गोंधळी
वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.
शुक सांगे परिक्षिती । ऐक कथा भागवती ॥ ध्रुवपद. ॥ देहनगर अष्टपुरी जी । पुरंजन राज्य करी जी । बुद्धि तयाची अंतुरी जी । गुणवती सुंदरी जी । त्याचा अहंकार परधान जी । दृष्टराशी काय दुर्जन जी । राजा त्याच्या स्वाधीन झाला जी । त्यानें खेळ काय मांडिला जी । राणीराजाचे माझारि जी । विपट पाडियलें भारी जी । पुढें होणाराची गती. ॥शुक०॥१॥
याव याव काय परधाना जी । माझ्या जीवींच्या जीवना जी । जाऊं विषयाच्या वना जे । भोगूं परावी अंगना जी । मनपवन वारूवरी जी । संकल्पाचा साज करी जी । इंद्रियदळभार हाकारी जी । राज शिकारी निघाला जी । मनवारूवर बैसला जी । पुढें होणाराची गती. ॥शुक०॥२॥
मग त्या पुरजन रायानें जी । आत्मराज्य काय सोडिलें जी । नसतें जिवपण जोडिलें जी । पांच वनें ओलांडिलीं जी । गेला विषयाच्या वना जी । गेला वासनेच्या दरीं जी । सहा चोरांचीं गांठिलें जी । घे घे घे घे काय बोलती जी । आशा राक्षसिणी गर्जती जी । व्देषभेदादि वनचरें जी । खाती फोडोनि उदर जी । राजा मनीं दचकला जी । काय रे ! अहंकार परधाना ! जी । वन रे ! मोठे भयंकर जी । त्याचा अंत काय लागेना जी । मला रे ! दिशाभुली झाली जी । राणी कुठें रे ! राहिली जी । ऐशा होणाराची गती ॥शुक०॥३॥
इकडे बुद्धि पट्टराणी जी । पतिव्रता सत्वगुणी जी । तिनें रोदना मांडिलें जी । हरि बा हरि नारायणा ! जी । काय रे ! करूं या प्राक्तना जी । राजा कोणीकडे गेला जी । इनें बा ! तप काय मांडिलें जी । उपभोगासि सांडिलें जी । घालुनी वैराग्याची धुनी जी । विवेकाच्या काय अंगणीं जी । संग्रामाच्या वज्रासनीं जी । मोक्षहेतु धरुनी मनीं जी । सद्गुरु देव आराधिला जी । त्यांनीं बोधपुत्र दीधला जी । पुढें होणाराची गती. ॥शुक०॥४॥
बोध बुद्धीतें बोलत, जी । ‘ राजा कोठें सांग मला जी । त्याचा शोध मी लावीन जी । तुजलागीं भेटवीन जी ’ । बुद्धि ह्मणे, ‘ ऐक सुता रे ! जीव विषयवनीं तुझा पिता रे ! जी । अहंकार घेउनी गेला रे ! जी । तेथें गुंतोनि राहिला रे ! जी ’ । ऐकुनि मातेच्या वचना जी । बोध प्रतिज्ञा बोलत जी, । ‘ राजा घेउनि येइन जी । तुला सुखी काय करिन जी ’ । पुढें होणाराची गती. ॥शुक०॥५॥ विवेकाचा वारु भला जी । त्यावरी बोध स्वार झाला जी । शांति क्षमा दोहीं करीं जी । चौर्या ढाळिती सुंदरी जी । शमदम संगें दळ जी । तोफा वैराग्य तुंबळ जी । मग त्या विषयवनाला जी । त्यागरूप अग्नी दिला जी । सहा चोर काय पळती जी । भेद वनचर जळती रे ! जी । मग अत्या बोधराजियानें जी । अद्वैताच्या काय शस्त्रानें जी । अहंकार तो मारिला जी । इंद्रियबंध तो बांधिला जी । वनमारू फिरविला जी । ऐशा होणाराची गती ॥शुक०॥६॥
पुरंजन राजियाला जी । रामा बोध घेउनियां आला जी । बुद्धीलागीं भेटविलें जी । बुद्धि आत्मयाची भेटी जी । निरालंबीं मिठी पडली जी । गेला दु:खाचा दुकाळ जी । झाला सुखाचा सुकाळ जी । ब्रह्मपदसिंहासनीं जी । आत्मा शोभे अद्व्यपणीं जी । वसता झाला निरंजन जी । ऐशा होणाराची गती. ॥शुक०॥७॥
N/A
References : N/A
Last Updated : November 22, 2016
TOP