बाबा भेटले

नाट्यछटा हा साहित्यप्रकार मराठीत प्रथम ‘ दिवाकर ‘ यांनीच आणला. त्यांचे संपूर्ण नांव - शंकर काशीनाथ गर्गे


एक होता माणूस. तो निघाला प्रवासाला. जाता जाता आला एका मोठ्या छानदार शेताजवळ. तेथे एक मोठे घरही होते. ते इतके मोठे होते की, जसा काही एक टुमदार राजवाडाच !
म असे त्याने घराकडे पाहिले आणि पुटपुटला आपल्याशीच. “ खरेच, रातच्या रात येथे राह्यला मिळेल, तर किती छान होईल. ” असे म्हणून गेला फाटकाच्या आत. तो जवळच एका दाढीवाला म्हातारा लाकडे फोडीत उभा. त्याचे सगळे केस पिकले होते.
वाटसरू म्हणाला, “ राम राम बाबा, रातच्या रात येथे राह्यला जागा मिळेल काय ? ”
म्हातारा म्हणाला, “ अहो, मी नाही येथला बाबा. त्या तिकडे स्वयंपाकघरात जा, आणि विचार माझ्या बाबांना. ”
असे सांगितल्यावर वाटसरू गेला स्वयंपाकघरात. तो तिथे पहिल्या म्हातार्‍याहूनही एक म्हातारा ! गुडघे टेकून बसला होता चुलीजवळ फुंकीत.
त्याला प्रवाशाने विचारले, “ राम राम बाबा, रातभर येथे राह्यला मिळेल का ? ”
“ मी नाही बरे इथला बाबा, असेच आत जा, अन् पुसा माझ्या बाबांना. बसले आहेत तिथे बैठकीवर. ”
हे झाल्यावर वाटासरू गेला तिकडे, आणि लागला बोलायला तिथल्या म्हातार्‍याशी. तो तर आणखी म्हातारा. थरथर कापत किती होता, दात काय वाजत होते, बसला होता आपला खुडखुड करीत. एक मोठे बुक घेतले होते आणि वाचीत होता लहान मुलासारखे ! वाटसरू म्हणाला, “ राम राम, बाबा आजची रात्र इथे राहू द्याल मला ? ”
पण म्हातार्‍याच्याने बोलवते आहे कुठे ? थरथर थरथर कापत, दात वाजवीत, शेवटी म्हणाला कसे तरी, “ मी नाही काही इथला बाबा, पलीकडे जा. बाबा बसले आहेत तिथे बाकावर. त्यांना विचारा ! ”
पुढे वाटसरू जो जातो तो एका बाकावर आपली चिलीम भरीत बसला होता एक म्हातारा. इतका रोड झाला होता की, काही पुसू नका ! हात तरी किती कापत होते ! धड चिलीम सुद्धा धरवेना !
लगेच प्रवाशाने राम राम केला, आणि विचारले, “ बाबा, रात्रभर मला इथे राहू देता ? ”
“ मी कसे बरे सांगू ! पलीकडे आत जा आणि विचारा माझ्या बाबांना. निजले आहेत तिथे. ”
मग गेला तो आतमध्ये. एक म्हातारा तिथे आपला निजला होता. किती म्हातारा होता तो ! मोठे दोन डोळे टक लावून पहात होते म्हणून बरे ! नाही तर त्याला जिवंत म्हणायचा कसा ?
“ राम राम बाबा ! मी आजची रात्र इथे राहू का ? ”
“ कसे सांगू मी ! तिकडे माझे बाबा पाळण्यात निजले आहेत. त्यांना विचारा. ”
झाले ! वाटसरू जो तिकडे जातो, तो पाळण्यात माणून निजलेला ! म्हातारा म्हणजे किती होता तो ! इतका वाळला होता अन् रोड झाला होता की जसे काही लहान बाळच ! घसा मधून मधून वाजत होता. म्हणूनच त्याला जिवंत म्हणायचा !
वाटसरूने रामराम करून विचारले, “ बाबा ! आजची रात इथे राहू का ? ”
असे विचारले पण जबाब कुठे आहे ? पुढे बर्‍याच वेळाने म्हातारा लागला घुटमळायला. बोलता येते आहे कुठे ? मग आणखी बर्‍याच - वेळाने, लागला कसाबसा बोलायला, “ मी नाही बरे बाबा इथला. असेच पलीकडे जा. भिंतीला तिथे शिंग अडकवून ठेवले आहे. त्याच्यात आहेत माझे बाबा. ”
हे ऐकले आणि गेला तो वाटसरू आतमध्ये; चहूकडे एकदा नीट न्याहाळून पाहिले. तो शेवटी सापडले शिंग. जवळ जाऊन जो पाहातो तो तिथे काय ? शिंगाच्या तोंडाशी एक राखेचा पापोद्रा ! अन् तो तर दिसायला माणसाच्या तोंडासारखा ! ते पाहिले, आणि वाटसरू गेला घाबरून ! भीतीने गांगरून बिचारा ओरडला, “ अहो बाबा ! आजची रात्र इथे राहू देता ? ”
लागलीच त्या शिंगावाटे चिवचिवल्यासारखे ऐकू आले, जसे काही लहानसे पाखरूच ओरडले; तरी त्या वाटसरूने ओळखलेच की, “ रहा बरे बाळ ! रहा बरे बाळ ” असे ते म्हणत आहे.
इतक्यात खाली जो पहातो तो ताट वाढून तयार ! किती गोड गोड खायला ! तसेच पाणीही गार प्यायला ! मग काय? पोटभर जेवला. जेवून उठतो तो समोर बिछाना तयार पांघरायलाही तसेच झाले ! शेवटी एकदाचे “ बाबा भेटले ” म्हणून किती आनंद झाला त्याला !

‘ ज्योत्स्ना ’ दिवाकर विशेषांक ऑक्टोबर १९३७
आधारित

N/A


References : N/A
Last Updated : November 11, 2016