अहो ! मला वाचता येतंय !

नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे


नुसती कोवळी उन्हे पडलेली. थंडी पडायला कुठे सुरवात झाली असेल नसे. तेव्हा ऊन खात खिडकीत बसलो होतो मी. आमचे घर कुठे आहे ते तुम्हाला ठाऊकच आहे ! अगदी तिवाठ्यावरच. समोरून, म्हणजे घराच्या डाव्या बाजूने शनवार मारुतीवरून ओंकारेश्वराकडे जाणारा रस्ता आणि त्यालाच न्यू इंग्लिश स्कूलच्या बोर्डिंगवरून दक्षिणोत्तर येऊन मिळणारा बोळ, तिथंच कोपर्‍यावर एक लहानसे घर टाकून मी बसतो ती माडी. तेव्हा अनायासे घर चांगले पूर्वाभिमुख आणि थंडीचे दिवस, म्हणून बसलो होतो मजेत मी !
इतक्यात पाठीमागून ओंकारेश्वराच्या रस्त्याने ‘ हू - ळूप ! हू - ळूप ! ’ करीत पाचपंचवीस मुले धावत आली. त्यात आणखी आमच्या शेजारच्या मुलांची भर ! मग काय विचारता ? मुलांचे ते ओरडणे आणि वानरांचे तडातड उड्या मारणे ! त्या सपाट्यात बिचार्‍या कौलांचा मात्र चुराडा ! दोन चार मोठी वानरे आणि दोन लहान पिल्ले ! आमच्या कौलांवरून समोरच्या छपरावर उड्या मारताना जेव्हा ती आईच्या पोटाला बिलगली, तेव्हा रस्त्यातल्या मुलांनी ऐसा जयघोष केला की ज्याचे नाव ते !
झाले ! हा कुठे मुलांचा आणि वानरांचा गोंधळ चालतो आहे, इतक्यात पाठीमागून सिनेमा वाजत आला ! चारपाच ब्यांडवाले आणि त्यांच्यामागे मोठमोठ्या रंगीत पाट्या असलेले दोन छकडे. तेव्हा साहजिकच वानरांकडचे लक्ष उडून, मुले ती, सिनेमाच्या छोट्या जाहिरातीसाठी धावत सुटली; आणि ‘ कालियामर्दन ’, ‘ बाळकृष्ण ’ ही पाट्यांवरील नावे मोठमोठ्याने ओरडत, जाहिराती वाटणाराच्या भोवती त्यांनी ही गर्दी केली ! पण तिथे थोडीच दाद लागते आहे ! येणारी जाणारी, किंवा दारात उभी असलेली जी मोठी माणसे त्यांनाच काय तो जाहिराती मिळण्याचा हक्क ! पोरांसोरांना कोण विचारतो ? तरी ती “ अहो, मला द्या ! आम्हांला द्या ! ” असे मोठमोठ्याने ओरडत त्या वाटणार्‍यामागे लागतच होती ! तोही “ चले जाव् ! ” असे म्हणत, व हातांनी खुणावीत वरचेवर त्यांना हाकलून देई. वाटणारा चांगला पोक्त - मुसलमान - मनुष्य होता. मोठी दाढी ठेवलेली, डोळ्याला काळा गोल चष्मा, आणि डोक्याला मोगली तांबडी टोपी. त्यात त्याच्या काळ्या चष्म्याचे खरोखर भय वाटे ! जी गरीब मुले होती, ती आपली लांब - दूर उभी !
पुढे ते ब्यांडवाले आणि ते छकडे निम्म्या वाटेवर जातात न जातात, तोच एक लहान मुलगा - सहा सात वर्षांचा असेल किंवा नसेल - जवळच्या एका घरातून त्या मुसलमानाजवळ धावत गेला. आणि सारखे, “ अहो, पण मला द्या ! मला वाचता येतंय् ! वाचून घ्या तुम्ही ! ” असे म्हणून, त्याने त्या वाटणार्‍याच्या कोटाची बाही धरली, आणि जाऊ लागला मागोमाग !
तेव्हा त्या मुसलमान गृहस्थाला काय वाटले कुणास ठाऊक ? लगेच तो थांबला, आणि, “ ऐसा ! तुला वाचता येतंय् ? ” असे म्हणून, हसत हसत. त्याने त्याच्या त्या चिमुकल्या हातात एक जाहिरात दिली, आणि “ अच्छा, पढो ! ” म्हणून वाचायला सांगितले ! आसपासची माणसे पहातच होती हे ! इकडे त्या मुलाने जाहिरातीवरील ‘ भा-र-त-सि-ने-मा ’ असे एक एक अक्षर करीत त्याला वाचून दाखविले ! त्याबरोबर त्या वाटणाराने मुलाच्या पाठीवरून ‘ शाबास ’ ! म्हणून हात फिरवला व त्याच्याकडे आणि इतर मुलांकडे हसत हसत पाहिले, आणि तो निघून गेला !
यानंतर मला वाटते, तो सिनेमाच्या जाहिराती वाटणारा महिना - पंधरा दिवसांच्या दरम्यान, दोन तीन वेळा तरी आमच्या त्या वाटेने येऊन गेला असेल. पण तो यायचा अवकाश, की तो मुलगा घरातून धावत यायचा, आणि नेमका त्या मुसलमानाजवळ जाऊन हसत हसत उभा राह्यचा ! इतर कोणाला मिळो वा न मिळो, त्याला आपली जाहिरात ही मिळायचीच  ! आणि तोही ती घेऊन, नाचत उडत, चटकन् घरात निघून जायचा ! त्यामुळे आमच्या त्या तेवढ्या टापूत हा एक मोठा कौतुकाचाच विषय होऊन बसला !
पुढे बरेच दिवस होऊन गेले. चांगला महिना दीड महिना झाला असेल. सकाळी नवाच्या सुवाराला मी काही तरी वाचीत बसलो होतो. इतक्यात आपला ब्यांडचा आवाज ऐकू आला ! उठून पहातो तो नेहमीचा सिनेमावाला !
पाहाता क्षणी धसकाच बसला मला ! का ते सांगतो आता ! तो सिनेमावाला मारुतीच्या देवळाकडे, निम्म्या वाटेवर एका घरापाशी गेला. आणि हातात एक जाहिरात घेऊन तिथे थबकला. क्षणभर थांबून - अंमळ दुरूनच - दारात डोकावून पाहू लागला ! दोन मिनिटे झाली, पाच झाली, ते बाजेवाले आणि छकडे मारुतीपुढे गेले सुद्धा ! पण हा आपला तिथेच उभा ! इतक्यात त्या घरातून एक मध्यम वयाचे गृहस्थ बाहेर आले - त्या वाड्याचे मालक ते, - आणि त्या मुसलमानाकडे पहात उभे राहिले. क्षणभर दोघेही काही बोलेनात ! नंतर लवून सलाम करून तो मुसलमान त्यास म्हणतो, “ रावसाब ! इथे एक छोकरा माझ्याकडून जाहिरात घेत होता, इथेच तो रहात होता, तो कुठे दिसत नाही ? ”
यावर ते गृहस्थ अंमळ चकित होऊन म्हणाले, “ छोकरा ? कोणता बुवा ? हां हां तो होय ! आमच्या वाड्यातल्या विष्णुपंतांचा तो गोपू ? ”
“ हा साहेब ! ” मध्येच उत्सुकतेने तो वाटणारा म्हणाला !
“ हजरत ! सात आठ दिवस झाले, तापाने वारला तो ! ”
हे शब्द कानी पडाताच तो बिचारा मुसलमान गृहस्थ जागच्या जागी स्तब्ध - अगदी स्तब्ध उभा राहिला !!
पण असा किती वेळ उभा राहणार ?
“ ऐसा ! खुदाकी मर्जी बाबा ! ” असे म्हणून व एक लांब सुस्कारा सोडून, त्याने हातातली जाहिरात हळून दारात टाकली, आणि जड पावले टाकीत तो निघून गेला !
पुढे आश्चर्य हे की, जेव्हा जेव्हा तो आमच्या बाजूला येतो, तेव्हा तेव्हा त्या दारापाशी जातो, आणि लवून, हळून एक जाहिरात आत टाकतो, व मुकाट्याने आपला निघून जातो !

‘ रत्नाकर ’ नमुना अंक, ऑक्टोबर १९२५

N/A


References : N/A
Last Updated : November 11, 2016