अध्याय ७ वा - श्लोक २ ते ५
श्लोक २ ते ५
यच्छृण्वतोऽपैत्यरतिर्वितृष्णा सत्त्वं च शुद्ध्यत्यचिरेण पुंसः ।
भक्तिर्हरौ तत्पुरुषे च सख्यं तदेव हारं वद मन्यसे चेत् ॥२॥
भगवद्गुणांचा श्रवणमहिमा । वर्णनीं समर्थ नोहे ब्रह्मा । तो त्वां केला जोगा आम्हां । मुनिसत्तमा कारुण्यें ॥६९॥
ज्या हरिगुणश्रवणाप्रति । कृतसुकृत सादर होती । त्यांसी सप्रेम उपजे रति । जाय आर्ति मनाची ॥७०॥
आर्ति म्हणजे मनोम्लानि । अनेक तृष्णा विषयध्यानीं । तळमळी कवळिला म्हणोनि । रति श्रवणीं न संभवे ॥७१॥
कोटिजन्माचें सुकृतलेखन । भाग्य होय जैं फलोन्मुख । तैं तुजसारिखा वक्ता सुमुख । हरिगुणपीयूष हें पाजी ॥७२॥
तरीच होय श्रवणीं रति । अभाग्या ओपितां नुपजे प्रीति । भिडेनें बैसल्या श्रवणाप्रति । चटपट चित्तीं चांचल्य ॥७३॥
पाहे वरती करूनि मान । केव्हां सरेल हातींचें पान । अथवा निद्रा डोलवी मान । देखे स्वप्न आणखीही ॥७४॥
म्हणे मी एथ बैसलों असतां । स्वप्न देखिलें श्रवण करितां । धन सांपडलें जातां जातां । सुंदर कांता वश झाली ॥७५॥
अथवा पाठी लागले चोर । रानीं भेटले सर्प व्याघ्र । ऐसे अनेक मनोव्यापार । देखे श्रवणपरी निदसुरा ॥७६॥
ऐसाही धरी सत्संगति । बळेंचि श्रवणीं नेहटी वृत्ति । हरिगुणाची सामर्थ्यशक्ति । तेणें अरति हारपे ॥७७॥
शुष्क काष्ठांचा निचय जळे । सन्निध ओला वृक्ष न जळे । तथापि आहाळोनि जाती मूळें । वठोनि वाळे शनैः शनैः ॥७८॥
अनेकजन्मार्जितकर्म - । संस्कारमूळ वासनाद्रुम । वाळे घडतां सत्संगम । तैं उपजे प्रेम हरिगुणीं ॥७९॥
तृष्णा समग्र क्षीण होती । ऐशी दृढ बाणे जे विरक्ति । स्वयंभ उपजे श्रवणीं रति । मन विश्रांति मग भोगी ॥८०॥
तुटती अध्यस्त मनोमळ । होय सत्त्वशुद्धि निर्मळ । सत्संगति सप्रेमळ । एवढें फळ गुणश्रवणीं ॥८१॥
हरिप्रेमळ करिती दया । तृष्णा आरति पावे विलया । शुद्धसत्त्व करी उदया । जे परिसिलिया हरिगुण ॥८२॥
तया श्रवणीं अधिकार माझा । जरी देखशी योगिराजा । भवसागरीं आधार तुझा । तारक दुजा मी तेणें ॥८३॥
जे म्यां सेवेसि केली विनति । मान्य होईल तुझ्या चित्तीं । तरी मज कृपेनें कृपामूर्ति । तेचि हरिकीर्ति परिसवीं ॥८४॥
अथान्यदपि कृष्णस्य तोकाचरितमद्भुतम् । मानुषं लोकमासाद्य तज्जातिमनुरुंधतः ॥३॥
करूनि पूतनाशोषण । काय करिता झाला कृष्ण । यानंतर तें निरूपण । कृपा करून सांगावें ॥८५॥
श्रीकृष्णाचें बालचरित । जें परिसतां अत्यद्भुत । श्रवणीं रसाळ परमामृत । फिकें होत ज्या रसें ॥८६॥
घेऊनिया मनुष्यनट । मनुष्यलोकीं केलें नाट्य । त्यांतही अमानुष अचाट । जें दुर्घट सुरनरां ॥८७॥
मनुष्यजातीची संपादणी । माजीं अमानुप चरित्रकरणीं । जें जें करी चक्रपाणि । माझे कर्णी ते घालीं ॥८८॥
ऐशी रायाची श्रवणीं आर्ति । देखोनि सप्रेम श्रीशुक चित्तीं । परमानंदें रायाप्रति । श्रीकृष्णकीर्ति निरूपी ॥८९॥
श्रीशुक उवाच - कदाचिदौत्थानिककौतुकाप्लवे जन्मर्क्षयोगे समवेतयोषिताम् ।
वादित्रगीतद्विजमंत्रवाचकैश्चकार । सूनोरभिषेचनं सती ॥४॥
भविष्योत्तरींचा ऐसा पाटः । पूतनेचा भरिला घोंट । मग पातला महाबळभट्ट । ज्यासी पाट अर्पिले ॥९०॥
देशभाषा कवीची वाणी । आश्रय भविष्योत्तरपुराणीं । जन्माष्टमीव्रतकहाणी । मृत्तिकापूजनीं प्रवृत्ति ॥९१॥
विष्णुपुराण कां हरिवंश । एथ न वदती पाराशर व्यास । भागवतींही शुक डोळस । हा इतिहास न वर्णी ॥९२॥
भविष्योत्तरीं शकटासुर - । मर्दनकथा सविस्तर । ब्रह्मांडपुराणीं नामोच्चार । शकटासुरभंजन हा ॥९३॥
( सप्तमाध्यायी प्रथम मव्यान । शकट मात्र केला भग्न । शकटासुराचें मर्दन । शुक भवान न वर्णी ॥९३॥ )
शुक म्हणे गा उत्तरात्मजा । श्रवणभक्तीची कीर्तिध्वजा । उभवूनि भजलासि अधोक्षजा । गौण सायुज्या करूनि ॥९४॥
तुवां सप्रेम केला प्रश्न । तेणें संतोषनिर्भर मन । आतां ऐके निरूपण । सर्वांग श्रवण करूनि ॥९५॥
कोणे एके उत्तमदिवशीं । परिवर्तन श्रीकृष्णासि । करितां देखोनि यशोदेसी । निजमानसीं उत्साह ॥९६॥
जन्मनक्षत्राचा योग । पाहोनि दिनशुद्धि पंचांग । मांडिला उत्साहप्रसंग । कृष्णें आंग फिरवितां ॥९७॥
बल्लवी सपुत्रा सौभाग्यवती । बाला मुग्धा प्रौढा युवती । सुहृद मित्र आप्त ज्ञाति । सदनाप्रति आणिले ॥९८॥
ब्राह्मण वेदपारंगत । तपोधन ऋषि समर्थ । निगमावतार मूर्तिमंत । जे सिद्धांततत्त्वज्ञ ॥९९॥
मंत्रतंत्रविशारद । दैववेत्ते ज्योतिर्विद । कर्मब्रह्मबोधविशद । विदुपवृंद आणिले ॥१००॥
सूत मागध बंदिजन । वाद्यगीतनृत्यप्रवीण । आणि पुरंध्री वृद्धा निपुण । मंगलाचरण उपदेष्ट्या ॥१॥
आदरें आणूनि सदनाप्रति । आनंदें निर्भर यशोदा सती । सालंकृत स्वसंपत्ति । केली आयती यथोक्त ॥२॥
रंगवल्ली गृहांगणीं । नभ शोभलें दिव्य वितानीं । भित्तिप्रदेश विचित्र करणीं । शिल्पलेखनीं झळकती ॥३॥
तळीं घालूनि क्षीरोदक । मुक्ताफळीं भरोनि चौक । वरी बैसवूनि बाळक । मंत्रघोष द्विज करिती ॥४॥
अक्षवाणें करिती नारी । मंगलतुरांच्या वाद्यगजरीं । कृष्ण न्हाणिला यथोपचारीं । सर्व पुरंध्री मिळोनि ॥१०५॥
यशोदा सारूनि मंगलस्नान । मंत्रघोषें स्वस्तिवाचन । मग पूजिले ते ब्राह्मण । दानसन्मानदिव्यान्नीं ॥६॥
नंदस्य पत्नी कृतमज्जनादिकं विप्रैः कृतस्तस्त्ययनं सुपूजितैः ।
अन्नाद्यवासःस्रगभीष्टधेनुभिः संजातनिद्राक्षमशीशयच्छनैः ॥५॥
व्रजपतीची वरांगना । कृष्णें सहित कृतमज्जना । लेवूनिया वस्त्राभरणां । साध्वी शोभना यशोदा ॥७॥
दिव्याभरणें दिव्य वसनें । गंधाक्षता माला सुमनें । अन्नें दक्षिणाधेनुदानें । विप्रपूजनें सारिलीं ॥८॥
ऐसे सुपूजित संतुष्ट विप्र । आशीर्वाद स्वस्त्युच्चार । संभ्रमें तद्गृहिणी सादर । हर्षनिर्भर यशोदा ॥९॥
ते संभ्रमीं विलंब फार । बाळकासी प्रजागर । निद्राभरें दाटले नेत्र । पाहिलें वक्त्र मातेनें ॥११०॥
जें काम शकटस्थापनागार । उच्च विस्तीर्ण विशाळ द्वार । गोरसेंसहित रस अपार । संग्रह फार जे ठायीं ॥११॥
तेथ यशोदा उताविळी । माजघरीं शकटातळीं । हळूच पहुडवी वनमाळी । निद्राकाळीं पर्यंकीं ॥१२॥
बाळ निजवूनि ऐशिये परीं । यशोदा पातली बाहेरी । विगुंतली संभ्रमगजरीं । गौरवोपचारीं सुहृदांचे ॥१३॥
N/A
References : N/A
Last Updated : April 27, 2017
TOP