श्रीरघुनाथ चरित्र - ओव्या ३०१ ते ३५०

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


जैसें चंद्राचें चांदणें । प्रकाश दिसे शोभायमान ।
त्या तेजें गुंफा संपूर्ण । भरोनिया पैं गेली ॥३०१॥
द्विज स्तविती वारंवार । धन्य धन्य जी स्वामी रघुवीर ।
आमुचें प्रारब्ध आजि थोर । जे ऐसी प्रभा पाहिली ॥३०२॥
तंव इतुकियांत चमत्कार । होता जाला दुसरा प्रकार ।
स्वामीप्रति शीतज्वर । प्राप्त झाला होता पै ॥३०३॥
शीत यावयाची वेळा । प्राप्त झाली तये काळा ।
मग कंथा काढोनि तात्काळा । सव्यभागीं । ठेविली ॥३०४॥
तीत निज सामर्थ्यें करूनि । शीत ठेविलें काढूनी ।
कंथा तया योगें करून । उडावयासी लागली ॥३०५॥
दृष्टीसी हा चमत्कार । पहाते झाले ते द्विजवर ।
मग नमस्कार वारंवार । घालोनिया वंदिती ॥३०६॥
तयाचे दुसरिये दिनीं । यात्रा आली काशीहूनी ।
वर्तमान सर्वांशीं तयांनीं । येवोनिया कथियेला ॥३०७॥
रघुनाथ रवामी काशी माझारी । प्रत्यक्ष पाहिले डोळेभरी ।
ते येथेंहि दिसती त्यापरी । काशींत आह्मी पाहिले ॥३०८॥
असो तया रीतीं रामेश्वर । पाहोनि आले अतिसत्वर ।
न उगवतां दिनकर । एवया रात्रींत पैं आले ॥३०९॥
दुसरे दिवसाप्रति जाण । येवोनि केलें पारण ।
तृप्त केले द्विजगण ! यात्रा सफळ पैं केली ॥३१०॥
यजमानाचे गृहीं असतां । चमत्कार जाला तत्वतां ।
यजमान पत्नी पतिव्रता । गरोदरा होती पैं ॥३११॥
पूर्ण जाले नवमास । येता जाला प्रसूतीदिवस ।
रात्रौ पोट दुखावयास । लागलें बहुवस ते काळीं ॥३१२॥
निघोनि गेली सर्वयामिनी । उगवता जाला दिनमणी ।
बहुत सूतिका बोलावुनि । यजमानें आणिल्या ॥३१३॥
करितां बहुतसा प्रयत्न । प्रसूतिशुद्धी नोहेचि जाण ।
आडवें आलें ह्मणवून । प्रयत्न सर्वीं सांडिला ॥३१४॥
घडी अर्धघडी माजी प्राण । पतिव्रतेचा जावा निघून ।
तों इतुकियांत कळलें वर्तमान । रघुनाथ गुरु लागुनी ॥३१५॥
मग स्वामींनीं केला चमत्कार । सूक्ष्मरूप अतिसत्वर ।
होवोनी प्रवेश नेत्रद्वारें । करिते जाले उदरीं ॥३१६॥
नाभितळासि जाऊन । गर्भ दिला लोटून ।
सवेंचि मग नेत्राकडून । निघते जाले ते काळीं ॥३१७॥
असो कोणे एके अवसरीं । यजमानाची सावकारी ।
पंधरा सहस्त्राचा रोखा करीं । घेवोनी चरणीं अर्पिला ॥३१८॥
ह्मणे हें द्रव्य संपूर्ण । तुह्मास्तव दिलें सोडून ।
कपर्दिक न घेतां जाण । रोखा फाडून टाकिला ॥३१९॥
यजमान करी स्तुतुस्तवन । म्हणे धन्य आमुचें प्राक्तन ।
ह्मणोनि ऐसें निधान । आमुचे घरा पातलें ॥३२०॥
ऐसें जालिया उपरी । बंड झालें ग्रामा माझारीं ॥
ब्राह्मण घातलें अंधारी । बंदिशाळेमाझारी ॥३२१॥
मनुष्य मात्रासी धरावे । नासिक कर्णासी छेदावे ।
ऐसें प्रतिदिनीं बरवें । व्हावयासी लागलें ॥३२२॥
तंव आलीसे अर्धयामिनी । स्वामी येती अरण्यांतुनी ।
तों एक दूत त्यांतें पाहुनी । पृष्ठभागीं धावला ॥३२३॥
तो यवन महादुष्टराशी । उपसोनिया असिलतेसी ।
मारूं पातला स्वामींशीं । क्रोधयुक्त होवोनी ॥३२४॥
तंव शस्त्रसहित त्याचा हस्त । वरुतोंचि राहिला निश्चित ।
बोलूं जाता वाचा कुंठित । होवोनिया गेलीसेस ॥३२५॥
तटस्थपणें स्वामीतें पाहे । हस्त कदापि खाली नये ।
याचिप्रकारें घटिकाद्वय । होती जाली ते काळीं ॥३२६॥
मग बोबडी वळूनिया जाण । पुसता जाला वर्तमान ।
स्वामी तुह्मी आहा कोण । मजलागि सांगिजे ॥३२७॥
एक असतां अनेक । मजलागीं दिसतसां देख ।
मी नेणें अतिमूर्ख । तुकचिया स्वरूपातें ॥३२८॥
तरि माझिया अन्याया । क्षमा करोनि देवराया ।
हस्तालागुनि माझिया । आतां खालीं आणावें ॥३२९॥
स्वामि कृपावंत होऊन । पाहाते जाले त्या लागून ।
मग हस्त खालतें येऊन । पूर्ववत तो जाला ॥३३०॥
मग स्तवनातें आरंभून । करिता झाला साष्टांग नमन ।
जाता झाला तो यवन । आपुलिया स्थळासी ॥३३१॥
क्षेत्रांतील विप्रमंडळी । बंडवाल्यांनीं तये काळीं ।
बंदीं घालोनिया सकळी । द्रव्य बहुत मागती ॥३३२॥
मग तया सर्व विप्रांनीं । रघुनाथ स्वामीतें स्मरूनि ।
निघते जाले तथुनि । मौनपणें सर्वही ॥३३३॥
बैसले असतां पाहरेकरी । नदिसतां तयाचिया नेत्रीं ।
निघोनिया द्विज सत्वरी । जाते जाले गृहासी ॥३३४॥
असो कोण एके समयांतरीं । रोगी द्विज येवोनि सत्वरी ।
सप्तशृंग पर्वतावरी । देवीपाशीं बैसला ॥३३५॥
पायाप्रती पडिलें छिद्र । मांस झडोनि गेलें समग्र ।
दिसावयासि अस्थिमात्र । तयास्थळीं राहिली ॥३३६॥
औषध करितां शीणला । ह्मणूनि जिवासी त्रासला ।
देवीपाशीं निग्रह केला । सप्तशृंगा जाउनी ॥३३७॥
कडकडाट निराहारी । राहिला सप्त दिन वरी ।
मग देवी येवोनि स्वप्नांतरीं । सांगती जाली तयातें ॥३३८॥
तूं एथोनि जाई सत्वरीं । जनस्थान क्षेत्रामाझारी ।
रघुनाथ बावाचिये द्वारीं । जाऊनीया पडे कां ॥३३९॥
त्याचे कृपादृष्टी करून । चांगले होतील तुझे चरण ।
हें वचन मानुनि प्रमाण । निघे एथूनि सत्वरीं ॥३४०॥
ऐसा होतांचि दृष्टांत । ब्राह्मण होवोनि जागृत ।
दिनमणि पावतां उदयातें । पर्वता खालीं उतरला ॥३४१॥
बहुत प्रयत्नें करून । मार्ग क्रमोनिया जाण ।
जनस्थानाप्रति येणें । केलें तया विप्रानें ॥३४२॥
स्वामीतें पाहोनि नयनीं । नमस्कारोनी जोडी पाणी ।
ह्मणे सप्तशृंगीची । भवानी । स्वप्न देती जहाली ॥३४३॥
तिनें आपणाकडे वहिलें । मजलागीं पाठविलें ।
माझे पाय होती चांगले । ऐसी आज्ञा करावी ॥३४४॥
यापरि बोलोनिया वचन । गुंफेचे निकटभागीं जाण ।
रोगी पडला आपण । प्रेतासम ते काळीं ॥३४५॥
प्रतिदिनीं स्वामीदर्शन । होतसे त्या द्विजालागून ।
ऐसे लोटितां सप्तदिन । शुद्ध चरण जहाले ॥३४६॥
वरते मांस आलें भरून । त्वचा जाली समान ।
आरोग्य होवोनि ब्राह्मण । चरणाप्रति लागला ॥३४७॥
जोडोनिया उभय कर । स्तुति करीत वारंवार ।
जी जी स्वामी रघुवीर । सुखी जालों मी आतां ॥३४८॥
आरोग्य होऊनि सर्व शरीर । चरण चाली तो द्विजवर ।
निजग्रामाप्रति सत्वर । जाता जाला तेधवां ॥३४९॥
एक्या ब्राह्मणाच्या स्त्रियेसी । प्रतिबंदी होती संततीसी ।
ह्मणोनि रघुनाथ स्वामीसी । नवस करिती जहाली ॥३५०॥

N/A

References : N/A
Last Updated : November 21, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP