दिवा मोठा कसा झाला !

नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे


थंडीचे दिवस. आठ वाजले असतील नसतील. खोलीतील सामानसुमान झटकून काही तरी वाचायला म्हणून बसलो मी. इतक्यात खिडकीखाली रस्त्यात एक मोटार येऊन थबकली.
“ माझ्याकडे... अन् मोटारीतून कोण बुवा ! ” असे म्हणून खिडकीतून जो डोकावतो आहे. तोच मोटारीचे दार उघडून काळा कोट घातलेले लठ्ठसे एक गृहस्थ बाहेर पडले. पाहतो तो आमचे मित्र सरदार नानासाहेब !
“ कोण नानासाहेब ? तुम्ही... आणि मोटारीतून ? काय आहे काय विचार ! ”
“ थांब, वर येतो, आणि सांगतो तुला काय विचार आहे तो ! ”
वास्तविक दोघेही आम्ही भिन्न परिस्थितीतले. पण लहानपणापासून जन्म सगळा एकाच आळीत गेलेला, आणि शिकलो तेही एकाच शाळेत. तेव्हा बोलण्याचालण्यात अरे काय, अन् अहो काय सारखेच.
“ काय ? वाचीत बसला आहेस ना ! राम ! राम ! पुस्तकातला किडा तू, पुस्तकातल मरायचास ! ”
असे म्हणून स्वारी समोरच आमच्या येऊन बसली. हातात त्यांची अर्धांगी, म्हणजे सिगारेट होती हे सांगायला नकोच.
“ अरे नानासाहेब, काय हे सिगारेट्स् ओढणं ! जरा तरी अमळ... ” असे मी म्हटले मात्र, तोच ते उसळून म्हणाले, “ तुला त्यातले काय समजतं आहे ! कधी ओढायची नाही, सवरायची नाही ! काय तुला त्यातली लज्जत ठाऊक ! ”
“ सगळं खरं ! पण काहीतरी... ”
“ आता एक अक्षर तर बो, की पेटीतलं हे जुडगंच्या जुडगं तुझ्या तोंडात कोंबतो, अन् सगळ्या एकदम तुला ओढायला लावतो की नाही बघ ! ”
मी मोठ्याने हसत म्हटले, “ हा मात्र कठीण प्रसंग ! ”
“ कठीण म्हणजे ! गाठ कुणाशी आहे ! तू, लेका हा... असाच ! बरं, आता काय सांगतो ते नीट ऐकून घे ! आज रात्री माझ्याकडे गाण्याला, आणि बरोबर बाराला उद्या जेवायला..... ”
“ जरूर ! जेवायला अगदी जरूर येतो मी. ”
“ नुसतं जेवायला नाही.. गाण्याला आधी आलं पाहिजे ! जागरणाबिगरणाची काही एक सबब चालायची नाही ! येऊ तर नकोस, की सडकीत तुला इथून नेतो की नाही बघ ! ”
“ अरे पण भाई, हे सगळं कशाकरिता ? ”
“ काही कारण नाही, अन् काही नाही ! लहर, बस्स ! आलं मनात, ठरवलं झालं ! उठल्याबरोबर सकाळीच त्र्यंबकरावाकडे गेलो अन् त्याचीच मोटार घेऊन निघालो आहे हा असा... ”
तरीच ! नाही तर म्हटलं.... नानासाहेब ! आणि त्यांनी मोटार इतक्यात कशी घेतली ? ”
“ अरे घेईन ! वेळ आली म्हणजे मीही घेईन ! घेतल्याशिवाय सोडतो होय ! बहुतेक पुढच्याच खेपेला मुंबईला गेलो म्हणजे... ”
“ हो ! बरी आठवण झाली ! ” मधेच थांबवून त्यांना म्हटले, “ आल्याबरोबरच विचारणार होतो की... परवा जे मुंबईला गेला होतात त्याचं काय झालं ? ”
“ व्हायचं काय ? ” नानासाहेब सिगारेटची राख झाडीत म्हणाले “ व्हायचं तेच झालं ! ”
मी विचारले, “ पण तेच काय ते सांगाल तर खरं ! ”
“ सांगायचे म्हणजे इतकेच, की शहाण्याने या त्रिंबकच्या भानगडीत पुन्हा पडू नये ! ”
“ का ? पुन्हा फिसकटलं वाटतं ? ”
“ जन्माचेच रडे तुम्ही ! तो आणि तू एकाच माळेतले ! स्वतः काही हातपाय हलवायचे नाहीथ बरे, चार मित्रमंडळींनी, आणि घरच्या माणसांनी थोडीफार उचल खावी, तर तुम्हीच आयत्यावेळी... ”
क्षणभराने मी म्हटले, “ माझं एक असो म्हणा, पण त्रिंबकरावानं असं का करावं ते समजत नाही ! हे... असं तिसर्‍यांदा झालं ! ”
“ अरे, या, वेळेला तर अगदी नक्की व्हायला आलेलं. स्वतः आमच्याबरोबर चांगला आला. मुलगी पाहली, ती त्याला पसंतही पडली. इतकंच नाही, तर तिथं लग्नाचा रुकारही दिला त्यानं ! ”
“ आणि मग ? ”
“ मग काय ? घरी परत आल्यावर ‘ नको बुवा ! ’ म्हणून बसला हातपाय गाळून ! ” तेव्हा दोन तीन मिनिटं कशाकडे तरी पहात दोघीही आम्ही स्वस्थ बसलो.
मी म्हटले, “ मोठे विलक्षण आहे बुवा ! इतकी सगळी अनुकूलता असून... हे असं का करतो काही कळत नाही ! ”
“ बैस त्याचा तू आता विचार करीत ! मला नाही वेळ, सर्वांकडे अजून जायचे आहे मला ! ” असे म्हणून झटकन ते निघून गेले !
“ काय आहे कोणास कळे ! ”असे जो मीमनात पुटपुटतो आहे, तोच ‘ गुडगुड ’ करीत खिडकीवाटे एक भुंगा आत शिरला. तेव्हा त्याच्याकडे माझे लक्ष कितीतरी वेळ त्याचे ते गुणगुणणे, आणि इकडे माझ्याही डोक्यात ‘ हे असे का ? हे असे का ? ’ असे...

पुढे दोन चार दिवसांनी दिवे लावण्याच्या वेळी त्रिंबकरावांकडे गेलो मी. ते घरात नव्हते. म्हणून तसाच तडक माडीवर दत्तोपंतांकडे गेलो. दत्तोपंत हे त्रिंबकरावाचे धाकटे बंधू. मुंबईच्या मेडिकल कॉलेजमध्ये त्यांचे दुसरे वर्ष चालू होते. पण त्यांचे वय आणि अभ्यास यांच्या कितीतरी पलीकडे त्यांचे मन गेले होते ! पाचसहा वर्षांनी माझ्यापेक्षा ते लहान. असे असून त्रिंबकरावांशी फारसे न बोलता, मी आपला आधी दत्तोपंतांकडेच धावे !
“ यावं ! ” अंथरुणावर पडल्या पडल्याच हसत हसत माझ्याकडे पहात दत्तोपंत म्हणतात, “ अहो, काय तुमची किती वाट पहावी हो ! म्हटलं आज याल उद्या याल... ”
“ पण तुम्ही इथं आला असाल, याची मला कल्पनाच जर नाही... ”
“ काय, कल्पना काय नाही ! त्रिंबकरावांच्या बरोबर आलो मी ! ”
“ आणि परीक्षेचे ? ”
“ अहो, कसली परीक्षा अन् काय ! ” दत्तोपंत म्हणाले, “ प्रकृती सांभाळून जे होईल ते होईल ! ”
इतक्यात नोकराने आत येऊन टेबलावरील दिवा लावला आणि तांब्याभांडे वगैरे घेऊन जाऊ लागला. तोच दत्तोपंताने, “ दिवा अमळ बारीकच ठेव, आणि खाली जाऊन ताईंना म्हणावे, वर दोन कप चांगला कोको पाठवून द्या. ” असे त्याला सांगितले.
“ अहो, काय दत्तोपंत हे ? माफ करा बुवा ! कोको वगैरे घेण्याची वेळ का आहे ही ? ”
“ अहो, कसली वेळ अन् काय ! आणि... कोको बरा लागतो म्हणून थोडाच घ्यायचा आहे ! आनंदमय खरा प्राण आहे ! काय ? ”
“ खरं आहे ! ” हसत हसत मी म्हटले, “ बरं पण दत्तोपंत, औषध वगैरे चालूच आहे ना ? ”
तेव्हा ते म्हणाले, “ आहे सगळे ठीक आहे. पण खरं सांगू तुम्हाला ?... इथल्या गोष्टीवरून माझे मनच उडल चाललं आहे. आताशा असं एकटं दुकटं बसावे, आणि... काही तरी वेगळ्याच गोष्टीचा विचार करावासा वाटतो... हो बरं झालं... काय म्हणत होतो मी... ? हां बरोबर तुमच्याकरता म्हणून, आम्ही एक चीज आणली आहे मुंबईहून ! ओळखा कोणती ती ? ”
मी म्हटले “ एखादी छानदारशी काठी असेल बहुधा ? ”
“ अहो काठी ! ती तर आणलीच आहे. पण दुसरं काय ते बोला ? ”
“ नाही बोवा, आपली अगदी शरणचिठी आहे ! ”
तेव्हा ते म्हणाले “ अहो मला कशाला ! प्रत्यक्ष त्या वस्तूलाच आता शरण जायला लागतो !... अरे रघुवीर ! खाली रघुवीर आहे का ? असला तर द्या बरं वर लावून ? ”
“ बरं, अलीकडे अवांतर वाचन वगैरे काही ? ” सहज आपले विचारलं मी, “ टॉल्स्टाय्च्या गोष्ती झाल्याच असतील वाचून ? ”
तेव्हा हसत हसत ते म्हणाले, “ हां, चाललाय येत आता आमच्या गोष्टीजवळ ! बरं, अजून तरी ओळखा ! ”
तो मी अधिकच बुचकळ्यात पडलो ! म्हटले, “ एखादे पुस्तकबिस्तक आणले आहे की काय टॉल्स्टॉयचे ! ”
तेव्हा अधिकच हसून आलेल्या रघुवीरकडे वळून दत्तोपंत म्हणतात, “ अरे, रघुवीर, पलीकडच्या त्या दिवाणखान्यात त्रिंबकरावांच्या ट्रंकेत कागदाचे एक भेंडोळे आहे, ते तेवढं आण बरं ! ”
शेवटला ‘ बरं ’ ! शब्द उच्चारताना दत्तोपंतांची मुद्रा, विशेषतः डोळे खरोखरच पहाण्यासारखे होते !!
रघुवीर कागदाचे ते भेंडोळे हातांत घेऊन आत आला. आणि ते आपल्या चुलत्याच्या हातात देणार, तोच ते म्हणाले, “ दे, त्यांच्याच हातात दे ते ! पहातील ते आत काय आहे ते ! ”
भेंडोळे उलगडून पहातो तो टॉलस्टॉयच एक छानदारसा फोटो !
घरादाराला अजिबात फाटा दिलेला, डोक्याला काही नाही, आणि चालली आहे स्वारी अनवाणी भटकत ! सगळी संपत्ती काय ते खिशातले बाय्बल् ! हा एकंदरीत टॉलस्टॉयसाहेबांचा धाट !
मी म्हटले, “ फोटो खरोखरच चांगला आहे. मला हवा होता तस्सा आहे. तेव्हा आभार काय, जितके मानावेत तितके थोडेच आहेत ! ”
“ आमच्या रघुवीरालाही तो फार आवडला ! रघुवीर, जाऊन आलास का देवाला ? ” दत्तोपंतांनी आपल्या पुतण्याला विचारले.
“ नाही अजून, आता जायचं आहे ” असे रघुवीरने उत्तर दिले, आणि तो जायला निघाला.
“ बरे, जाताना कोणाला तरी घेऊन जा हं ”
“ हो ! ” असे म्हणून तो निघून गेला.
दारात काळोख होता. एक दोन मिनिटे तरी दत्तोपंत तिकडे पहातच राहिले, तेव्हा कोणते गोड चित्र त्यांच्या डोळ्यापुढे खेळत होते ?
मी विचारले, “ रोज हा देवाला जातो का ? ”
“ हो, दुसरे काय हवे ते चुकेल, पण देवदर्शन त्याचे कधी टळायचे नाही ! ”
“ कोणत्या देवाला जातो रोज ? ”
“ तुळशीबागेतल्या रामाला. त्याची आई होती, तोपर्य्म्त तिचा रोजचा क्रम असे, आणि बरोबर यालाही ती नेत असे ! खरोखर, मुलगा तसा मोठा... आम्ही सगळेजण थोडेफार भिऊनच असतो त्याला ! ”
“ असे ? ”
“ कल्पना नाही तुम्हाला ! पोर मोठं मातृभक्त आहे ! आई गेली तेव्हा हा काय सहा - सात वर्षाचा असेल, पण... ”
किंचित् डोकावून ते कानोसा घेत दाराकडे पाहू लागले.
तेव्हा मी हळूच म्हटले, “ कोणी नाही तिथं, सांगा खुशाल. ”
“ याची आई गेली, अन् दुसर्‍या दिवसापासून हा आपला... आजारी पडायच्या आधी ती जी चंद्रकळा नेसली होती, तिचीच घडी उशाला घेऊन हा आपला रोज निजायला लागला ! ”
तेव्हा क्षणभर आम्ही एकमेकांकडे पहातच राहिलो !
दत्तोपंत डोळे पुसून म्हणतात, “ रोजचा त्याचा हा क्रम आहे ! स्नान केल्यावर ती चंद्रकळा पाण्यात बुचकळून, पिळून काढतो, आणि... स्वतः ती वाळत घालतो. दुसर्‍या कोणाला हात लावू देत नाही ! ”
“ असं रोजचं आहे हे ? ” आश्चर्याने थक्क होऊन म्हटले मी !
“ अगदी रोजचं आहे ! आईचं लुगडं स्वतः धुवायचं, अन् त्याचीच घडी उशाला घेऊन झोपी जायचं ! ”
“ त्याचे वडील त्रिंबकराव याबद्दल कधी काही बोलत नाहीत ? ”
“ ते काय बोलणार ! उलट मला वाटत... बोलू नका कोणाजवळ तुम्ही आपल्या मुलाचे हे... चांगलं अभंग रहावं, चांगली त्याची जपणूक व्हावी, म्हणूनच स्वतः... दुसरं लग्न करीत नाहीत ! ”
पाचदहा मिनिटे तक्क्याला टेकून दोघेही आम्ही स्वस्थ - अगदी स्वस्थ पडून राहिलो. घड्याळाची टकटक कशी स्पष्ट ऐकू येत होती ! खोलीतील सामानसुमानावर चक्क प्रकाश पडला होता.
दिव्याकडे पहात दत्तोपंत म्हणतात, “ दिवा इतका मोठा कोणी केला हो ! ”
मी म्ह्टले, “ नाही बोवा, आपण तर इथंच बसलेलो अन् रघुवीरही तसाच गेला ! ”
“ मग एकाएकी इतका मोठा कसा झाला !! ”

‘ रत्नाकर ’, ऑगष्ट १९२७

N/A


References : N/A
Last Updated : November 11, 2016