मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५७ वा| श्लोक ६ ते १० अध्याय ५७ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४२ अध्याय ५७ वा - श्लोक ६ ते १० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ६ ते १० Translation - भाषांतर स्त्रीणां विक्रोशमानानां क्रंदंतीनामनाथवत् । हत्वा पशून्सौनिकवन्मणिमादाय जग्मिवान् ॥६॥निद्रित असतां शय्यागारीं । हिंसक जैसा पशूतें मारी । तैसाचि कंठ छेदितां करीं । भोंवत्या नारी आक्रन्दती ॥७४॥बळें घालूनि दरवडा । निद्रितातें मारूनि होडां । भोंवता नारींचा हंबाडा । मणि रोकडा हिरतिला ॥७५॥अनाथापरी रडती नारी । येरें मनि बांधोनि पदरीं । निघोनि जाय दरोडेकरी । जाता जाला तो तैसा ॥७६॥स्त्रिया बाळकें करिती रुदन । दासदासीकिंकरजन । सत्यभामा आक्रन्दोन । आली धांवोन जनकापें ॥७७॥सत्यभामा च पितरं हत वीक्ष्य शुचाऽर्पिता । व्यलपत्तात तातेति हा हतास्मीति मुह्यती ॥७॥देखोनि जनकाचिया मरणा । सत्यभामा करी रुदना । प्रेत कवळूनि विलाप नाना । करूनि वदना पिटीतसे ॥७८॥भो भो ताता अनाथें आम्ही । तुजवीण पडिलों दुःखधामीं । कपाळ पिटूनि लोळे भूमी । नावरे ऊर्मी शोकाची ॥७९॥हाहाकारें पिटी हृदय । म्हणे जालासि कां निर्दय । तुझ्या वियोगें अंतसमय । आम्हांलागूनि ये काळीं ॥८०॥निष्ठुर होऊनि जनकराया । तूं गेलासि कवण्या ठायां । कां पां सोडिली आमुची माया । ताता सदया स्नेहाळुवा ॥८१॥जनकप्रेत कवळूनि करीं । ऐसे अनेक विलाप करी । सांवचूनि धरिती नारी । म्हणती पुढारी गति चिंता ॥८२॥तलद्रोण्यां मृतं प्रास्य जगाम गजसाहवयम् । कृष्णाय विदितार्थाय तत्पाऽऽचख्यौ पितुर्वधम् ॥८॥स्त्रिया पुरोहित सुहृद आप्त । तैलद्रोणीमाजि प्रेत । घालूनि सत्यभामा त्वरित । क्रोधें दुःखित निघाली ॥८३॥क्लेशें ठाकिलें हस्तिनापुर । देखोनि श्रीकृष्णहलधर । चरणांपासीं त्राहटी शिर । सांगे प्रकार जनकाचा ॥८४॥तुम्ही असतां माझिये माथां । दुष्टें केलें जनकघाता । पशुहिंसकाचिये समता । प्राण तत्वता घेतले ॥८५॥निद्रित असतां शय्यागारीं । तात वधिला पशूचे परी । मणि अपहरिला करूनि चोरी । दुःखें भूवरी पडे कथितां ॥८६॥सर्व विदित ज्याकारणें । तया कृष्णासि हें गार्हाणें । शोकसंतप्त अंतःकरणें । कथिलें वदनें वनितेनें ॥८७॥तदाकर्ण्येश्वरौ राजन्ननुसृत्य नृलोकताम् । अहो नः परमं कष्टमित्यास्राक्षी विलेपतुः ॥९॥तें ऐकोनि राममुरारि । अवगणी मनुष्यलोकानुसारी । दुःख न कीजे जिहीं ईश्वरीं । ते दुःखलहरी अनुभविती ॥८८॥राया कुरुभूमंडलपाळा । रामकृष्णही तये वेळां । अश्रु आणूनि नेत्रकमळां । म्हणती जाला अन्याय ॥८९॥अहो खेदें म्हणती आम्हां । परम कष्टा न करवे सीमा । विलाप करूनि म्हणती अधमा । मणीचा प्रेमा पाणहर ॥९०॥आम्ही जीत असतो पृथ्वी । आमुच्या सुहृदा ऐसी पदवी । तेव्हां आमुची कीर्ति आघवी । वृथा मानावी कीं ना हो ॥९१॥ऐसें म्हणूनि शोकाभिभूत । कौरवांतें पुसोनि त्वरित । अधिष्ठून द्वारकापंथ । जाते जाले तें ऐका ॥९२॥आगत्य भगवांस्तस्मात्सभार्यः साग्रजः पुरम् । शतधन्वानमारेभे हंतुं हर्तुं मणिं ततः ॥१०॥क्लेशभरें न सरे वाट । सारथिघोडियां देऊनि साट । रथ चालतां घडघडाट । द्वारकाप्रविष्ट पैं जाले ॥९३॥प्रवेशोनि आत्मसदनीं । सर्व वृत्तांत ऐकिला श्रवणीं । शतधन्व्याची लधिष्ठकरणी । अंतःकरणीं जाणितली ॥९४॥सत्यभाम संकर्षण । सहित सानुग पार्षदगण । द्वारका पावतां श्रीभगवान । भेटले स्वजन संतोषें ॥९५॥हसित्नापुराहूनि हरि । ऐसे येऊनि द्वारकापुरीं । स्वजन भेटतां परस्परीं । गोष्टी निर्धारी कळूं आली ॥९६॥सत्यभामेचे पुसोनि अश्रु । कृष्णें प्रतापें स्पर्शिले स्मश्रु । जणें वधिला निरागस श्वश्रु । तो निर्धारें मारीन ॥९७॥सत्राजितची जैसी दशा । शतधन्व्यासी वधीन तैसा । मणिहर तस्कर वधितां दोषा । पात्र सहसा मी नोहें ॥९८॥निद्रितहंता आततायी । त्यातें वधितां दोष नाहीं । ऐसें बोलोनि शेषशायी । कान्ता स्वभवीं सान्तवी ॥९९॥शतधन्व्याचें करूनि हनन । त्यापासूनि स्यमंतकरत्न । हरीन तेव्हां सत्यप्रतिज्ञ । जाणती जन मजलागीं ॥१००॥ऐसी भगवन्मुखींची वाणी । शतधन्व्याचे पडतां श्रवणीं । धडकी भरली अंतःकरणीं । तत्कृत करणी अवधारा ॥१॥ N/A References : N/A Last Updated : May 09, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP