अध्याय २६ वा - आरंभ
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
श्रीगोविंदसद्गुरुमूर्तये नमः ।
पद्मनाभी पद्मारमणा । पद्मधारका पद्मायतना । पद्मजजनका पद्मलोचना । पद्मवदना गोविंदा ॥१॥
भयभयाचें दुःखावर्त । भोगितां प्राणी त्रासले बहुत । त्या भयाच्या उपशमनार्थ । शरणागत पदपद्मीं ॥२॥
त्यांसि वोपिसी नाभीकार । कृपेनें उचलूनि पद्मकर । म्हणोनि पद्मनाभी हा नामोच्चार । घडे साचार तुजलागीं ॥३॥
स्वजनहृत्पद्मजा प्रीति । अव्यभिचारें अनन्यगति । जाणोनि रमसी तूं एकांतीं । पद्मवतीप्राणेशा ॥४॥
मनःपद्मीं मनसिजवसति । तेणें तरळे तन्मात्रभ्रांति । तें तव चरणीं जे अर्पिती । मग त्यां विश्रांति नैश्चल्यें ॥५॥
प्रणतमानसपद्मचरणीं । धरिसी प्रतापें गोवूनि भजनीं । पद्मधारक यालागुनी । म्हणती मुनि तुजलागीं ॥६॥
सहस्रदलपद्मीं आयतन । तुझें वास्तव वसतिस्थान । पद्मायतन हें अभिधान । तुजलागून स्वतःसिद्ध ॥७॥
त्रिविधतापें भवसंतप्तां । देखोनि स्वपादशरणागतां । पद्मकर तें ठेवूनि माथां । अनुग्रहीता तूं होसी ॥८॥
तवानुग्रहकर पद्मज । पद्मजनक तो तूं सहज । तुजपासूनि नुपजे रज । जो विश्वबीजविधाता ॥९॥
कृपावलोकें नेत्रपद्मा - । पासूनि अक्षय वोपिसी पद्मा । पद्मलोचना पुरुषोत्तमा । कैवल्यधामापर्यंत ॥१०॥
वदनपद्में प्रकटिसी बोध । तेणें निरसे भव विरुद्ध । वास्तव चित्सुख लाभे शुद्ध । तो तूं प्रसिद्ध पद्मवदन ॥११॥
इत्यादिविशेषणीं विशिष्ट । अचिंत्यैश्वर्यगर्विष्ठ । अजाड्य जाड्यातीत स्पष्ट । अलघिष्ठलघिष्ठ शोभविसी ॥१२॥
गोशब्दार्थें बोलिजे केश । तद्गतवेदना सूक्ष्मविशेष । जाणता सर्वज्ञ तूं परेश । त्या तुज अशेष श्रुति गाति ॥१३॥
म्हणोनि अखिलात्मका तुज । नम्य नमितां नमन सहज । अभेदबोधें प्रेमवोज । हें निजगुज श्रुतिगोप्य ॥१४॥
एकात्मकत्वें न फवे गोडी । भजतां भेद उभवी गुढी । यालागिं स्वरूपीं दिधली बुडी । सप्रेमखोडी न मोडतां ॥१५॥
एकात्मत्वें सुवर्ण खरें । वरी राजमुद्रेचीं अक्षरें । मोल न तुटोनि शेषाकारें । जेंवि व्यवहारें अभेदें ॥१६॥
तैसी दशमस्कंधावरी । लक्षूनि शुकाची वैखरी । महाराष्ट्रभाषाव्याख्यान करीं । आज्ञा निर्धारीं हे केली ॥१७॥
प्रभूची आज्ञा अव्याहत । म्हणोनि निरूपिलें चाले कृत्य । श्रोतयांचे मनोरथ । पुरवी समर्थ पूर्णत्वें ॥१८॥
तेथ पंचविसाव्या माझारी । इंद्र वर्षतां धरिला गिरि । निर्भय सप्त अहोरात्री । कृष्णें व्रजपुरी रक्षिली ॥१९॥
तें देखोनि व्रजनिवासी । अद्भुत मानिती निजमानसीं । सव्विसाव्या अध्यायीं त्यांसी । गर्गोक्तीसी नंद कथी ॥२०॥
कृष्णकर्में अत्यद्भुतें । देखोनि गोप विस्मितांतें । नंद गर्गोक्तिसंमतें । भावी वीर्यातें परिसवी ॥२१॥
शुक म्हणे गा कुरुवरभूपा । तुजवरी प्रभूची अनुकंपा । म्हणऊनि हरिगुण समानमधूपा । प्रियतमस्तनपा स्तनसाम्यें ॥२२॥
N/A
References : N/A
Last Updated : May 02, 2017
TOP