अध्याय ७ वा - श्लोक १४ ते २०
श्रीकृष्णदयार्णवकृत हरिवरदा
इति बालकमादाय सामर्ग्यजुरुपाकृतैः । जलैः पवित्रौषधिमिरभिषिच्य द्विजोत्तमैः ॥१४॥
नंदासि म्हणे यशोदा सती । ब्राह्मणांसि करूनि विनति । अभिषेक कीजे बाळकाप्रति । विघ्नशांतीकारणें ॥३६॥
नंदें ऐकतां हें वचन । विनीत विनविले तपोधन । आणोनि यमुनेचें पवित्र जीवन । अभिषेचन मांडिलें ॥३७॥
बाळक घेऊनियां निकट । तिहीं वेदींए मंत्रपाठ । अभिमंत्रिले तोयघट । द्रव्यें वरिष्ठ मिळविलीं ॥३८॥
ग्रहशांत्यर्थ अभिषेचनीं । बोलिल्या ग्रहमखीं दैवज्ञीं । द्रव्यें ओषधि त्या आणोनि । पवित्र जीवनीं मिळविल्या ॥३९॥
मग घालूनिया रंगवल्ली । नंद यशोदा बैसविलीं । बाळ यशोदा घेई जवळी । भोंवतीं मंडळी द्विजांची ॥२४०॥
तिहीं वेदींच्या ब्राह्मणीं । स्वशाखोक्त सूक्तपठणीं । ओषधिमिश्रित जीवनीं । करीं घेऊनि कुशमुष्टि ॥४१॥
यथाविधि अभिषेचन । केलें शांतिरस्तु म्हणोन । आणि सर्वारिष्टशमन । अभीष्टकल्याणपूर्वक ॥४२॥
वाचयित्वा स्वस्त्ययनं नंदगोपः समाहितः । हुत्वा चाग्निं द्विजातिभ्यः प्रादादन्नं महागुणम् ॥१५॥
सबाह्य नियतेंद्रिय होऊन । नंद करवी पुण्याहवाचन । विप्रद्वारा करविलें हवन । शांति कल्याण इच्छूनि ॥४३॥
केवधें नंदाचें राया पुण्य । सकाम निष्काम कर्म जाण । सहजें होय कृष्णार्पण । ब्रह्म परिपूर्ण खेळणें ॥४४॥
पुत्रमोहें झळंबला । किंवा पुत्रलोभें कवळिला । पुत्रार्थ जें जें आचरला । पौष्टिकादि सकाम ॥४५॥
तेंचि निष्काम भजन झालें । कर्म ब्रह्मीं समर्पिलें । विषचि अमृतफळीं फळलें । मायाजाळ दुर्घट ॥४६॥
भवद्रुमासि कैवल्यफळें । कीं त्रिताप शमले रोहिणीजळें । प्रपंचीं परमार्थ सोहळे । भोगिती डोळे नंदाचे ॥४७॥
अभ्युदयार्थ केलें हवन । मग ते समस्त तपोधन । नंदें पूजिले संपूर्ण । सांगोपांग उपचारीं ॥४८॥
उत्तमगुणी उत्तमान्नें । नंदें ब्राह्मणांकारणें । श्रद्धायुक्त अंतःकरणें । कृष्णार्पण अर्पिलीं ॥४९॥
यथा सावकास बैसोन । भोजन करिती ते ब्राह्मण । त्या स्वादाचें स्वादिष्टपण । श्रीभगवान जाणतसे ॥२५०॥
ऐशीं सारूनि भोजनें । गंधाक्षता दिव्य सुमनें । पुष्पमाळा अलंकरणें । वस्त्राभरणें अर्पिलीं ॥५१॥
सुगंधचूर्ण सुपरिमळ । नागवल्ली पूगीफळ । चूर्णखादिरादि द्रव्यें सकळ । दिव्य तांबूल अर्पिले ॥५२॥
गावः सर्वगुणोपेता वासःस्रग्रुक्ममालिनीः । आत्मजाभ्युदयार्थाय प्रादात्ते चान्वयुंजत ॥१६॥
कृष्ण गोकुळा आलिया । धेनु कामधेनु झालिया । त्यांतहि निवडूनि आणिल्या । अर्पावया ब्राह्मणां ॥५३॥
तरुणा सगुणा पयस्विनी । सुंदरा सुशीला शुभलक्षणी । सालंकृता सर्वाभरणीं । रुक्ममालिनी सक्षौमा ॥५४॥
सुपूजित जे सुब्राह्मण । सुष्टुवचनीं सुमुखीकरण । सुपूजितासुदुघादान । सुपुत्रकल्याण उदयार्थ ॥२५५॥
आत्मजाभ्युदयार्थ नंद । धेनुदानें विप्रवृंद । गौरविले ते आशीर्वाद । देती विशद विदोक्त ॥५६॥
आस्तिक्यसद्भाव नंदास । तपोधनांचे दिव्य आशिष । निष्फळ नव्हती हा विश्वास । जो दे संतोष सद्भजनीं ॥५७॥
विप्रा मंत्रविदो युक्तास्तैर्याः प्रोक्तास्तथाऽऽशिषः । ता निष्फला भविष्यन्ति न कदाचिदपि स्फुटम् ॥१७॥
जे ब्रह्मनिक्षेप वेदनिधि । जे स्फुरद्रूपमंत्रसिद्धि । क्रिया सालंकृतनिधि । ज्यां समाधि स्वानुभवीं ॥५८॥
कर्म ब्रह्मार्पणस्थिति । ब्रह्मावबोधें जे वर्तती । त्यांचे आशिष वृथा होती । हें कल्पांतीं घडेना ॥५९॥
तयांसि केलिया संतोष । तेव्हांचि पावले आशिष । तथापि दिधले हा विशेष । मंत्रघोषपूर्वक ॥२६०॥
मनें तुष्टले मंत्र पठले । दोहीं परीं अभीष्ट भले । त्यांचे मंत्रार्थ सफळ झाले । हें बोलिलें स्फुट वेदीं ॥६१॥
नंदें द्विजांचें आशीर्वचन । घेऊनि मानिलें समाधान । एथूनि सर्वविघ्नोपशमन । स्वस्ति कल्याण सर्वदा ॥६२॥
एथूनि संपलें शकटाख्यान । सद्भावें जे करिती श्रवण । त्यांच्या विघ्नांचें उपशमन । इष्टकल्याण हरिवरें ॥६३॥
गोविंदसद्गुरुपादाब्जभ्रमर । श्रीकृष्णदयार्णवानुचर । शकटाख्यान मनोहर । बालचरित्र निवेदी ॥६४॥
आतां एथूनि तृणावर्त । परमकर्कश कंसभृत्य । त्याचें कथिजेल सर्व कृत्य । श्रोतीं स्वास्थ्य करावें ॥२६५॥
करूनि शकटाचें भंजन । तृणावर्ता अधःपतन । स्वलीला करी श्रीभगवान । तो वंदून तें ऐका ॥६६॥
एकदाऽऽरोहमारूढं लालयंती सुतं सती । गरिमाणं शिशोर्वोढुं न सेहे गिरिकूटवत् ॥१८॥
शकटभंग केलियावरी । कोणे एके काळांतरीं । आली मंदिराबाहेरी । यशोदा सुंदरी प्रभाते ॥६७॥
किंकरीं झाडिलें गोठण । बालसूर्याचे मंद किरण । यशोदा बैसली घ्यावया उष्ण । घेऊनि कृष्ण उत्संगीं ॥६८॥
बाळकाचें पाहे मुख । केवळ चित्सुखाचें निजसुख । कैवल्यप्राप्तीचा जो हरिख । त्याहुनि संतोष पावली ॥६९॥
हनुवटी धरूनि पाहे वदन । क्षणक्षणां गुल्लस्पर्शन । सप्रेम उचलोनि दे चुंबन । कलभाषणीं रंजविते ॥२७०॥
कज्जलें माखले नेत्र पुशी । कुंतल कुंची टोपी सरसी । करूनि आलिंगी हृदयेंशीं । चुंबी वदनासी क्षणक्षणा ॥७१॥
सुंदर बाळाचें नेंगुलें । मन्मथकोटीहूनि चांगलें । यशोदा करतळें चुंबिलें । लोण केलें दृश्याचें ॥७२॥
नाभिहृदया गुदकुल्या करी । लावण्य पाहे डोळेभरी । आपणा ऐशी चराचरीं । धन्य दुसरी न देखे ॥७३॥
ऐसें अनेकपरीं लालन । करी यशोदा आपण । क्षणक्षणां उतरी लोण । दुसरें ध्यान ते नेणें ॥७४॥
नवपंकजामोदीं भ्रमर । कृपण रविणाप्रति तत्पर । चकोर पाहे रजनिकर । तैशी सादर यशोदा ॥२७५॥
ऐशी यशोदा वेधली बाळा । विसरली लटिक्या प्रपंचखेळा । तंव हरीची अगाध लीला । नेणे वेल्हाळा सावडी ॥७६॥
तो सर्वज्ञचूडामणि । जरी लाप्ता बाळपणीं । तरी तृणावर्ताची दुष्ट करणी । अंतःकरणीं ओळखिली ॥७७॥
चक्रवात दुष्टाचरण । करूनि माझें करील हरण । तेणें यशोदा पावेल मरण । अंतःकरण कळवळिलें ॥७८॥
मग झाला गुरुतर । जैसें गिरीचें लघु शिखर । किंवा केवळ वज्रसार । न घेवे भार यशोदे ॥७९॥
भूमौ निधाय तं गोपी विस्मिता भारपीडिता । महापुरुषमादध्यौ जगतामास कर्मसु ॥१९॥
बाळक अकस्मात गुरुतर । देखोनि भयभीत अंतर । विस्मयें दाटली सुंदर । भूमि भूधर ठेविला ॥२८०॥
हरीचें न जाणे विंदान । जें तृणावर्तापासोनि स्वमरण । चुकवावया भूभारहरण । गुरुतर पूर्ण जाहला ॥८१॥
न सांगतांचि यशोदा स्वयें । भूमीवरी ठेविती होय । ऐसा लक्षूनि उपाय । गुरुत्व काय आणिलें ॥८२॥
हा न जाणोनि वृत्तांत । उत्पातभयें शंकाभूत । महापुरुष हृदयीं ध्यात । विघ्नशमनार्थ आदरें ॥८३॥
जगत्त्रय या बाळकाउदरीं । तेणें भारें दाटली भारी । हें नेणोनिया घाबरी । ध्याय अंतरीं पुरुषोत्तमा ॥८४॥
अथवा जगत्कर्माच्या ठायीं । जगामधीं राहिली पाहीं । परी जगज्जठर हा शेषशायी । जाणती नाहीं ते झाली ॥२८५॥
दैत्यो नाम्ना तृणावर्तः कंसभृत्यः प्रचोदितः । चक्रवातस्वरूपेण जहारासीनमर्भकम् ॥२०॥
पूतनेचा व्रजीं घात । चारद्वारें कंसा श्रुत । तेणें प्रेरिला तृणावर्त । करावया अंत बाळाचा ॥८६॥
तो चक्रवातनामा दैत्य । आज्ञाधारक कंसभृत्य । करूं आला आज्ञाकृत्य । नेणे मृत्यु आपुला ॥८७॥
मग चक्रवात म्हणजे वाहाटुळी । तेणें रूपें तो गोकुळीं । रिघोनि उडविला वनमाळी । भूमंडळीं बैसवितां ॥८८॥
बैसलिया बाळकातें हरिलें । तरी कां कोणी न देखिलें । तें दैत्यकृत्य बोलिलें । श्लोकीं पुढिले परिसावें ॥८९॥
N/A
References : N/A
Last Updated : April 27, 2017
TOP