शिष्य :- सत्, चित्, आनंद ही पदें भिन्नार्थ असून अखंडार्थ कसा ?
गुरु :- देशकालवस्तुपरिच्छेदरहित, तो अखंडार्थ. आकाशाला व्यापकत्व आहे म्हणून देशपरिच्छेद नाहीं. यासाठीं त्यावर ब्रह्मत्व येईल, तें वारण्यासाठीं कालपरिच्छेद सांगितला. आकाशाला उत्पत्ति, नाश आहे म्हणून त्याला कालपरिच्छेद आहे. कालाला देशपरिच्छेद नाहीं व ( आपल्यानें आपलाच परिच्छेद नाहीं म्हणून ) कालपरिच्छेद नाहीं. तेव्हां त्यावर ब्रह्मत्व येईल, यासाठीं वस्तुपरिच्छेद सांगितला. कालाचीही प्रपंचांत गणना आहे. त्याहून वेगळें आत्मवस्तु त्रिविधपरिच्छेदरहित आहे.
शिष्य :- मी गुजराथेंत आहें, कोंकणांत नाहीं, हा देशपरिच्छेद जाहला. मी आनंदसंवत्सरांत जाहलों, शार्वरीसंबत्सरांत वस्तुपरिच्छेद जाहला. मग त्रिविध परिच्छेदराहित्य कसें ?
गुरु :- अरे मूढा, भलतीच शंका करतोस ? तर तूं शिष्य आहेस कीं प्रतिवादी ? जर शिष्य असशील तर दयेनें पुन: अनुग्रह करूं. प्रतिवादी असशील तर क्षमेनें उगाच राहूं किंवा शाप देऊं. शापानें काय होईल म्हणशील तर शिष्यावर अनुग्रह केलेला सफल होतो, तर मव आदिनिग्रहार्थ शाप निष्फल होईल काय ? निग्रहानुग्रहसमर्थ ज्ञानी ईश्वराभिन्न आहे.
शिष्य :- क्षमा असावी. मी कृपा - पात्र आपला शिष्य आहें.
गुरु :- तर ऐक. हे तीन परिच्छेद देहाला आहेत. आत्मा तर देहाहून निराळा, सद्रूपी, व्यापक आहे तो असा. घट: सन् ( घट आहे ) पट: सन् ( पट आहे ) इत्यादि सर्व भूत, भौतिक पदार्थांना सत्ता आहे म्हणून आत्मा सर्वदेशी व्यापक जाहला. त्याला देशपरिच्छेद नाहीं. पूर्वोक्त प्रकारानें कालत्रयींही अबाधित आहे म्हणून कालपरिच्छेद नाहीं. सजातीय, विजातीय, स्वगतभेदभिन्न तीन वस्तु. वृक्षाहून अन्य वृक्ष हा सजातीय भेद. वृक्ष आणि पाषाण हा विजतीय भेद. वृक्षाला पत्र, पुष्प, फलादि हा स्वगत भेद. हे तिन्ही भेद आत्मरूपी नाहींत. म्हणून आत्मवस्तु परिच्छेदरहित. याप्रमाणें आत्मा त्रिविधपरिच्छेदरहित सिद्ध जाहला.
शिष्य :- ब्रह्मचैतन्य, ईश्वरचैतन्य, कूटस्थचैतन्य, जीवचैतन्य असे चार भेद दिसतात; हा सजातीय भेद १ आत्मा ( ब्रह्म ), अनात्मा ( प्रपंच ), हा विजातीयभेद २ ब्रह्माला सच्चिदानंदत्व आहे, हा स्वगतभेद ३. असे तीन असताम त्रिविध परिच्छेदरहित आत्मा कसा ?
गुरु :- जलाकाश, महाकश, घटाकाश, अभ्राकाश असे एकाच आकाशाचे उपाधीनें भेद दिसतात; तसे मायोपाधीनें ब्रह्म, ईश्वर; अविद्योपाधीनें कूटस्थ, जीव; हे भेद दिसतात. ते वास्तविक नव्हेत. म्हणून सजातीय भेद नाहींत. जसा रज्जूवांचून सर्प नाहीं तसा ब्रह्मावांचून प्रपंच नाहीं. जें अधस्त तें मिथ्या, म्हणून विजातीयभेद नाहीं. आत्मा, साक्षी, कूटस्थ, हे जसे पर्याय तसेच सत्, चित्, आन्म्द हे निरंश आत्म्याचे पर्याय होत. म्हणून स्वगतभेद नाहीं.
शिष्य :- सत्, चित्, आनंद, एकार्थ आहेत, तर कर, पाणि हस्तवत् पुनरुक्तिदोष होय. आणि भिन्नार्थ आहेत तर भेद कां नसावा ?
गुरु :- जसा वृक्ष एकदेशीं पत्ररूपी, एकदेशीं पुश्परूपी, एकदेशीं फलरूपी असतो, तसा आत्मा नाहीं. रक्तोष्णप्रकाश दीपवत् सर्वांशीं अखंडार्थत्वें सच्चिदानंदरूपच आहे. दुसरें असें, आत्मनिष्ठ सत्त्व अनित्य जगावर, चित्त्व जड बुद्धीवर, आनंदत्त्व दु:खरूपी भार्यादिकांवर आरोपून त्यावरचे असज्जडदु:खित्व आपल्यावर घेऊन जग सत्य आहे, बुद्धींद्रियें चेतन आहेत, भार्यादि आनंददायक आहेत असें कित्येक मानितात. त्यांचा भ्रम दूर होण्याकरितां श्रुति म्हणते कीं हे जीवहो, आत्मा सद्रूप आहे, अनृतरूप नव्हे; चिद्रूप आहे, जडरूप नव्हे; आनंदरूप आहे, दु:खरूप नव्हे. याप्रमाणें भ्रांति जाण्याकरितां तीन पदांनीं बोध करिते व कित्येक वादी सत्त्व हा आत्म्याचा धर्म, चिदानंदत्व हा गुण मानून आत्मा द्रव्य आहे, असें म्हणतात. तन्निवारणार्थ ( निराकरणार्थ ) सच्चिदानंदपदानें श्रुति अखंडार्थ प्रतिपादितात. कारण, सर्व श्रुतीचे उपक्रमादिलिंगींनीं अखंडार्थी तात्पर्य आहे. युक्तीनें पाहिलें तर सत् स्वत: प्रकाशित होतें कीं अच्यानें प्रकाशित होतें ? स्वत: प्रकाशित होतें म्हटलें तर, सत् चित् जाहलें. अन्यानें प्रकाशित होतें म्हणावें तर, सताहून दुसरें सत् अन्य, कीं असत् अन्य ? असत् अन्य मानावें तर, तें शशश्रृंगाप्रमाणें नसणारें असत् कसें प्रकाशित करील ? दुसरें सत् मानलें तर तें तरी कशानें प्रकाशित होतें ? असा पुन: पुन: विचार केला तर आत्माश्रय, अन्योन्याश्रय, अनवस्था व चक्रिकापति, असे दोष येतील. तेव्हां अद्वितीय सत् स्वयमेव प्रकाशित होतें, अतएव तेंच चित् होय. हें सत्, व्यापकत्वानें सर्वत्र पूर्ण आहे, म्हणून तोच आनंद होय. कारण, आनंद हा भूम ( परिपूर्ण ) रूपींच राहतो. याप्रमाणें श्रुति, युक्तीवरून अखंडार्थ सिद्ध आहे. अनुभव पाहणें असेल तर निद्रानंद घेऊन उठलेला पुरुष मीं एवढा वेळ आनंद अनुभवला असें स्मरतो. तर अनुभवावांचून स्मरण होणार नाहीं. निद्रेमध्यें इंद्रियादिक लीन जाहल्यामुळें त्यावेळीं जरी आनंदसाक्षात्कार दिसला नाहीं तरी तो अनुभव स्मरणानें अनुमान करण्यायोग्य आहे.
शिष्य :- निद्रेमध्यें अज्ञान व आनंद दोन्ही असतात. यांतून स्वयंप्रकाश कोण ?
गुरु :- अज्ञानाला आवरण रूप आहे. तें कसा प्रकाश करील ? तेव्हां आनंद स्वयंप्रकाश असून अज्ञानाला दाखवितो, म्हणून तोही चिद्रूप आहे; व चिताला सत्त्व आहे हें तर पूर्वींच प्रतिपादन केलें; तेव्हां श्रुति, युक्ति अनुभवेंकरून सजातीय, विजातीय, स्वगतभेदरहित असून देशकाल - वस्तु - परिच्छेदहीन सच्चिदानंदरूप आत्मा अखंड आहे हें सिद्ध जाहलें. त्या आत्म्याला येणारें दु:ख अगांतुक व त्याला जन्मकर्मादि कारणें चवथ्या अध्यायांत सांगितलीं व त्यांचा नाशही सहाव्या अध्यायांत सांगितला. या प्रमाणें श्रवणानें, मी देहेंद्रियांहून वेगळा आत्मा आहें, असें जें ईश्वरोपासनेनें व श्रीगुरूच्या उपासनेनें अनुग्रहानें होणारें ज्ञान, तें परोक्ष ज्ञान जाणावें. पुढें त्याचेंच मनन, निदिध्यासन होतां होतां साक्षात्कार होतो तें अपरोक्ष ज्ञान होय. हें ज्याला जाहलें तो कृतकृत्य होऊन नित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त, सत्य, परमानंदाद्वयरूप जाहला असें जाणावें. हें ज्ञान ज्याला प्राप्त जाहलें तो चांडाळ असो अथवा द्विज असो ( स:गुरुरित्येषा मनीषा मम ) याप्रमाणें भगवन्पूज्यपाद श्रीशंकराचार्यवचनानें कुटीचक, बहूदक, हंस, परमहंस, संन्याश्याहून तो अधिक पूज्य आहे. त्याचे योगानें कुल पावन होतें, कृतार्थ होतें. विशेष काय सांगावें ? पृथ्वी सुद्धां त्याचे चरणस्पर्शानें पवित्र होते. त्याचा वारा लागेल तोही कृतार्थ होईल. मग दर्शनादिकांचें फल काय वर्णन करावें ? हा ज्ञानसमकाल मुक्तच जाहला. सर्पकंचुकवत् देहाचा प्रतिभास प्रारब्धक्षय करितो. तो देह काशींत पडो किंवा चांडाळवाड्यांत पडो, पुन: बद्धता नाहीं. तेव्हां शिष्या, तूं श्रवणादि करून या गतीला जा. यापुढें आणखी उपदेश राहिला नाहीं. हें ऐकून शिष्य गुरुचरणीं लीन जाहला.
बारावा अध्याय समाप्त.
प्राकृत मनन समाप्त.