श्रीशुक उवाच - एवंविधानि कर्माणि गोपाः कृष्णस्य वीक्ष्य ते ।
अतद्वीर्यविदः प्रोचुः समभ्येत्य सुविस्मिताः ॥१॥

हरिगुणकथामृताची चवी । राया जाणसी तूं एक बरवी । म्हणोनि प्रेमा नित्य नवी । कां जाणती आघवी शिवशिवा ॥२३॥
जाणोनि विश्व आर्तभूत । स्वयेंचि वर्षे तडित्वंत । कीं क्षुधित होतां सुप्तासुप्त । पुन्हा न धरत जननी ये ॥२४॥
तेंवि राजा न करितां प्रश्न । योगींद्र भूतभविष्यज्ञ । अंतर रायाचें जाणोन । करी निरूपण स्वयमेव ॥२५॥
शक्रगर्व हरिल्यावरी । इंद्रें स्तविला असेल हरि । तें निरूपील यावरी । हें अंतरीं नृपाचे ॥२६॥
परी जो प्रांजळ भूतवेत्ता । दैवें नृपासि जोडला वक्ता । तो यथापूर्व वर्तली कथा । तैसी तत्त्वता निरूपी ॥२७॥
ऐकें आर्जुनिनंदना । कृष्णें धरूनि गोवर्धना । व्रज रक्षितां बल्लवगणा । विस्मय मना बहु गमला ॥२८॥
जन्मापासूनि आजिपर्यंत । नित्य नूतन अत्यद्भुत । पाहोनि हरिकर्म समस्त । झाले विस्मित व्रजवासी ॥२९॥
विस्मित व्हावयाचें कारण । कीं ते नेणती हरिमहिमान । अद्भुत कर्में अवघे जन । कथिती येऊन नंदातें ॥३०॥
जीं जीं कर्में कृष्णें केलीं । तीं तीं बल्लवीं नंदा कथिलीं । शुकें रायासि निवेदिलीं । श्रोतीं ऐकिलीं पाहिजती ॥३१॥

बालकस्य यदेतानि कर्मण्यत्यद्भुतानि वै । कथमर्हत्यसौ जन्म ग्राम्येष्वात्मजुगुप्सितम् ॥२॥

अवघे मिळोनि म्हणती नंदा । बाळक मानिसी आनंदकंदा । ज्याचा एवढा अद्भुत धंदा । त्या गोविंदा सुत म्हणसी ॥३२॥
देव मनुष्य आणि पितर । गण गंधर्व ऋषीश्वर । त्यांसि कर्म जें अगोचर । तें तें सत्वर करीतसे ॥३३॥
ऐसें असोनि गोपांसदनीं । याचें जन्म काय म्हणोनी । क्षुद्र मानवी कुत्सित योनि । यालागूनी अयोग्य हें ॥३४॥
कृष्ण ईश्वराचा ईश्वर । प्रतापें तुळितां परमेश्वर । न कळे कोण्हा हा विचार । मोहें किशोर या मानूं ॥३५॥
नंदा कर्में याचीं परिस । जन्मापासून दिवसेंदिवस । याचें अद्भुत ऊर्जित यश । परी कोणास न चोजवे ॥३६॥

यः सप्तहायनो बालः करेणैकेन लीलया । कथं बिभ्रद्गिरिवरं पुष्करं गजराडिव ॥३॥

नंदा आजूनि तुज कां नुमज । सप्त वर्षांचा तवात्मज । परी हा अद्भुतप्रतापपुंज । शैशवओज प्रकटीतसे ॥३७॥
रातोत्पलदलकरपदतळ । नीलोत्पलदलनयनयुगळ । सहस्रपत्र तें वक्त्रकमळ । जावळ अळिउळभाभंजी ॥३८॥
वज्रभासुरदशनपंक्ति । अधर विद्रुमा लाजविती । इंद्रनीळाची लोपे दीप्ति । अंगकांति पडिपाडें ॥३९॥
बाल्यें मृदुल कल भाषणें । सुधारसासि आणी उणें । स्निग्ध सविलास वीक्षणें । तनुमनप्राणें जन मोही ॥४०॥
पदविन्यासें हंसगति । धार्ष्ट्यें जैसा पैं मृगपति । सांग अनंत अनंगमूर्ति । लोपोनि जाती लावण्यें ॥४१॥
क्रीडा पाहतां जननयनासी । आठवूं नेदी दिवसनिशी । ऐसा अनंतगुणैकराशि । बल्लवासी सुत न सजे ॥४२॥
सप्तवर्षांचा हा कुमर । परमसकुमार सुंदर । लीलें करूनि धरीं गिरिवर । दुसरा कर न लवितां ॥४३॥
सुरगज पंकज शुंडादंडें । जळीं क्रीडतां उचली कोडें । गोवर्धनही तेणें पाडें । धरी कैवाडें तव कलभ ॥४४॥
एवढें कैसें अद्भुत कर्म । पहा विवरूनि याचें वर्म । बल्लवबाळकासि हा सम । करितां परम स्मय वाटे ॥४५॥
ऐसींच अवघीं अद्भुत कर्में । बल्लवीं वर्णिलीं विस्मयागमें । बारा श्लोकीं मुनिसत्तमें । नृपा सप्रेमें निवेदिलीं ॥४६॥
बालकें गिरिवर सप्तरात्री । कैसा धरिला एके करीं । हें आश्चर्य चमत्कारीं । गोप निर्धारीं चोजविती ॥४७॥
हें ऐकोनि बल्लव कोण्ही । म्हणती कृष्णें जन्मतेक्षणीं । जे कां केली अद्भुत करणी । पाहोनि नयनीं कां विसरां ॥४८॥

तोकेनामीलिताक्षेण पूतनाया महौजसः । पीतः स्तनः सह प्राणैः कालेनेव वयस्तनोः ॥४॥

पुरते नुघडिले असतां डोळे । जातमात्रें या तव बाळें । पूतनेचीं स्तनमंडळें । सहगरळें शोखिलीं ॥४९॥
दीडयोजन विक्राळ काया । भीं बलाढ्य राक्षसी माया । नटोनि लावण्यरूपी जाया । आली वधावया बाळांतें ॥५०॥
यशोदाप्रमुख व्रजगौळिणीं । भुलल्या मायामोहें करूनी । पूतना बाळा लावी स्तनीं । जैशी जननी सत्कुलीं ॥५१॥
कृष्णें उघडिले नसतां नयन । प्राणें सहित प्याला स्तन । आयुष्येंशीं तनुतारुण्य । काल प्राशन जेंवि करी ॥५२॥
जीच्या प्रेतकलेवरपातें । दीडयोजन झालीं प्रेतें । स्थावरजंगमें भौतिकें भूतें । अक्षत तेथें निर्भय हा ॥५३॥
कैसें अद्भुत या लेंकुरा । योग्य कर्म ऐसें विवरा । एका वांचूनिं ईश्वरा । हें सुरनरां अघटित ॥५४॥
हें ऐकोनि अन्य गौळी । म्हणती आमुचे गोपकुळीं । भाविभूतादित्रिकाळीं । विक्रमशाली हा एक ॥५५॥

हिन्वतोऽधः शयानस्य मास्यस्य चरणावुदक् । अनोऽ‍पतद्विपर्यस्तं रुदतः प्रपदाहतम् ॥५॥

पुरते न भरतां तीन मास । परिवर्तनोत्सवीं यास । शकटतलीं सावकाश । करवी शयनास यशोदा ॥५६॥
आपण गुंतली उत्साहकार्या । स्वागतार्चनीं पुरंध्री आर्या । करितां शिष्टांची परिचर्या । क्षुधिता तनया विसरली ॥५७॥
कृष्णें क्षुधार्त करितां रुदन । शिशुस्वभावें पदचालन । प्रपदस्पर्शें शकट भग्न । पडला उलथून खंडशः ॥५८॥
तया शकटाचा पतनध्वनि । समस्त पातलों ऐकोनी । लेंकुरीं कथिली याची करणी । परी सत्य निजमनीं तें न मनूं ॥५९॥
कैसें अद्भुत हें याजोगें । अवघे सावध विवरा वेगें । तीं महिन्यांचा तैं हा आंगें । शकट भंगे या कैसा ॥६०॥
हें ऐकोनि गोप अपर । म्हणती ऐका आश्चर्य थोर । नंद मानी या निजकुमर । परी हा निर्जरवरवरद ॥६१॥

N/A

References : N/A
Last Updated : May 02, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP