श्रीरघुनाथ चरित्र - ओव्या ३५१ ते ३९६

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


मजप्रति जालिया पुत्र । तयासि घेऊनि मी सत्वर ।
घालावयासी चरणावर । येईल स्वामी दयाळा ॥३५१॥
यापरि करोनिया नवस । संवत्सर लोटतां त्यास ।
पुत्र होता झाला तियेस । इच्छिलिया सारिखा ॥३५२॥
सहामास जालियावरीं । जालोनि तीस योजनवरी ।
नवस पुरवावया अत्यादरी । जनस्थाना पातली ॥३५३॥
उभयताही स्त्रीपुरुष । येउनि लागती चरणास ।
ह्मणती स्वामी अवतंस । तुमचे कृपें लाधलों ॥३५४॥
स्वामी देती आशीर्वचन । शतायु होवो हा नंदन ।
तुमचें अक्षयीं कल्याण । असो ईश्वरप्रसादें ॥३५५॥
मग तया द्विजवरांनें । केलें ब्राह्मणसंतर्पण ।
मागती चरणाशीं लागून । जाता जाला स्वदेशा ॥३५६॥
सवेंचि पुण्यग्रामींचा द्विजवर । ऐकोनि ऐसा चमत्कार ।
प्रतीत पहावया सत्वर । येता झाला तेधवा ॥३५७॥
माध्यान्हीं पातला दिनकर । स्वामी गेले गंगेवर ।
हें पाहोनी तो द्विजवर । जाता जाला सन्निध ॥३५८॥
पाषाणाची करोनि खूण । स्वामीसी करी संभाषण ।
अर्घ्यप्रदानापूर्वीं आपण । गुंता करोनि बैसला ॥३५९॥
ऐसा चार घडिपर्यंत । बैसला तो द्विज बोलत ।
तंव सूर्य अध्यर्प्रदान विरहित । न चालेचि पुढारीं ॥३६०॥
न ढळे पाषाणाची छाया । आश्चर्य वाटलें बहुसाल तया ।
मग द्विज लागोनिया पायां । वारंवार स्तवितसे ॥३६१॥
स्वामी उठोनि अर्घ्य देती । तंव सूर्य चालला सत्वर गती ।
छाया धरोनिया निगुती । गेली दूर तेधवां ॥३६२॥
ऐशी वार्ता बहुता प्रकारीं । ऐकिली क्षेत्रांतील द्विजवरीं ।
मग धावती सहपरिवारीं । स्वामीप्रती विनवावया ॥३६३॥
जावोनिया धरिती चरण । ह्मणती हे स्वामी दयाघन ।
आपण क्षेत्रीं असून । आह्मी दीन जाहालों ॥३६४॥
दरिद्रें बहुत पीडिलें । महर्गतेचे दिवस आले ।
मरण समय पातले । आह्मालागीं ये समयीं ॥३६५॥
तरि ऐसी कृपा करावी । आह्मा सर्वांची विपत्ती जावी ।
सुखोत्पत्ती आघवी । प्राप्त व्हावी आह्मांतें ॥३६६॥
तयाप्रती संबोधून । दिधलें गृहासी लावून ।
आपण एकांतीं बैसून । चमत्कार पैं केला ॥३६७॥
आपले मनें करून । श्रीमंतांचे चित्तीं प्रवेशून ।
लक्षावधि द्रव्यालागून । क्षेत्राप्रति देवविलें ॥३६८॥
असो श्रोत्यालागीं माझी विनवणी । हे चमत्कार पाहिले सर्वांनीं ।
परि माझ्या प्रत्यया लागुनी । आले तें मी सांगतों ॥३६९॥
जया दिनीं या ग्रंथासी । आज्ञा केली लेखनासी ।
तेव्हां बोलत श्रीदत्तासी । बैसले होते गुंफेंत ॥३७०॥
घेवोनि दत्ताचें दर्शन । स्मामीप्रती पाहिलें जाण ।
तंव द्वादश वर्षाचे आपण । मजलागी दीसले ॥३७१॥
सर्वजग निजलियावरी । दत्तात्रयासि अवघे रात्रीं ।
निद्रा न घेता उभयत्रीं । बैसलेची असावें ॥३७२॥
जन्मलिया दिवसापासून । शेवटवरी निद्रेलागून ।
येऊं दिलें नाहीं जाण । नेत्रालागीं सर्वथा ॥३७३॥
धन्य धन्य हा रघुराव । जयाची लीला अभिनव ।
वर्णावया ब्रह्मदेव । न सकेची सर्वथा ॥३७४॥
एकाकि असावें आपण । लक्षोनिया घोर विपिन ।
निशिदिनीं एकांतस्थान । सेवोनिया असावें ॥३७५॥
फळमूळ कंदाचें सेवन । न भक्षितां उत्तम अन्न ।
सक्तुक पीठाचें सेवन । उदकासवें करावें ॥३७६॥
एक्या अंगवस्त्रानिशीं । शीत काळीं क्रमावी निशी ।
सुखोत्पत्ति देहासी । देणें नाहीं सर्वथा ॥३७७॥
ब्रह्मचर्य कडकडाट । वैराग्याचा हव्यवाट ।
पेटवोनीं इंद्रियासकट । प्राणहोमीं होमिती ॥३७८॥
स्वप्नींहि स्त्रियेचें मुख । पाहिलें नाहीं सन्मुख ।
नेत्र उघडोनी नि:शंक । दृष्टी लागी सर्वथा ॥३७९॥
कोणी एक्या समयांतरीं । एक्या भाग्यवंताची कुमारी ।
लावण्य लतिका तारुण्यवरी । उन्मादता पावली ॥३८०॥
वत्राभरणें अलंकार । लेवोनिया ती सुंदर ।
येवोनि पडली अंगावर । एकांतनिशी पाहूनी ॥३८१॥
स्वामी नेत्र उघशोनि पहाति । तंव कामानळें व्यापिली युवती ।
मग विस्मयो मानुनिया चित्तीं । नेत्र झाकोनि बैसले ॥३८२॥
ऐसे चार घटिकापर्यंत । कामिनी हावभाव दावीत ।
येवोनि अंगासि कळवित । कामभरित होवोनि ॥३८३॥
परी न पाहती तिजकडे । जेसें पिशाच अंगावरी पडे ।
कां राक्षसीण घालोनिया सांकडें । भक्षावया पातली ॥३८४॥
मग ती सुंदरी कंटाळून । जाती जाली होवोनि खिन्न ।
परि स्वामींचें उतावळें मन । जालें नाही सर्वथा ॥३८५॥
तस्मात् धन्य तो रघुराव । जो वैराग्यसिंधू अभिनव ।
किंवा धैर्यमेरूचाचि ठाव । अचलपणें सर्वदा ॥३८६॥
जो तपोघनांमाजी श्रेष्ठ । भृगुऋषीचा अवतार वरिष्ठ ।
कलिमाजी प्रगटला स्पष्ट । जनोद्धार करावया ॥३८७॥
जो ब्रह्मविद्येचा रत्नाकर । अद्वैतबोधरत्नें सुंदर ।
सुक्ष्म पाहोनिया चतुर । निजकृपें लेवबी ॥३८८॥
जो आत्मतत्वांतें दाविता । जो चैतन्यातें जागविता ।
अज्ञ जनांतें शक्तिपाता । करोनिया उद्धरी ॥३८९॥
आतां श्रोतें होइजे सावधान । मागील कथेचें अनुसंधान ।
रेवातीरींचे मुनिजन । गंगातीरीं अवतरलें ॥३९०॥
त्यांतें तत्वविद्या उपदेशुन । दिधलें पूर्वजन्मस्मरण ।
ते जगामाजी गुप्तपण । सेवोनिया राहिले ॥३९१॥
श्रीरघुनाथ दयाकर । पूर्वेसि उगवला दिनकर ।
त्याचे सुप्रभें वारिकर । भक्त प्रेमळ विकसती ॥३९२॥
सद्गुरुराय हा निशाकर । आह्मी शिष्य हे चकोर ।
चिद्रस सेवोनि परिकर । ब्रह्मानंदें क्रीडतसों ॥३९३॥
जयजय स्वामी रघूत्तमा । त्रैलोक्यामाजी तुमची प्रतिमा ।
शोधोनि पाहतां सर्वोत्तमा । न दिसेची कदापि ॥३९४॥
तूं अप्रतिम अगोचर । अक्रिय असंग अनावर ।
निरंजन हा वारंवार । त्या तुजप्रती नभितसे ॥३९५॥
इतिश्री ब्रह्मनिष्ठविजय । सार कथिला अभिप्राव ।
अज्ञ जनासी तरणोपाय । प्राकृत कथियेला ॥३९६॥
॥ श्री दिगंबरार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 21, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP