श्रीगणेशाय नम: ॥ श्रीसद्गुरुदत्तात्रेयाय नम: । अथ मननसारग्रंथप्रारंभ: ॥ कोणी एक ब्राह्मणकुलोत्पन्न अधिकारी सच्छिष्य सद्गुरूला शरण जाऊन प्रश्न करितो.
शिष्य :- श्रीसद्गुरो, मनुष्यजन्माला येऊन कोणता पुरुषार्थ करावा ?
गुरु :- धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे चार पुरुषार्थ होत. यांतून शेवटला मोक्ष हा परम पुरुषार्थ होय. कारण तो नित्य आहे म्हणून तोच साधावा. ( तो पुनरावृत्तीला जात नाहीं ) अशी श्रुती आहे. आणि इतर जे तीन ( धर्म, अर्थ, काम ) यांना अनित्यत्व आहे. जशी येथें प्रासाद, घरें, वगैरे निर्माण केलेलीं कालांतरीं नष्ट होतात, तसें पुण्यानें संपादन केलेले स्वर्गादिलोकही क्षीण होतात अशी श्रुती आहे.
शिष्य :- तो मोक्ष कशानें मिळेल ?
गुरु :- ब्रह्मज्ञानानें त्या आत्मस्वरूपाला जाणतात ते मृत्यूचा अतिक्रम करून जातात. मोक्षप्राप्तीला ज्ञानावांचून दुसरा मार्गच नाहीं. जो ज्ञानानें ब्रह्मस्वरूपाला जाणतो तो त्याच परब्रह्मरूपी ऐक्यभावानें लीन होतो इत्यादि श्रुती बोलतात.
शिष्य :- तें ब्रह्म कसें जाणावें ?
गुरु :- अध्यारोपापवादानें सर्वसंग सोडून जाणावें. ( अध्यारोपापवादानें ब्रह्म जाणिलें जातें ) असें पूर्वाचार्यांचें वाक्य आहे. ( कर्मानें, प्रजोत्पादनानें, किंवा धनानें मोक्ष होत नाहीं. कित्येक सर्वसंगपरित्यागपूर्वक ज्ञानानेंच मुक्त जाहले. ) अशी श्रुती आहे. तेव्हां अध्यारोपापवाद अवश्य जाणावे.
शिष्य :- अध्यारोप म्हणजे काय ?
गुरु :- शिंपीवर रजत; रज्जूवर सर्प; दगडावर चोर जसा भ्रमानें भासतो, तद्वत् निष्प्रपंच ब्रह्मस्वरूपीं प्रपंच भासतो. तो अध्यारोप होय. त्यालाच अविद्या, तम, मूलप्रकृती, प्रधान, गुणसाम्य, अव्यक्त आणि माया असें म्हणतात. त्यांतून रक्त, शुभ्र, कृष्णवर्ण सुताच्या दोरीसारखी रज:सत्वतमोगुणरूपा मूलप्रकृती जाणावी; इलाच महासुषुप्ती आणि प्रलय म्हणतात. इचे ठायीं प्रलय कालीं स्वकर्मवासनारूपानें अनंत कोटि जीव लीन होतात. हा अनुभव निद्रेमध्यें प्रत्यहीं येतो. सृष्टीकालीं ती मूल - प्रकृती, जीवकर्में परिपक्क दशेला आल्यामुळें माया, अविद्या, तामसी अशा तीन रूपानें प्रगट होते. विशुद्धसत्वप्रधान माया तिचे ठायीं जें चैतन्य प्रतिबिंबित होतें तोच सृष्टीच्या पूर्वी ईश्वर होतो. त्याला अव्याकृत व अंतर्यामी म्हणतात. तोच जगत्स्त्रष्टा पूर्णब्रह्मचैतन्यरूपानें तांमसीमध्यें प्रतिबिंबित होऊन पंचभूतरूपानें जगाला उपादान कारण होतो. जसा कोळी तंतूला निमित्तोपादान होतो, तसा ईश्वर स्वप्राधान्यानें निमित्तकारण, आणि स्वोपाधीनें उपादानकारण होतो.
शिष्य :- हा ईश्वर सृष्टी कशी करितो ?
गुरु :- सत्व शुद्धितारतम्यानें अविद्या अनंत रूपिणी होते. तिचे ठिकाणीं प्रतिबिंबित जीवही अनंत होतात. ह्या जीवेश्वराची व्यष्टीरूप अविद्या समष्टीरूप मूल प्रकृती होय. हींच त्याची कारणशरीरें होत. हाच आनंदमय कोश जाणावा. या प्रकारें कारण सृष्टी जाण. आतां सूक्ष्मसृष्टी ऐक. मायायुक्त ईश्वराच्या ईक्षणानें महत्तत्व ( बुद्धी ) झालें. त्यापासून त्रिगुनात्मक अहंकार जाहला. त्यापासून सूक्ष आकाश, वायू, तेज, आप, पृथ्वी जाहलीं. याला तन्मात्रा किंवा अपंचीकृत भूतें म्हणतात. अनुक्रमें या भूतांच्या सात्विकांशानें श्रोत्र, त्वचा, जिव्हा, नेत्र, घ्राण हीं ज्ञानेंद्रियें झालीं. अव सर्वांचे सात्विकांश एकत्र होऊन अन्त:करण झालें. तें अन्त:करण मन, बुद्धी, चित्त, अहंकार असें वृत्तिभेदानें भिन्न जाहलें. त्यांतून चित्ताचा मनामध्यें आणि अहंकाराचा बुद्धिमध्यें अंतर्भाव जाणावा. आणि क्रमानें आकाशादिकाच्या रजोगुनानें पृथक् वाचा, हस्त, पाद, गुद, उपस्थ हीं कर्मेंद्रियें जाहलीं; व आकाशादिकांचे रजोगुनांश एकत होऊन प्राण जाहला. तो प्राण, अपान, व्यान, उदान, समान असा वृत्तिभेदानें पांच प्रकारचा जाहला. एवं पंचज्ञानेंद्रियें, पंचकर्मेंद्रियें, पंचप्राण आणि मन, बुद्धी अशा १७ सत्रा अवयवांचें लिंगशरीर जाहलें. यालाच सूक्ष्मशरीर म्हणतात. हेंच सुख - दु:खादिभोगसाधन होय. या शरीरीं प्राणमय, मनोमय, विज्ञानमय हे कोश राहतात; आणि स्वप्नावस्था येथेंच अनुभवली जाते. या प्रकारें ही सूक्ष्मसृष्टी जाण. आतां स्थूलसृष्टी ऐक. तमोगुनप्रधान अपंचीकृत आकाशादि पांच भूतें प्रत्येक अर्ध करून प्रत्येकांच्या एका एका अर्ध भागाचे ४ चार भाग करून आपआपल्या अर्ध भागीं न मिळवितां इतरांच्या अर्धभागीं प्रत्येकांचा एक एक अष्टमांश मिळवावा, म्हणजे पंचीकरण होतें. पृथ्वीपासून रोम, त्वचा, मांस, नाडी, अस्थी; आपापासून मूत्र, रेत, स्वेद, रक्त, लाला; तेजापासून क्षुधा, तृषा, निद्रा, तंद्रा, कांति; वायूपासून गमन, धावन, लंघन, आकुंचन, प्रसरण; आकाशापासून काम, क्रोध, लोभ, मोह आणि भय हे पंचवीस होतात. या पंचीकरणापासून ब्रह्मांड आणि त्यामध्यें १४ चवदा लोक व ४ चार भूतजन्य देहाला स्थूलशरीर म्हणतात. हाच अन्नमय कोश होय. या प्रकारें व्यष्टी - समष्टी रूपानें सृष्टी जाहली.
शिष्य :- व्यष्टी समष्टी कशी ?
गुरु :- निरनिराळे पाहणें ती व्यष्टी, व एकरूपानें पाहणें ती समष्टी. जसें घर किंवा वृक्ष पाहणें ती व्यष्टी, आणि ग्राम किंवा वन पाहणें ती समष्टी. तसेंच एक एक शरीर ( पिंड ) ही व्यष्टी. सर्व शरीर ( ब्रम्हांड ) ही समष्टी होय. व्यष्ट्युपाधी जीव, समष्ट्युपाधी ईश्वर ( शिव ); तथापि कारण व्यष्टीचा प्राज्ञ, कारण समष्टीचा ईश्वर, सूक्ष्म व्यष्टीचा तैजस, सूक्ष्म समष्टीचा हिरण्यगर्भ; स्थूल व्यष्टीचा विश्व; आणि स्थूल समष्टीचा विराट् हे अभिमानी होत. हा ईश्वर सत्व, रज, तमोगुणानें अनुक्रमें विष्णु, रुद्र, ब्रम्हा या स्वरूपानें जगाचें पालन, संहार, उत्पत्ति करितो. ब्रह्मदेवाचा विराट्रूपीं, विष्णूचा हिरण्यगर्भरूपीं व रुद्राचा ईश्वरूपीं अंतर्भाव जाणावा अशी सृष्टी ईश्वर करिता जाहला. याला अध्यारोप म्हणतात. हें विक्षेपशक्तीचें कार्य जाणावें.
शिष्य :- आवरन शक्तीचें कार्य कोणते ?
गुरु :- ईश्वर आणि ब्रह्मज्ञानी यांना सोडून सर्व जीवांचे पंचकोश आणि आत्मा यांचा परस्पर भेद असतांही तो भेद असत्वावरण आणि अभानावरण या दोन रूपानें कार्य करते. त्यांतून ब्रह्म वस्तू मुळींच नाहीं, असा व्यवहार होतो तें असत्वावरण. आणि ब्रम्हवस्तू मला भासत नाहीं, असा व्यवहार होतो तें अभानावरण. हें आवरणशक्ति कार्यच संसाराला कारण होतें.
शिष्य :- हें द्विविधावरण कशानें नष्ट होईल ?
गुरु :- परोक्ष आणि अपरोक्ष आशा दोन प्रकारचे तत्वज्ञानानें तें नष्ट होतें. गुरुमुखें वेदांतश्रवणानें होणारें तत्त्वज्ञान परोक्ष म्हटलें जातें; हेंच श्रवण होय. या श्रवणानें असत्वावरण दूर होऊन सद्वस्तु आहे, असा परोक्ष बोध होतो. श्रवणानें संशय जातो. मननानें असंभावना, व निदिघ्यासनानें ( घ्यानानें ) विपरीत भावना जाऊन देहात्मवत् होणारें जें ब्रह्मात्मज्ञान तें अपरोक्ष ज्ञान ( अनुभव ) जाणावें. यानें आभानावरण नषट होऊन आनंदप्राप्तीरूप सातवी अवस्था होते.
शिष्य :- सात अवस्था कोणत्या ?
गुरु :- अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्षज्ञान, अपरोक्षज्ञान, अनर्थ ( शोक ) निवृत्ती, निरतिशयानंदलाभ हा सर्व अघ्यारोप होय.
शिष्य :- अपवाद कसा ?
गुरु :- कारणावांचून कार्य होत नाहीं, या न्यायानें रज्जूसर्पवत् ब्रह्मरूपीं मायेनें भासलेलें जग मुळींच नाहीं, हा निर्धार करणें तो अपवाद होय. ईश्वरोपाधी माया ( मिथ्या ) व जीवोपाधी अविद्या ( नसणारी ) या दोहोंपासून झालेला जगत्भ्रम सत्य कसा ? असें विचारानें जाणून ब्रम्हावांचून कांहीं नाहीं व तें ब्रम्ह मी आहें, असें जो अनुबंधचतुष्टयज्ञ अनुभवानें जाणतो तो जीवन्मुक्त होतो.
पहिला अध्याय समाप्त.