साक्षात्कार - अध्याय पांचवा

वेदान्तशास्त्र हे नुसते बुध्दिगम्य व वाक्‍चातुर्यदर्शक शास्त्र नसून प्रत्यक्ष अनुभवगम्य शास्त्र आहे हे या ग्रन्थातून स्पष्ट होते.


श्री दिगंबरायनम: । परात्परा दिगंबरा । दत्तात्रया पूर्णावतारा ।
तूंचि व्यापक चराचरा । होवोनिया ठेलासी ॥१॥
तुझे पोटीं हे भूगोल । उत्पन्न झालें नभमंडळ ।
हरिहरब्रह्मा तिन्ही बाळ । तुझे पोटीं जन्मलीं ॥२॥
दयाघनरूपें रघुवीर । तूचि प्रगटोनि भूमीवर ।
जडमूढासि पैलतीर । पावविसी दयाळा ॥३॥
श्रोते परिसिजे विनवणी । चव अध्यायीं कथासरणी ।
करीत आलों ज्या कारणीं । तें कारण परिसावें ॥४॥
मागील अध्यायीं कथा गहन । गुप्त तपस्वी पाहून ।
घेऊनि पादुकादर्शन । सर्व तीर्थे वंदिलीं ॥५॥
जुनेगडा माजी जातां । तंव एक ब्रह्मचारी अवचिता ।
उदासीन आणि ज्ञाता । भेटता जाला मजप्रती ॥६॥
एकांतीं दोघे जाऊन । करिते झालों आत्मविवरण ।
तो वय - कडोनी असे सान । परि पूर्ण दशा पावला ॥७॥
त्यानें आपली मुमुक्षता । सर्व सांगितली कथा ।
सांप्रतहि पूर्ण अवस्था । झाली तेहि कथियेली ॥८॥
व्यक्ति पहावयाचें लक्षण । पाहणें जातें हारपून ।
मन जेणें होतें उन्मन । तेंही कथन कथियेलें ॥९॥
त्याचें ऐकोनी उत्तर ॥ वृत्ति झाली तदाकार ।
होउनि स्वरूपीं निर्भर । आनंदरूप जहालों ॥१०॥
जैसी आफिमियासि आफु मिळे । गिळुनि जाय आफूचे गोळे ।
फिरोनि जाती नेत्रबुबुळें । शुद्धी नाहीं देहाची ॥११॥
ब्रह्मरस लावोनी होटीं । माईक झुगारिली वाटी ।
तैशा उभयपक्षीं गोष्टी । सांडुनि स्तब्ध राहिलों ॥१२॥
आसो तो ब्रह्मचारी खरा । माया कामिनीचा अंगवारा ।
नातळे जयाचिये अंतरा । व्रतधारा अखंड ॥१३॥
त्यासि त्यासि करोनि म्यां नमना । रेवताचळाची प्रदक्षिणा ।
करावयालागी जाणा । प्रारंभ केला तेथुनि ॥१४॥
करितां एक प्रदक्षिणा । सहा योजनें होत गणना ।
तयामाजी वृक्षपाषाणा । उल्लंघूनि जावें पैं ॥१५॥
चैत्र - वैशाखाचें उष्ण । त्यामाजी अनवाणी चालणें ।
बहुत कंटक मार्ग कठिण । उल्लंघूनि जातसे ॥१६॥
आंगीं वैराग्य कडकडाट । टाकुनिया चांगली वाट ।
पर्वतावरी अफाट । चालुनिया र्पै जावें ॥१७॥
मार्गालागीं करितां क्रमण । कोणीकडे उगवला दिन ।
रात्र अंधार दारुण । हेंही ठावें न व्हावें ॥१८॥
क्षुधा लागली असतां जाण । करावीं वनफळें भक्षण ।
दों चव दिवसांनंतर अन्न । मिळालें तरी भक्षावें ॥१९॥
तोहि असला जरी ब्राह्मण । तेणें दिधलें स्वइच्छें करून ।
तरि मग स्वयंपाका लागून । पात्र नाहीं जवळिकें ॥२०॥
पीठ आणि दुसरें मिष्ट । पदरीं बांधुनि बळकट ।
पाहुनि नदीचा तटांक । शुभा वेचुनि आणाव्या ॥२१॥
तयांचें जगरें चेतवून । स्नानसंध्येसि सारून ।
पाहुनि चांगला पाषाण । पिष्ट त्यावरी तिंबावें ॥२२॥
तयाचे पानगे करावे । जगर्‍यावरि भाजुनि घ्यावे ।
उदार चित्त करोनि खावे । मिष्ट तोंडीं लावूनी ॥२३॥
कोरडे न गिळवले जरी । मग कुस्करावी ते भास्करी ।
कालवूनि उदकामाझारी । गिळूनिया जावी पैं ॥२४॥
एवं भोजनातें सारून । सवेंचि करावें गमन ।
उदास करोनिया मन । विश्रांति कोठें न घ्यावी ॥२५॥
ऐसें एकमास पर्यंत । प्रदक्षिणा केल्या बहुत ।
तंव रात्रीं येवोनी स्वप्नांत । दत्तात्रय बोलती ॥२६॥
म्हणती ऐकारे निरंजना । पुरे करी रे प्रदक्षिणा ।
जाई द्वारकापट्टणा । कृष्णदर्शन घ्यावया ॥२७॥
आतां जरी तूं न जाशी । तरि पुढें दुष्काळ तये देशीं ।
पडोनि अन्न खावयासी । न मिळेचि सर्वथा ॥२८॥
मी कोण ह्मणशील जरी । माझें नांव दत्तपुरी ।
वचन ऐकोनि निर्धारीं । जाय आतां त्वरेनें ॥२९॥
मग मी होवोनि जागृत । विचार केला मना आंत ।
आज्ञापिलें श्रीगुरूनाथें । तयापरी करावें ॥३०॥
प्रदक्षिणा करोनी समाप्त । निघता झालों मी त्वरीत ।
मिळाली बहुत सांगात । द्वारकेसि जावया ॥३१॥
तयांचे समागमें करून । पावलों द्वारकापट्टण ।
करोनि गोमतीचें स्नान । विष्णुदर्शन घेतलं ॥३२॥
तीर्थविधीतें सारून । बाह्यप्रदेशीं दैवत पूर्ण ।
घ्यावया तयाचें दर्शन । तृतीयदिनीं निघालां ॥३३॥
पंचकूपसंगम नारायण । चक्रतीर्थ चमत्कारिक पूर्ण ।
तयांत अस्थि झालिया पतन । चक्रे होतीं तयांचीं ॥३४॥
त्यामाजी करोनि स्नान । घेतलें सिद्धेश्वरदर्शन ।
रुक्मिणीदेवी रुसून । बैसली ते वंदिली ॥३५॥
भद्रकाळीतें नमोनि । आशोक वृक्षा अवलोकोनि ।
बहुता तीर्थांचिया श्रेणी । वंदिता झालों आदरें ॥३६॥
चतुर्थ दिवशीं तातडी । उतरोनि समुद्राची खाडी।
जाउनीया पैलथडी । बेट दृष्टी देखिलें ॥३७॥
तेथें श्रीकृष्ण आपण । दुष्ट यवनाचिये भयेन ।
निघुनिया द्वारकेहून । बेटीं जावोनि राहिले ॥३८॥
तयांचें घेउनिया दर्शन । करिता झालों साष्टांगनमन ।
नूतन कविता करून । श्रीहरिगुण वर्णिले ॥३९॥
कंठ सद्गदित होऊन । प्रेमाश्रु टाकिती उभय नयन ।
यात्रेकरू सर्वहि जन । पहाती येवोनी दृष्टीसी ॥४०॥
स्तुति करिति वारंवार । ह्मणती धन्य सद्गुरु उदार ।
यास दिधला कवित्व - वर । श्रीहरिगुण वर्णावया ॥४१॥
राजे मंत्री सर्वहि जन । येवोनिया धरिती चरण ।
कोणी देती आलिंगन । निजभावें करुनी ॥४२॥
ऐसे झाले तीन दिन । मग करोनिया समुद्रस्नान ।
जावोनी शंखनारायण । दृष्टीलागीं पाहिला ॥४३॥
करोनि शंखासुरमर्दन । सवेंचि केलें उद्धारण ।
अद्यापि चमत्कार पहाणें । शंख तेथें निघती ॥४४॥
असो करुनि प्रदक्षिणा । तीर्थ दैवतें पाहिलीं नाना ।
सवेंचि श्रीकृष्णदर्शना । घेता झालों आदरें ॥४५॥
देवाप्रती आज्ञा मागून । निघता झालों न लगतां क्षण ।
गोपी गळाल्या तें स्थान । दृष्टीलागीं पाहिलें ॥४६॥
रेवताचळाची आठवण । होतांचि निघालों तेथून ।
सहा दिवसां माजी जाण । गिरनारासि पाहिलें ॥४७॥
राहिलों सहा कोसावरी । तंव ते दिवशाचिंये रात्रीं ।
अवधूत येवोनि स्वप्नांतरीं । मधुरोत्तरीं बोलती ॥४८॥
चाल रे ऊठि कां लवकर । मज जानें आहे सत्वर ।
वृथा वाउगा उशीर । लाऊं नको सर्वथा ॥४९॥
तंव जागृत होवोनी बैसलों । रात्रींच मार्गासी लागलों ।
दिन उगवावया गेलों । तया पर्वता माझारी ॥५०॥
उंची पावणेदोन योजन । माध्यान्ही होतां गेलों चढोन ।
कमंडलूचें करूनि स्नान । शिखरानिकटीं पातलों ॥५१॥
तंव अंतरीं झाली आठवण । गुरुआज्ञेचियाप्रमाण ।
संख्या भरत आले दिन । राहिले तीन शेवटीं ॥५२॥
अंतरीं त्याग आयुर्भाव । उठोनि वस्त्रें वाटिलीं सर्व ।
श्रीगुरुभेटीचा उत्साव । अंतर्यामीं दाटला ॥५३॥
तेथील गोसावियापासून । व्याघ्रांबर घेतलें मागून ।
भस्म चांगलें पाहून । बहुत बांधोनी घेतलें ॥५४॥
तया गोसावियाप्रती । वदता झालों वचनोक्ति ।
श्रीदत्ताचे दर्शनाप्रती । शिखरावरुतें जातों मी ॥५५॥
तुह्मां सांगतों एक प्रमाण । झालिया दत्तात्रय - दर्शन ।
चवथे दिवशीं मी येईन । भेटीलागी तुमचे ॥५६॥
नाहीं तरी हेचि भेटी । आजचि बुडाली सर्व सृष्टी ।
असेल माझिये अदृष्टीं । तैसें घडो सुखरूप ॥५७॥
ऐसे सांगोनी तयाप्रती । निघता झालों सत्वर गती ।
जावोनिया शिखरावरुती । गुरुपादुका पाहिल्या ॥५८॥
होवोनिया प्रेमभरिता घातलें साष्टांग दंडवत ।
एकाग्र करोनिया चित्त । ध्यान दृष्टी पाहिलें ॥५९॥
आसन घालोनिया दृढ । बैसता झालों पादुका पुढें ।
घालोनि देवासी साकडें । निश्चय करोनि बैसलों ॥६०॥
पूर्व दिशेसि मुख करून । केलें रघुनाथगुरुस्मरण ।
आतां करावें धावण । गुरुराया ये काळीं ॥६१॥
तुह्मी बोलिले जे वचनोक्ति । दतात्रय तुज भेटती ।
त्या दिवसाची भरती । पूर्ण झाली या काळीं ॥६२॥
आतां धावण्या धावून । करवावें दत्ताचें दर्शन ।
नाहींतरी माझा प्राण । जाऊं पाहे या काळीं ॥६३॥
सवेंचि करोनि नामस्मरण । आठविले दिगंबरगुण ।
बोलता झालों करुणावचन ।ऐका चित्त देउनि तें ॥६४॥
हे पतितपावन दिगंबरा । हे अवधूतरूपा सर्वेश्वरा ।
दत्तात्रया पूर्णावतारा । परब्रह्मा येई कां ॥६५॥
कृष्णरूपा सर्वेश्वरा । हे त्रयिदेवाचिये अवतारा ।
हे भवभयतापरसंहारा । करुणाकरा दे भेटी ॥६६॥
हे शंखचक्रकमंडलु - धरा । हे त्रिशूळडमरुमालाकरा ।
षड्भुज ऐश्वर्य - धरा । कृपकरा धावे कां ॥६७॥
जाहला एक संवत्सर । मार्ग पाहिला आजवर ।
आतां देह वृथा भार । ठेवूं कशासाठीं हा ॥६८॥
जैसा दे वीस नवस केला । बस्त घेऊनि वाहिला ।
येतां त्याचा समय वहिला । वधोनिया टाकिती ॥६९॥
तैसा हा देह तुज वाहुनी । सोडिलें इंद्रायणीचें पाणी ।
गुंतली होती माझी वाणी । आजवरी त्या बोला ॥७०॥
ते हे पूर्ण भरले दिन । शेष राहिले आहेत तीन ।
तयांची ही भरती जाण । होईल एथेंचि बैसोनी ॥७१॥
मग देह तुज वाहून । मोकळे होऊं सर्वागुण ।
पावोनिया शुभमरण । मान्य होऊं सर्वत्रीं ॥७२॥
परि अंतरीं पूर्ण भरवसा । अझोनी आहे जगदीशा ।
ठायीं ठायीं माझिया क्लेशा । निवारित आलासी ॥७३॥
अंकोलीयामाजी जाण । स्वप्नवत दिधलें दर्शन ।
मंत्र अष्टाक्षरीं सांगून । गुप्त झालेती ते काळीं ॥७४॥
अनेकप्रकारीचें भाषण । स्वप्नामाजी केलें जाण ।
त्याचा ग्रंथची लिहून । आत्मप्रचीती ठेविली ॥७५॥
जयापरी स्वप्नीं दर्शन । देवोनि केलें संरक्षण ।
तैसे यया काळीं आपण । साक्षात् दर्शन द्यावें जी ॥७६॥
ऐसें ह्मणोनी वारंवार । स्तविता झालों दिगंबर ।
नेत्रीं प्रेमाश्रूचे पूर । ददोदित वाहती ॥७७॥
रघुनाथ कृपेंकरून । होईल साक्षात दर्शन ।
संशय राहित्य होऊन । धैर्य धरिता जाहलों ॥७८॥
श्रोत्यांलागीं निरंजन । विनवीतसे कर जोडून ।
पुढील कथेसि अवधान । सावधपणें देईजे ॥७९॥
इतिश्री साक्षात्कारग्रंथ । संमत श्रीगुरुरघुनाथ ।
दत्तात्रय मूर्तिमंत । गुरुकृपें भेटले ॥८०॥
॥ श्री दिगंबरार्पनमस्तु ॥

N/A

References : N/A
Last Updated : November 21, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP