साक्षात्कार - अध्याय तिसरा

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


श्री दिगंबरायनम: । श्रीमत्गोदातीरनिवासिया ।
स्वानंदकंदा रघुराया । भक्तचकोर निववावया । शीतकर तूं कर ॥१॥
तूं निष्कळ निर्गुण । तूं सच्चिदानंद परिपूर्ण ।
तुझेनि प्रसादें सर्व जन । गमनागमनीं वर्तति ॥२॥
तुझेनि आधारें कवित्वरचना । कल्पलतिका चालली गगना ।
ते भेदोनिया द्वैतभावना । सत्स्वरूपासी मिळावी ॥३॥
आतां ऐका श्रोतेजन । मागील कथेचें अनुसंधान ।
धर्मपुरीं राहुनी जाण । कविता बहुत पैं केली ॥४॥
तेथोनि निघालों झडकरी । पाहिली सुरत नाम नगरी ।
वास्तव्य तीन दिनवरी । करिता झालों ते ठायीं ॥५॥
तेथें शंकरनाम सन्यासी । राहिलों जाऊन तयापाशीं ।
दृष्टीसी पाहिला तपस्वी । म्हणोनि पुसता जाहलों ॥६॥
कवण मार्ग कवण सांप्रदाय । करित असतां साधन काय ।
माया - मृगजळतरणोपाय । कवणे रीतीं योजिला ॥७॥
ऐसे त्याजसी विचारिलें । तव त्यांनीं आपुलें ज्ञान कथिलें ।
गुरूंनीं जें सांगितलें । गुह्य गुह्यार्थ ज्ञान तें ॥८॥
ह्मणे ऐक रे लेकुरा । तुज ठाउका नाहीं ज्ञानवारा ।
भवसिंधूचे पैलतीरा । उतरावया योग्य जो ॥९॥
काढिलें ज्ञानाचें भांडार । जैसीं गारुड्यासी ब्रीदें फार ।
बांधुनि करी स्तुति फार । स्तुति अहंपणाची ॥१०॥
कां कोल्हाटिया मरुनि उडी । क्षणक्षणा असिलता झाडी ।
दावी युद्धाच्या कडोविकडी । परि योद्धा नव्हे तो ॥११॥
तयापरि शंकर सन्यासी । जो मूर्खग्रामींचा मिराशी ।
ब्रह्मज्ञान सांगावयासी । उदित झाला मजलागीं ॥१२॥
ह्मणे ब्रह्म आहे उंच बहुत । मस्तक आकाशापरियंत ।
हातपाय स्थूळ बहुत । उदर मोठें विशाल पैं ॥१३॥
ह्मणे हें ब्रह्म सर्वोत्कृष्ट । नाहीं याविण दुजें श्रेष्ठ ।
ऐसें मम गुरुनें स्पष्ट । कथिलें आहे मजप्रती ॥१४॥
त्यासी पहावयाचें लक्षण । पूर्व दिशेसी मुख करून ।
करावी छाया विलोकन । मुखावरी ध्यान धरोनी ॥१५॥
क्षणभरी छाया ते पहावें । सवेंचि आकाशीं न्याहाळावें ।
विराटपुरुष तो स्वभावें । दृष्टीलागीं पडतसे ॥१६॥
ऐकोनि मज हासूं आलें । ब्रह्मज्ञान बरवें जी साधिलें ।
दैवेंकडोनिया वहिलें । प्राप्त झालें तुह्मांसी ॥१७॥
आतां पुसतों हेंचि बरवें । कवण सांप्रदायी हें सांगावें ।
मग ते आपले जिवेभावें । उदाहरणें सांगती ॥१८॥
वाममार्गी आह्मां लागून । परंपरा नामाभिधान ।
अशौच - क्रिया - संपादन । साधन आह्मी करितसों ॥१९॥
बीजपंथ आदिकरून । चार मार्ग हे आहेत जाण ।
ते आचरतां जन्मालागून । येणें न घडे मागुती ॥२०॥
ऐकोनि तयाचें वचन । मजलागीं त्रास आला जाण ।
वाटे ययाचें भाषण । ऐकों नये सर्वथा ॥२१॥
जैसे धन पाहुनिया मैंद । हिरोनी करिती शिरच्छेद ।
तैसे हे ज्ञानमार्ग - भेद । ठकवोनि नेती मुमुक्षा ॥२२॥
जे जे याचे शिष्य झाले । तयांचें प्रारब्ध फुटलें ।
भवसागरामाजी बुडाले । तळीं बैसले जाउनी ॥२३॥
कीं अंधमार्गानें चालिला । दुजा त्याचे संगें गेला ।
जरी कूपांत पडे पुढिला । मग मागील पडे सहजचि ॥२४॥
असो कोणीएक मुमुक्षानें । गुरू करावा विचारून ।
मान्य जयाचीं वचनें । वेदशास्त्रा मिळताती ॥२५॥
असो त्या कुमार्गियाला सोडुनी । निघता झालों तये क्षणीं ।
बहुसाल मार्गातें क्रमोनी । बडोद्यासी पावलों ॥२६॥
रामचंद्रचे देवालयांत । स्थल पाहूनि शुचिष्मंत ।
विलोकोनिया एकांत । जावोनी तेथें राहिलों ॥२७॥
तये स्थलीं एक सन्यासी । ज्ञानसागर कैवल्यराशी ।
जावोनिया तयापाशीं । क्षणएक बैसलों ॥२८॥
त्याचे दर्शनासी ब्राह्मण । येवोनि करितां संभाषण ।
आत्मानाम विवरण । अहर्निशी करीतसे ॥२९॥
शांति जयाची बहुत वाड । दयाक्षमा अति प्रौढ ।
वाचेनें बोलोनिया गोड । सर्वांप्रती निववीतसे ॥३०॥
आत्मबोधानें बोधला । द्वैत संशयो सर्व गेला ।
जैं आंबा येवोनि पाडाला । शेखी निवाला निवआंगीं ॥३१॥
तैसा तो महाराज यतीश्वर । उपमा जयासी ईश्वर ।
कराया जडमूढ - उद्धार । कलिमाजी प्रगटले ॥३२॥
करोनि त्यासी नमस्कार । पाहुनी एकांत सुंदर ।
पुसता झालों विचार । अनुभवयुक्त सर्वही ॥३३॥
त्यांनीं मजकडे पाहून । ह्मणती दिससी तूं परिपूर्ण ।
ऐक सांगतों अंतर खूण । बहु बोलणें कासया ॥३४॥
तुझे माझे मध्यभागीं । त्यासि चैतन्य ह्मणती योगी ।
व्यापुनिया सर्व जगीं । अभेदपणें वर्ततसे ॥३५॥
तयासी कैसें पहावें । ऐसें ह्मणशील जरी स्वभावें ।
तरि तें सांगतों अनुभवें । श्रवणीं घेई ऐकोनी ॥३६॥
मनोवृत्तीनें कल्पावें । पृथ्वीचे पलीकडे जावें ।
तेथें काय तें पहावें । ज्ञानदृष्टी करुनी ॥३७॥
ऐसें पाहतां पाहतां मन । तेथेंचि जाय हारपोन ।
उरलें तें चैतन्यघन । ब्रह्म परिपूर्ण त्या ह्मणती ॥३८॥
आपुले हृदयांत पहावें । चित्स्वरूपातें विलोकावें ।
सवेंचि विश्वव्यापक व्हावें । आत्मस्वरूपें करोनि ॥३९॥
तेथें मनाचा वेगु नाहीं । ऐसें ह्मणसी जरी कांहीं ।
तरि मी सांगतों तेंही । श्रवण करी आदरें ॥४०॥
जैं मेणाची पुतळी करून । मृत्तिका लावावी वरून ।
रस ओतितां ऊनऊन । मेण तेथें न राहे ॥४१॥
तैसें मनेंकडोनि कल्पितां । स्वरूपाचा पार न लागतां ।
आपेंआप मनोलयता । होऊनीया जातसे ॥४२॥
ऐसें ऐकोनिया वचन । पोहोंचली खुणेप्रती खूण ।
ब्रह्मानंदीं समरसोन । स्तब्धपणें राहिलों ॥४३॥
चार घटिकापर्यंत । दोघेहि झालों समाधिस्थ ।
स्वामी होवोनि कृपावंत । आशीर्वाद पैं देती ॥४४॥
अक्षयीं असो तव कल्याण । प्रकट होवो तुझें ज्ञान ।
परंपरा तुजपासून । प्राप्त होवो आणिकां ॥४५॥
धन्य धन्य रे तुझा गुरू । जेणें उपदेशिला हा विचारू ।
आत्मज्ञानाचा दिनकरू । तुझे हृदयीं प्रगटविला ॥४६॥
ऐकूनिया तुझे प्रश्न । संतुष्ट झालें माझें मन ।
धन्य उगवला आजिचा दिन । आत्म निरूपण जहालें ॥४७॥
मग त्यांनी कृपा करून । आंगावरील काशायवसन ।
धाबळी दिधली जाण । मजलागून तयांनीं ॥४८॥
त्रै दिन तेथें राहून । तेथोनि सवेंचि केलें गमन ।
ढवळके ग्रामीं शिवदर्शन । घेता झालों आदरें ॥४९॥
तया शिवाचा चमत्कार । पिंडी बहुत रुद्राक्षाकार ।
मोजून पाहतां वारंवार । गणित त्याचें न लागे ॥५०॥
एकरात्र तेथें राहून । सवेंचि मग केलें प्रयाण ।
काठेवाड देश कठिण । तेथूनिया लागला ॥५१॥
उष्ण जैशा भाजती लाह्या । कोठें नसे वृक्ष - छाया ।
उदक शीतल प्राशावया । न मिळेचि सर्वथा ॥५२॥
चव चव कोसाचें रण । मार्गांत काटे बहु सघन ।
सर्वदा पायांत भेदून । रुधिर वाहे भडभडा ॥५३॥
असो अंतरीं करुनिया ध्यान । श्रीदत्ताचें नामस्मरण ।
निजवाचेसि उच्चारून । मार्गक्रमण करीतसे ॥५४॥
श्रीदिगंबराचें कीर्तन । करोनि वर्णीत जावे गुण ।
सद्गदित कंठ होऊन । प्रेमभरित अंतरीं ॥५५॥
आसुवें येवोनि नेत्रासी । खेद होवोनि मानसीं ।
वाटे केव्हां पायापाशीं । जाईन मी श्रीगुरूच्या ॥५६॥
चार घटिका पर्यंत । बसावें मार्गामाजी रडत ।
अंतरीं वाटतसे खंत । दिगंबर - भेटीची ॥५७॥
सवेंचि धरोनिया धीर । वृत्ति करुनिया स्थिर ।
मार्ग क्रमोनी सत्वर । जात असावें पुढारीं ॥५८॥
मार्गामाजी भीमनाथ । शिवमूर्ति अतिसमर्थ ।
कीर्ति जयाची विख्यात । तिन्ही लोक जाणती ॥५९॥
शाळुंका आहे बहुत सान । खणून पहातां चहूंकडून ।
त्याचे मूळाचा ठिकाण । नाहीं कोणा लागला ॥६०॥
श्रीरामचंद्रें आपण । केलें तयाचें संस्थापन ।
पाहुनीया उत्तम स्थान । मूर्ति तेथें स्थापिली ॥६१॥
घेऊनि तयाचे दर्शनासी । निघता झालों वेगेसीं ।
तंव दशयोजनाहून दृष्टीसी । गिरनारातें पाहिलें ॥६२॥
तयासी पाहिलें तया क्षणीं । आनंद न माय तो गगनीं ।
वाटे आतांचि जाऊं उडोनी । तया स्थानाजवळिके ॥६३॥
जैशी कन्या सासुर्‍याहून । माहेरासी करी गमन ।
दृष्टी पहातां दुरून । वाटे उडून जाऊं कां ॥६४॥
कां दावियाचें वास्रुं । गाईतें पाहोनि समोरु ।
ओढी घेऊनिया सत्वरू । जाऊ पाहे पिजाया ॥६५॥
तयापरी मजलागुनी । होतें झालें तये क्षणीं ।
श्रीदत्तात्रय ध्यानींमनीं । होऊनिया राहिला ॥६६॥
गुरुनें सांगितलें ध्यान । अंतरिक्ष पाहे मूर्ति सगुण ।
तयाप्रकारें मास तीन । ध्यान करिता जहालों ॥६७॥
तंव आश्चर्य वर्तलें एक । माझे अंतरीं वाटलें नीक ।
दत्तात्रय मूर्ति सम्यक । मीच झालों ये काळीं ॥६८॥
अंतरीं उदेला त्याग फार । वाटे व्हावें दिगंबर ।
विपिन सेवून घोरांदर । स्वेच्छानंदें क्रीडावें ॥६९॥
मी निर्विकार नि:संग । मज कासया पाहिजे संग ।
मी अक्षयी अभंग । नाहीं भंग मजप्रती ॥७०॥
देह नाहीं मजलागून । मी निर्विकार निरंजन ।
ऐसें वदोनिया जाण । वस्त्रें सर्व वांटिलीं ॥७१॥
आणिक वाटे मी त्रैअवतार । षड्भज - मूर्ति साकार ।
शंखचक्र - त्रिशूल - डमरु । माला कमंडलू शोभित जो ॥७२॥
सर्व वृत्ती झाल्या स्थिर । वाटे मीच दिगंबर ।
ब्रह्मानंद वारंवार । हृदयांतरीं उचंबळे ॥७३॥
जैसा होतां रामावतार । कौसल्या असतां गरोदर ।
वृत्ति झाली स्वरूपाकार । रामरूपीं मिळाली ॥७४॥
भूतें झडपिली ह्मणून । वसिष्ठ आणिला दशरथानें ।
तोहि तदाकार होऊन । रामरूप जाहला ॥७५॥
कां कृष्णावतारीं देवकी माता । आठवा गर्भ उदरा येतां ।
ह्मणे मीच कंसाचा हंता । काळ कृतांता दंडीन ॥७६॥
तैसें झालें मजलागून । विसरुनि गेलों देहभान ।
चार घटिका स्ब्धपणें । मार्गीं उभा राहिलों ॥७७॥
सवेंचि देहावरी येऊन । करिता झालों मार्गक्रमण ।
चालूनिया वायूप्रमाण । गिरिनारासी पावलों ॥७८॥
पर्वतासन्निध जाऊन । आनंदयुक्त झालें मन ।
वारंवार कर जोडून । साष्टांगनमन करीतसे ॥७९॥
वाटे दैवोदय जहाला । दरिद्रियाप्रती वहिला ।
धनाचा कूप सांपडला । अकस्मात् प्रारब्धें ॥८०॥
तैसा पहातां रेवताचळ । उचंबळला प्रेमकल्लोळ ।
नेत्रीं वाहतसे जळ । अखंड धारा लागली ॥८१॥
रेवताचळाचा महिमा फार । पुराणीं लिहिलासे अपार ।
तो मी यथामति पामर । वर्णूनिया दावितों ॥८२॥
तीन योजनें लंबायमान । उंच पावणेदोन योजन ।
मध्य सप्त शिखरें जाण । कोटाप्रमाणें भोवताले ॥८३॥
सभोवते शुभ्र पाषाण । मध्यपर्वत नीळवर्ण ।
गंडिके शिळेचे समान । तेज:पुंज दिसतसे ॥८४॥
पारिजातक आणि मांदार । जाई जुई मोगरे प्रचुर ।
पुष्पवाटिका अपार । ठायीं ठायीं शोभती ॥८५॥
न्यग्रोध अश्वत्थ औदुंबर । जांबूळ वृक्ष आणि आम्र ।
चिंचा बदरी कपित्थ अपार । सफळ फळें डोलती ॥८६॥
धामनी करवंदें आणि चार । नेपती टेंभुरणें पिंपर ।
सिताफळी वृक्ष अपार । ठायीं ठायीं उगवले ॥८७॥
अनेक जातींचे वृक्ष अपार । अठरा वनस्पतींचे भार ।
साक्षात् धरुनिया अवतार । गिरनारीं राहिले ॥८८॥
तेथ मयोरें बोभावती । कोकिळा सुस्वरें गाती ।
रावे साळ्या आदि जाती । किंकाटती पक्षिगण ॥८९॥
व्याघ्र चित्ते जांबुवंत थोर । रोही चितळ आणि सांबर ।
हरण गेंडे आणि मार्जार । बहुत उग्र रहाती ॥९०॥
नळनीळ जांबुवंत । सुग्रीव आणि हनुमंत ।
ह्यांचे वंशज मूर्तिमंत । वनचरें तेथ क्रीडती ॥९१॥
पर्वतामाजी उदक पुष्कळ । अक्षोभ वाहतसे जळ ।
ठायीं ठायीं नद्या तुंबळ । घडघडाट चालिल्या ॥९२॥
स्थळोस्थळीं तीर्थें पवित्र । पुराणांतरीं जयांचीं स्तोत्रें ।
स्नान करितीयां पवित्र । करिते ऐसे प्रतापी ॥९३॥
ठायीं ठायीं तापसी वृंद । नवनाथ चौर्‍यांशीं सिद्ध ।
कोणी गुप्त कोणी प्रसिद्ध । पर्वतामाजी रहाती ॥९४॥
स्थळोस्थळीं गुह्यस्थान । गुंफा ठेविल्यासे कोरून ।
तपश्चर्या उग्र साधन । बहुतीं तेथें पै केल्या ॥९५॥
पांडवांनीं तेथें वहिली । तपश्चर्या उग्र केली ।
हेडंबा तेथें पर्णिली । वृकोदरें आपण ॥९६॥
तया हेडंबाचा हिंदुळा । अद्यापि दिसताहे डोळा ।
पांडव - गुफा अति सोज्वाळ । त्याजपाशीं आहे हो ॥९७॥
मुचकुंदाची गुंफा अति थोर । बहु सखोल आहे विवर ।
तया स्थळाचा अंतपार । नाहीं कवणा लागला ॥९८॥
गौतम ऋषींनीं आपण । केली तपश्चर्या लागून ।
तयाचें सुंदर स्थान । विवर आहे चांगले ॥९९॥
शंकराचार्य रामानंद । गोरक्ष अवघडनाथ प्रसिद्ध ।
गुप्तस्थानांतरीं निर्द्वंद्व । तपश्चर्या आचरले ॥१००॥
श्रीगुरुदत्तात्रय पूर्ण । अद्यापि तपती आपण ।
तये कथेचें वर्णन । येईल पुढील अध्यायीं ॥१०१॥
गिरनार हा वृक्ष थोर । शाखा विरूढली ग्रंथाकार ।
कवित्व - लतिका अति सुंदर । निरंजन चढवीतसे ॥१०२॥
इतिश्री साक्षात्कार ग्रंथ । संमत सद्गुरु रघुनाथ ।
दत्तात्रय मूर्तिमंत । गुरुकृपें भेटले ॥१०३॥
॥ श्री दिगंबरार्पणमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 21, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP