हा स्थूल देह अन्नमय कोश आहे, कारण अन्नापासून झालेलें मातेचें रक्त व पित्याचें रेत यापासून विटाळांत उपजला आणि मळमूत्रादि विटाळानें भरला. याला नाना विकार आहेत म्हणून हा आत्मा नव्हे. यामुळेंच अविचारानें मीपणा व ममता होते ती सर्व खोटी. त्याप्रमाणेंच देह रोडला म्हणजे मी रोडलों इत्यादिक व्यवहारही खोटा. पायास कांटा लागला, थंड, ऊन कळतें तें देहचैतन्य नव्हे. देहाला ज्ञान असतें तर, मेलेला देह हायहुय करीत असता. तर तो जळाला असतांही, हालचाल करीत नाहीं. जिवंतपणीं कळतें तें या देहाच्या आंत असणारा लिंगदेह जो, त्यांतील अहंकार आहे. त्याचें व जीवात्म्याचें तादात्म्य म्हणजे एकरूप झालेल्या अहंकारानें देहाला व्यापिलें म्हणजे देह जड असतांही चेतनासारखा भासतो. त्यामुळें देहाला समजल्यासारखा भ्रम होतो. जसें नौकेंत बसून आपण जात असतां तीरावरचीं झाडें जातात असा भ्रम होतो तें सर्व खोटें, त्याप्रमाणें देहेंद्रियें, प्राण, मन, बुद्धि, चित्त, अहंकार हें चेतनसे वाटतात तो सर्व भ्रम खोटा, असा निश्चय झाला म्हणजे मी अमक्याचा व हें माझें इत्यादिक हें सर्व खोटें ठरतें व मी सर्वांचा साक्षी व सर्वांहून वेगळा आहें असा निश्चय होतो. मग हा पिंडस्थूलदेह व येथें होणारी जाग्रत् अवस्था व याचा अभिमानी विश्वसंज्ञक आणि ब्रह्मांडदेह विराट् व याचा अभिमानी वैश्वानर हे सर्व नश्वर आणि मी साक्षिभूत आत्मा अविनाशी असा निर्धार करावा.
जसा हा तमोगुणाच्या द्रव्यशक्तीपासून स्थूलप्रपंच झाला तसा क्रियाशक्ति रजोगुणापासून पांच प्राण व पांच कर्मेंद्रियें आणि ज्ञानशक्ति सत्त्वगुणापासून पांच ज्ञानेंद्रियें व मन, बुद्धि, चित्त, अहंकार झाले. यापासून सूक्ष्मभूतरचित स्थूलदेहाचे आंत असणारा सूक्ष्मदेह म्हणजे लिंगदेह आहे; येथें स्वप्नावस्था आहे. याचा अभिमानीं तैजस. यामध्यें तीन कोश आहेत. ते हे कीं - पांच प्राण व पांच कर्मेंद्रियेम मिळून प्राणमय कोश होतो. भूक, तहान, बळ, देणें, घेणें, चालणें, बोलणें, रति, मलमूत्रात्सर्ग हे सर्व धर्म प्राणाचेच आहेत. हे क्षुधापिपासादि धर्म आत्म्याचे मुळींच नव्हेत. तसेंच पांच ज्ञानेंद्रियें व मन मिळून मनोमय कोश होतो. संकल्प, विकल्प, काम, संशय, विपर्यय, दु:ख, शोकादिक हे सर्व मनोमय कोशाचेच धर्म आहेत. या धर्मांचा आत्म्याला मुळींच स्पर्शसुद्धां होत नाहीं. तसेंच पांच ज्ञानेंद्रियें व बुद्धि मिळून विज्ञानमयकोश होतो. यामुळेंच कर्तृत्व, ऊहापोहादिक घडतें. हे धर्म विज्ञानमय कोशाचेच आहेत. आत्म्याचे नव्हेत. स्थूलदेह अधिष्ठान, अहंकार कर्ता, ज्ञानेंद्रियें पांच व कर्मेंद्रियें पांच व अंत:करण हीं कर्मसाधनभूत करणें. पांच प्राणांच्या चेष्टा आणि नेत्रादि इंद्रियादिकांच्या सूर्यादि देवता या पाचांच्या योगानें कायिक, वाचिक, मानसिक अशीं तीन प्रकारचीं कर्में होतात. तीं पापपुण्यरूपीं कर्में हीं मीं केलीं असें, आपण अकर्ता असतांही जीवात्मा आपल्यावर कर्तृत्व घेऊन बद्ध होतो आणि जन्ममरणाच्या फेरीत पडून सुखदु:ख भोगितो. या लिंगदेहाभिमानी जीवाचें नाम तैजस. लिंगदेहाचा वियोग होणें हेंच मरण जाणावें. लिंगदेहतादात्म्यानें, जीव सर्गवास, नरकवास, गर्भवास, बाल्यादि अवस्थांनीं होणारें दु:ख भोगितो.
स्थूल आणि सूक्ष्म हे दोनही देह कार्यभूत आहेत. याचें कारण अनिर्वचनीय अविद्या म्हणजे अज्ञान आहे. हाच कारणदेह. येथें निद्रावस्था. याचा अभिमानी प्राज्ञ नांवानें जीव जाणावा. या तीन देहांहून वेगळा जो त्याला प्रत्यगात्मा, साक्षी, कूटस्थ, असंग, पुरुष, त्वंपदलक्ष्य असें म्हणतात.
मुमुक्षूनें एकांतीं बसून, एकाग्र मन करून असें चिंतन करावें कीं - स्थूल, सूक्ष्म, कारण हे तीन देह व येथें होणार्या जाग्रत्, प्राज्ञ हे तीन देहाचे अभिमानी या सर्वांचा द्रष्टा, साक्षी, कूटस्थ, निर्विकार, प्रत्यगात्मा मी एकच आहें. हे सर्व गुनविकार मला लागत नाहींत. म्हणून मी असंग, अज, अजित, अविकारी, अजर, अमर, अनादि, अनंत, परिपूर्ण परब्रह्मरूपी, अकर्ता, अभोक्ता, नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त, सत्यस्वभावाचा असून अत्यंत निर्मल आहें. मी निरामय आहें. मी अक्रिय आहें. मी सदैव मुक्त आहें. मी इंद्रियांच्या व मनाच्या गतीपलीकडचा आहें. माझा अंतपार नाहीं. मला भूतभौतिक संबंध नाहीं. असा मी एकच अद्वितीय आहें. याप्रमाणें निरंतर अशा शब्दानें निश्चय करणें हा शब्दानुविद्ध सविकल्प समाधि जाणावा. अंत:करणांत ज्या ज्या कामक्रोधादि वृत्ति उठतात त्या त्या वृत्तींचा द्रष्टा, साक्षी मीच आहें. जसा पाण्यावर वार्यानें तरंग जिकडून उठतो तिकडे पाणी व जिकडे जातो तिकडे पाणी तरंगांत व त्याच्या दोन्ही बाजूंस पाणीच असतें व वारा शांत झाल्यावर केवळ एकच पाणी असतें त्याप्रमाणें मायामयवाअनेनें ज्या ज्या वृत्ति शांत झाल्यावर केवळ एकच प्रत्यगात्मा असतो तोच मी. जाग्रत्स्वप्नांमध्यें जें द्वैत असतें तें ज्यावेळीं या साक्षीपणाच्या अभ्यासानें नष्ट होतें व निद्राही येत नाहीं त्यावेळी जें सुख भासतें तोच आत्मानंद होय. त्याचा निरंतर अभ्यास ठेवावा; म्हणजे क्रमानें निर्विकल्पसमाधिसिद्धि होईल. समाधींतून उठल्यावरसुद्धां बाहेर जें जें मायिक नामरूपात्मक भूतभौतिक जड जग दिसतें त्याचें नामरूप टाकून सच्चिदानंदरूप तत्पदलक्ष्य ब्रह्म आहे तेंच मी व मी प्रत्यगभिन्न परमात्मा आहें, असें निरंतर चिंतन करावें. म्हणजे जन्ममरणादि अनर्थ निवारण करणारा प्रबोध होतो.
इति आत्मचिंतन समाप्त.