मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|निरंजन स्वामीकृत श्रीरघुनाथ चरित्र| ओव्या १ ते ५० निरंजन स्वामीकृत श्रीरघुनाथ चरित्र ओव्या १ ते ५० ओव्या ५१ ते १०० ओव्या १०१ ते १५० ओव्या १५१ ते २०० ओव्या २०१ ते २५० ओव्या २५१ ते ३०० ओव्या ३०१ ते ३५० ओव्या ३५१ ते ३९६ श्रीरघुनाथ चरित्र - ओव्या १ ते ५० वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते. Tags : marathiniranjam raghunathनिरंजन रघुनाथमराठी ओव्या १ ते ५० Translation - भाषांतर श्रीमंत् गोदातीर निवासिया । आनंद कंदा श्रीरघुराया । कृपासिंधु करुणालया । सद्गुरुराया करुणाब्धि ॥१॥तूं सर्वाचा आदिपुरुष । तूं सर्व जीवांचा ईश । नटनाट्य मायावेश । धरोनिया खेळसी ॥२॥श्रोते होइजे सावधान । ऐकिजे ब्रह्मनिष्ठाचे गुण । कलिमाजी रघुनंदन । स्वामी माझा अवतरला ॥३॥पूर्वी कृतायुगीं जाण । रेवातीर रम्यस्थान । पाहुनि भृगुऋषि आपण । अनुष्ठाना बैसले ॥४॥लावुनि मुद्रा खेचरी । समाधि केली बहुकाळ वरी । तिन्ही युगें गेलीं परी । ठाउकें नाहीं जयातें ॥५॥कलियुगहि जालें प्राप्त । संवत्सर लोटले बहुत । तंव मुनी वृत्तीवरी अकस्मात । येवोनि मुद्रा उतरली ॥६॥शिष्यालागीं हाक मारून । पुसते झाले वर्तमान । हें युग चाललें कवण । मजलागीं सांगावें ॥७॥तंव शिष्य करिती विनवणी । स्वामीराया ! ऐकिजे श्रवणीं ॥ कृतत्रेतद्वापार जाउनी । कलियुग प्राप्त जहालें ॥८॥जाहला श्रीरामावतार । दुसरा गेला कृष्णावतार । सांप्रत बौद्ध अवतार । कलिमाजी अवतरला ॥९॥रेवा तीरीं मुनीश्वर । रहात होते थोर थोर । गोदामहात्म्य ऐकोनि शुभकर । गंगातीरासी पैं गेले ॥१०॥मातेच्या वचनातें ऐकून । श्रीराम दशरथी आपण । चतुर्दश वर्षेपर्यंत जाण । गंगातटीं राहिले ॥११॥रावण कुंभकर्णातें वधून । सोडविले त्रिदशगण । मुनिवृंदातें गौरवून । अयोध्येसी पैं गेले ॥१२॥मुनिवृंद बहुकाळ वरि । वाय करोनी सहपरिवारीं । कलीचिया प्रथम प्रहरीं । जाते झाले हिमनगा ॥१३॥ऐसें भृगुऋषी लागून । शिष्य सांगती वर्तमान । व्यासें गोदेचें महिमान । वर्णिलें तेंहि कथियेलें ॥१४॥सर्व तीर्थांमाजी श्रेष्ठ । गोदामाहात्म्य अतिवरिष्ठ । हे बादरावणवाणी स्पष्ट । वदती जाली भारतीं ॥१५॥तंव बोलता जाला मुनिराणा । आपणही जाऊं गंगास्नाना । वास करूं तया स्थाना । कांहीं काळ पर्यंत ॥१६॥परि कलिराजा अतिदुष्ट । त्याची प्रजाही तैशीच नष्ट । आह्मांसी पाहुनि बहुकष्ट । देतील येऊनी सर्वदा ॥१७॥आतां एक करूं या उपाय । जेणें कवणासी ठाऊकें न होय । वेष पालटोनिया लवलाहे । दक्षिण देशीं जन्मावें ॥१८॥जन्मउनिया मातापितर । ह्मणती आमचे हे कुमर । लोक ह्मणती हे आमुचे मित्र । आह्मां सारिखे दिसती ॥१९॥कोणी ब्रह्मचर्यत्वें असावें । कोणी गृहस्थाश्रम आचरावे । संसार करोनिया बरवे । जग भुलवावें सर्वही ॥२०॥ब्राह्मण कुळीं अतिउत्तम । तुह्मालागीं होतील जन्म । कृष्ण गंगेचिये मध्यम । स्थळामाजी सर्वस्वी ॥२१॥पूर्व जन्मांतरीचें स्मरण । राहाणार नाहीं जाण । विषयभोगीं भुलून । जाल तुह्मी सर्वही ॥२२॥लोक ह्मणतील तुह्मांसी पापी । तुह्मी तयावरी भराल कोपी । द्वेषनिंदेची खटाटोपी । बळेंचि आंगीं आणाल ॥२३॥ऐसे परि श्रीगुरुवचन । ऐकोनि शिष्य खेदसंपन्न । देते झाले प्रतिवचन । मुनिलागीं तेधवा ॥२४॥नलगे आह्मांतें गंगास्नान । नलगे गर्भवासा जाण । नलगे कलिमाजी अवतरण । आह्मालागीं सर्वथा ॥२५॥नलगे स्वरूपाचें विस्मरण । नलगे जगा सारिखें आचरण । तुमचे चरणकमळ सोडून । जाणें नलगे सर्वथा ॥२६॥नलगे हर्षशोकाचें वेष्टन । नको मोहाचें बंधन । पुत्र मित्र दारा धन । दु:खप्रद नको ते ॥२७॥एकदा मुक्त जालियावरि । मागती कां पडावें बंधारीं । गर्भवास निबिड अंधारीं । कासिया लागीं सोसावी ॥२८॥ऐसे शिष्याचे वचना । ऐकूनि बोले गुरुराणा । ह्मणती संपादुनिया ज्ञाना । विचार नाहीं तुम्हांसी ॥२९॥अरे तुह्मी सर्वदा मुक्त । देही असोनी देहातीत । अखंडैकरसभरित । तुह्मी असां सर्वही ॥३०॥कुलाळें मृद्घट केलें । मयामाजी नभ संचलें । परि तें नाहीं गुंतलें । कदाकाळीं सर्वथा ॥३१॥आणि कुलाळें घट अपरिमित । घडियले जरी अनेकजात । तयामाजी आकाश भीत । नाहीं कदा पुत्र हो ॥३२॥गंगेचा प्रवाह चालिला । तया वरुते बुद्बुद उठला । गंगा आधारभूत त्याजला । होवोनिया जातसें ॥३३॥दुसरीयानें जरी बुद्बुद निघे । तयासी ते काय ह्मणे नेघे । जेव्हां तेव्हां तयासंगें । आधाररूपें जातसें ॥३४॥परि तियेसी होणें जाणें । कदापि नाहीं वेगळेपण । तैसे तुह्मांसी जन्ममरणं । नाहीं नाहीं निजरूपें ॥३५॥ऐसें ऐकोनि स्वामीवचन । शिष्य डोलविती मान । ह्मणती गुरु - आज्ञा प्रमाण । आह्मालागीं सर्वदा ॥३६॥परी स्वामीप्रति एक विनवणी । आह्मी जन्मूं जये स्थानीं । तेथें मोहपाश येवोनि । आह्मालागी कर्षतील ॥३७॥तेथें पश्चात्ताप होऊण । व्हावें स्वामीचरणदर्शन । निजस्वरूपाची आठवण । देवोनि मुक्त करावें ॥३८॥तंव स्वामी देती आशीर्वचन । तुमच्या सद्वुद्धी होऊन । गंगातटीं ममस्थान । शोधित तुह्मी याल पैं ॥३९॥मग मी निजतत्वातें बोधून । करीन तुमचा शोक हरण । मग सुखस्वानंदें करून । विदेहपणें वसाल तुह्मी ॥४०॥कराल जगाचे उद्धार । कीर्ती विख्यात होईल फार । कोणी वसवोनी गंगातीर । योगसमाधी कराल पैं ॥४१॥कोणी वेदांत व्याख्यान । सांगोनि जग कराल पावन । कोणी कवित्व रचून । नूतन ग्रंथ कराल पैं ॥४२॥कोणी वैराग्य कडकडाट । कोणी ज्ञानचर्चा घडघडाट । कोणी धर्मदानादि विख्यात । कीर्ती प्रगट कराल पैं ॥४३॥नवविध भक्तिलक्षण । कोणी जप तप साधन । गुप्त आणि प्रगटपण । करोनिया रहाल पैं ॥४४॥ऐसें ऐकोनि आशीर्वचन । शिष्य जयजयकारें गर्जून ॥ करिते झाले साष्टांग नमन । तया भृगूऋषीसी ॥४५॥सर्व शिष्यांनीं मिळून । रेवातीरीं उत्तम स्थान । पाहूनिया रम्य उपवन । मठिका करिते जाहले ॥४६॥मध्यभागीं भृगुमुनी । प्रगट राहिले तये स्थानीं । त्या स्थानातें त्या दिवसापासोनी । भृगुक्षेत्र ऐसें बोलती ॥४७॥असो तया स्थानीं राहून । करिते झाले यजनयाजन । बहुताप्रकारीं अनुष्ठान । करिते जाले सर्वदा ॥४८॥पंच पंच उष:काळीं । उठोनि ऋषींची मंडळी । गुरुवेष्ठित मध्यमेळीं । स्नानाप्रती पै जावें ॥४९॥नर्मदा मिलाली सिंधूजीवनीं । उभय संगम मध्यस्थानीं । स्नानसंध्या तये स्थानीं । प्रतिदिनीं जावोनि करावी ॥५०॥ N/A References : N/A Last Updated : November 21, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP