महावाक्य - टीका

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


श्रीगणेशाय नम: । ॐ नमो जी ऋषिश्वरा । आत्मविवेकदातारा । अपारकृपाजळधरा । बोलविसी ते बोलेन ॥१॥
श्लोक :- नत्वा श्रीभारतीतीर्थविद्यारण्यमुनीश्वरौ । महावाक्यविवेकस्य कुर्वे वाख्यां समासत: ॥१॥
भारतीतीर्थ विद्यारण्यस्वामीस नमस्कार करून महावाक्यविवेकाची व्याख्या संक्षेपे करीजेते. मुमुक्षु पुरुषाकारणे मोक्षास कारण जे ब्रह्म तोचि आत्मा होय हे जाणावे. या जाणावयासाठी प्रसिद्ध जी चार महावाक्ये त्याचा अर्थ क्रमेकरून निर्पित होत्साते, परमकृपाळु विद्यारण्ययतीश्वर जे ते प्रथमारंभी ऐतरेय आरण्यक उपनिषद जे त्या उपनिषदि ‘ प्रज्ञानं ब्रह्म ’ ऐसे महावाक्य जे त्याचा अर्थ सांगताहेत. श्लोक :- येनेक्षते शृणोतीदं जिघ्रति व्याकरोति च । स्वाद्वस्वादु विजानाति तत्प्रज्ञानमुदीरितम् ॥१॥
’ टीका :- नेत्रावाटे निघाली जे अंत:करण वृत्ति ते वृत्ति चैतन्यसहित असता, त्या चैतन्येकरून सकळ रूपादीक पदार्थ दिसतात; त्या रूपाते पाहाणार जे त्यास प्रज्ञान ह्मणावे. तैसेच कानावाटे निघते जे अंत:करण वृत्तिचैतन्यसहित ते शब्दमात्राते ऐकते ते प्रज्ञान ह्मणावे. त्या प्रकारेच नाकावाटाए निघती जे अंत:करणाचि वृत्ति चैतन्यसहित सर्व गंधाचे ग्रहण करिते जे ते प्रज्ञान ह्मणावे. यारितीच वागींद्रियावाटे शब्दजात बोलते आणि रसनेंद्रिय द्वारा निर्गंत अंत:करण - वृत्ति चैतन्यसहित जे गोडकडूखारटादीक जाणते ते प्रज्ञान ह्मणावे. तसीच जे अन्य इंद्रिये बोलिजेली आणि बोलता राहिली, त्या सर्वेंद्रिय अंत:करणवृत्तिउपाधीयोगे जे चैतन्य सकळेंद्रियव्यापार प्रवर्तिते, जाणते, ते प्रज्ञान म्हणावे ॥१॥
आता ब्रह्म शब्दाचा अर्थ बोलताहेत. श्लोक :- ‘ चतुर्मुखेंद्रदेवेषु मनुष्यश्वगवादिषु ॥ चैतन्यमेकं ब्रह्मात: प्रज्ञानं ब्रह्ममय्यपि ॥२॥
टीका :- चतुर्मुख, विष्णु, शंकर, प्रजापति, मनु, सनत्कुमारादिक ऋषि आणि इंद्रादिक संपूर्ण देव जे ऐसे उत्तम देहधारी आणि अश्व, गाई, व्याघ्र,  हस्ति, पक्षी आदिकरून अधमजन्मे जे या सर्वाचे ठाई आणि मनुष्य, राजे, रंक, ब्राह्मणादिक वर्ण अंत्यजपर्यंत ऐसे मध्यमदेहधारी जे त्याचे ठाई आणि आकाश, वायु, अग्नि, आप, पृथिवी याचे ठाई जे चैतन्य आहे आणि संपूर्ण जगाचा जन्मास हेतूभूत जे चैतन्य आणि सर्वाठाई भरून पुष्कळ भूमा, अनंतस्वरूपे उरले असे जे त्यास ब्रह्म ह्मणावे. तीच वस्तु उत्तम देवादिकाचे ठाई आणि अश्वगदादिकाचे ठाई आणि मनुष्यमात्राचे ठाई आणि पंच महाभूताचे ठाई आणि जगज्जन्मास हेतूभूत ईश्वर जो याचे ठाई भरून पुष्कळपणें जे उरले आहे ते ब्रह्म होय. ऐसा ब्रह्मपदाचा अर्थ सांगितला. आता वाक्यार्थ सांगतात. पहिले श्लोकि प्रज्ञान शब्दाचा अरथ सांगितला. दुसरिया श्लोकि ब्रम्ह शब्दाचा अर्थ आणि प्रज्ञान जे ते ब्रम्ह होय ऐसे सांगितले. ऐसे ब्रम्ह जे ते प्रज्ञानपणे करून सर्व प्राणिमात्राचे ठाई आहे. तरि सर्वामध्यें मीही आहे. तेव्हा ब्रह्मवस्तु जे ते प्रज्ञानरूपत्वे माझे ठाईहि आहे म्हणोन मीहि ब्रह्मच होय. याप्रकारे ऋग्वेदीचे महावाक्य जे त्याचा अर्थ निरूपिला. आता, यजुर्वेदीचे महावाक्य बृहदारण्यउपनिषदि ‘ अहंब्रह्मास्मि ’ आहे त्याचा अर्थ सांगतात. त्यात ‘ अहं शब्दाचा अर्थ आधि सांगताहेत. श्लोक :- “ परिपूर्ण: परमात्मास्मिन् देहे विद्याधिकारिणि ॥ बुधै: साक्षितया स्थित्वा स्फुरन्नहमितीर्यते ॥३॥
” टीका :- परिपूर्ण ब्रह्म जे देशेकरून, कालेकरून, वस्तुभेदेकरून खंडले नाही त्यास पूर्ण परमात्मा म्हणावे. तो परमात्मा जो त्याचे मायेकरून कल्पित जे हे जग, या जगामध्ये ज्ञानाचे अधिकारि ऐसे जे नरशरीर याचे ठाई अधिकारि शरीर म्हणजे शम - दम - तितिक्षा - उपरति - श्रद्धा - आस्तिक्य - आदिकरून साधने जी, त्या साधनेकरून संपन्न होत्साते आत्मविद्या संपादनास योग्य जे देह, या देही श्रवण - मनन - निदिध्यासन घडते, ऐशा शरीरास अधिकारी शरीर म्हणावे. या अधिकारि शरीरि बुद्धिसहित सत्रा कळाचे लिंगशरीर जे, त्या सूक्ष्म शरीराचे साक्षित्वेकरून शरीरि राहुन प्रकाशतो जो त्यास ‘ अहं ’ ऐसे बोलिजे. आता ‘ ब्रह्म ’ शब्दाचा अर्थ दाखवितात. श्लोक :- “ स्वत:पूर्ण: परात्मात्र ब्रह्मशब्देन वर्णित: अस्मीत्यैक्यपरामर्शस्तेन ब्रह्म भवाम्यहम् ॥४॥
” टीका :- स्वभावेकरून जो परिपूर्ण, देश - काल - वस्तू - करून जास्त परिच्छेद नाही, ऐसा जो परमात्मा, जो मागिले श्लोकि वर्णिला, तोचि हा, या महावाक्याचे ठाई ‘ ब्रह्म ’ शब्देकरून बोलिजेला. आता लक्षणेकरुन ब्रह्म जे त्यासि आणि अहंकाराशि ‘ अस्मि ’ या पदेकरून ऐक्य करताहेत. अहं प्रत्यय आलंबनेकरून वर्णिला जो पारमार्थिक जीव तेणे अखिलशक्तीसंबंधरहित शुद्ध ब्रह्म जे त्याचा ऐक्यानुभव घेउन मी ब्रह्म होय, ऐसे जाणावे. आता, छांदोग्योपनिषदीचे “ तत्त्वमसि ” महावाक्य जे त्याचा अर्थ सांगावयासाठि प्रथम तत्पद जे त्याचा लक्षर्थ बोलताहेत. श्लोक :- “ एकमेवाद्वितीय सन्नामरूपविवर्जितम् ॥ सृष्टे: पुराधुनाप्यस्य तादृक्त्वं तदितीर्यते ॥५॥
” टीका :- तत्पदलक्ष जे ते येरिती जाणावे :- येकचि अद्वितीय ऐसे नामरूपेकरून रहित केवलस्वरूप जे, जाचे ठाई सजातीयविजातीय स्वगतभेद नाहीत म्हणोन श्रुति बोलत्ये - “ सदेव सोम्येदमग्र आसीदेकमेवाद्वितीयमिति ” सृष्टि जाहलि नव्हति तेव्हां स्वगतादि भेदरहित आणि नामरूपविवर्जित ऐशि जे वस्तु, तीच वस्तु आता सृष्टीउत्तरकाळीही तैसीच नामरूपरहित अद्वितीयरूपे करूनच आहे; त्यास तत्पदलक्ष ऐसे म्हणावे. ॥५॥
आता ‘ त्वं ’ पदाचा अर्थ सांगतात, श्लोक :- “ श्रोतुर्देहेंद्रियातीतं वस्त्वत्र त्वंपदेरितम् ॥ एकता ग्राह्यतेसीति तदैक्यमनुभूयते ॥६॥
” टीका :- जो श्रोता श्रवण - मनन - निदिध्यासन ऐसे अनुष्ठान कर्ता आणि वाक्यार्थाचा संपादनकर्ता जो पुरुष, याचे देहेंद्रियातीत आणि देहेंद्रियेकरून उपलक्षित आणि स्थुळादि देहत्रयसाक्षित्वेकरून वर्तणारे आणि त्या देहत्रयाहून विलक्षण सद्वस्तुरूपे अचल राहाणारे देहाचे गमन जाहाले असता, देहाबरोबर जात नाहि ये विषयि अमृतबिंदुउपनिषदीचे वाक्य - “ घटसंवृत्तमाकाशं नीयमाने घटे यथा ॥ घटो नीयेतमाकाशं तद्वज्जीवो नभोपम: ॥श्रु.॥ ” जैसा घट नेला असता, घटातील आकाश जात नाही; तैसे देहत्रय गेले असता त्याजबरोबर अंतरात्मा जात येत नाही. तो सदंश सद्वस्तुरूपेच अचलकूटस्थत्वेच राहातो, हे त्वंपदलक्ष ऐसे जाणावे. आता, या वाक्याचे ठाई ‘ असि ’ पद जे या पदत्रयाचा अर्थ सिद्ध जाहाला. ॥६॥
आता अथर्वणवेदी “ आयमात्मा ब्रह्म ” ऐसे महावाक्य जे त्याचा अर्थ बोलताहेत. या वाक्यांत ‘ अयं ’ आणि ‘ आत्मा ’ या दोपदेकरून बोलिला जो त्वंपदलक्षार्थ याचि व्याख्या करिजेते. श्लोक :- ‘ स्वप्रकाशपरोक्षत्वमयमित्युक्तितो मतम् । अहंकारादिदेहान्तात्प्रत्यगात्मेति गीयते ॥७॥
टीका :- ‘ स्वप्रकाश ’ आणि ‘ अपरोक्ष ’ या दोपदाचा अर्थ करिजेतो. प्रत्यगात्मा जो तो स्वप्रकाशेकरून नित्य अपरोक्ष आहे हे संपूर्णास अभिमत आहे. जे न दिसे आदृष्टासारिखे त्यास परोक्ष म्हणावे. ऐसा प्रत्यगात्मा नव्हे, का जो नित्य अपरोक्ष आहे म्हणून. आणि घटादिक पदार्थ हे चक्षुरादिक इंद्रियेकरून प्रत्यक्ष दिसतात; परंतु ते घटादिकाचे प्रत्यक्ष होणें दृश्य होय. तैसा प्रत्यगात्मा दृश्यासारिखा नव्हे का जो अदृश्य आणि नित्य अपरोक्ष आहे म्हणोन. अंत:करणादिक आत्मप्रकाशेकरून प्रकाशित होतात; तैसा आत्मा परप्रकाश नव्हे, स्वप्रकाश होय. आणखी अहंकार, प्राण, मन, इंद्रिये, देह याचा अभ्यंतरि अधिष्ठानत्वेकरून आहे ह्मणोन त्यास प्रत्यगात्मा ह्मणावे. आता ‘ ब्रह्म ’ शब्दाचा अर्थ सांगतात.

श्लोक :- ‘ दृश्यमानस्य सर्वस्य जगतस्तत्वमीर्यते । ब्रह्मशब्देन तद् ब्रह्म स्वप्रकाशात्मरूपकम् ॥८॥
’ टीका :- रज्जूसर्पाचेपरि लटकेच माइक आकाशादि संपूर्ण हे जगत्, याचे तत्व म्हणजे वास्तविक अधिष्थानभूत भूमा अनंतस्वरूप जे ब्रम्ह, तेच या महावाक्याचे ठाई ब्रह्मशब्देकरून बोलिजेते. अन्यत्र वेदादिकाचे ठाई ब्रह्म शब्दाचा प्रयोग आहे; परंतु ते वेदादीक येथे गृहीत नाहीत. कारण जे, ब्रह्म प्रकाशेकरून ते वेद आणि विष्णु - विरंच्यादि आणि चंद्रसूर्य अग्नि आदि देहे संपूर्ण ब्रम्हवस्तुयोगे प्रकाशीत होतात; परंतु ते वेदादीक स्वप्रकाश आहे. तेच स्वप्रकाश प्रत्यगात्मरूप होय, ऐसे बाधासामानाधिकरण्ये करून ऐक्य जाणावे. ह्मणजे संपूर्ण शक्त्यादि स्र्थावरजंगमांत जगताचा बाध करून सच्चिन्मात्र ब्रह्मचि सत्य होय ऐसे जाणावे. ॥८॥
आता चहुवेदाचि महावाक्य जे ती जीवब्रह्मऐक्याते सांगतात. आणि सद्गुरु जो तेणेहि या महावाक्यानुसारे जिज्ञासु शिष्य जो त्यास युक्तिने बोधन करून केवल ब्रह्मवस्तु जे ते चर्मवृत्तिने त्याचा प्रत्ययास आणून द्यावी म्हणजे तो शिष्यहि मी ब्रह्म होय ऐसे अनुभउन निरतिशयानंदाते पावतो आणि जिवंत असताचि आपणाते जिवन्मुक्तत्वे आणि विदेहिमुक्तत्वेकरून पाहातो. आता, चहुवेदाचि चार महावाक्ये जी त्याचि एकवाक्यता ती ऐशि :- प्रथम - ऋग्वेदीचे महावाक्य, “ प्रज्ञानं ब्रह्म ” ‘ प्रज्ञान ’ शब्देकरून जीवात्मा आणि ‘ ब्रह्म ’ शब्देकरून परमात्मा या उभयाचे ऐक्य सांगितले. यजुर्वेदीचे महावाक्य, ‘ अहं ब्रह्मास्मि. ’ ‘ अहं ’ या शब्देकरून जीवात्मा आणि ‘ ब्रह्म ’ या शब्देकरून परमात्मा या उभयाचे ऐक्य सांगितले. सामवेदीचे महावाक्य, ‘ तत्वमसि. ’ ‘ त्वं ’ शब्देकरून जीवात्मा आणि ‘ तत् शब्देकरून परमात्मा या उभयाचे ऐक्य सांगितले. अथर्वण वेदीचे महावाक्य, ‘ अयमात्मा ब्रह्म ’. ‘ अयमात्मा ’ या शब्देकरून जीवात्मा आणि ‘ ब्रह्म ’ या शब्दे करून परमात्मा या उभयाचे ऐक्य सांगितले. सारांश, या चतुवेदीचा महावाक्याचा अर्थ की, ‘ मी ब्रह्म होय ’ हें या महावाक्याप्रकर्णि विशद करून बोलिजेले.
ओवी :- ऋषीश्वरपदसरोजी ॥ महावाक्याचा समाजी ॥ रिघोनि बोलिलि माझि ॥ वाणि ते म्या अर्पिली ॥१॥
ऋषिअज्ञा अनुमोदे ॥ महावाक्यवर्णनछंदे ॥ जगन्नाथाचि निमालि द्वंद्वे ॥ परमानंदे राहिला ॥२॥
रघुनाथ जनस्थानवासि ॥ तयाचा अनुग्रह निरंजनासि ॥ तेणे प्रकर्ण शोधिले स्वानुभवेसि ॥ मुमुक्षु जना पाहावया ॥३॥
जैसे द्रव्येकरून जोसपूर ॥ तेणे शिवालयाचा जीर्णोधार ॥ करिजे तैसे प्रकर्णपरिकर ॥ शोधोनि नीट केले हे ॥४॥
इति श्रीमद्विद्यारण्यविरचितं पंचदशीमहावाक्यप्रकर्णं संपूर्णमस्तु ॥ श्रीदत्तात्रेय रघुनाथ निरंजनार्पणमस्तु ॥
शके १७८० कालयुक्तनाम संवत्सरे ॥
॥ श्रीदिगंबरार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 22, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP