श्रीरघुनाथ चरित्र - ओव्या १५१ ते २००
वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.
तैशापरि मातापितयांसी । आनंद जालासे मनासीं ।
कैवारी हा कैलासवासी । जाला असे म्हणवूनी ॥१५१॥
येवोनि अंतरीं कळवळा । आरडोनि पुत्राच्या पडिले गळां ।
आमच्या तान्हुलिया बाळा । अंतरला तूं होतासी ॥१५२॥
असो शिवरात्र उत्तम दिवस । पूजोनि स्वयंभू लिंगास ।
नाम रामेश्वर तयास । ठेविते जाले ते काळीं ॥१५३॥
अनेक प्रकारीं पूजन । करोनि ब्राह्मण - संतर्पण ।
उत्साह करोनिया जाण । स्थापन केलें शिवाचें ॥१५४॥
तया नदीचिये माझारी । स्वयंभूलिंग अद्यापीवरी ।
जावोनि पहावें चतुरीं । पुण्य गांठीं असलिया ॥१५५॥
असो तो गणपति किशोर । उभयतांही वधुवरें ।
वयें कडोनि झाले थोर । स्वेच्छा आनंदें क्रीडती ॥१५६॥
इकडे नर्मदेचे तीरीं । भृगूसी त्रिनेत्र विचारी ।
करनाट देशामाझारीं । जाणें आह्मां लागलें ॥१५७॥
भृगुक्षेत्रींचे ब्राह्मण । अमंदा आणि ज्ञानवर्धन ।
उभयतांनीं संकल्प सोडून । देह एथें त्यागिले ॥१५८॥
तयांनीं घेतले अवतार । पाहुनि मल्लप्रभातीर ।
घेते जाले परिकर । लीलामात्रें करोनी ॥१५९॥
तयांचे मनोरथ पूर्ण । करावयासी आह्मां जाणें ।
तरि आपणहि त्वरें करून । तेथें आलें पाहिजे ॥१६०॥
ऐसें वदोनि पंचवदन । तये स्थानीं अदृश्य होऊन ।
मल्लप्रभातीरा येणें । करिते झाले सत्वरीं ॥१६१॥
गणेशभटजींची पत्नी । चिमाबाई लावण्यखाणी ।
पतिव्रतेची स्वामिनी । गजगामिनी शुभांगी ॥१६२॥
पाहोनि एकांत सुंदर । जाऊनि तयाचे कर्णद्वारे ।
शिवसांबकर्पूर गौर । उदरामाजी प्रवशले ॥१६३॥
नवविधा भक्तीचे नवमास । गर्भा भरले पूर्ण दिवस ।
डोहाळे आदि बहू विलास । करिते जाले सर्वही ॥१६४॥
असतां उत्तम मुहूर्त । चिमाबाई जाली प्रसूत ।
मृडानीवरा ऐसा सुत । तये वेळीं जन्मला ॥१६५॥
उभयता मातापितरें । जाले आनंदें निर्भर ।
द्विज पाचारूनि सत्वर । बहु दक्षना दीधली ॥१६६॥
असो अनुक्रमें करून । प्रभु जोडलासे नंदन ।
नाम ठेविलें नारायण । आवडी करोनी सर्वांनीं ॥१६७॥
द्वितीय संवत्सरीं । उभा हिमनगाची कुमारी ।
चिमाबाईचिये उदरीं । येती जाली स्वच्छंदें ॥१६८॥
जीऊबाई अभिधान । ठेविते जाले आवडी करून ।
यथाविधि लालन पालन । करिते जाले उभयतांचें ॥१६९॥
इकडे भृगुऋषी आपण । रेवातीरवासी ऋषिगण ।
शिष्यमंडळी आदिकरून । पाचारिते जाहाले ॥१७०॥
सांगति सर्वांशीं विचार । वसवोनिया रेवातीर ।
तुम्हीं असावें सुस्थिर । स्नान संध्या करूनी ॥१७१॥
द्विजपत्नी आणि द्विजवर । उभयांचे मनोगत समग्र ।
पुरवावया अत्यादरें । जातों आम्हीं सत्वरीं ॥१७२॥
तुम्हीही स्वइच्छें करून । करावें कलिमाजी अवतरण ।
पुढें गंगातीरीं सर्वां लागून । एकत्र वास होईल पै ॥१७३॥
ऐसें सांगोनि सर्वांसी । गुहेत गेले भृगुऋषी ।
प्रगटोनिया करनाटदेशी । आतार घेते जहाले ॥१७४॥
गणेश भटजीची सुंदरी । व्याप्त झाली निद्राभरीं ।
तया समयीं नेत्रद्वारी । प्रवेश करिते जाहले ॥१७५॥
लीला - मात्रें करून । नवमास भरले संपूर्ण ।
प्रसूत जाल्याचें वर्तमान । सांगतोम तें परियेसा ॥१७६॥
तीन तालाचें माडीवरी । निद्रिस्त जाली मातोश्री ।
स्वप्नामाजी तये अवसरीं । पाहती जाली पुत्रातें ॥१७७॥
नवा महिनियांचा पुत्र । रांगता देखिला सुंदर ।
म्हणोनि जागृत जाली सत्वर । तवं किशोर पाहिला ॥१७८॥
सुप्रसन्न हास्यवदन । स्वरूपें करोनि जैसा मदन ।
विशाळभाळ विशालनयन । गौरवर्ण शोभत ॥१७९॥
ऐसा पाहतां निजवंदन । मातेसि आनंद जाला पूर्ण ।
ब्रह्मानंदसुखीं निमग्न । होवोनिया पैं गेली ॥१८०॥
जैसा तत्वदर्शनी तत्ववेत्ता । समाधिस्थ होय तत्वता ।
स्थूळसूक्ष्मकारणवार्ता । विसरोनि जाय सर्वही ॥१८१॥
तैशी होवोनि स्वरूपीं निमग्न । मन जालेंसे उन्मन ।
नाहीं आपपर किंवा भान । चिद्रूप होवोनि पै गेली ॥१८२॥
तंव तीर्थरूप अकस्मात । घ्यावया आले समाचारातें ।
पाहोनिया निज पुत्रातें । आनंदयुक्त जहाले ॥१८३॥
जैसा योगी प्रवर्ततां हाटीं । साध्य वस्तु देखे ढिठी ।
मग सद्वस्तूची मिठी । न सुटेचि सर्वथा ॥१८४॥
तैसें पाहोनि पुत्रवदन । पिता स्वरूपीं निमग्न ।
पावोनिया तत्वानुसंधान । तद्रूप होऊनि पै गेला ॥१८५॥
ऐसी हे उन्मनी अवस्था । उभयांतें लागली तत्वता ।
हें पाहोनि घरचियांसी चिंता । उत्पन्न होती जहाली ॥१८६॥
एक म्हणती भूतें झडपिलीं । एक म्हणती आनंदें ग्रासिलीं ।
एक म्हणती स्वरूपीं वेधलीं । बाळ दृष्टी पाहूनि ॥१८७॥
असो सात दिनवरी । उभयांसी मुद्रा खेचरी ।
लागोनि आनंदसिंधू माझारी । निमग्न होबोनि राहिले ॥१८८॥
तंववरी लेकराचिया सांभाळा । घरचीं करिती वेळोवेळा ।
अष्टम दिनीं प्रातर्वेला । होती जाली निश्चित ॥१८९॥
मग उभयतांची समाधी । उतरोनि आले देहबुद्धी ।
तवं तें म्हणती आह्मीं सुखाब्धि । माजी होतों पहुडलों ॥१९०॥
आमुचे सुखालागी विघ्न । येवोनिया केलें कोणें ।
करोनि समाधि उत्थापन । उठविलें आह्मांसी ॥१९१॥
असो गणेश भटजींनी तये वेळीं । पाचारुनि द्विजमंडळी ।
वस्त्रभूषणें वेळोवेळीं । द्रव्य देऊनि तोषविलें ॥१९२॥
ग्रामांतील स्त्रिया मिळून । घेऊनि येती अक्षईवाण ।
द्वादश दिनां - अंतीं जाण । नामाभिधान ठेविलें ॥१९३॥
रघुनाथ ऐसें नामाभिधान । ठेविलें सुमुहूर्त पाहून ।
चिन्मय पालखी घालून । हालविती सुवासिनी ॥१९४॥
ऐसा नित्यानित्य सोहळा । पिता करित वेळोवेळा ।
शुद्ध पक्षाची सोमकळा । तैसा वाढे नंदन ॥१९५॥
कोणी एकें दिवशीं । माता पहुडली सेजेशीं ।
तीन प्रहर गेली निशीं । बाळ पाठीशीं घेऊनि ॥१९६॥
तंव लेकरूं रांगत रांगत । जावोनिया देवघरांत ।
सुखासन घालोनि ध्यानस्थ । एकाग्र मनें बैसलें ॥१९७॥
उठोनि माता जंव पाहत । तंव लेकरूं गेलें देवगृहांत ।
हालवोनिया जागें करीत । तंव शुद्धि नाहीं देहाची ॥१९८॥
बहुतकाल जालियावरी । लेकरूं आलें देहावरी ।
नित्य नित्य ऐशियापरी । व्हावयासीं लागलें ॥१९९॥
मग गणेश भटजीप्रती । भार्या सांगतसे एकांतीं ।
रघुनाथाची लहान व्यक्ती । परि योगिराज दिसतो ॥२००॥
N/A
References : N/A
Last Updated : November 21, 2016
TOP