मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री निरंजन रघुनाथांचे ग्रंथ|साक्षात्कार| अध्याय सहावा साक्षात्कार अध्याय पहिला अध्याय दुसरा अध्याय तिसरा अध्याय चौथा अध्याय पांचवा अध्याय सहावा अध्याय सातवा साक्षात्कार - अध्याय सहावा वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते. Tags : marathiniranjam raghunathनिरंजन रघुनाथमराठी अध्याय सहावा Translation - भाषांतर सद्गुरुस्वामिया रघुनाथा । पूर्णब्रह्मा कृपावंता । कवणाचीहि उपमा देतां । तुझी समता नव्हेची ॥१॥ग्रंथ करावयासि लेखन । माझें सामर्थ्य नाहीं जाण । परि त्वां अंतरीं प्रवेशून । कवित्ववाणी वदविली ॥२॥ऐकोनि घेईजे श्रोतेजन । मागील अध्यायीं कथा गहन । गिरनार - प्रदक्षिणा करून । पादुकापाशीं बैसलों ॥३॥दत्तात्रयागुणानुवाद वर्णिता । अस्तमानासी गेला सविता । तंव विघ्न एक अवचिता । येतें झालें ते काळीं ॥४॥वात सुटलासे प्रचंड । पर्जन्यधारा वर्षे अखंड । विद्युलता खंडविखंड । करावया धावती ॥५॥तया पर्वताचे शिखरीं । नाहीं कोठें गुहा दरी । त्यामाजी दडून बैसूं तरी । नाहीं कोठें ठिकाणा ॥६॥मग तैसेंचि घालूनि आसन । बैसता झालों अक्षईपण । वरोनि वर्षत असे घन । नाहीं प्रमाण तयासी ॥७॥वाटॆ प्रलयकाळचि पातला । कीं अंतकाळ जवळी आला । कां दत्तात्रय क्षोभला । ह्मणोनी ऐसें वर्तलें ॥८॥देशांत पडलें अवर्षण । ऐथेंचि कोठें पातला घन । असो जावो माझा प्राण । परि मी येथानि न ढळेचि ॥९॥वर्षाव होत वरचेवरी । हुडहुडी दाटलीसे अंतरीं । दांतखीळ तेथें अवसरी । बसती झाली अखंड ॥१०॥देहीं पडोनि विस्मरण । पडता झालों अचेतन । नाहीं कांहीं एक भान । व्याकुळ प्राण जहाला ॥११॥तंवस एक सुवासीन । येवोनि बोलती झाली वचन । हा घेईरे निरजंन । प्रसाद गुरुदत्ताचा ॥१२॥पक्क खिचडी मुष्टीभरी । ठेवोनि माझे हस्तावरी । तेचि काळीं ते झडकरी । मूर्छेमाजी भक्षिली ॥१३॥रात्री झालीसे दोन प्रहर । अचेन पडिलों मी तोंवर । मग येवोनि देहावर । पहाता झालों सभोंवता ॥१४॥तंव ते न दिसे सुवासिनी । पर्जन्यहि न दिसे नयनीं । वायू ठेला स्तब्धपणीं । सरली यामिनी सवेंची ॥१५॥करूनिया स्वाभिस्तवन । वर्णिता झालों कीर्तिगुण । अंतरीं सखेदता पावून । तीव्र भाषण करितसे ॥१६॥रे रे स्वामी दिगंबरा । दत्तात्रया पूर्णावतारा । कृपासंधु करुणाकरा । निर्वाण कांरे पहासी ॥१७॥तुझें नाम स्मरत्रगामिनी । तेम काय हालें इये क्षणीं । नामासारिखी न दिसे करणी । मजलागीं सर्वथा ॥१८॥तुझें नाम जगदुद्धार । करावया जगाचा उद्धार । घेउनि षड्भुज अवतार । सर्व दिशेसी भ्रमसि तूं ॥१९॥बहुतां जनांसी तारिलें । जनार्दनाशीं दर्शन झालें । एकनाथासी भेटले । दासोपंत तीसरा ॥२०॥इतुके कलिमाजी जाणा । मागील युगाची नाहीं गणना । तो मज भासे लटकेपणा । यया काळीं पहातां ॥२१॥असो तुज संकट घातलें ह्मणून । काल पाठविलें विघ्नालागून । परि मी न भी सर्वथैवपणें । सत्य जाण स्वामिया ॥२२॥जैं शूर व्याघ्रावरी गेला । चिंतोनि आपुले मरणाला । परि न भी त्याचे आरोळिला । हाटकोनी बोलावी ॥२३॥तैसा देहाचा संकल्प । आदौचि केलासे निष्टंक । मग दर्शनाची धरोनि भूक । आलों स्वामी तुजपाशीं ॥२४॥ऐसें बहुता प्रकारें करून । बोलता झालों निष्ठुरपण । तंव अस्तमानाप्रति दिन । जाता झाला ते काळीं ॥२५॥गेली तीनप्रहर यामिनी । एकांत पाहुनिया स्वप्नीं । दत्तभट ब्राह्मण होवोनी । वचन झाले बोलते ॥२६॥एथोनी जाय रे सत्वर । ह्मणोनी बोलती उत्तर । एक रुमाल एक वत्र । पीतवर्ण दिधलें ॥२७॥जागृत होवोनि पाहिलें । तंव जगद्गुरु गुप्त जाले । वस्त्रें उशासि ठेविलें । प्रसादिक आपुलीं ॥२८॥मग मी वदता झालों उत्तर । हे हे श्रीगुरु स्वामि - दिगंबर । स्वप्नीं येसी वारंवार । प्रत्यक्ष कां न भेटसी ॥२९॥आधीं देउनिया लळा । मग कापोनि टाकितां गळा । हे हे दीनबंधु कृपाळा । बरें न दिसे तुजप्रती ॥३०॥असो माझेंचि दैव खोटें । ह्मणोनि न देसि तूं भेट । हें कळोनि आलें स्पष्ट । मजलागीं ये क्षणीं ॥३१॥परि थोरपणाची रीति । ऐसि नोहे हो श्रीपती । शरणागत आलियाप्रती । कृपादृष्टी पहावें ॥३२॥दर्शन झालिया मजप्रती । कांहीं आशा न धरी चित्तीं । मी शपथ वाहतों निश्चिती । श्रवण केली पाहिजे ॥३३॥इच्छून उपभोगप्राप्ती । जरि मागेन धनसंपत्ति । तरि रवरवामाजी जे पचती । ते गति होवो मजलागीं ॥३४॥जरि सिद्धि सामर्थ्य मागेन । तरि जें गुरुवचन करी खंडन । तें पातक बहुदारुण । माझे माथा बैसो कां ॥३५॥कीं गुरूनें करितां तत्वबोधन । ते शिष्य सांडी नोहे ह्मणून । काढूनिया विकल्प अज्ञान । करी अवमान गुरूचा ॥३६॥तो पिशाच होवोनि बहुकाळ । होवोनि क्षुधेनें व्याकुळ । भक्षी आपुले मांसगोळ । ते गति होय मजप्रती ॥३७॥एक्या दर्शना वांचून । कांहींच न बोले मी वचन । सर्व आशा परिपूर्ण । झाली आहे गुरुकृपें ॥३८॥ऐसें बोलतां नेमोत्तर । दिनयामिनी गेली समग्र । अवघें रात्र केला जागर । डुकली आली शेवटीं ॥३९॥तंव एक येवोनि ब्राह्मण । खडावांचा जोड देऊन । ह्मणे तूं जाईरे एथून । बसूं नको सर्वथा ॥४०॥जागृत होवोनिया पाहे । तंव ब्राह्मणाचा न दिसे ठाय । खडावांचा जोड आहे । सव्यभागीं ठेविला ॥४१॥मग त या खडावांसि वंदून । हृदयाप्रती लाविल्या जाण । मानुनिया शुभशकुन । स्वस्थ होता जहालों ॥४२॥असो निघोनि गेले दिनत्रय । होता झाला सूर्योदय । होता तितका उपाय । करोनिया पाहिला ॥४३॥आला शेवटील दिन । देह करावयाचा अर्पण । तंव जहाली आठवण । रघुनाथ गुरुपायांची ॥४४॥हे सद्गुरुराया समर्था । कृपा असूं द्यावी आतां । तुमचे उपकार उत्तीर्णता । झालों नाहीं मी कांहीं ॥४५॥जेव्हां आपुले चरण सुटले । तेव्हांचि माझे तीळ तुटले । पर्वतांतरीं मरण आलें । दैवयोगें कडोनि ॥४६॥आतां एथोनि नमस्कार । तुम्हासि करितों साचार । कृपा मज दीनावर । असें द्यावी स्वामिया ॥४७॥ऐसें मुखानें बोलून । करिता झालों मोठें रुदन । त्या शोकासी माझियान । न लिहवे या ग्रंथीं ॥४८॥अंगिरा नाम संवत्सर । भाद्रपद कृष्णपक्ष साचार । एकादशी सोमवासर । घटिका एक दिन आला ॥४९॥उपवासें देह झाला क्षीण । नाहीं उठावया अवसान । तैसाचि आवांका धरून । चंडपाषाण आणिल ॥५०॥ठेवोनि पादुकां शेजारी । जे कां ध्यान मस्तकावरी । लक्षीत होतों रोमरंघ्रीं । ते मूर्ति खालीं उतरली ॥५१॥योजुनि त्या पाषाणावरी । मानसपूजा केली बरी । सर्व साहित्य षोडशोपचारीं । यथासांग सर्वही ॥५२॥घालोनिया मंगळस्नान । लेवविलें दिव्य वसन । नैवेद्य तांबूल आदिकरून । यथोक्त पूजा सारिली ॥५३॥मग स्तुति आरंभिली बहुत । हे देवाधिदेव भगवंत । दयार्णव तूं कृपावंत । ह्मणोनि होतें ऐकिलें ॥५४॥ते हे तुझी थोरी । सुखें असो तुझे घरीं ॥ आह्मां कासिया वाईटाबरी । दाखविसी कृपाळा ॥५५॥दत्तात्रय स्मरत्रगामिनी । ते आजि झाली मिथ्या वाणी । सत्य सांडिलें थोरांनीं । परि धाकट्यांनीं सांडू नये ॥५६॥इंद्रायणीचें सोडोनि पाणी । देह केला तव अर्पणीं । ते हे सर्व भाक आजी पूरवूनि । घेई नवस आपुला ॥५७॥ऐसें करोनिया स्तवन । सवेंचि केलें आत्मचिंतन । सर्वसाक्षी मी परिपूर्ण । अजरामर असे मी ॥५८॥एकाग्र स्वरूपीं लीन । होवोनि स्थिर केलें मन । हर्षशोकातें सोडून । निश्चलपण धरियेलें ॥५९॥सवेंचि मेटाकुटी येऊन । उभय हस्तातें टेकून । मस्तक पाषाणीं तुकावून । उचलिलें मागुतीं ॥६०॥जैसें श्रीफळ देवाप्रती । नवस करूनि फोडिती । शकलें वेगळालीं होतीं । क्षण एक न लागतां ॥६१॥तया परी मस्तक उचलून । पाषाणावरी मारिलें जाण । भडभडा रुधिर आंतून । यावयासी लागलें ॥६२॥सवेंचि त्यापरी दुसर्यानें । ताडिता झालों बहु सत्राणें । तंव मस्तक होवोनि छिन्नभिन्न । अचेतन पडियेलों ॥६३॥निघोनि गेले सर्वप्राण । नाहीं कांहीं देहभान । कोठें पडलों हा ठिकाण । कांहींएक स्मरेना ॥६४॥तों इतकियांत श्रीदत्तात्रय । षड्भुज मूर्ती सावयव । ध्यान केलें होतें बरवें । तयापरी प्रगटलें ॥६५॥स्व - कमंडलूचें पाणी । घालते झाले माझे वदनीं । मस्तकावरि कर ठेवोनि । वर दवाणी बोलती ॥६६॥सावध होई रे निरंजन । मज पाहे नेत्र उघडोन । तुज द्यावयासि दर्शन । दत्तात्रय मी आलों ॥६७॥मग म्यां नेत्रानें उघडून । पहाता झालों सुहास्यवदन । षड्भुज मूर्तीं सगुण । तेजायमान देखिली ॥६८॥तंव ते स्वामी दिगंबर । बोलते झाले मधुरोत्तर । अरे उदार होउनी देहावर । इतुका निग्रह कां केला ॥६९॥जें जें तुवां मनीं इच्छिलें । तें तें तुजला प्राप्त झालें । कवित्वहि वदता आलें । ज्ञानानुभव घेऊनि ॥७०॥आतां हि माझा घेई वर । कवित्व वदसी अतिसुंदर । ज्ञान हो कां वृद्धिकर । आशीर्वादें माझिया ॥७१॥करुनिया परोपकार । करशील जनाचा उद्धार । हाचि माझा तूंतें वर । सफळ होवो सर्वदा ॥७२॥खडावा आणि वस्त्रें दोन्ही । त्यांसी संरक्षी जीवाहुनी । ते समजोनि माझे ठिकाणीं । जतन करी सर्वदा ॥७३॥मी सर्व व्यापकपण । असे तुझे हृदयीं वसून । मजवेगळा ठिकाण । नाहीं कोठें रिकामा ॥७४॥क्षणेक होतों मी सगुण । परि अक्षयीपणें निर्गुण । माझें सत्यस्वरूप जाण । निराकार सर्वही ॥७५॥सगुणरूपाचा विचार । अवघा मायिक हा प्रकार । ओडंबरी हे साचार । ज्ञानियासि समजली ॥७६॥एक्या ज्ञानिया वांचून । दुजासी ठाऊकी नसे खूण । माझ्या शुद्धस्वरूपालागून । ज्ञानी मात्र जाणती ॥७७॥अरे तुज मज नाहीं भेद । स्वरूपीं पाहे रे निर्द्वंद्व । सांडोनिया द्वैतभेद । देव - मानवीपणाचा ॥७८॥कोणी कोणासि रे भेटावें । दिसतें तें मायिक सर्व । तुज ज्ञान आहे बरवें । त्या दृष्टीनें पाहे पां ॥७९॥जें कां माझें गूढज्ञान । तें तुज कथिलें रघुनाथानें । दुसरें नाहीं तयाविण । सत्य सत्य त्रिवाचा ॥८०॥मानवी न ह्मणे तो रघुनाथ । जाणें देवादिकांचा गुह्यार्थ । हें जाणोनियां म्यां तूतें । पूर्वीं दावोनि दीधलें ॥८१॥आतां पाहे ज्ञानदृष्टीकरून । सर्वव्यापक मी परिपूर्ण । हें ब्रह्मांड पोटीं घेऊन । ढिसाळरूप धरी कां ॥८२॥ऐसें स्वामींचें उत्तर । ऐकोनिया बहु सुंदर । वृत्ति केली तदाकार । ज्ञानदृष्टी करोनि ॥८३॥तंव पाहतां पहाणें हारपलें । वस्तुपण मजचि आलें । देहभान सर्वहि गेलें । मुद्रा उन्मनी लागली ॥८४॥ऐसें होतांसि सत्वर । गुप्त झाले दिगंबर । मग मी येवोनि देहावर । नेत्र उघडोनि पाहिलें ॥८५॥असो अनुभवावृत्ति कडोनि । वियोग कांहीं न वाटे मनीं ॥ आनंदसिंधु उचंबळोनि । तृप्त होता जहालों ॥८६॥अनेक जन्मींचें सुकृत । ह्मणोनि भेटले श्रीगुरुदत्त । दर्शन झालेंसे साक्षात । तया जगद्गुरूचें ॥८७॥असो ज्या शिळेवरी मस्तक ताडिलें । तिचे दोन तुकडे झाले । मग उचलोनि टाकिले । पादुकांहूनि दूरवरी ॥८८॥झालीं होतीं दोन शकलें । कपाळ पहिल्यासारिखें झालें । तीं जडोनिया गेलीं । जोडफळा सारिखीं ॥८९॥कपाळ फुटलियाची खूण । कपाळीं शोभे सुलक्षण । केशापर्यंत भोवयाहून । असे वण सूक्ष्मत्वें ॥९०॥असो रुधिर जेथें झालें पतन । तो कोरडा झाला ठिकाण । आरक्तता गेली निघून । पूर्ववत स्थळ झालें ॥९१॥या ठायीं बैसून । बोलता झालों प्रेमळवचन । दत्तात्रयातें आठवून । स्तुति करिता जहालों ॥९२॥हे हे स्वामिदिगंबरा । दत्तात्रया पूर्णावतारा । दीनबंधु करुणाकरा । धन्य धन्य तूं एक ॥९३॥हे सर्वेश्वरा सर्वातीता । सर्वव्यापका सर्वगता । हे दीनबंधून अवधूता । कृपा आतां करावी ॥९४॥आपुला नेणोनि अधिकार । मी बोललों जें जें उत्तर । ते क्षमा करोनि दासावर । कृपा कीजे स्वामिया ॥९५॥दर्शनाची आशा धरून । बोलिलों मी कठिणवचन । जैसें वत्स क्षुधित होऊन । गोस्तनासी करांडी ॥९६॥तयापरि जी स्वामीराया । बोलिलों मी कुशब्द वायां । ते कृपा करोनिया सखया । क्षमा केली पाहिजे ॥९७॥अधमाचीं वचनें ऐकतां । थोर क्रोध न आणिती चित्ता । कां अंतर्यामीं सदयता । बहुत असती ह्मणोनी ॥९८॥तैसे स्वामी दयाळ पूर्ण । अंतरीं न आणावें माझें वचन । करोनि कृपेचें पोषण । सर्व पोटीं घालावें ॥९९॥ऐसें करोनिया स्तवन । बैसता झालों निवांतपण । तंव झालीसि आठवण । रघुनाथ गुरुचरणाची ॥१००॥धन्य धन्य हो रघुराव । पुरविली माझी सर्व हांव । न भेटता सगुण देव । तरी आशा पोटीं रहाती ॥१०१॥होवोनिया ब्रह्मज्ञान । हा हेतु पोटीं रहाता जाण । तरि मग जन्मासि कारण । होतों मज पुनरपि ॥१०२॥चांग सद्गुरु समर्थ मिळाले । ह्मणवुनिया बरवें जालें । सगुण निर्गुण दावुनि वहिलें । अद्वैत केलें निजरूपीं ॥१०३॥ह्मणवोनी निश्चयेंसि बरवा । आश्रयो थोरांचाचि करावा । तयायोगें कैवल्यठेवा । निजहातासि चढतसे ॥१०४॥सदुगुरु असलिया समर्थ । शेष अंतरीचे मनोरथ । पुरवोनिया सन्मार्गपथ । लावोनिया देतसे ॥१०५॥जैशी श्रीमंताची सुंदरी । प्रथम झाली गरोदरी । सहजीं डोहाळे अंतरीं । होते झाले तियेच्या ॥१०६॥उंची मोतियांच चुना । लावोनि खावा उदंड पर्णा । श्रीमंतें ऐकोनी घेतां श्रवणा । मनोरथ पूर्ण करितसे ॥१०७॥तैसा गुर समर्थ मिळाला । ह्मणोनि मनोरथ पूर्ण झाला । द्वैतभावा झाडा केला । देव दाविला निजदेही ॥१०८॥जो अलक्ष लक्षातें दाविता । त्या सगुण दावितां कायसी चिंता । मानवासि जो देव कर्ता । त्या देव दावितां श्रम कैचे ॥१०९॥जैसें राजियानें आपुले । दरिद्रियासी राज्यीं स्थापिलें । त्या भिकारपणाचे डोहोळे झाले । चणे खावे ह्मणोनिया ॥११०॥त्याचे मनोरथ पुरवावयासी । दुर्घट काय त्या राजियासी । तैसें सगुण दाखवावयासी । गुरुतें श्रम न पडती ॥१११॥जरि गुरु मिळता असमर्थ । तरी न पुरते मनीं मनोरथ । सगुण निर्गुण न होतें प्राप्त । नरदेह व्यर्थ जाता हा ॥११२॥जैसी दरिद्रियाची अंगना । डोहोळा इच्छी मौक्तिकचुना । तो पुरवावयासि जाणा ॥ पति समर्थ नसेचि ॥११३॥तैसा जयाचा गुरु काबाडी। त्याची दैना कोण फेडी ।जन्ममृत्यूची हे बेडी । न तुटेची सर्वथा ॥११४॥तैसा नोहे माझा गुरू । जो इच्छा पुरविता । कल्पतरू । सगुण रूप दिगंबरु । दाउनि रूपीं स्थिर केलें ॥११५॥झालें श्रीदत्तदर्शन । आनंदयुक्त झालें मन । पूर्णपदप्राप्ती जाण । गुरुकृपें जहाली ॥११६॥रघुनाथ - चरण - कमळावर । निरंजन होवोनी भ्रमर । सदा चित्स्वरूपीं निर्भर । रुंझी करी पूर्वत्वें ॥११७॥श्रोते ऐकिजे माझें वचन । रघुनाथ गुरोचें महिमान । पुढील अध्यायीं रसाळ गहन । तें निजभावें परिसिजे ॥११८॥इतिश्री साक्षात्कार ग्रंथ । संमत सद्गुरु रघुनाथ । दत्तात्रय मूर्तिमंत । गुरुकृपें भेटले ॥११९॥॥ श्री दिगंबरार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : November 21, 2016 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP