । भयंकर परिणामीं ॥१९॥
जैसी थट्टा नाशासि कारण । तैसेंचि घातक उन्मत्तपण । येविषयीं एक उदाहरण । करा श्रवण सांगतों ॥२०॥
एकदां सनत्कुमार ऋषी । वैकुंठी विष्णुदर्शनासी । गेले तेथें प्रतिबंध त्यांसी । द्वारावरी जाहला ॥२१॥
जय विजय द्वारपाळ । वदले त्यांचा करुनि छळ । वेष तुमचा अमंगळ । जाऊं न देऊं ह्मणूनी ॥२२॥
तेव्हां बोलले सनत्कुमार । सुवेषधारी मानिजे थोर । हा मृत्यूलोकींचा आचार । अनुचित साचार वैकुंठीं ॥२३॥
देवलोकी ऐसा भेद । असे जाणा अत्यंत निषिद्ध । ऋषिविप्रांसी प्रतिबंध । नाही कोठें ऐकिला ॥२४॥
थोरांच्या आश्रयें धुंद । होऊनि तुझी मतिमंद । सज्जनांचा उपमर्द । अनिवार करीतसां ॥२५॥
या उन्मादाचा परिणाम । दैत्यकुळी घ्याल जन्म । हांसत केलें पापकर्म । फळ भोगाल भूतळीं ॥२६॥
जैसा आमुचा केला छळ । तैसेंचि तुह्मां भूवरी सकळ । दुष्कर्म घडेल सर्वकाळ । नाश पावाल त्या योगें ॥२७॥
शाप ऐकतां जय विजय । दोघेही पावले भय । ह्मणती विष्णुचे पाय । दूर आह्मां नसावे ॥२८॥
तेव्हां उ:शाप वदले ऋषी । दैत्यकुळीं जन्म तुम्हांसी । तथापि व्हाल वैकुंठवासी । विष्णुहस्तें मरोनी ॥२९॥
तेचि हिरण्याक्ष हिरण्यकश्यपू । दोघेही देवांचे रिपू । उ:शापें त्यांच्या वपू । विष्णुहस्तें निमाल्या ॥३०॥
उभयांमाजी हिरण्यांक्ष । बलिष्ट युद्धकलादक्ष । देवांसंगे विरुद्धपक्ष । स्वीकारुनी राहिला ॥३१॥
एकदां वरूणासीं युद्ध करावया झाला सिद्ध । येरु ह्नणे मी अशक्त वृद्ध । त्वां विष्णुसी झुंजावें ॥३२॥
मग विष्णुपाशी येउनी । हेतु धरिला जो मनीं । तो जाणवूनी ह्मणे येचि क्षणीं । उत्तर कांही पाहिजे ॥३३॥
विष्णु म्हणे अहंकार । सांडूनि येईं तदनंतर । करूं आपण परस्पर । जाण समर बलिष्टा ॥३४॥
तरी तो नुमजे कांही । ह्मणूनी देवें त्याचि समयीं । आवेशें ताडूनि हृदयीं । यमसदनी धाडिला ॥३५॥
विष्णुहस्तें मृत्यू आला । तेणें वैकुंठी पावला । जयांसी अभिमान झाला । ऐसेचि मरती ते मूढ ॥३६॥
हिरण्याक्षाचा वध । ऐकूनि, जैसा जातवेद । भडके, तैसा पावे क्रोध । तेव्हां हिरण्याकशिपू ॥३७॥
वैर्‍याचे घेऊनि प्राण । त्या रक्तें भातृतर्पण । करीन ऐसी दारुण । केली तेणें प्रतिज्ञा ॥३८॥
सकल सुरांसी आधार । विष्णुपासूनि असे थोर । करितां तयाचा संहार । पाड काय इतरांचा ॥३९॥
मजसारिखा समर्थ बळी । कोण दुजा भूमंडळीं । करीन सर्वांची होळी । उगवीन वैर बंधूचें ॥४०॥
मग निजकार्य यशस्कर । व्हावया तपश्चर्या थोर । आरंभिली तेणें सत्वर । गिरिकंदरीं बैसूनी ॥४१॥
कांही काळें ब्रम्हदेव । प्रसन्न होऊनि ह्मणे सर्व । मागशील तें वैभव । देईन तूतें तत्काळ ॥४२॥
तेव्हां दैत्य विनयें ह्मणे । नाही बहुत मागणें । परी माझें मरणें । कोणा हातीं नसावें ॥४३॥
दिवसा किंवा रात्रीं । आकाशी किंवा धरित्रीं । आंत अथवा बाहेरी । मरण माझें नसावें ॥४४॥
यावरी ह्मणे चतुर्मुख । सर्व दिधलें भोगी सुख । तेव्हां दैत्य हास्यमुख । वसतिस्थानीं परतला ॥४५॥
आधींच दीप्त वैश्वानर । वरी सोडिली घृताची धार । मग जैसा भयंकर । ज्वाळा निघती तेथुनी ॥४६॥
तैसा दैत्य स्वभावें क्रूर । वरी लाधे विधीचा वर । मग काय उरे तेथ विचार । इच्छी संहार सकळांचा ॥४७॥
सकळ निर्जर केले जर्जर । पदच्युत केला पुरंदर । छ्ळ मांडिला अनिवार । त्राहि भगवन्‍ जन वदती ॥४८॥
या हिरण्यकशिपूचा सुत । प्रल्हाद नामें ईश्वरभक्त । त्याचें चरित्र परम अद्भुत । ऐकुनि विस्मय वाटतो ॥४९॥
खाण तैसी माती । ऐसें जन बोलती । परी ईश्वराची कृती । अतर्क्य असे ॥५०॥
कोळशांमाजी सुंदर हिरा । हा प्रकार विचित्र खरा । परी एका परमेश्वरा । विदित कारण तयाचें ॥५१॥
हिरण्यकशिपू पिता दुष्ट । प्रल्हाद पुत्र जन्मला श्रेष्ठ । ईश्वरी योजना अचाट । नकळे आह्मां मानवां ॥५२॥
असो प्रल्हाद भगवद्भक्त । करी नामस्मरण सतत । पूजावे अनाथ साधु संत । नित्यक्रम हा त्याचा ॥५३॥
दैत्याचे वैरी देव । घेऊं नये त्यांचे नांव । ऐसें शिकविती आप्त सर्व । परी छंद सुटेना ॥५४॥
शिकविलें करुनि लालन । करुनी पाहिलें शासन । परी प्रल्हादाचें दृढ मन । कांही केल्या वळेना ॥५५॥
ऐसा बहुत केला छळ । उपाय हरले सकळ । तरी मुखीं सर्वकाळ । नारायण तयाच्या ॥५६॥
तेव्हां करावया त्याचा वध । हिरण्यकशिपु झाला सिद्ध । दैत्यांसी ह्मणे अपराध किती याचे सोसावे ॥५७॥
गजचरणीं तुडविला । पर्वततळीं वरुनि लोटिला । सर्पदंश करविला । तरी उरला जिवंत ॥५८॥
ज्यावरी देवाची दया । मारुं शके कोण तया । श्रीमंताची जाया । काय भिक्षा मागेल ॥५९॥
तैसा श्रीहरीचा ज्यासि आधार । तो सुखरुपचि निरंतर । सूर्यापासूनि दूर अंधार । तैसें भय दूर भक्तांसी ॥६०॥
ऐसा निर्भय प्रल्हाद । बहुत केला प्रतिबंध । तरी भजनाचा त्याचा छंद । लेशमात्र सुटेना ॥६१॥
त्याचें भजन सर्वकाळ । देखूनि, इतर सकळ । विद्यार्थी तोचि खेळ । शाळेमाजी खेळती ॥६२॥
मग तेथील मुख्य शिक्षक । ही प्रल्हादाची वर्तणूक । जाणवी संतापपूर्वक । तत्काळ पित्यासी ॥६३॥
तेव्हां हिरण्यकशिपू सक्रोध भूमीसी आपटी हस्तपाद । ह्मणे कुलांगार प्रल्हाद । कोठें आहे दाखवा ॥६४॥
मग सेवकें आणूनि सत्वर । उभा केला समोर । त्यासी पुसे हा तुज दुराचार कोण्या अधर्मे शिकविला ॥६५॥
मी येथील मुख्य राजा । स्वेच्छेनुरुप सारी प्रजा । वागवावी हा अधिकार माझा । पाड तुझा मग किती ॥६६॥
कोणी माझा आज्ञाभंग करील त्यासी सवेग । दाखवीन मृत्यूयोग । नक्षत्रवार नसतांही ॥६७॥
तेव्हां येरु वदे प्रत्युत्तर । पृथ्वीचा राजा एक ईश्वर । त्यावीण सारे इतर । जीव दुर्बळ सर्वथा ॥६८॥
कीं जेवीं जगीं जीवां इतरां । तेवीं राजांसी व्याधी जरा । जन्म, मृत्यु, भय, भोग सारा । भोगावया लागतो ॥६९॥
पाहतां ईश्वराचे दृष्टीं । समान ही जीवसृष्टी । राजा चाले ज्या महीपुष्टीं । तेथेंचि मुंगी चालते ॥७०॥
भू जल तेज समीर । यांवरी ज्याचा अधिकार । तोच पृथ्वीचा भूप साचार । ऐसें आहे मत माझें ॥७१॥
जलप्रलय धरणीकंप । निवारील ऐसा प्रताप । ज्याचे अंगी तोचि भूप । सत्ताधीश पृथ्वीचा ॥७२॥
ऐसी शक्ती ईश्वराअंगी । ह्मणूनि तोचि या जगीं । सर्वांसी आधार, यालागीं । तोचि राजा पृथ्वीचा ॥७३॥
तैं हिरण्यकशिपू ह्मणे । सत्य नसे हें बोलणें । प्रत्यक्ष पाहिल्याविणें । मी न मानीं देवातें ॥७४॥
यास्तव तुझा पालनकर्ता । दावीं देव मज आतां । एर्‍हवीं तुझिया जिविता । घात करीन क्षणार्धे ॥७५॥
तेव्हां प्रल्हाद वदे सर्वत्र । भरुन आहे ईश्वर । काष्टीं पाषाणीं अणुमात्र । स्थळ न रिक्त त्याविणें ॥७६॥
ऐकूनि ऐसें पुत्रवचन । हिरण्यकशिपू सिंहासन । सोडूनि, तळीं आपण । उभा सक्रोध बोलला ॥७७॥
ह्मणसी ईश्वर जळीं स्थळीं । काष्ठीं पाषाणीं अंतराळीं । तरी सांग पाहूं ये वेळीं । येथें स्तंभीं दिसेल का ?॥७८॥
अवश्य ह्मणे तो बालभक्त । वस्तुमाजीं ईश्वर व्याप्त । तोंचि दैत्यें स्तंभीं लाथ । मारिता अद्भुत वर्तलें ॥७९॥
तेथूनि प्रचंड सिंहनाद । होतांचि घाबरूनि स्तब्ध । उभेचि राहिले सर्व सखेद । प्रल्हाद एक तोषला ॥८०॥
तैं भयचकित सर्व होती । नाद येई कोठूनि देखती । तंव नृसिंहरुपें विष्णुमूर्ती । स्तंभाआंतुनी अवतरली ॥८१॥
ती देखूनि दैत्य चढे मदा । हातीं घेऊनि सर्वेंची गदा । करावया शिरच्छेदा । विष्णूवरी धांवला ॥८२॥
विष्णुनें त्यासी मांडीवरी । घेऊनि चिरिला उदरीं । प्राण सोडी त्या अवसरीं । दैत्य हिरण्यकशिपू ॥८३॥
तेव्हां प्रल्हादें करुनि स्तुती । ह्मणे पिता पावो सद्गती । ते समयीं वैकुंठपती । तैसेंचि घडेल बोलिला ॥८४॥
सारांश जगदीश्वर । भक्तांसी रक्षी निरंतर । घेऊनि त्यांचा कैवार । करी संहार दुष्टांचा ॥८५॥
भागवत ग्रंथ प्रसिद्ध । तेथील सार सुबोध । गातसे सानंद गोविंद । बालहिताकारणें ॥८६॥
याचें करितां श्रवण पठन । प्राप्त होईल विद्याधन । तैसेंचि दु:ख भय शमन । होईन, वचन व्यासाचें ॥८७॥
इति श्रीलघुभागवते द्वितीयोऽध्याय: ॥
॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : January 02, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP