श्रीगुरुबोध ग्रंथ - प्रथम प्रकरण

श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज.


॥ श्रीगणेशायनमः ॥ श्रीगुरुभ्योनमः ॥
नमूनि वैष्णव सद्गुरु । कृष्णजगन्नाथ हृदयीं धरूं । तेणें हा भवसावरु । तेणें हा भवसागरु । थेंबुटा होय ॥१॥
ज्यांच्या पूर्ण कृपेचा प्रसाद । बोलतां नये तो अगाध । जेथें मायेचा बाध । लागों शकेना ॥२॥
जेथें श्रुति नेति वदती । तो म्यां पामरें वर्णावा किती । परंतु बोलतों यथामतीं । आज्ञाबळें करूनि ॥३॥
सहज स्वरूपीं असतां स्फूर्ति झाली अवचितां । तीच आज्ञा मानूनि तत्वतां । प्रारंभ आतां करितसें ॥४॥
श्री समर्थांचा अवतार । दुसरा कृष्णदास नामें निर्धार । ज्यांच्या कृपेनें भवपार । पावले प्राणी ॥५॥
नामाभिधानें डोंगरी । प्रत्यक्ष केली अयोध्यापुरी । अनुभव निरभिमानी नरीं । घेइजे स्वयें ॥६॥
ऐसा जयांचा प्रताप । जळोनि जाती त्रिविधताप । अखंड सुख आपेंआप । वाढों लागे ॥७॥
पिंडब्रह्मांडातें ग्रासी । ऐसा अनुभवसूर्य उदयासी । येतां, अज्ञानतिमिरासी । ठाव कैंचा ॥८॥
या अनुभवीं जे विराले । तेचि एक मुक्त झाले । येर अवघे ठकोनि गेले । विषयसुखा भुलोनी ॥९॥
ऐसें ज्ञान जिहीं दिधलें । जन्मांपासोनि मुक्त केलें । अभ्यासितां मीपण गेलें । समूळ विरोनी ॥१०॥
यासि मीं आतां काय द्यावें । उपकार कैसे फेडावे । हा देह जीवेंभावें । ओंवाळीन पायीं ॥११॥
जो जो पदार्थ भेटे । तो तो सद्गुरूपचि वाटे । अविद्यारचित काटे । बुजोनि जाती ॥१२॥
देहास विश्वीं पाहतां । सद्गुरूवांचोनि न दिसे तत्वतां । यास्तव त्यांसि कोणता । पदार्थ अर्पावा ॥१३॥
आतां आह्मी एकचि करूं । त्यांचे चरण हृदयीं धरूं । तेणें हा संसार तरूं । निमिषमात्रें ॥१४॥
इति श्रीगुरुबोध ग्रंथ । श्रवणें लाभे मोक्षपंथ । मननाभ्यासें श्रीभगवंत । हृदयीं भेटे ॥१५॥
इति श्रीगुरुबोधे प्रथम प्रकरणं संपूर्णम् ॥१॥

N/A

References : N/A
Last Updated : January 17, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP