अध्याय ५७ वा - श्लोक ३१ ते ३५
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
इत्यंगोपदिशंत्येके विस्मृत्य प्रागुदाहृतम् । मुनिवासनिवासे किं घटेतारिष्टदर्शनम् ॥३१॥
कोमलवचनीं आमंत्रण । अंग म्हणोनि संबोधन । नृपा संबोधी शुक सर्वज्ञ । सुचवूनियां हरिगरिमा ॥४९॥
भो भो राया प्राचीनऋषि । विसरोनि श्रीकृष्णगरिमेसी । अक्रूर गेलिया द्वारकेसी । विघ्नें ऐसीं जे वदले ॥२५०॥
तयांसि दूषण त्यांचेनि बोलें । कृष्णमहिमा विसरूनि गेले । म्हणोन अक्रूरा प्रशंसिलें । विघ्नबाहुल्यें वदोनियां ॥५१॥
अक्रूर कृतवर्म्याच्या उक्ति । शतधन्व्याची निराकृति । तें पूर्वील व्याख्यान विसरोनि पुढती । वाखाणिती अनारिसें ॥५२॥
कृष्ण असतां द्वारकेआंत । अक्रूर गेलिया महोत्पात । हेंचि व्याख्यान असंमत । काय निमित्त तें ऐका ॥५३॥
सकळ कल्याणाच्या श्रेणी । तपोधनांच्या आशीर्वचनीं । त्या मुनींचा वास सदैव कृष्णीं । तो द्वारकाभुवनीं हरि असतां ॥५४॥
कैसें अरिष्टदर्शन घडे । हें बोलणेंचि अवघें कुडें । अक्रूर मात्र गेलिया पुढें । कीं गरिमा उडे कृष्णाची ॥२५५॥
स्फुलिङ्गे वीण अग्निचि वृथा । कीं तरंगेंवीण सागर रिता । तेंवि अक्रूरें वीण कृष्णसामर्थ्या । आली न्यूनता म्हणो ये ॥५६॥
कृष्ण असतां अकूरेंवीण । द्वारके अरिष्टदर्शन । ऐसें कोण्ही वदले गौण । तें अप्रमाण तुज कथिलें ॥५७॥
हें ऐकोनि राजा पुसे । तरी द्वारके उत्पात संभव कैसे । ये शंकेचें निरसिलें पिसें । व्यासऔरसें हरिइच्छे ॥५८॥
कृष्ण स्वलीला इच्छामात्रें । चाली सर्वांचीं अंतरें । भूतें भौतिकें कृष्णतंत्रें । सत्तसूत्रें चेष्टती ॥५९॥
तस्मात् कृष्णइच्छावशें । अक्रूर वाराणसी प्रवेशे । रामभामेची शंका निरसे । तदुद्देशें उत्पात ॥२६०॥
तेचि लक्षूनि उत्पात । द्वारकावासी जन तर्कित । प्राचीन ऋषीचें संमत । तेचि प्रस्तुत अवधारा ॥६१॥
देवेऽवर्षति काशीशः श्वफल्कायागताय वै । स्वसुतां गांदिनीं प्रादात्ततोऽवर्षत्स्म काशिषु ॥३२॥
अक्रूर गेलियां उत्पात । जनमानसीं हा वितर्कहेत । प्रेरक सर्वग श्रीकृष्णनाथ । तो ऐका वृत्तान्त जनचर्चा ॥६२॥
द्वारकावासी वृद्ध वृद्ध । मिळोनि वदती एवंविध । काशिप्रान्तीं अवृष्टिखेद । पूर्वी जनपद जैं पावे ॥६३॥
तैं भूपाळ काशीश्वर । करितां वृष्टीचा विचार । श्वफल्क देखोनि पुण्यप्रचुर । स्वकन्या सुंदर या अर्पी ॥६४॥
काशीश्वराची गान्दिनी कन्या । श्वफल्कें करितां निजाङना । परमानंद त्रिभुवना । अमृतघना सुर करिती ॥२६५॥
अमृतरूप जाली वृष्टि । परमानंदें धाली सृष्टि । ऐसी श्वफल्काची गोठी । सुत त्या पोटीं अक्रूर हा ॥६६॥
यालागीं अक्रूर पुण्यशीळ । गांदिनीजठरीं श्वफल्कबाळ । याचा प्रभाव अमळ । तोही प्राञ्जळ अवधारा ॥६७॥
तत्सुतसत्प्रभावोऽसावक्रूरो यत्र यत्र ह । देवोऽभिवर्षते तत्र नोपतापा न मारिकाः ॥३३॥
पितरां ऐसाचि प्रभाव याचा । जेथ हा अक्रूर वसे साचा । तेथ वर्षाव पर्जन्याचा । आणि विघ्नाचा असंभव ॥६८॥
चिंता हृद्रोग संताप । पीडा रोग न बधी अल्प । महामारी अरिष्टकल्प । नुपजे विकल्प कोण्हातें ॥६९॥
ऐसे जनपद ठायीं ठायीं । वृद्ध मिळोनि वदती पाहीं । तेंचि श्रोत्यांचे श्रवणालयीं । रिघोनि हृदयीं प्रवेशो ॥२७०॥
इति वृद्धवचः श्रुत्वा नैतावदिह कारणम् । इति मत्वा समानाय्य प्राहाक्रूरं जनार्दनः ॥३४॥
ऐसें द्वारकेमाजी वृद्ध वृद्ध । लहान थोर बुधाबुध । ठायीं ठायीं करिती वाद । ऐकोनि गोविंद तद्वचनें ॥७१॥
सभास्थानीं प्रसंगचर्चा । प्रस्ताव केला वृद्धोक्तींचा । वृद्ध मेळवूनियां त्यांचा । अभिप्राय अवगमिला ॥७२॥
तंव ते म्हणती अक्रूर गेला । तैंहूनि द्वारके उपसर्ग आला । तस्मात् सुकृति अक्रूर भला । कल्याण जनांला तत्संगें ॥७३॥
हें ऐकोनि जनार्दन । म्हणे यथार्थ वृद्धवचन । यदर्थीं आणीकही कारण । आम्हांलागूनि भासतसे ॥७४॥
अक्रूर कल्याणाची मूर्ति । हे तों यथार्थचि वृद्धभारती । अपर कारणही यदर्थीं । असे तें चित्तीं विवरा हो ॥२७५॥
स्यमंतकमणि भास्करदत्त । तो जेथ असे अभ्यर्चित । तत्प्रभावही एवंभूत । हेंही यथार्थ कीं ना हो ॥७६॥
केवळ अक्रूर गेलियासाठीं । द्वारकेमाजि अरिष्टकोटी । ऐसी प्रशंसूं नये गोठी । अपगत शेवटीं स्यमंतकही ॥७७॥
जेथ अक्रूराचा निवास । स्यमंतकाचाही तेथेंचि वास । तिये देशीं सुखसंतोष । अरिष्टां विघ्नांस असंभव ॥७८॥
ऐसें प्राचीन ऋषींचें मत । वाखाणिलें इत्थंभूत । यावरी शुकादिकांचें जें संमत । तो इत्यर्थ अवधारा ॥७९॥
वॄद्धवचन करूनि मान्य । अक्रूराचें गवेषण । करूनि आणवी श्रीभगवान । आज्ञावचनें नृपाचिया ॥२८०॥
अक्रूर आणूनि आज्ञावचनें । सम्मानिला नृपसम्मानें । द्वारकेमाजि बसतां तेणें । अरिष्टें विघ्नें उपशमलीं ॥८१॥
शुकादिकांचें संमत ऐसें । विघ्नें अरिष्टें जीं बहुवसें । अक्रूरागमनमात्रें निरसे । हें बालिशें प्रशंसिती ॥८२॥
म्हणाल तरी कां द्वारकापुरीं । अरिष्टें अक्रूर गेलियावरी । हे मुख्य कृष्णलीलेची थोरी । यथार्थ चतुरीं जाणावी ॥८३॥
अक्रूर आलिया द्वारकेआंत । विघ्नें अरिष्टें जालीं शांत । हेंहे कृष्णलीलेचें कृत्य । वास्तव अर्थ हा मुख्य ॥८४॥
अक्रूर द्वारकाभुवना आला । सर्वारिष्टां उपशम जाला । जनपद म्हणती भला भला । पुण्याथिला श्वाफल्कि ॥२८५॥
अक्रूरागमनाहूनि पूर्वीं । उग्रसेनासि प्रार्थूनि सर्वीं । संकर्षणातें तो आणवी । उद्धवादिकां प्रेरूनियां ॥८६॥
बळराम द्वारके आलियावरी । कित्तेक दिवसां जनवैखरी । ऐकोनि अक्रूरा आणवी हरि । सविस्तरीं तें कथिलें ॥८७॥
देवक वसुदेव उग्रसेन । अपर यादव थोर लहान । कृष्णप्रमुख संकर्षण । सभास्थानीं उपविष्ट ॥८८॥
वृद्धजनांची मानूनि वाणी । अक्रूरातें चक्रपाणि । पाचारूनियां सभेसी आणी । मग त्या वचनीं काय वदे ॥८९॥
पूजयित्वाऽभिभाष्यैनं कथयित्वा प्रियाः कथाः । विज्ञाताखिलचित्तज्ञः स्मयमान उवाच ह ॥३५॥
येतां देखोनि अक्रूरासी । अभ्युत्थानें हृषीकेशी । साधुवचनीं गौरवी त्यासी । प्रियकथांसि कथूनियां ॥२९०॥
चिरकाळ वियोगाची वार्ता । आवडीचिया गोष्टी माता । परस्परें अनुवादतां । जाला बोलता काय अया ॥९१॥
भूत भविष्य वर्तमान । त्रिलोकींचें त्रिकालीन । जाणता म्हणोनि तो अखिलज्ञ । सर्वचितज्ञ सर्वात्मा ॥९२॥
सर्व विदित असे ज्यासी । वंचन न चले तयापासीं । कोण प्रतारणा तयासें । करूं शकेल अल्पज्ञ ॥९३॥
असो ऐसा श्रीभगवान । षड्गुणैश्वर्यसंपन्न । बोलता जाला हास्य करून । अक्रूरालागून तें ऐका ॥९४॥
N/A
References : N/A
Last Updated : May 09, 2017
TOP