मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ४१ वा| श्लोक २६ ते ३० अध्याय ४१ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४० श्लोक ४१ ते ४५ श्लोक ४६ ते ५२ अध्याय ४१ वा - श्लोक २६ ते ३० श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २६ ते ३० Translation - भाषांतर अश्नंत्य एकास्तदपास्य सोत्सवा अभ्यज्यमाना अकृतोपमज्जनाः । स्वपंत्य उत्थाय निशम्य निःस्वनं प्रपाययंत्योऽर्भमपोह्य मातरः ॥२६॥एकी क्षुधिता जेविती ताटीं । ग्रास चाविती मोडिती बोटीं । तंव कृष्णागमनचावटी । श्रवणपुटीं प्रवेशली ॥२००॥उत्साहभरिता श्रवणमात्रें क्षुधे । तृषेसी विसरल्या पात्रें । कृष्णदर्शना उत्सुक नेत्रें । धांवतां गात्रें नावरती ॥१॥धांवतां पदर रुलती बिदीं । येरी वनितांची मांदी खुरंदी । गळोनि पडल्या नोहे शुद्धि । धांवती नुसधीं कलेवरें ॥२॥मुखीं भरले जे षड्रस । चावणें गिळणें हे स्मृति ओस । हातीं उचलिले तैसेचि ग्रास । जाती जगदीश पहावया ॥३॥ह्याहीहूनि कौतुक आन । राया ऐकें सावधान । केवळ लज्जेचें भाजन । तो हा स्त्रीजन विधिसृष्ट ॥४॥त्याही अभ्यंग करावया । तैलें सर्वांगीं माखलिया । शिरीं चर्चूनि चोखणिया । स्नाना आलिया शिळेवरी ॥२०५॥वसनाभरणरहित आंगें । वरी माखली चोखणी रंगें । धांवती वेधलिया श्रीरंगें । प्रवृत्तिपांगें न पांगती ॥६॥डोई चिकटलीं घांसती अबळा । कृष्णमृत्तिका मर्दिली बाळां । कर्दम सर्वांगीं माखला । मुखमंडल अनोळखी ॥७॥तैशाच तनु न सांवरीत । जळें न होतां सुस्नात । धांवती वधू शतानुशत । श्रवणें विस्मित परीक्षिति ॥८॥एकी प्रसुप्तासुखसेजारीं । कृष्णागमनोत्सवाच्या गजरीं । अग्नि स्पर्शतां द्रव्ययंत्रीं । गोळापरी धांवती त्या ॥९॥बाळका पाजिती स्नेहाळ जननी । कृष्णागमन पडतां कानीं । धांवतां पडलीं स्तनींहूनी । नेणती ग्लानि रुदनाची ॥२१०॥राया येथ नवल काय । करणज्ञानें प्रपंच होय । करणोपरमें फावल्या सोय । तैं स्वप्नप्राय भवभान ॥११॥स्वप्नसंसारीं प्रसवली । पुत्रेसहित ते पहुडली । दैवें अवचिती जागृति आली । मग कैं माउली शिशु जोपी ॥१२॥तैसा परमात्मा सुखकंद । करणां फावल्या तत्सुखवेध । देहस्मृतीचा होय अबोध । येथ विरोध कोणता ॥१३॥ऐशा धांविल्या वाडेंकोडें । कृष्ण पाहती निजनिवाडें । कृष्णें जाणूनि त्यांचिये चाडे । कोण्या पाडें तोषविल्या ॥१४॥मनांसि तासामरविंदलोचनः प्रगल्भलीलाहसितावलोकनैः । जहार मत्तद्विरदेंद्रिविक्रमो दृशां ददच्छ्रीरमणात्मनोत्सवम् ॥२७॥जे लीलेनें विधिहरसुर । मोइले होत्साते अजस्र । वर्तती होवोनि लीलातंत्र । प्रगल्भतर यास्तव ते ॥२१५॥अबळामोहकें जीं कौशल्यें । प्रबुद्ध तियें मानिती शल्यें । प्रगल्भलीलारससाफल्यें । हरिचांचल्यें विधिगोळीं ॥१६॥अयस्कांतें चळती लोह । तैसा प्रगल्भलीलामोह । त्रिजगा वेधक हरिविग्रह । वनितासमूह ते वेधी ॥१७॥इंद्रनीळाचें गाळोनि कीळ । सुनीळप्रभा कोमळ अमळ । तत्प्रतिमेचा रंग सोज्वळ । फांके निर्मळ निद्गगनीं ॥१८॥तो हा अद्यापि योगिजन । लक्षयोगें मुरडूनि नयन । पाहोनि होताती उन्मन । सच्चित्सुखघन तनुधारी ॥१९॥कमलनेत्रीं कोमळदृष्टि । उद्दामलीलानाटकयष्टि । त्रिभंगीं ठाण ठकारधाटी । चाले जगजेठी ठमकत ॥२२०॥रत्नजडित शोभे मुकुट । बर्हश्रेणी ललाटजुष्ट । कुटिल कुंतल श्रवणानिकट । पाहे व्यंकट स्मितवदनीं ॥२१॥गंड मंडित कुंटळकांति । दशनीं कोटिचंद्रांची द्युति । सरळ नासिका चापाकृति । भ्रू तरळती सविभ्रमा ॥२२॥उभयोष्ठांच्या मीलनोन्मीलनीं । आनंद कोंदे ब्रह्मांडभुवनीं । सुललित शब्द निघती वदनीं । ज्यांच्या श्रवणीं श्री वेधे ॥२३॥चिबुक हनुवटी वर्तुळ । कंबुकंठ बाहु सरळ । कपाटसन्निभ वक्षःस्थळ । ककुदीं सबळ वृषसाम्य ॥२४॥केयूरांगदें दंडलीं दंडीं । मनगटीं जडित कंकणजोडी । तरळ मुद्रिकांच्या उजिवडीं । फांके ब्रह्मांडीं विद्युद्भा ॥२२५॥जगदर त्रिवळी सहित । नाभि गंभीर दक्षिणावर्त । सूक्ष्म रोमराजी अनुदित । अंबर पीत परिधान ॥२६॥मेखळे क्षुद्रघंटिकादाटी । पल्लव सोडूनि मालगांठी । जानु वर्तुळ त्रिकोणघोंटी । चरणतळवटीं भास्करभा ॥२७॥चरणीं वाळेवांकी अंदु । पदविन्यासें उमटती शब्दु । गजेंद्रविक्रम श्रीगोविंदु । चाले अमंदमंदवत् ॥२८॥दिव्यकौशेयपट प्रावरण । उभय पल्लव देदीप्यमान । डुलत चाले मत्त वारण । तेंवि श्रीकृष्ण पद ठेवी ॥२९॥संवगडियांच्या खांदियावरी । हात ठेवूनि चाले हरि । तरळ भृकुटी कमलनेत्रीं । सस्मितवक्त्रीं वधू वेधी ॥२३०॥कृष्णदर्शना उताविळा । तनुविस्मृता नगरअबळा । धांवूनि आलिया त्यांसि डोळां । सुखसोहळा दाखवी ॥३१॥प्रगल्भलीलारसिक तनु । सविलासहासावलोकेंकरून । रमणीय रमेचें रमवी मन । निववी वधूगण त्या रूपें ॥३२॥सनाथ केल्या लक्ष्मीहून । मानसें हरीनें नेलीं हरून । लावण्य दाविलें डोळे भरून । झाल्या निमग्न स्वानंदीं ॥३३॥उत्सव देऊनि वधूनयनांसी । हरिता झाला मानसांसी । ना त्या स्वानंदसमरसीं । निमग्न केल्या कां न म्हणा ॥३४॥तिहीं ते देखोनि कृष्णमूर्ति । कैसी भोगिली निजविश्रांति । तें तूं ऐकें परीक्षिति । म्हणे भारती शुकाची ॥२३५॥दृष्ट्वा मुहुः श्रुतमनुद्रुतचेतसस्तं तत्प्रेक्षणोत्स्मिंतसुधोक्षणलब्धमानाः ।आनंदमूर्तिमुपगुह्य दृशात्मलब्धं हृष्यत्त्वचो जहुरनंतमरिंदमाधिम् ॥२८॥अनंतजन्में श्रुति स्मृति । वर्णितां ऐकिली ज्याची कीर्ति । ते हे प्रत्यक्ष कृष्णमूर्ति । नारदोक्ति श्रुत होती ॥३६॥वारंवार श्रवणेंकरून । पूर्वींच सवेघ होतें मन । मूर्ति अकस्मात देखोन । निर्भर पूर्ण उत्साहें ॥३७॥विशेष सविलास तत्प्रेक्षण । हास्ययुक्त सुंदर वदन । तेंचि केवळ सुधासेवन । लाहोनि नयन निवाले ॥३८॥मग त्या दृष्टिसम्मानप्राप्ता । स्मितावलोकनामृतें तृप्ता । नेत्रें प्राशूनि आंतौता । नेती एकांता हृत्पद्मीं ॥३९॥फावलिया मानससदनीं । आनंदमूर्ति कवटाळूनी । निर्भर झाल्या आलिंगोनी । त्वचा थरकोनि हरिखेल्या ॥२४०॥अरिंदम हे परीक्षिति । वामा पावोनि निजविश्रांति । अनंत जन्मींची वियोगखंती । ते निश्चिती टाकिली ॥४१॥अरिंदम हें संबोधन । निर्जितषड्वैरी म्हणोन । शृंगाररसीं झणें निमग्न । होसी म्हणोन सुचविलें ॥४२॥शृंगाररसभावें हे कथा । झणें घेसी धरित्रीनाथा । तरी दुर्जय काम उधवील माथा । मग सत्पथा अंतरसी ॥४३॥अरिंदमसंबोधनें करून । ऐसें केलें सावधान । म्हणे राया हें निरूपण । शांत संपूर्ण वेदांत ॥४४॥ऐशा आनंदनिर्भर नारी । हृदयीं आलिंगूनि श्रीहरि । प्रसन्नवदना कोणे परी । राममुरारी त्या यजिती ॥२४५॥प्रासादशिखरारूढाः प्रीत्युत्फुल्लमुखांबुजाः । अभ्यवर्षन्सौमनस्यैः प्रमदा बळकेशवौ ॥२९॥उभ्या होत्या प्रासादशिखरीं । गवाक्षद्वारीं कीं गोपुरीं । कृष्णप्रेमें त्या समस्त नारी । वक्त्रकह्लारीं प्रफुल्लिता ॥४६॥रामकृष्णांवरी तिये समयीं । सुष्ठुं सुमनांची वृष्टि तिहीं । केली म्हणतांच राजा हृदयीं । शंकित होवोनि पुसतसे ॥४७॥तनुविस्मृता धांवल्या नारी । तेव्हां सुमनें कैंचीं करीं । त्या वर्षल्या कवणे परी । हे अंतरीं मज शंका ॥४८॥मुनि म्हणे गा श्रोतया चतुरा । प्रेमोत्कर्षें वधू निर्भरा । शोभनमानससुमनभारा । वर्षत्या झाल्या उह्लासें ॥४९॥उत्फुल्ल प्रीतीच्या निर्भरीं । आनंदाश्रु वर्षती नेत्रीं । नेत्रकमळीं कृष्णावरी । वर्षती ऐसें न म्हणिजे ॥२५०॥कीं हर्षें रोमांचित त्वचा । पुलक पाझर सुखस्वेदाचा । तोचि वर्षाव तत्सुमनांचा । प्रेमोत्साहें न मनावा ॥५१॥नातरी सप्रेम सादर श्रवणें । सेवितां कृष्णाचें बोलणें । कळवळूनि अंतःकरणें । द्रवणें वृष्टिसम नोहे ॥५२॥कीं कारुण्यें अंतःकरणीं । शोभन शब्द निघती वदनीं । ते अभीष्टवृष्टि गगनसुमनीं । केली म्हणोनि न मनावें ॥५३॥एवं मनाचे शोभन भाव । सौमनस्य त्यांचें नांव । तिहीं वर्षल्या नारी सर्व । हें अपूर्व तुज कथिलें ॥५४॥आणिक कित्येक वृद्ध पुरंध्री । लाजाक्षतासुमनोपचारीं । वळघल्या होत्या प्रासादशिखरीं । त्या हरीवरी वर्षल्या ॥२५५॥कीं सुमनशब्दें जे सुरवर । तत्संबंधीं सुमनभार । तिहीं वर्षल्या प्रमदा अपार । ज्या निर्जरपुरवनिता ॥५६॥एवं रामकेशवांवरी । सुमनीं वर्षल्या नरसुरनारी । पुढें चालतां कैटभारि । कैसा द्विजवरीं पूजिला ॥५७॥दध्यक्षतैः सोदपात्रैः स्रग्गंधैरभ्युपायनैः । तावानर्चुः प्रमुदितास्तत्र तत्र द्विजातयः ॥३०॥कनकरजतादि पर्यळीं । दध्यक्षतापुष्पीं फळीं । सुमनमाळा गंधें पिवळीं । आणि धवळीं श्रीगंधें ॥५८॥धूपदीपादि सामग्री । खंडशर्करा तांबूलवस्त्रीं । शुद्धोदकें कनकपात्रीं । येती सामोरीं द्विजवृंदें ॥५९॥राम गोपाळ श्रीपति । ईश्वरभावें द्विज पूजिती । शकुनार्थ दध्यक्षता अर्पिती । मग लेपिती विलेपनें ॥२६०॥केशरतिलक रेखूनि भाळा । सर्वां कंठीं घालिती माळा । वरी उधळिती दिव्य परिमळा । फुलीं मोकळा वर्षती ॥६१॥सधूपदशांगशळाका । उजळूनि साज्य त्रिवर्तिका । आर्द्र खाद्यें खर्जूरिका । पयःशर्करा नैवेद्य ॥६२॥पनस कदळें आम्रफळें । द्राक्षें दाडिमें रायावळे । साखरनिंबें बोरें जांबळें । सेव्यें मृदुलें अर्पिलीं ॥६३॥त्रयोदशगुणान्वित तांबूल । यथाशक्ति दक्षिणा विपुल । कर्पूरें नीराजिती सोज्वळ । पुष्पांजळि मंत्रपुष्पें ॥६४॥उपायनें वस्त्राभरणें । प्रसाद मानूनि घेतलीं कृष्णें । द्विज संतोष पावूनि मनें । आशीर्वचनें ओपिती ॥२६५॥ऐसे द्विजवर ठायीं ठायीं । हर्षें पूजिती शेषशायी । पुरजनवनिता आपुले ठायीं । चिंतिती कायी तें ऐका ॥६६॥ N/A References : N/A Last Updated : May 07, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP