मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|हरिवरदा|अध्याय ३८ वा| श्लोक ११ ते १५ अध्याय ३८ वा आरंभ श्लोक १ ते ५ श्लोक ६ ते १० श्लोक ११ ते १५ श्लोक १६ ते २० श्लोक २१ ते २५ श्लोक २६ ते २७ श्लोक २८ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक ३६ ते ४३ अध्याय ३८ वा - श्लोक ११ ते १५ श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा Tags : harivaradakrishnapuranकृष्णपुराणहरिवरदा श्लोक ११ ते १५ Translation - भाषांतर य ईक्षिताऽहंरहितोऽप्यसत्सतोः स्वतेजसाऽपास्ततमोभिदाभ्रमः । स्वमाययात्मन्नचितैस्तदीक्षयाप्राणाक्षधीभिः सदनेष्वभीयते ॥११॥जर्ही प्राकृत दिसे कृष्ण । तर्ही तो प्रकृतिधर्मविहीन । शुभाशुभकार्यकारण । अहंताशून्यही अवलोकी ॥२४॥देहाहंता नसतां एक । कर्तृत्व भोक्तृत्व हर्ष शोक । कोणे ठायीं भेद कळंक । भासोनि पंक माजवी ॥१२५॥म्हणाल अहंता ते काय । तरी अवघा आवरणें आत्मप्रत्यय । झांकतां विक्षेप करी उदय । भेदासि ठाय त्यामाजी ॥२६॥एकला एकांतीं शयन करी । जागृति प्रत्यय सुषुप्ति आवरी । विक्षेपस्वप्नभ्रमांतें प्रसरी । तैं भेद उभारी सुखदुःखा ॥२७॥तेथ क्षणिकें विषयाभासें । सुखदुःखादि पूर्वाध्यासें । भोगितां हर्षें शोकें त्रासें । एवं ऐसें स्वाज्ञान ॥२८॥अविद्यावरण म्हणिजे तम । विक्षेप तो भेदोद्गम । विषयाभास केवळ भ्रम । देह अहंमम दृढावी ॥२९॥तो कर्तृत्वभोक्तृत्वाभिनिवेश । घालूनि सुखदुःखांचे पाश । जागवूनियां षड्वैरियांस । रात्रिदिवस जाचवी ॥१३०॥कृष्णीं अपास्त हे अवघेचि । म्हणोनि ऊर्मी अहंतेची । नुठे यास्तव आनंदाची । नित्योपलब्धि प्रकाशे ॥३१॥म्हणाल कृष्णही देहधारी । तमादि भ्रम त्या कां नावरी । तरी स्वतेजसा या पदावरी । जाणिजे चतुरीं निर्भ्रमता ॥३२॥नित्य स्वरूपसाक्षात्कार । स्वप्रत्यय जैं अनावर । तैं त्या कोठूनि पडेल विसर । केंवि तमांकुर विरूढेल ॥३३॥जेथ तमाचें आवरण नाहीं । तेथ विक्षेप कैंचा काई । विक्षेपें विण भेद पाहीं । कोणा कहीं उपजेल ॥३४॥भेदेंविण कर्त्ता भोक्ता । या अभिनिवेशें देहाहंता । केंवि भ्रमवील नित्यतृप्ता । चैतन्यनाथा श्रीकृष्णा ॥१३५॥म्हणाल हें जरी कृष्णीं न घडे । तरी गोपींसी कैसा क्रीडे । संगोपूनि निज संवगडे । दैत्य गाढे निर्दाळी ॥३६॥तरी आत्मनि म्हणिजे आपुले ठायीं । आपुल्या ईक्षणसत्ता पाही । आपुले मायेच्या प्रवाहीं । रची सर्वही संकल्पें ॥३७॥धी बोलिजे कर्तृकरणा । प्राण म्हणिजे चेष्टाकरणा । ज्ञानाकर्मात्मका संज्ञा । अक्ष ऐसी जाणावी ॥३८॥इत्यादि करणीं सावयव । स्वसत्ता निर्मूनि विविध जीव । अभेदबोधें वासुदेव । क्रीडे स्वमेव ऐश्वर्यें ॥३९॥लतापिहितकुंजसदनीं । विचित्रलीला कर्माचरणीं । आसक्त भाविजे मुग्धीं जनीं । परी जाणती ज्ञानी अनासक्त ॥१४०॥जो ज्या उत्कट चिंतितार्थ । तो त्या प्रत्ययगोचर होत । तैसा आभिमुख्यें भासत । कर्मासक्तवत् श्रीकृष्ण ॥४१॥एवं आम्हां समान कृष्ण । देही नोहे हा निश्चय पूर्ण । कर्तृत्वभोक्तृत्वाभिनिवेशशून्य । हा पूर्णचैतन्य परमात्मा ॥४२॥ऐसी शंकेची निवृत्ति । करूनि पुनः विवरी चित्तीं । जे नित्यतृप्ता लीला आचरिती । केंवि प्रवृत्ति म्हणावी ॥४३॥तरी जगदुद्धाराचि कारणें । पूर्ण स्वजनांच्या कारण्यें । अनुग्रहार्थ लीलाचरणें । करी तीं श्रवणें परिसावीं ॥४४॥यस्याखिलामीवहभिः सुमंगलैर्वाचो विमिश्रागुनकर्मजन्मभिः ।प्राणंति शुभंति पुनंति वै जगद्यास्तद्विरक्ताः शवशोभना मताः ॥१२॥ज्याचे जन्मकर्मगुण । तिहीं करूनि मिश्र व्याख्यान । ज्याच्या वाणी करिती कथन । जगत्कल्याण त्या वाणी ॥१४५॥पूर्णपणासि न पडे तुटी । अव्ययत्वाची न सुटे गांठी । न पचतांचि गर्भघटीं । योनिसंकटीं न कोंडतां ॥४६॥ऐसीं अयोनिसंभवजन्में । कारुण्यगुणादि अनंत नामें । वाणी वर्णिती ज्या सप्रेमें । अगाह कर्में यशोंऽकितें ॥४७॥ज्याच्या जन्मकर्मगुणीं । अमीवें म्हणिजे पातकश्रेणी । श्रवणमात्रें त्यांची धुणी । करी दिनमनि जेंवि तमा ॥४८॥सकळ पातकां होतां भंग । क्षाळला अमंगळ प्रसंग । यास्तव मंगळवृद्धि सांग । पिके अव्यंग ते ठायीं ॥४९॥गुणकर्मादिविमिश्रा वाणी । अमृतरूपा जगज्जीवनीं । प्राणंति या पदव्याख्यानीं । नपा शुकमुनि बोलिला ॥१५०॥तव कथामृत ऐसें । गोपीगीतीं गाईलें असे । तेंचि अक्रूरें निजमानसें । चिंतनमिस्सें विवरिलें ॥५१॥त्रिजगल्लक्ष्मीचें शोभन । जन्मकर्मगुणांचें कथन । आणि पवित्रा गंगेहून । गुणकीर्तनमय वाणी ॥५२॥ऐसिया आणी त्रिजगाप्रति । प्राणंति म्हणिजे जीवविती । शुभंति म्हणिजे शोभविती । बोलिजे पुनंति पावनता ॥५३॥एवं जन्मकर्मगुणविमिश्रा । वाणी निखिल चराचरा । जीववी शोभवी आणि निष्पापकरा । मंगलप्रचुरा पुण्यदा ॥५४॥अमृतरूपा मंदाकिनी । लक्ष्मीशोभना रविनंदिनी । सरस्वती ते विश्वपावनी । एवं त्रिवेणी हरिकीर्ति ॥१५५॥तीर्थीं व्रतीं तपीं दानीं । पुरश्चरणीं यज्ञविधानीं । चर्तुविध पुरुषार्थांची खाणी । तें फळ कीर्तनीं अक्षय ॥५६॥विविधा कर्मीं पृथक् फळें । पुण्यक्षयें होतीं विकळें । हरिकीर्तनीं जोडती सकळें । तीं न होतीं विकळें कल्पांतीं ॥५७॥जन्मकर्मगुणमिश्रिता । ऐसीया वाणींत नाहीं कथा । तिया वाणी चातुर्यभरिता । लावण्ययुक्ता शवरूपा ॥५८॥भगवद्गुणीं ज्या विमुखा वाणी । अशुभफळांच्या केवळ खाणी । वैदिकीं लौकिकीं सूक्तपठनीं । कदा कल्याणी न फळती ॥५९॥हरिगुणविमुखीं आशीर्वाद । दिधल्या होती अशुभप्रद । रजस्वलेचें सोवळें शुद्ध । जेंवि अशुभफळदानी ॥१६०॥शव अपवित्र जेंवि श्मशानीं । कीं जीतचि बाळरंडा । कामिनी । हरिगुणविमुखा चातुर्यखाणी परी त्या वाणी शवरूपा ॥६१॥श्मशानीं शवासनीं अभिचार । जारनमारणादि साबरमंत्र । साधूनि होती पापापात्र । तेंवि अपवित्र फळदात्या ॥६२॥शव उपयोग साबरागमीं । तेंवि बाळरंडा ही पूज्य वामीं । परी ते योग्यता नरकधामीं । पूज्या पूजकां पाचक ॥६३॥साहित्य अळंकार नाटकें । संगीत शृंगाररस कौतुकें । हो का काव्यव्याकरणप्रमुखें । लावण्यरोचकें वाणीचीं ॥६४॥हो का श्रुतिप्रवीणा वाणी । मीमांसादि अनुष्ठानीं । परी ज्या विमुखा भगवद्गुणीं । त्या शव म्हणोनि अशुभदा ॥१६५॥अशुभें त्यांचीं कर्मफळें । म्हणोनि पचविती गर्भखोळे । जन्ममृत्यूचे उमाळे । दुःखें बहळें भोगविती ॥६६॥शास्त्राभ्यासें लावण्यभरिता । परी शवासमान ज्या हरिगुणरहिता । त्या वाणींतें सादर श्रोता । प्रेतान्नभोक्ता तो जाणा ॥६७॥वेदवरिष्ठ जर्ही झाला । तरी तो शरण हरिगुणांला । कर्मसांगतासिद्धि वदला । विष्णुस्मरणें सर्वत्र ॥६८॥शव नासोनि सुटे घाणी । तैसिया हरिगुणविमुखा वाणी । निंद्य अपवित्र दुर्गुणी । नरकश्रेणीफलरूपा ॥६९॥बालरंडा रूपसंपन्ना । नट लेवूनिया आभरणा । पाहे स्मितवक्त्रें दर्पणा । तैं पुंश्चली चिह्नां प्रकटी कीं ॥१७०॥तनुतारुण्यें लावण्यपुष्टि । तों ते मन्मथें होय कष्टी । परपुरुषाचे मैथुनघृष्टी । अघसंकटीं कुळ बुडवी ॥७१॥बालरंडेसी रजोदर्शन । होतां संस्कार करी कोण । असंस्कारी सर्वाचरण । प्रेतासमान जितातें ॥७२॥बालरंडा लावण्ययुवति । सालंकृता ही भेटल्या पंथीं । अशुभसूचक कार्यघाती । भले मानिती अपशकुन ॥७३॥बालरंडेच्या हातींचा पाक । शुचिष्मंत विधिपूर्वक । तथापि हव्यकव्यात्मक । भोजनीं कुंभपाक न चुकती ॥७४॥बालरंडेचें सोवळेपण । तें प्रेतसंपर्का समान । पिता बंधु आप्त स्वजन । ममता धरून कालविती ॥१७५॥शास्त्रीं निंद्य परि ममता न सुटे । यालागिं सोवळें तिचेंचि मोठें । ब्राह्मणस्पर्शें तें उफराटें । सचैल करी शुद्धत्वें ॥७६॥रजोदर्शनीं संस्कारवंता । पुरुषभुक्ता वैधव्यप्राप्ता । सदोषा नसती विरक्ता असतां । बालरंडे सम त्या पैं ॥७७॥सुपुत्रवंता वैधव्यप्राप्ता । पुत्रयोगें त्यां कर्मार्हता । दोष नाहीं त्यांचिया माथां । सौभाग्यभरिता जाणाव्या ॥७८॥पिताचि आपण गर्भवासी । परिणमोनि जन्म पावे कुसीं । उपनयनीं तो स्वकर्मासी । पुत्रापासीं निक्षेपी ॥७९॥अधिकार करूनि श्रौतीं स्मार्तीं । स्वपन्ती देऊनि पुत्राहातीं । कर्मसंन्यासें होय यति । तैं कर्मच्युति त्यां नाहीं ॥१८०॥भर्तार पुत्ररूपें कुसीं । म्हणोनि वैधव्य नाहीं तिसी । एवं प्रेतत्व बालरंडेसी । उत्क्रांतदर्शी मुनि वदती ॥८१॥प्रैषोच्चारपूर्वक आतुर । अथवा विद्वद्यतीश्वर । त्याचें प्रेतही परम पवित्र । अशौचसंचार त्या नाहीं ॥८२॥परंतु हरिगुणविमुखा वाणी । त्या प्रेतापरीस अशौचखाणी । घेतां श्रवणीं पठनीं मननीं । अकल्याणीं नांदविती ॥८३॥बालरंडा जर्ही असंस्कारीं । वैराग्ययुक्ता निरहंकारी । हरिगुणकीर्ति पढे वैखरी । तरी धन्य संसारीं पावन ते ॥८४॥न वंचूनियां तनु मन प्राण । अमत्सरत्वें हरिगुणभजन । नीचकर्मीं निरभिमान । उल्हास पूर्ण हृकमळीं ॥१८५॥जितेंद्रियत्वें हरिगुनपठन । भर्ताररूपी श्रीभगवान । हृदयीं ठसावतां संपूर्ण । बाळरंडापण मग कैंचें ॥८६॥भर्ता भगवान रुचला मनीं । हरिगुणपठनीं रंगली वाणी । शरीर रंगलें हरिगुरुभजनीं । तैं सुकृतखाणी ते होय ॥८७॥तिचें पदजल वंदिती सुर । विधिहर होती आज्ञाधर । सप्रेम हरिगुणवाग्व्यापार । जाणोनि श्रीधर संगोपी ॥८८॥तैं अशुभें तितुकीं शुभदें होतीं । महापातकें क्षया जाती । हरिगुणपठनीं ऐसी शक्ति । जे न पढती ते प्रेत ॥८९॥निंद्य कुंटिनी अपवित्र । पक्षीपालनीं नामोच्चार । करितां पावली तमसःपर । वैकुंठपुर अक्षय ॥१९०॥पिंगला नामें केवळ गणिका । हरिगुणपठनें अक्षय सुखा । पावली ते तुज कुरुकुलतिलका । पुढिले स्कंधीं कथिजेल ॥९१॥जर्ही तो प्राणी आचारभ्रष्ट । परि भवीं विरक्त एकनिष्ठ । वाचेसि करितां हरिगुणपाठ । पावे वैकुंठ अनायासें ॥९२॥अजामिळाच्या पातकराशि । कीं जें घडलें वाल्मीकासी । तें पूर्वीं म्यां तुजपासीं । नाममहिमेंशीं निरोपिलें ॥९३॥एवं हरिगुणपठनापुढें । ब्रह्मांडभरीही पातक उडे । पावन हरिगुण जो नर न पढे । तो जितचि मढें अपवित्र ॥९४॥तस्मात् हरिगुणविमुखा वाणी । सालंकृता रसाळपणीं । बालरंडा त्या व्यभिचारिणी । प्रेताहिहूनि अपवित्रा ॥१९५॥ज्या ज्या विरक्ता हरिगुणपठनीं । त्या शवशोभना संमता वाणी । या पदाचे स्फुट व्याख्यानीं । दूषण बुधजनीं न मनावें ॥९६॥ऐसें ज्याचें मंगल यश । तोचि हा यदुकुळीं आदिपुरुष । कां अवगला पशुपवेश । हृषीकेश तें ऐका ॥९७॥स चावतीर्णः किल सात्वतान्वये स्वसेतुपालामरवर्यशर्मकृत् ।यशो वितन्वन्व्रज आस्त ईश्वरो गायंति देवा यदशेषमंगलम् ॥१३॥भगवन्निर्मित स्वधर्मसेतु । वर्णाश्रमादि जे कर्मतंतु । तद्रुक्षक जे अमरनाथु । त्यां सुखहेतु अवतरला ॥९८॥अमरवर्या जो सुखसाग्र । स्वयें व्रजपुरीं तो ईश्वर । करूनि दैत्यांचा संहार । कीर्ति अपार विस्तारी ॥९९॥पीयूषबाह्य जैसे अमर । अखिल तेजस्वी भास्कर । तैसें अशेष मंगलकर । यश पवित्र जयाचें ॥२००॥अशेष मंगल निर्जर गाती । ज्याची पावन यशःसंपत्ति । त्रिजगदुद्धरणीं अगाध कीर्ति । तो श्रीपति व्रजवासी ॥१॥बहुतेक त्याचें मज दर्शन । होईल ऐसें भावूनि पूर्ण । अक्रूर आपणा मानी धन्य । तें निरूपण अवधारा ॥२॥तं त्वद्य नूनं महतां गतिं गुरुं त्रैलोक्यकांतं दृशिमन्महोत्सवम् ।रूपं दधानं श्रिय ईप्सितास्पदं द्रक्ष्ये ममासन्नुषसः सुदर्शनाः ॥१४॥ब्रह्मांडभुवनींचें लावण्य । एकात्मता पावलें पूर्ण । दृष्टिमंतांसि महोत्सवकरण । ज्याचें दर्शन बहुभाग्य ॥३॥महान म्हणिजे विधिहरप्रमुख । ज्यांतें वंदिती अखिल लोक । त्यांसही गतिप्रद जो देख । म्हणोनि पदांक ते वाहती ॥४॥अज्ञानसुषुप्तिप्रलयावस्था । फेडूनि तामसी अहंता । पूर्णात्मत्व प्रकाशितां । तो महंतां गतिप्रद ॥२०५॥जागररूपा जे उत्पत्ति । ते निरसूनि विक्षेपभ्रांति । काढूनि रजोगुणाची बुंथी । पूर्णात्मस्थितिप्रापक जो ॥६॥सनकादि ऊर्ध्वरेते व्रती । ज्याचे स्वरूपीं त्यांची गति । म्हणोनि शोभे गुरुत्वशक्ति । त्रिजगोत्पत्तिस्थितिनाशी ॥७॥त्रिजगदुद्धर्ता जो गुरुवर । अखिल लावण्य एकाकार । नेत्रवंतासि उत्साहकर । रूप सुंदर देखोनि ॥८॥इंदिरेनें एकांतइच्छे । नुरसुरविधिहर केलीं तुच्छें । तें रू धरूनि गोगोपवत्सें । रक्षी स्वेच्छें तें सम जो कां ॥९॥त्या कृष्णाचें आजि दर्शन । बहुतेक भाग्यें मी लाहीन । किमर्थ म्हणों तरी शुभप्रद शकुन । प्रभाते पासून होताती ॥२१०॥उषसीं करितां आत्मचिंतन । लविन्नला दक्षिण नयन । दक्षिण बाहु करी स्फुरण । सुप्रसन्न हृत्कमळ ॥११॥सुस्नात सलंकृत हास्यवदन । प्रभाते भेटले ब्राह्मण । सपुत्र सुवासिनींचा गण । सौभाग्यमंडित भेटला ॥१२॥धेनु सवत्सा स्नुतस्तनी । प्रफुल्ल कुसुमेंसी माळिणी । दधिदुग्धेंसीं व्रजगौळिणी । प्रयाणारंभीं भेटल्या ॥१३॥उषःकाळीं सुष्ठु चिह्नीं । शुभसूचका जाल्या रजनी । आजि हरिपद देखेन नयनीं । निश्चय शकुनी दृढ केला ॥१४॥पादाब्जदर्शनानंतरें । नमनोत्साह सप्रेमभरें । आधींच कल्पी चित्तें आतुरें । तिये उत्तरें परिसावीं ॥२१५॥अथावरूढः सपदीशयो रथात्प्रधानपुंसोश्चरणं स्वलब्धये ।धिया घृतं योगिभिरप्यहं ध्रुवं नमस्य आभ्यां च सखीन्वनौकसः ॥१५॥हरिपद देखिल्यानंतर । रथापासूनि अतिसत्वर । उडी टाकूनि दण्डाकार । लोटीन शरीर भूभागीं ॥१६॥प्रधान म्हणिजे श्रेषपुरुष । रामकृष्ण गोपाळवेश । नटले ईश्वर जाणोनि त्यांस । नमीन सावकाश तत्क्षणीं ॥१७॥ज्यांचें चरणपंकज मुनि । आत्मप्राप्ति अभिलाषुनी । प्रज्ञाबळें कवळिती ध्यानीं । योगसाधनीं बहुयत्नें ॥१८॥आजि मी त्यांच्या चरणांसहित । तत्सन्निधि गोप समस्त । त्यांतें नमीन आनंदभरित । होईन कृतार्थ तल्लाभें ॥१९॥श्रीपद ऐसें नमिल्यावरी । अनुग्रह करील कैसा हरि । तेंही अक्रूर हृदयीं विवरी । शुकवैखरी तें वर्णी ॥२२०॥ N/A References : N/A Last Updated : May 06, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP