मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ५५ वा| श्लोक ६ ते १० अध्याय ५५ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० अध्याय ५५ वा - श्लोक ६ ते १० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ६ ते १० Translation - भाषांतर नारदोऽकथयत्सर्वं तस्याः शंकितचेतसः ।बालस्य तत्त्वमुत्पत्तिं मत्स्योदरनिवेशनम् ॥६॥ऐसी शंकितचित्ता रति । नारद येऊनि तयेप्रति । गुह्य वृत्तान्त सर्व कथे । तो तूं भूपति अवधारीं ॥५६॥अवो सुंदर कामाङ्गने । हा तव भर्ता मन्मथ जाणें । मत्स्योदरीं कवण्या गुणें । याचें येणें तें ऐक ॥५७॥पूर्वीं वासुदेवांश हा स्मर । तो येथ वासुदेववीर्यें कुमर । रुक्मिणीजठरीं हा अवतार । हरी शंबर गतवैरें ॥५८॥बाळक टाकितां सिंधुजळीं । दैवयोगें त्या मत्स्य गिळी । तो मत्स्य खंडितां पाकस्थळीं । तुज हे नव्हाळी पावली ॥५९॥आतां गुह्य हें प्रकट न करीं । बाळकाचें गोपन करीं । जाणोनि निज कान्त निर्धारीं । जन्मान्तरीं उपलब्ध ॥६०॥ऐसी ऐकोनि नारदवाणी । रति संतुष्ट अंतःकरणीं । पुढें वर्तली जैसी करणी । ते ऐक श्रवणीं कुरुवर्या ॥६१॥सा च कामस्य वै पत्नी रतिर्नाम यशस्विनी ।पत्युर्निर्दग्धदेहस्य देहोत्पत्तिं प्रतीक्षती ॥७॥ते पूर्वींच मन्मथयुवती । यशस्विनी पतिव्रता सती । नामें विख्यात जे कां रति । सदनीं होती असुराचे ॥६२॥रुद्रशापें स्वकान्ततनु । दग्ध जाहली ते उत्पन्न । कोणापासूनि कोठें जनन । देह लाहून प्रकटेल ॥६३॥ऐसी स्वकान्तदेहोत्पत्ति । प्रतीक्षमाणा सुभगा सती । शंबरें आणूनि सदनाप्रति । पाकनिष्पत्ती नियोजिली ॥६४॥निरूपिता शंबरेण सा सूपौदनसाधने ।कामदेवं शिशुं बुद्ध्वा चक्रे स्नेहं तदार्मके ॥८॥शंबरासुरें यथातथ्य । पाकशाळेचें जितुकें कृत्य । मायावतीसितदाधिपत्य । देऊनि निश्चित स्थापिली ॥६५॥वर्तत असतां स्वनियोगीं । नारदमुखें मन्मथमागी । आइकोनि आविर्भवली आंगीं । अभिलाषोर्मी सस्निग्ध ॥६६॥मत्स्योदरीं जो लब्ध शिशु । जाणूनि स्वभर्ता वासुदेवांशु । त्याच्या ठायीं स्नेहविशेष । धरी विश्वास मुनिवचनीं ॥६७॥मायावती ते मायाप्रचुरा । जिणें मोहिलें शंबरासुरा । तिणें सदासदासीनिकरा । मोहूनि लेंकुरा लपविलें ॥६८॥नित्य वाढवी सप्रेमभावें । परंतु कोण्हासि नोहे ठावें । कोणें कोणापें चावळावें । मायालाघवें हें गमे ॥६९॥नातिदीर्घेण कालेन स कार्ष्णी रूढयौवनः ।जनयामास नारीणां वीक्षंतीनां च विभ्रमम् ॥९॥मनःसंकल्पाची धांव । तेंवि हा मनसिज मनोभव । अदीर्घकाळें सर्वावयव । कार्ष्णि स्वमेव कृष्ण गमे ॥७०॥थोड्याच दिवसा प्रौढवयसा । आंगीं बाणली यौवनदशा । रूपरेखा लावण्यठसा । जनकासरिसा निडारला ॥७१॥जयाची तनु लावण्यतर । नारी पाहती ज्या सादर । त्यांचे अंतरीं स्मरविकार । दर्शनमात्रें उपजवी ॥७२॥लावण्यरसिक पुरुषरत्न । पाहतां नारींचें वांछी मन । यासीं रमिजे करूनि प्रयत्न । द्रवे कारण अभिलाषें ॥७३॥ऐसी देखोनि मन्मथवयसा । कामिनी होती साभिलाषा । असो प्रत्यक्ष रतिमानसा । विभ्रम कैसा तो ऐका ॥७४॥सा तं पतिं पद्मदलायतेक्षणं प्रलंबबाहुं नरलोकसुंदरम् ।सव्रीडहासोत्तभितभ्रुवेक्षती प्रीत्योपतस्थे रतिरंगसौरतैः ॥१०॥मन्मथमानिनी स्वयें रति । जीच्या लाघवें सुरतप्रीति । सुरनर तिर्यक् सर्व जाति । विषयासक्तिनिबद्ध ॥७५॥ते त्या कृष्णतनयाप्रति । जाणोनि पूर्वजन्मींचा पति । दृढविश्वासें नारदोक्ति । स्मरोनि चित्तीं विरहार्ता ॥७६॥तारुण्यतरणीच्या प्रकाशें । दारादारणऔदार्य दिसे । मार कुमारवयसामिसें । रति सौरसें स्मरार्ता ॥७७॥फुल्लारपद्मदलायताक्ष । शोभे सदस्र वक्र राकेश । गंडमंडैत कुंडलें सुनस । व्यंकट कटाक्ष सस्मेर ॥७८॥आजानुबाहु प्रलंब सरळ । ललाटपट्टिका अमळ विशाळ । विस्तीर्ण हृदय बाहुयुगळ । नाभि वर्तौळ सुशोभित ॥७९॥जानु जघन पदविन्यास । ऐसियातें रतिमानस । पाहूनि वेधलें निःशेशः । पाहे सविलास कटाक्षें ॥८०॥सलज्ज सस्मित व्यंकट दृष्टि । सप्रेम उत्तंभित भ्रुकुटि । रतिरंगार्ह मन्मथयष्टि । देखोनि गोरटी स्मर कांक्षी ॥८१॥अंग ऐसिया संबोधनें । संबोधूनि नृपाकारणें । शुक्राचार्य सावध म्हणे । ऐक लक्षणें नवसुरतीं ॥८२॥नेत्र मुरडूनि खुणावी । चाटुचटुल कौशल्य दावी । गाढालिङ्गनें अधर चावी । सुरतगौरवीं स्मरचेष्टा ॥८३॥शत्रु खवळूनि आणिजे समरा । तेंवि चेतवी स्मरविकारा । दावूनि मन्मथसंगरमुद्रा । प्राशी अधरा हास्यमिसें ॥८४॥सादर अवयवनिरीक्षणीं । तत्पर व्यवायगुह्यभाषणीं । निःशंक क्रीडासंकीर्तनीं । रतिरसचिह्नीं प्रमुदित पैं ॥८५॥दुकूलाकलनें शयनाकर्षीं । सस्मित परिधानचीरविकर्षी । स्वयें साक्षेप नीवीमोक्षीं । इत्यादि लक्षीं स्मरचिह्नें ॥८६॥तेणें मन्मथ विस्मित मनीं । होऊनि तर्की अंतःकरणीं । आजि कां जननी विपरीत चिह्नीं । मजलागूनि संस्तोभी ॥८७॥हेंचि जाणावया प्रकट । शंका सांडूनि जाला धीट । तयेसि पुसता जाला स्पष्ट । कर्णीं सुभट तें ऐका ॥८८॥ N/A References : N/A Last Updated : May 09, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP