मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ३८ वा| श्लोक २१ ते २५ अध्याय ३८ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते २७ श्लोक २८ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४३ अध्याय ३८ वा - श्लोक २१ ते २५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक २१ ते २५ Translation - भाषांतर लब्धांगसंगं प्रणतं कृतांजलिं मां वक्ष्यतेऽकूर ततेत्युरुश्रवाः । तदा वयं जन्मभृतो महीयसा नैवादृतो यो धिगमुष्य जन्म तत् ॥२१॥लाहोनि कृष्णाचा अंगसंग । प्रणाम करूनि साष्टांग । बद्धांजलि नम्रोत्तमांग । पाहीन सांग हरिचरण ॥२६०॥ऐसिया मातें अवलोकून । जो का पुण्यश्रवणकीर्तन । तो उरुश्रवा स्वमुखें करून । सम्मानून बोलेल ॥६१॥तात अक्रूर ऐसिया शब्दीं । संबोधील जैं कृपानिधि । तेव्हां आमुची जन्मसिद्धि । सफळ त्रिशुद्धि जाहली ॥६२॥श्रेष्ठीं नादरिला जो प्राणी । वृथा भूभार तो जन्मोनी । धिक्कार त्याचे जननीं मरणीं । वृथा जननीश्रमकर तो ॥६३॥धिक् त्या जंतूचें तें जन्म । ज्यातें नादरी पुरुषोत्तम । धिक्कृत तयाचें सर्व कर्म । विश्वीं अधम असंमत जो ॥६४॥विश्वीं संमत जो सौजन्यें । तो आदरिजे श्रीभगवानें । श्रीकृष्ण जीव नव्हे मां मानें । सुहृदादिकां सम्माना ॥२६५॥सुहृदादिकां आलिंगन । स्वागतप्रश्न संभाषण । न करी प्राकृत जीवांसमान । कां पां कृष्ण तें ऐका ॥६६॥न तस्य कश्चिद्दयितः सुहृत्तमो न चाप्रियो द्वेष्य उपेक्ष्य एव वा ।तथाऽपि भक्तान्भजते यथा तथा सुरद्रुमो यद्वदुपाश्रितोऽर्थदः ॥२२॥कृष्ण परमात्मा ईश्वर । सर्वीं सर्वगत निर्विकार । त्यासि अप्रिय कोण प्रियतम स्वपर । आप्त कीं इतर असेना ॥६७॥त्यासि सुहृद अथवा द्वेष्य । उदास मध्यस्थ ना उपेक्ष्य । इष्ट मित्र गोत्र पोष्य । हा विशेष त्या नाहीं ॥६८॥हे संबंध जीवांकडे । ईश्वरीं कांहीं संबंध न घडे । तथापि भक्त भजती कोडें । तैसा त्यांकडे अनुसरतो ॥६९॥जो जो प्राणी भजेल जैसा । ईश्वर भासे तयासि तैसा । कामिकांचे इच्छेसरिसा । फळे अपैसा सुरद्रुम ॥२७०॥बैसोनि कल्पतरुतळवटीं । इच्छी संकल्पें रत्नकोटी । तों त्या लाहे कीं नरोटी । इच्छी तैसी लाहे तो ॥७१॥ते कल्पना सुरतरु न करी । तैसा भक्तांच्या भजनावरी । इच्छेसरिसा भजे हरि । संबंधविकारी न होतां ॥७२॥मित्र म्हणती त्यांचा मित्र । पुत्र भाविती त्यांचा पुत्र । शत्रु मानिती त्यांचा शत्रु । भावनामात्रफळदानी ॥७३॥तैसा कृष्ण माझ्या भावें । मज संतुष्ट स्नेहगौरवें । अंगीकारील हृद्गत आघवें । ओळखोनि तें अवधारा ॥७४॥किं चाग्रजो माऽवनतं यदूत्तमः स्मयन्परिष्वज्य गृहीतमंजलौ ।गृहं प्रवेश्याप्तसमस्तसत्कृतं संप्रक्ष्यते कंसकृतं स्वबंधुषु ॥२३॥आणि कृष्णाचा अग्रज बंधु । संकर्षण जो चातुर्यसिंधु । यदुकुळगगनीं जैसा इंदु । आनंदकंदु व्रजकुमुदा ॥२७५॥बद्धांजलि केली मियां । तैसीच स्वकरीं धरूनियां । हास्यवदनें आलिंगूनियां । ग्रहामाजी प्रवेशवील ॥७६॥समस्त सत्कार लाधले ज्यातें । ऐसिया मातें धरूनि हातें । पुसेल कंसाचीं चेष्टितें । छळी बंधूंतें केंवि कैसा ॥७७॥स्वबंधु जे यादवगण । त्यांच्या ठायीं द्वेष गहन । धरूनि कैसा करी छलन । तें संपूर्ण पुसेल ॥७८॥ऐसें अक्रूराचें प्रेम । नृपा कथूनि मुनिसत्तम । पुढील कथेचा अनुक्रम । अमृतोपम वाखाणी ॥७९॥इति संचितयन्कृष्णं श्वफल्कतनयोऽध्वनि । रथेन गोकुलं प्राप्तः सूर्यश्चास्तगिरिं नृप ॥२४॥ऐसा अक्रूर रथावरी । कृष्णप्रेमें कल्पना करी । चिंतूनि कृष्णातें अंतरीं । मार्गीं हरंवरीं चालतां ॥२८०॥ऐसा श्वफल्काचा तनय । कृष्णचिंतनें कृष्णमय । स्मरणधर्मा मुकला ठाय । तथापि जाय रथयोगें ॥८१॥अस्त पावतां गभस्ति । अक्रूर पावला व्रजाप्रति । तंव त्या कृष्णाचे चरण क्षितीं । देखता झाला तें ऐका ॥८२॥पदानि तस्याखिललोकपालकिरीटजुष्टामलपादरेणोः ।ददर्श गोष्टे क्षितिकौतुकानि विलक्षितान्यब्जयवांकुशाद्यैः ॥२५॥समस्त लोकपाळांच्या श्रेणी । लागतां श्रीकृष्णाचे चरणीं । तैं निर्मळ पदरज गंगेहुनी । शिरोभूषणीं मिरविती ॥८३॥त्या कृष्णाचीं अतिसुंदरें । पाऊलें जैसीं सहस्रारें । गोष्ठीं उमटलीं वसुंधरे । मंगलकरें क्षितीतें ॥८४॥गोगोपाल सह जनपद । त्यां माजि कृष्णाचेही पद । कैसे वोळखिले पैं विशद । तोचि अनुवाद अवधारा ॥२८५॥वज्रांकुशोर्ध्वरेखाध्वज । पद्मचिह्नें श्रीपादाब्ज । गंगाजनक तेजःपुंज । निरखी सहज निजदृष्टीं ॥८६॥म्हणाल पाउलांचीं सामुद्रिकें । कैसीं उमटलीं मृत्तिके । केंवि अक्रूर त्यां ओळखे । हें विविकें बोधावें ॥८७॥तरी येथींची विचित्र परी । सावध परिसावी पैं चतुरीं । वेध्यवेधक परस्परीं । प्रेमादरीं ज्ञातृत्व ॥८८॥गगनामाजील माग काढणें । हें एक विहंगयाति जाणे । कीं जळगर्भींचा यादोगणें । जेंवि हुडकणें मागोवा ॥८९॥म्हणाल हें जातिविशिष्ट ज्ञान । तरी येथही तैसेंचि लक्षण । परस्परें ओळखण । वेध्यवेधक सप्रेमें ॥२९०॥वेधक शक्ति श्रीभगवंतीं । असे स्वतःसिद्ध आयती । तदंश तद्वेधें वेधती । हेही स्थिति नैसर्गिक ॥९१॥येरां सर्वत्र हें अवघड । परी सप्रेमळांलागिं उघड । जेंवि चंद्रींचे सस्नुत सड । सेविती चंड चाकोरी ॥९२॥सकौस्तुभ एकावळी कंठीं । ध्यानें घालितां दाटली मुकुटीं । दुज्या ध्यानस्थें देखोनि दृष्टीं । मुकुट काडःओनि घालविली ॥९३॥कीं दुष्यंत मृगया त्रिपुराचळीं । करितां अश्वचरणातळीं । लोह स्पर्शतां स्पर्शशिळीं । वेधें तत्काळीं हेम केलें ॥९४॥तैसे अनेक पाषाण इतरां । बहुधा झगडतां अश्वखुरां । लोहनाला ते कर्बुरा । करूं न शकती संस्पर्शें ॥२९५॥कीं शतयोजनें सिंधुजळीं । अयस्कांताचीं खडकें तळीं । परी जळयानींच्या लोहखिळीं । वेधें तत्काळीं गाळिजेत ॥९६॥तेंवि कृष्णाचीं पाउलें । ध्वजवज्रादिचिह्नमेळें । अक्रूराचे वेधती डोळे । तीं तीं स्थळें तो पाहे ॥९७॥वेधक श्रीकृष्णचरणकमळ । अक्रूर तदंश सप्रेमळ । वेध्यवेधक उभयशील । तें केवळ ज्ञातृत्व ॥९८॥येथें म्हणती सामान्य कवि । ध्यानींची माळा अडस कां व्हावी । मुकुट काढूनि दुजा घालवी । हे गोष्टी आघवी अप्रमाण ॥९९॥ते धीटपाठ धूर्त वक्ते । अनुभवें विण बहुश्रुत ज्ञाते । ओगमहिमा अविदित त्यांतें । ते प्रमाण यातें केंवि म्हणती ॥३००॥चकोरां चंद्रामृतें तृप्ति । तेथ नास्तिक मंडूकांप्रति । एवं प्रतीतीविण प्राकृतमति । प्रमाण न मानिती तें उचित ॥१॥येर्हवीं जीवब्रह्मैक्यप्रसंग । ते दशेतें म्हणिजे योग । तत्सिद्धीचे जे जे मार्ग । ते अव्यंग अगाध ॥२॥लयलक्ष्यादि ध्यानयोग। सांख्य भक्ति ज्ञान अष्टांग । चिदैक्यपूर्ण घडे सांग । साधनमार्ग प्रसिद्ध हे ॥३॥सूर्यसत्तायोगबळें । सूर्यकांतीं स्फुरिजे अनळें । तेंवि अतिंद्रियज्ञायोगें उजळे । तें केंवि कळे धूर्तांतें ॥४॥एवं अघटितघटनापटी । योगमायेची शक्ति मोठी । जिचेनि ब्रह्म नटलें नटीं । तें नेणती करंटीं प्राकृतें ॥३०५॥तस्मात्प्रेमभक्तियोगबळें । आथिले अक्रूराचे डोळे । म्हणोनि श्रीकृष्णपाउलें । देखोनि भरले उल्हासें ॥६॥ N/A References : N/A Last Updated : May 06, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP