अध्याय ५५ वा - श्लोक १६ ते २०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
प्रभाण्यैवं ददौ विद्यां प्रद्युम्नाय महात्मने ।
मायावती महामायां सर्वमायाविनाशिनीम् ॥१६॥
ऐसें बोलोनि बोधिली विद्या । मायावती नामप्रसिद्धा । जीमाजि अनेक माया सिद्धा । दैत्यकुविद्यानाशक जे ॥२९॥
महात्मा जो प्रद्युम्न बलि । त्याकारणें विद्या कथिली । महामायानामाथिली । जे बोलिली धनुर्वेदीं ॥१३०॥
सामान्य भूत पृथक पृथक । महद्भूत तो विष्णु एक । ते वैष्णवी महामाया सम्यक । माया अनेक जीमाजे ॥३१॥
आधींच त्रिजगज्जेता मार । विशेष कृष्णवीर्याचा अंकुर । जेणें बसविलें रुक्मिणीजठर । वरी विद्या प्रचुर लाधला पैं ॥३२॥
मग आवेशें उथलला कैसा । प्रळयकाळींचा रुद्र जैसा । ग्रासावया विश्वाभासा । खवळे जैसा साटोपें ॥३३॥
चाप निषंग सकळ शस्त्रें । अस्त्रविद्या सबीजमंत्रें । लाधला मायावतीवक्त्रें । परजूनि ठकारें ठाकला ॥३४॥
मग लोटला कवणेपरी । शंबरा समराङ्गणीं पाचारी । तें तूं कुरुवर्या अवधारीं । प्रतापथोरी यदुकुळींची ॥१३५॥
स च शंबरमभ्येत्य संयुगाय समाह्वयत् ।
अविषह्यैस्तमाक्षेपैः क्षिपन्संजनयन्कलिम् ॥१७॥
गुप्त होता जो परिवारा । माजि प्रकटला अंतःपुरा । देखोनि किंकरी करिती गजरा । दैत्य घाबिरा ऐकोनी ॥३६॥
कोण माझिये अंतःपुरीं । जार तस्कर किंवा वैरी । दचकूनि तर्की जंव अंतरीं । तंव पाचारी समरंगा ॥३७॥
तो कंदर्प दर्पाथिला । यदुकुळसंभव शौर्यागळा । नवयौवनें विराजला । पुरुषचिह्नीं प्रतापी ॥३८॥
शंबरातें समराङ्गणीं । निर्भर्त्सूनि बोले कार्ष्णि । मंडित अससी पुरुषचिह्नीं । तरी उठोनि येईं पुढें ॥३९॥
जंववरी भेटला नाहीं वीर । तंव वरी विक्रम वाहसी थोर । आतां सांवरूनियां धीर । येईं सत्वर समरंगा ॥१४०॥
धिक्कारूनि बहुता परी । कलहोत्पादकोत्तरीं । हाकितां शोभला असुर भारी । कोणे प्रकारीं तें ऐका ॥४१॥
सोऽधिक्षिप्तो दुर्वचोभिः पदा हत इवोरगः ।
निश्चक्राम गदापाणिरमर्षात्ताम्रलोचनः ॥१८॥
तो आधींच शंबरासुर । रुद्रक्रोधाचा अवतार । विशेष ऐकोनि स्वाधिकार । क्षोभें दुर्धर उठावला ॥४२॥
सर्प खवळलिया चरणघातीं । तेंवि ऐकोनि स्मरदुरुक्ति । गदा पडताळूनियां हातीं । अधर दांतीं रगडिला ॥४३॥
खदिराङ्गारासदृश नेत्र । क्रोधावेशें कांपे गात्र । जैसें काळकूटाचें पात्र । तैसा दुष्कर निघाला ॥४४॥
गदामाविध्य तरसा प्रद्युम्नाय महात्मने ।
प्रक्षिप्य व्यनदन्नादं वज्रनिष्पेषनिष्ठुरम् ॥१९॥
विशाळमूर्ति ठाणमाणें । तया प्रद्युम्नाकारणें । गदाघातें असुरें तेणें । सवेग हृदयीं ताडूनी ॥१४५॥
प्रळयकाळींचा विद्युत्पात । तैसा गर्जिन्नला अद्भुत । गमे लोकत्रया कृतान्त । ग्रासकर्ता प्रज्वळला ॥४६॥
तामापतंतीं भगवान्प्रद्युम्नो गदया गदाम् ।
अपास्य शत्रवे क्रौद्धः प्राहिणोत्सवगदां नृप ॥२०॥
शंबरासुराचा गदाप्रहार । येतां वक्षस्थळासमोर । गदाहस्तें करूनि दूर । सवेग असुर ताडिला ॥४७॥
शंबरासुरा स्वगदाघातें । हृदयीं भेदूनियां मन्मथें । गर्जना करितां पाहे भंवतें । दैत्य मूर्च्छेतें पावतां ॥४८॥
ऐकें कौरवकुळपाळका । दैत्या हृदयें बाधी शंका । म्हणे कोण कोठूनि हा त्र्यंबका । अकस्मात पाठविला ॥४९॥
वीर नव्हे हा सामान्य । वय पाहतां दिसे सान । कृतान्तही आंगवण । करितां गौण यासमरीं ॥१५०॥
ऐसा विस्मय करूनि मनीं । स्वगुरु मयासुर चिंतूनी । सत्वर उडोनि गेला गगनीं । तें ऐकें श्रवणीं कुरुवर्या ॥५१॥
N/A
References : N/A
Last Updated : May 09, 2017
TOP