जगाची रीत

नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे


एकदा एक माणूस गेला रानामध्ये. मुलांना घोडे घोडे खेळायला त्याला लांब आणि बारीक असे बांबू पाहिजे होते. ते तर काही लवकर मिळेनात. शेवटी टेकडीवर जाता जाता, तो आला उंच अशा एका दगडाच्या राशीजवळ तिथे जो जातो, तो आपले कुणीतरी मोठ्याने कुंथते आहे, आणि कण्हते आहे ! जसे काही कोणी मरायलाच ठेपले आहे. म्हणून तो गेला राशीवर. हो, कोणी संकटात असले तर सोडवायला. वर गेला आणि पाहतो तो एक मोठा सपाट शिला पडलेली . मग त्याला समजले की, त्या शिळेखाली कोणीतरी कण्हते आहे. पण ती त्याला थोडीच उचलते आहे ! कितीतरी माणसे पाहिजेत ती उचलायला ! आता काय करावे ? आला पुनः खाली. एक झाड तोडले, आणि ते चांगले साफसूफ करून, खोडाचे एक टोक पहारीसारखे दोन बाजूंनी चपटे केले. ते घेतले आणि आला वर शिळेपाशी अन् खोड तिच्याखाली घातले आणि दिली शिला उलथून ! तो अरे बापरे ! केवढा भयंकर नाग तो ! फूं फूं करीत आला त्याच्या अंगावर; आणि म्हणाला, “ मी आता तुला खाणार ! ”
तो माणूस म्हणाला, “ शाबास ! तुला चांगले वाचवले ! आणि म्हण मी खाणार ! लाज नाही वाटत ! चांगले उपकार फेडतोस ! ”
नाग म्हणाला, “ केले असशील उपकार, नाही कोण म्हणतो. पण तुला नाही येवढे समजत ? या शिळेखाली किती वर्षांचा उपाशी मी ? एक घासभर सुद्धा खाल्ले नाही ! आणि तुला मी खातो, यात वावगे काय आहे ? जो आपला फायदा करतो, त्याचे उलट नुकसान करायचे ही तर जगाचीच रीत आहे ! ते काही नाही, मी तुला खाणार. ”
त्या बिचार्‍याने पुष्कळ सांगून पाहिले. नागाच्या हातापाया पडला. मग कसे तरी दोघांचे ठरले की, जो कोणी पहिल्याने भेटेल त्याला आपला पंच नेमायचा. मग तो माणूस असो, जनावर असो, कोणीही असो. तो जो निकाल देईल, तो दोघांनाही कबूल. पंचाने सांगितले की, “ नागाने माणसाला खावे ” तर माणसाने ते ऐकायचे. बरे उलट त्याने निकाल दिला, तर नागानेही माणसाला मुकाट्याने जाऊ द्यायचे असे ठरले.
आला पहिल्याने एक म्हातारा शिकारी कुत्रा. टेकडीखालून चालला होता. रस्त्याने धावत, त्यांनी त्याला हाक मारली, आणि सांगितले की, “ आमच्या येवढ्या खटल्याचा निकाल कर. ”
कुत्रा म्हणाला, “ देवाला ठावूक आहे ! कशी लहानपणापासून मी धन्याची नोकरी केली आहे. अन् कशी नाही. इतके दिवस सारखा रात्री पहारा केला. चोरांपासून, आगीपासून कितीतरी वेळा घर वाचवले. नेहमी त्याला सुखाची झोप. असे असून आता मलाच गोळी घालून मारतो आहे ! म्हातारा झालो. दिसत नाही, ऐकायला येत नाही, हा काय माझा दोष ! आलो जिवासाठी कसातरी धावत लपत छपत दारोदार भीक मागत फिरायचे आता ! मग आहेच शेवटी उपाशी मरायचे. काही नाही ! जगाची रीतच आहे अशी ! मरेमरेपर्यंत काम करावे, आणि शेवटी आपल्यावर मरायची पाळी ! ”
“ चल ! आता तुला मी खाणार ! ” असे म्हणून आला धावून नाग माणसाच्या अंगावर. पुनः बिचार्‍याने गयावया केली, पाया पडला. ठरले मग आणखी एकदा; की, जे कोणी आता येईल. त्याच्या पुढे पुन्हा खटला मांडायचा. ‘ नागाने माणसाला मारायचे ’ असा पंचाने निकाल दिला, तर माणसाने ते ऐकायचे. निकाल उलट दिला, माणसाने चालते व्हायचे.
इतक्यात एक म्हातारा घोडा, लंगडत लंगडत आला टेकडीखाली. त्याला त्यांनी हाक मारली; आणि सांगितले की, “ आमच्या खटल्याचा निकाल कर. ” तो ऐकायला तयार होता, नव्हता असे नाही.
घोडा म्हणाला, “ पहा बरे आता ! इतकी वर्षे धन्याची नोकरी केली ! गाडी ओढली, ओझी वाह्मली, घामाघूम होईपर्यंत सारखे कष्ट केले ! आता मी म्हातारा झालो; चालवत नाही. लंगडतो आहे, त्याला मी काय बरे करू ! पण न्याय पहा कसा आहे ! काम करीत नाही म्हणून खायला नाही ! वर आणखी गोळी घालून धनी मलाच मारतो आहे. काय म्हणावे या जगाच्या रीतीला ! सारखे मरमर काम करावे, तो उलट आपल्याच गळ्याशी ! ”
“ हे पहा ! झाले आता ! ” असे म्हणून आ पसरून आला नाग त्याला गट्ट करायला. झाले, पुनः त्या बिचार्‍याने धडपड केली, पाया पडला, पण नाग थोडेच ऐकतो आहे. तो म्हणाला, “ मी भुकेने मरतो आहे ! अन् तुला वाचवू कसा ! ”
“ तो पहा आला एकजण. खटला तोडायला जसे कोणी पाठवलेच आहे त्याला ? ” असे म्हणून त्या माणसाने एक कोल्हा ये होता तिकडे बोट दाखवले. तो दगडांच्या राशीतून हळूच कोल्हा आला वर. मग तो बुवा म्हणाला, “ हे पाहा आता इज्या, बिज्या, तिच्या. तिघांचा जो न्याय तो देवांचा न्याय. कारण मुख्य देव तीन. ब्रह्मा, विष्णु अन् महेश. तेव्हा आता कोल्हा जो निकाल देईल, तो शेवटचा. मग तो कसाही देवो. ”
“ ठीक आहे, ठीक आहे, काही हरकत नाही, कबूल. ” असे दोघांचे ठरले. मग त्या माणसाने पुन्हा सगळी हकीकत कोल्ह्याला सांगितली.
“ हो, हो, आले सगळे लक्षात ” असे म्हणून कोल्ह्याने काय केलं ? अंमळ त्या माणसाला बाजूला घेतले आणि हळूच त्याच्या कानात विचारले, “ या नागाच्या जबड्यातून तुला वाचवले, तर तू मला काय देशील ? ”
“ मला वाचवले तर ? दर गुरुवारी रात्री खुशाल माझ्या वाड्यात ये. तिथे असतील तितकी कोंबडी, बदके तुझी ! ”
मग कोल्हा म्हणाला, “ हे पहा नागूमामा !!! हा खटला आहे बराच भानगडीचा. कारण असे पाहा. येवढे मोठे तुम्ही ! त्या शिळेखाली आलात तरी कसे ? अहो पुष्कळ विचार केला मी. पण टाळक्यातच शिरत नाही ! ”
त्यात रे काय आहे ! असाच एक दिवस मजेने उन्हात बसलो होतो, तो वरून कडा तुटला आणि पडली ही शिळा माझ्या अंगावर. ”
कोल्हा म्हणाला, “ असेल तसे, नाही असे नाही. पण जरा कठीणच आहे. अन् माझे तर बोवा असे आहे की, स्वतः पाह्यचे, आणि मग खरे मानायचे. ”
“ असे कशाला ? एकदा समक्ष करूनच पाहानात ”, असे माणसाने म्हटल्याबरोबर नाग गेला बिळामध्ये इकडे डोळ्याचे पाते लवते न लवते तोच माणसाने खोड घेतले, अन्  दिली शिळा बिळावर उलथून !
“ अस्सा ! बैस आता मरेपर्यंत तिथे ! चांगला जीव वाचवला. तो उलट खायला निघाला ! काय रे खातोस का आता ? ”
असे कोल्ह्याने म्हटल्याबरोबर नागोबा लागले कण्हायला, अन् कुंथायला. “ आता नाही, मला सोडवा ! ” असे लागले रडायला. पण दोघे थोडेच ऐकतात. ते गेले निघून.
मग गुरुवार यायचा अवकाश. रात्री कोल्होबाची स्वारी आली डुलत डुलत. पुष्कळशी लाकडे पडली होती. त्या ढिगाच्या आड बसला लपून; मोलकरीण वाड्यात दाणे घालायला आली, तसाच हळूच तिच्या नकळत हाही शिरला आतमध्ये. ती जो परत जाते, तो याने केला सपाटा सुरू. कोंबडी, बदके पार फडशा ! आठ दिवस म्हणून खायला नको. खूप भराभर भरले ! मग हलवते आहे कुठे ! सकाळी मोलकरीण येऊन पहाते तो हे राजश्री पडलेले, खुशाल पाय पसरून. उन्हात घोरत आहेत. असा तट्ट फुगला होता की, काही पुसू नका !
मोलकरणीने पाह्यले, आणि गेली धावत मालकिणीकडे. मग ती, आणखी काही बायका, अशा आल्या धावून. कोणी त्याला काठ्या मारताहेत, कोणी केरसुण्या मारताहेत असे बदड बदड बदडले त्याला की, काय सांगू तुम्हांला ! सगळ्यांनी जाअ काही त्याचा जीव काढला ! इकडे कोल्ह्याला तर खास वाटले, आता आपले भरले. इतक्यात त्याला एक भोग दिसले. मग त्यातून हळूच कसातरी बाहेर पडला. लंगडत फरफटत निघाला रानाकडे.
पुढे जाता जाता कोल्हा काय म्हणतो, “ अरे अरे ! कसा चांगला उपयोगी पडलो, अन् उलट मीच जीवाला मुकलो. करे आहे ! उपकाराची फेड अपकाराने, अशी जगाची रीत आहे ! ”

‘ ज्योत्स्ना ’ दिवाकर विशेषांक ऑक्टोबर १९३७

N/A


References : N/A
Last Updated : November 11, 2016