एकहायन आसीनो ह्रियमाणो विहायसा । दैत्येन यस्तणावर्तमहन् कंठग्रहातुरम् ॥६॥

हा एकसंवत्सराचा बाळ । घेऊनि यशोदा वेल्हाळ । खेळवितां दैत्यकुटिळ । आला वाहटुळस्वरूपीं ॥६२॥
तेणें गोकुळ पाडिलें फेरीं । केली यशोदा घाबिरी । कृष्ण उडविला अंबरीं । माया आसुरी दावूनी ॥६३॥
तया तृणावर्ताकंठीं । कृष्णें घातली व्रजमिठी । गतप्राण तो उठाउठीं । शिलापृष्ठीं आपटला ॥६४॥
गगनींहुनी पतन जाहलें । अवयव खंडविखंड पडले । त्याचे वक्षःस्थळीं हा लोळे । निर्भय डोळे न झांकी ॥६५॥
एका वर्षाचें लेंकरूं । केंवि हें अद्भुत शके करूं । कोणा न करवे निर्धारु । विवरा साचार गोप हो ॥६६॥
हें ऐकोनि अपर गोप । म्हणती अद्भुत क्रीडाकल्प । कोणा साकल्यें करवे जल्प । कांहीं अल्प अवधारा ॥६७॥

क्कचिद्धैयंगवस्तैन्ये मात्रा बद्ध उलूखले । गच्छन्नर्जुनयोर्मध्ये बाहुभ्यां तावपातयत् ॥७॥

कोणे एके अवसरीं । अडिचा वर्षांचा श्रीहरि । परम चपळ चित्त चोरी । कोणा क्षणभरी नाकळे ॥६८॥
जेथ तेथ असे उभा । सर्व पाहती लावण्यशोभा । भुलवी बल्लवी स्ववालभा । दुर्लभ सुलभसम भासे ॥६९॥
यशोदा पाजितां प्रेमपान्हा । साजुका गोदुग्धा क्रियमाणा । उतोनि दवडी या विंदाना । नंदांगना न जाणे ॥७०॥
पाजितां ठेउनि कृष्ण कोडें । यशोदा धांवे दुग्धाकडे । प्रारब्धमथन गोरसभांडें । फोडी रोकडें श्रीकृष्ण ॥७१॥
मग प्रवेशोनि माजिघरीं । संचित नवनीत भक्षी हरि । हैयंगव या संज्ञोत्तरीं । ज्यातें सूरि बोलती ॥७२॥
मुक्त करूनि पश्चिमद्वार । मर्कट आणि गोपकुमार । संचित नवनीत समग्र । वोपी सत्वर तयांसी ॥७३॥
करितां यशोदा गवेषण । करी सत्वर पलायन । धरूं धांवे अनुलक्षून । परी हा स्तेन नाटोपे ॥७४॥
धरितां क्लेश पावली फार । परम क्लेशें धरिला कुमर । उखळीं बांधोनि दामोदर । झाली सादर गृहमेधा ॥७५॥
नवनीत चोरितां वनमाळी । यशोदेनें बांधिला उखळी । तैसाचि गेला अर्जुनातळीं । क्रीडाशाली चापल्यें ॥७६॥
अर्जुनांमधूनि गेला चपळ । बाहुबळें वोढितां उखळ । बळें उन्मळूनियां यमळ । द्रुम विशाळ पाडिले ॥७७॥
कैसें लेंकुराचें हें कृत्य । कर्म कृष्णांचें परमाद्भुत । पहात असतां होतसों भ्रान्त । कां हें समस्त विवराना ॥७८॥
हें ऐकोनि बल्लव आन । म्हणती याचें कर्म गहन । वयें पहातां दिसे लहान । विश्वमोहन विदितात्मा ॥७९॥

वने संचारयन् वत्सान् सरामो बालकैर्वृतः । हंतुकामं बकं दोर्भ्यां मुखतोऽरिमपाटयत् ॥८॥

औट वर्षांचा वनमाळी । बळरामेंशीं वत्सप मेळीं । वत्सें चारितां यमुनाकूळीं । दैत्य निर्दळी बकनामा ॥८०॥
मुखें गिळावा श्रीहरि । कीं मारावा चंचुप्रहारीं । ऐसें विवरूनि अभ्यंतरीं । दुराचारी तो आला ॥८१॥
तेणें कृष्ण गिळितां बळें । कंठीं पोळला प्रळयानळें । उगळूनि टाकिला तये वेळे । क्रोधें खवळे हरिहनना ॥८२॥
सवेग टोंचितां चंचुघातें । कृष्णें चंचु धरूनि हातें । चिरूनि टाकिलें त्या वैरियातें । कर्में अद्भुतें हीं त्याचीं ॥८३॥
ऐसें ज्याचें कर्म प्रबळ । तो हा कैसा बल्लवबाळ । रूपलावण्यशौर्यशीळ । तुळितां अतुळ त्रिजगीं हा ॥८४॥

वत्सेषु वत्सरूपेण प्रविशंतं जिघांसया । हत्वा न्यपातयत्तेन कपित्थानि च लीलया ॥९॥

तंव आणिक म्हणती कृष्णमहिमा । देखोनि नाठवे कां पां तुम्हां । वत्सरूपी वत्सनामा । हननकामा पातला ॥८५॥
वत्सरूपाची घेऊनि खोळ । वत्समेळीं विचरे चपळ । मारावया रामगोपाळ । लक्षी वेळ दुरात्मा ॥८६॥
तें या कृष्णासि कळलें मनीं । सपुच्छ धरूनि मागिलां चरणीं । भंवडूनि टाकितां कपित्थमूर्ध्नीं । पडिला धरणीं सकपित्थ ॥८७॥
मायाकपट उडोनि गेलें । राक्षसीदेह प्रकट पडिलें । अद्भुत कर्म हें पशुपबाळें । जाय केलें केंवि हो ॥८८॥
हें ऐकोनि पशुप एक । म्हणती नव्हे हा बल्लवतोक । अद्भुत कर्में समस्तलोक । जाणती सम्यक् पै याची ॥८९॥

हत्वा रासभदैतेयं तद्बंधूंश्च बलान्वितः । चक्रे तालवनं क्षेमं परिपक्कफलान्वितम् ॥१०॥

धेनुकनामा दितिनंदन । रासभरूपी जो बळवान् । तेणें वसवूनि ताळवन । केलें निर्जनें दुर्गम ॥९०॥
तज्जातीचें रासभाकार । शतसहस्र दैत्य घोर । त्यांच्या भयें भयंकर । जेथ नर सुर न वचती ॥९१॥
बळरामेशीं गोपमेळा । घेऊनि कृष्ण तेथें गेला । पाडूनि सुपक्क तालफळां । विचित्र खेळा खेळती ॥९२॥
ऐकोनि तयाचा सांचल । क्षोभें खवळला रासभमेळ । मारावया रामगोपाळ । परम चपळ धांविला ॥९३॥
धेनुक भवंते घेऊनि फेरे । रामासि डसूं धांवे निकुरें । संमुख येऊनि विमुख फिरे । लत्ताप्रहारें ताडावया ॥९४॥
तंव तो रामें मागिलां चरणीं । धरूनि भवंडूनि टाकिला गगनीं । पडतां तालवनाचे मूर्ध्नीं । पडिले भंगोनि तालतरु ॥९५॥
त्याचे अनेक बंधुवर्ग । गर्दभ क्षोभले पै सवेग । त्यांसि दाविला गगनमार्ग । दोघे अभंगबळशाली ॥९६॥
रासभदैत्य बंधुसहित । मारूनि जाले विजयवंत । तालकानन उपद्रवरहित । केलें सुफळित सुसेव्या ॥९७॥
बेडुकाभेणें पळती मुलें । येसणें अद्भुत इहीं केलें । कैसें अघटित यांचेनि जालें । तुम्हीं देखिलें कीं ना हो ॥९८॥
ऐसें वदती एक आभीर । हें ऐकोनि म्हणती अपर । रामकृष्णांचा प्रताप थोर । नंदकुमार न सजती हे ॥९९॥

N/A

References : N/A
Last Updated : May 02, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP