औत्थानिकौत्सुक्यमना मनस्विनी समागतान् पूजयती व्रजौकसः ।
नैवाशृणोद्वै रुदितं सुतस्य सा रुदंस्तनार्थी चरणावुदक्षिपत् ॥६॥

सदना आणिला सुहृद्वर्ग । त्यांचें पूजन यथासांग । करितां गुंतला मनोवेग । नेणे श्रीरंग स्तनार्थी ॥१४॥
सुहृदयाचकां यथोक्त मानें । दिधलीं उपचारभोजनें । उपायनें वस्त्राभरणें । यथाविधीनें अर्पिलीं ॥१५॥
तेणें लागला वाढवेळ । क्षुधार्थी जागृत झाला बाळ । रुदना न ऐकती गोपाळ । आणि वेल्हाळ यशोदा ॥१६॥
तंव अकस्मात महा असुर । शकटीं प्रवेशोनि सत्वर । बाळका करूं पाहे चूर । तें श्रीधर देखतसे ॥१७॥
कोणी ना ऐकतां रुदन । बाळभावें श्रीभगवान । ऊर्ध्व झाडी हस्तचरण । टाहो फोडून रुदतसे ॥१८॥

अथःशयानस्य शिशोरनोऽल्पकप्रवालमृद्वंघ्रिहतं व्यवर्तत ।
विध्वस्तनानारसकुप्यभाजनं व्यत्यस्तचक्राक्षविभिन्नकूबरम् ॥७॥

शकटातळीं श्रीभगवान । बालवेषें करी शयन । रातोत्पलदलकोमलचरण । उत्क्षेपण जं करी ॥१९॥
लघु सुनीळ सकोमळ । अंगुली जैशा इंद्रनीळ । ज्यांच्या ध्यानें मनोमळ । ध्यानशीळ क्षालिती ॥१२०॥
बालस्वभावें पादचालन । करितां शकटा स्पर्शला चरण । तेणें मोडलें शकटपण । अवयव भिन्न विखुरले ॥२१॥
जळोनि गेलें असुरवारें । गात्रें पडलीं काष्ठाकारें । गडबडलीं नाना गोरसपात्रें । जीं पवित्रें धातुमयें ॥२२॥
हेम रजत वर्जूनि दोन्हीं । अनेक धातूंचीं दुधाणीं । यावेगळे रस भाजनीं । जे गौळणीं संग्रहिले ॥२३॥
तया रसकूपिकांचा सांठा । भंगोनि गेला बारा वाटा । मोडोनि पडिला शकटसांठा । झाला काष्ठां चकचूर ॥२४॥
आंख मोडूनि दुखंड । चक्रें झालीं खंडखंड । कूबर म्हणजे धुरेचें तोंड । अतिप्रचंड भंगलें ॥१२५॥

दृष्ट्वा यशोदाप्रमुखा व्रजस्त्रिय औत्थानिके कर्मनि याः समागताः ।
नंदादयश्चाद्भुतदर्शनाक्लाः कथं स्वयं वै शकटं विपर्यगात् ॥८॥

ऐसें देखोनि परमाद्भुत । मंडपीं मिळाल्या गौळणीसहित । यशोदा धांवूनि आली त्वरित । विस्मयें भयभीत दाटली ॥२६॥
परिवर्तनोत्सवासाठीं । मिळाली जे लोकदाटी । नंदप्रमुख पाहोनि दृष्टीं । झाली पोटीं विस्मित ॥२७॥
अद्भुत देखोनि अवघीं भ्यालीं । विचित्र गति हे कैशी झाली । शकट भंगोनि काष्ठें पडिलीं । होतीं खिळिलीं लोहबंधीं ॥२८॥
उथलूनि पडिला कैसा शकट । पात्रें लागलीं बारा वाट । आपेंआप हें अरिष्ट । कैसें दुर्घट वर्तलें ॥२९॥

ऊचुरव्यवसितमतीन् गोपान् गोपीश्च बालकाः । रुदताऽनेन पादेन क्षिप्तमेतन्न संशयः ॥९॥

लहानें बाळकें होतीं निकटीं । जिहीं देखिलें आपुले दृष्टीं । तीं सांगती वर्तली गोठी । ते यथार्थ पोटीं न मानिती ॥१३०॥
बाळें सांगती समस्तांसी । कृष्णें रुदतां निजचरणासी । झाडितां लागला शकटासी । तेणें भंगासी पावला ॥३१॥
बाळकाचे चरणघातें । शकट उलथला हें निरुतें । यदर्थीं न धरा संशयातें । म्हणोनि वार्ते सांगती ॥३२॥
परी ते गोपाळ गोपिका सकळ । अव्यवसितमति केवळ । असंभावनासंशयाकुळ । सत्य चावळ न मानिती ॥३३॥

न ते श्रद्धधिरे गोपा बालभाषितमित्युत । अप्रमेयं बलं तस्य बालकस्य न ते विदुः ॥१०॥

म्हणती बाळें हीं नेणतीं । नेणोनि स्वच्छंदें बोलती । विचारें पाहतां न मिळे युक्ति । सत्य प्रतीति आणितां ॥३४॥
केवळ सुकुमार कोमळ बाळ । रातोत्पल तैसें पदतळ । परम सूक्ष्म चतुरंगुळ । रक्तगोळ ज्यापरी ॥१३५॥
करपद चाळिती बाळक । स्वभाव हा नैसर्गिक । शकटभंगाचें कौतुक । कथिती बाळक अघटित ॥३६॥
पुष्पप्रहारें वज्र फुटे । कां मुंगी प्राशितां सिंधु आटे । तेवीं बाळें चाळितां चरण शकटें । भंगणें वाटे शिशुवाक्यें ॥३७॥
ऐशिये असंभावनेंकरून । सत्य न मानिती बालभाषण । परी नेणती ते श्रीभगवान । बाळकपण नटला हें ॥३८॥
अनंतब्रह्मांडांचिया कोटी । ज्याचिये रोमगर्तेपोटीं । तेणें बालाकृति धाकुटी । धरूनि सृष्टीं अवतरला ॥३९॥
तयाचें अप्रमेय बळ । नेणोनि मानिती केवळ बाळ । यशोदा पुत्रमोहें व्याकुळ । उचलोनि गोपाळ घेतला ॥१४०॥

N/A

References : N/A
Last Updated : April 27, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP