मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५७ वा| श्लोक १ ते ५ अध्याय ५७ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४२ अध्याय ५७ वा - श्लोक १ ते ५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक १ ते ५ Translation - भाषांतर श्रीशुक उवाच - विज्ञातार्थोऽपि गोविंदो दग्धानाकर्ण्य पांडवान् । कुंतीं च कुल्यकरणे सहरामो ययौ कुरून् ॥१॥शकुनिमंत्रें दुर्योधन । लाक्षागारीं पाण्डवनिधन । करितां विवरीं प्रवेशोन । गेले म्हणोन हरि जाणे ॥७॥ऐसा विज्ञातार्थही हरि । तथापि मनुष्यनाट्यानुकारी । प्रवर्तला वृधाचारीं । सर्वान्तरी सर्वग जो ॥८॥कुन्तीसहित पाण्डवांतें । लाक्षागारीं जाळिलियांतें । परिसोनियां श्रीकृष्णातें । परम दुःखातें मानिलें ॥९॥वसुदेवप्रमुख सभस्थानीं । परम शोकें रसरसूनी । वृद्धकुळाचाराचरणीं । रामकृष्ण पाठविले ॥१०॥रत्नखचित रुक्मरथ । सुपर्णतालध्वजमंडित । सायुध सानुगपरिवेष्टित । कुरुविषयांतें पातले ॥११॥यथाकुळोचित वृद्धाचारें । आप्त कौरव निजसोयरे । सांभाळावया स्नेहादरें । परम ओसरें ते गेले ॥१२॥जाऊनियां हस्तिनापुरा । वृत्तान्त जाणविला नृपवरा । कौरवीं सन्मानें मंदिरा । नेऊनि परिवारा राहविलें ॥१३॥सभास्थानीं दुर्योधन । शकुनि कर्ण दुःशासन । अपर गान्धारीनंदन । पुढें येऊन भेटले ॥१४॥दावूनियां मृषा शोक । विलाप करिती अधोमुख । अंतरवेत्ता यदुनायक । यथालौकिक संबोखी ॥१५॥तेथूनि उठिलियानंतरें । ज्यांचीं निष्कपटें अंतरें । त्यांप्रति जाऊनियां स्नेहभरें । भेटिजे यदुवीरें तें ऐक ॥१६॥भीष्मं कृपं सविदुरं गांधारीं द्रोणमेव च । तुल्यदुःखौ च संगम्य हा कृष्णमिति होचतुः ॥२॥पाण्डवांचिया दुःखेंकरून । भीष्में वर्जिलें सभास्थान । कृपाचार्यही आत्मभुवन । न ये टाकून बाहीर ॥१७॥गान्धारीप्रति जाऊनि विदुर । करवी दुःखाचा परिहार । सान्त्वनोक्ति बोले सार । अन्य व्यवहार विसर्जिला ॥१८॥पाण्डवांचे ऐश्वर्य गुण । शौर्य प्रताप विद्याभ्यसन । स्मरोनि विलप करी द्रोण । न संडी सदन अतुदुःखें ॥१९॥रामकृष्ण हें जाणोनि चित्तीं । स्वयें जावोनि भीष्माप्रति । तुल्यदुःखें विलाप करिती । गुण आठविती पार्थांचे ॥२०॥भीष्म म्हणे भो जगदीशा । पाण्डवांऐसियां प्रतापी पुरुषां । दैवें वोपिली कोण दशा । जेंवि पाडसा दावाग्नि ॥२१॥कुंतीसारिखी साध्वी रत्न । धर्माऐसा सत्यप्रतिज्ञ । हनुमत्प्रतिमा भीमसेन । महाबलवान ओजस्वी ॥२२॥धनुर्विद्येचा अवतार । अपर भार्गव कीं रामचंद्र । अर्जुनाऐसा धनुर्धर । लाक्षागारीं जळाला ॥२३॥अनंग किंवा राकारंग । तैसे माद्रीतनय दोघ । सौदर्यमन्दाकिनीचे वोघ । पावले भंग अंगारें ॥२४॥त्रैलोक्यमण्डित भरिते कीर्ति । समरीं अमरां लाविते ख्याति । स्वचातुर्यें बृहस्पति । युक्तिप्रयुक्ति डोलविते ॥२५॥समरीं पुरली नाहीं हांव । भोगिलें नाहीं नृपगौरव । कैसें विचित्र अघटित दैव । पडिले वाडवअवदानीं ॥२६॥यशोलक्ष्मीचे कीर्तिध्वज । कीं वीरश्रियेचे उद्दाम भुज । कीं ब्रह्माण्डधारक जे दिग्गज । ते हे आत्मज पाण्डूचे ॥२७॥समरीं कृतान्त खिळिती बाणीं । ते जळाले लाक्षासदनीं । कुरुवंशाची रेखा उणी । जाली धरणी निर्दैव ॥२८॥ऐसे विलाप बहुतां परी । पाण्डव दुःखें गाङ्गेय करी । त्यातें कवळूनि राममुरारी । विलपती आणि सान्तविती ॥२९॥कुरुवरवृद्धा महाराजा । म्हणती सावध गंगात्मजा । कृतकर्माच्या फळभोगबीजा । अंकुर येती यथाकाळें ॥३०॥जो जो जैसें कर्म करी । तो तो तैसा फळभोग वरी । ईश्वरसत्तेची हे थोरी । चराचरीं नियामक ॥३१॥भूत भावी या संकेतें । भीष्मा बुझाविलें परमार्थें । यामाजि गान्धार स्वकर्मातें । भोगिती ऐसें सूचविलें ॥३२॥मग घेऊनि भीष्माज्ञा । पातले कृपाचार्यसदना । तेणें देखोनि रामकृष्णां । पाण्डुनंदनां आठविलें ॥३३॥परस्परें पाण्डवगुण । स्मरोनि विलाप करिती जाण । रामकृष्णें पुसोनि नयन । केलें सान्त्वन पूर्वोक्त ॥३४॥त्यानंतरें विदुरालया । जाऊनि सप्रेम भेटले तया । तन्मुखें वृत्तान्त परिसोनियां । केली स्नेहा अभिवृद्धि ॥३५॥विदुरा घेऊनि सांगतें । गेले गान्धारीमंदिरातें । स्नेहें भेटोनियां तयेतें । दुःखशोकांतें परिहरिती ॥३६॥देखोनियां राममुरारि । पाण्डवांचें दुःख भारी । हंबरडा हाणोनि गान्धारी । जननियेसरी आक्रन्दे ॥३७॥म्हणे पाण्डूचें लोपलें नांव । कुंतीमाद्रीशीं पाण्डव । एकसरें निमाले सर्व । गोमयें ठाव पूसिला ॥३८॥पाडसेंसहित कुंती हरिणी । जतुकागाराख्यदावाग्नी - । माजि निमाली तळमळूनी । आतां कोठूनि भेटेल ॥३९॥ऐसी विलपतां गान्धारी । विदुरें सहित राममुरारि । संबोखिती नानापरी । मधुरोत्तरीं बोधोनी ॥४०॥तेथूनि आले द्रोणसदना । द्रोणें देखोनि रामकृष्णां । अश्रुपात आणिले नयनां । पाण्डुनंदना आठवोनी ॥४१॥पाण्डवांचे आठवी गुण । ठाणमाण रूप लावण्य । वीर्य शौर्य प्रताप गहन । धृति दाक्षिण्य औदार्य ॥४२॥धनुर्विद्येचा अभ्यास । प्रजापालनीं परमोह्लास । प्रागल्भ्य पाटव तेजोविशेष । विनय नम्रता सौजन्य ॥४३॥मर्यादेचे रत्नाकर । समरीं अचळ मेरु अपर । जवें जिंकीती पैं समीर । केवळ जळधर कपेचे ॥४४॥ऐसे स्मरोनि अगाध गुण । पाण्डवमोहें जाकळे द्रोण । म्हणे पार्थाऐसें छात्ररत्न । आता नयन न देखती ॥४५॥दुपद प्रतापी पाञ्चाळपति । अर्जुनें बांधोनि आणिला रथीं । गुरुदक्षिणे वोपूनि हातीं । दाविली ख्यति भूचक्रीं ॥४६॥धनुर्विद्येचा सागर । ऐसा शिष्य कैंचा अपर । जैसा भार्गव परशुधर । न भूतो न भविष्यति ॥४७॥तयातें म्हणती रामकृष्ण । हेंचि पाण्डवांचें कल्याण । पुरूंच्या वदनें ज्यांचे गुण । ऐकती श्रवण जनांचे ॥४८॥हेंचि जन्माचें सार्थक । ज्यातें धन्य म्हणती लोक । शताब्द वांचोनि पासकपंक - । चर्चित मूर्ख भूभार ॥४९॥ऐसिया अनेक मदुरोत्तरीं । द्रोणा संबोखूनियां हरि । मग पातलें सभागारीं । वृद्धाचारा अनुसरले ॥५०॥इतर दुर्योधनप्रमुख । धार्तराष्ट्रही करिती शोक । बाह्य संपादिती लौकिक । परम संतोख हृत्कमळीं ॥५१॥कणदुःशासनादि येर । सहित अवघेचि गान्धार । बाह्य विलाप करिती फार । परी तें अंतर हरि जाणे ॥५२॥यालागिं तयांचें सान्त्वन । सहसा न करी जनार्दन । सभास्थानातें येऊन । वृद्धाचरण आदरिलें ॥५३॥भीष्म द्रोण कृपाचार्य । सभास्थाना आणिले आर्य । यथाकुलोचित सारूनि कार्य । कौरवधुर्य गौरविला ॥५४॥सर्वां देऊनि भोजन मिष्ट । पंक्तिलाभें अर्चिले इष्ट । सर्वां करूनियां संतुष्ट । सशोक कष्ट परिहरिले ॥५५॥इतुकी कथा हस्तिनापुरीं । वर्तली ते कथिली पुरी । तंव मागें द्वारकेमाझारी । ऐका अवसरी जाली ते ॥५६॥लब्ध्वैतदंतरं राजञ्शतधन्वानमूचतुः । अक्रूरकृतवर्माणौ मणिः कस्मान्न गृह्यते ॥३॥रामगोविन्द गजसाह्वया । गेले कौरवां सान्तवावया । तो संधि पाहूनि शतधन्वया । एकान्तनिलया नेऊनी ॥५७॥कृतवर्मा आणि अक्रूर । साभिमानी स्वपक्षपर । होऊनि कथिती गूढ मंत्र । दैवानुसार भवितव्य ॥५८॥म्हणती कां पां अद्यापिवरी । वीरश्री नुपजे तव अंतरीं । स्यमंतक सत्राजिताचे घरीं । नाद्यापिवरी अपहरिसी ॥५९॥प्रसंगी रामकृष्ण नसतां । सिंतरूनियां सत्राजिता । स्यमंतकहरणाचा तत्त्वता । संधि साधितां हा समय ॥६०॥सत्राजित हा परमान्यायी । कां पां न सले तुझ्या हृदयीं । ऐसिया घालितां महदपायीं । अल्पही नाहीं भय पाप ॥६१॥सत्राजितें परमान्याय । जरी तूं म्हणसी केला काय । तो तुज कथितों ऐकता होय । क्षोभे हृदय तद्दुःखें ॥६२॥योऽस्मभ्यं संप्रति श्रुत्य कन्यारत्नं विगर्ह्य नः । कृष्णायादान्न सत्राजित्कस्माद्भ्रातरमन्वियात् ॥४॥सत्यभामा स्वकन्यारत्न । गुणलावण्यचातुर्यभुवन । आम्हांकारणें कृतवाग्दान । जो कृष्णार्पण पुन्हा करी ॥६३॥आमुचा केला जैं अव्हेर । जालों तेव्हांचि निन्द्यतर । धिक्कारिती लहान थोर । सर्वीं सर्वत्र निंद्यत्वें ॥६४॥कांहीं दोष याचिये ठायीं । देखोनि कन्या दिधली नाहीं । ऐसें बोलती जन सर्वही । परमान्यायी हा ऐसा ॥६५॥म्हणसी सत्राजित जीत असतां । स्यमंतक केंवि चढेल हाता । तरी जेथ त्याचा प्रसेन भ्राता । हा तत्पथा लावावा ॥६६॥मणि न करूनि नृपार्पण । प्रसेनें केला कंठाभरण । मृगेन्द्रहस्तें पावला मरण । तैसेंचि जाण या कीजे ॥६७॥एवं भिन्नमतिस्ताभ्यां सत्राजितमसत्तमः । शयानमवधील्लोभात्स पापः क्षीणजीवितः ॥५॥अक्रूरकृतवर्म्यांचिया युक्ती । शतधन्वयाची भेदली मति । उभयबोधें तो दुर्मति । अधम निघाईं प्रवर्तला ॥६८॥सदामस्तार्कवज्रपय । मिश्र जालिया मारक होय । शतधनाही तेणेंचि न्यायें । अधमोपाय करूनियां ॥६९॥सत्राजिताच्या रिघोनि सदनीं । निद्रित असतां शय्याभुवनीं । स्यमंतकाच्या लोभेंकरूनी । त्यातें वधूनि मणि हरला ॥७०॥निद्रितवधाऐसें पाप । मनीं न धरूनि तद्भय अल्प । मणिलोभास्तव दस्युकल्प । केला साक्षेप दुष्टत्वें ॥७१॥शतधन्व्यासि समीप मरण । म्हणोनि रुचलें हें आचरण । अक्रूरकृतवर्म्यांचें वचन । जालें कारण तत्कर्मा ॥७२॥कैसा मारिला सत्राजित । राया ऐकें तेही मात । बलात्कारें दस्युवत । रार्रीं सदनांत रिघाला ॥७३॥ N/A References : N/A Last Updated : May 09, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP