दत्ताचा कटिबंध २

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


दत्तात्रय जन्मकथा हे ऐकावी चिन्मयखाणी ॥धृ॥ कृतायुगाचें ठाइं ब्रह्माविष्णूमहेश्वर यांच्या पत्न्या नानापरिचे अलंकार वस्त्रें लेवुनिया एके ठाई बसल्या असतां अकस्मात मुनि नारद तेथें येते जाले भाग्य उदेलें ऐसें त्या पत्न्यांनीं बोलुनि बहुत मानसन्मान करुनिया नारदमुनिचें पूजन केलें साभिमान होउनिया त्यातें पुसत्या जाल्या अहो मुनेश्वर त्रैलोक्याचें ठाईं तुमचें फिरणें परंतु अम्हा ऐसी पतिव्रता आणि सत्वशील कोणीहि दृष्टीलागि देखिली असल तरी आह्मासि वदावेम ऐसे ऐकूनि नारदमुनिनें हास्य करूनि मग बोलतसे निर्भिडपणानें काय तुह्मी मनि गर्व धरुनिया व्यर्थ भूलला तुह्माहूनिया श्रेष्ठ आगळ्या पतिव्रता म्यां बहुत देखिल्या परंतु त्यांतिल एक सांगतो अत्रिमुनिची पत्नी जे का अनुसूया मृगनयन शुभाननि पतव्रतेची आदि स्वामिनि हंसगामिनी कीर्ति दिनमणि तिन्ही त्रिभुवनी प्रकाश अगणित विकाशलासे जया सतीचा ऐसें असतां तुह्मासि नकळे काय भूलला तुह्मा ऐशा दासी तीच्या घरीं शोभति ऐसे ऐकुनि सावित्री लक्षुमि पार्वती क्रोधयुक्त होउनिया आपुल्या घरासि जाउनि भर्त्यालागुनि वदती निष्टुरवाणी ॥१॥
अहो तुह्मी या सर्व जगाचे उत्पत्तिक्षय पाळणकर्ते समर्थ सर्वाहुनि आगळे तशाच तुमच्या पत्न्या आह्मी पतिव्रता सर्वांत श्रेष्ठ परि नारदमुनिनीं अनूसयेची किर्ति वर्णिली । काय ह्मणावे । तरि आतां तूह्मी सत्वर जावें । कैसे करावे । तया सतीचें सत्व हरावें । घरासि परतुनि लौकरि यावे । नाहीतरी मग आमुच्या नांवें । पाणी द्यावें । तुह्मी एकले सुखी असावें । ऐसें एकुनि ब्रह्मा विष्णु महेश्वर तिघे अतीत होउनि अत्रीमुनि निजतपासि गेले ऐसे पाहुनि अनुसूयेसि हाक मारिती घाई करुनीं आहा माय वृथा तूं काय बैससि पाय अमुचे बहुत पोळती तरी आतां तूं नग्नपणानें आह्मासी भीक्षा घाली बरि वो नाहींतरि आह्मी फिरोनि जातों तुझें सत्व तें हरोनि नेतों ऐसें ऐकुनि । पतिव्रता ती मनांत भ्याली । मुखावरि बहु ग्लानी आली । धैर्य धरुनिया मग सांवरली । बाह्यवृत्ती सारि आवरली । अत्रीमुनिला स्मरती जाली । अंतरयामी शरण रिघाली । भाव धरुनि मनिं भर्ताराचे तीर्थ होतें तें । हस्तकिं घेउनि । बाहेर येउनि । अतिथिलागीं नयनीं पाहुनि । बहुत धाली । पूर्ण निवाली । ऐसे पाहुनि । तिघा जणासी पालखी घालुनि । हालवुनि गाती गाणीं ॥२॥
ब्रह्मकर्म सारें उरकुनिया । अत्रिमुनि निजघरासि आले । त्रै कुमरांतें नयनिं पाहिलें । आपुल्या मनिं मग विस्मित जाले । असो याजपरि बहूतकाळ गेल्यावरि इकडे स्वर्गलोकिच्या ठाईं त्रैदेवाच्या भार्या विस्मित होउनि चिंता करिती काय करावें कसें करावें । कोणीकडेस उठोनि जावें । स्वामीवार्ता न पडे ठावें । कोठें आहेत ह्मणवुनि पहावें । कोणावरुते आतां रुसावें । घात घेतली आमच्या दैवें । सर्वांनीं तें नयनिं पाहिलें । अहो नारदा यावें यावें । आमुचें निजगुज ऐकुनि घ्यावें । हितकारक तें सांगुनि द्यावें । पती आमुचे कोठें तुह्मी । नयनिं पाहिले असतिल तरि ते सांगुनि द्यावेम ऐसें ऐकुनि नारदमुनि मग वदते जाले । अनुसुयेच्या घरीं पाहिले । तिघेजणे ते बाळे जाले । तयासि तीशीं शरण रिघुनि या मागुनि घ्यावे ऐसें ह्मणतां तिघीजणी त्या अनुसूयेच्या गह्रासि जाउनि शरण रिघाल्या निराभिमानें वदता झाल्या आमुचे पति आह्मासी द्यावे ऐसें ऐकुनिया मग पतिव्रतेनें तीर्थ शिंपिलें तिघेजणे पहिल्यासम केले ब्रह्माहरिहर प्रसन्न जाले । देउनिया वर घरासि गेले । इकडे त्रैअवतार प्रगटले । चंद्र आणि द्र्वास मुनीवर । तिसरा श्रीदत्तात्रय प्रभुवर । त्रैलोक्यामधि ज्याची कीर्ति । ऐकुनिया सुर धाउनि येती । करोनिया नीरंजन आरति । वृष्टी करिति सुमनीं ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : November 25, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP