शिष्य :- पंचकोश कोणते व त्यांचीं लक्षणें कशीं ?
गुरु :- १ अन्नमय २ प्राणमय ३ मनोमय ४ विज्ञानमय आणि ५ आनंदमय हे पांच कोश. अन्नविकार जें शुक्रशोणित, यानें जाहलेला व अन्नानें वाढलेला, षट्भावविकारी स्थूलदेह हा अन्नमय कोश १. कर्मेंद्रियें ५ पांच आणि प्राण ५ पांच, मिळून प्राणमय कोश २. ज्ञानेंद्रियांसहित मन ( बहिर्वृत्तिक ) हा मनोमय कोश ३. ज्ञानेंद्रियांसहित बुद्धि ( अंतर्वृत्तिक ) हा विज्ञानमय कोश ४. प्रिय इष्टवस्तुदर्शनानें मोद ( त्याच्या लाभानें होणारा आनंद ), प्रमोद ( त्याचा अनुभव किंवा भोगानें होणारा आनंद ) यांसह कारणशरीरस्थ सत्त्व हा आनंदमय कोश ५. यांप्रमाणें हे पांच कोश होत. खङ्गाला कोश, शिवलिंगाला संपुष्ट, अंब्याला साल, व पुरुषाला अंगरखा आच्छादून ठेवितो त्याप्रमाणें हे कोश आत्म्याला आच्छादून ठेवितात.
शिष्य :- खङ्गादिक निराळे व त्याचे कोशादिक निराळे असून आच्छादक होतात हें उघड कळतें. पण आत्मसंबंधानें जाहलेले पांच कोश आत्म्याला कसे झांकतात ?
गुरु :- सूर्यसत्तेनें दिसणारे व सूर्यकिरणांपासून जाहलेले मेघ किंवा अग्निसत्तेनें असणारा धूम, हे जसे बालदृष्टया आच्छादक होतात, तसेच कोश आत्म्याला आच्छादक होतात. जसे खङ्गादिकाहून कोशादिक निराळे, तसे आत्म्याहून पंचकोशही निराळेच आहेत.
शिष्य :- कोशाचा व आत्म्याचा संबंध कसा ?
गुरु :- १ समवाय २ संयोग आणि ३ अध्यास असा तीन प्रकारचा संबंध. एकतराध्यास आणि अन्योन्याध्यास असे दोन प्रकारचे अध्यास. अवयव, अवयवी; गुण, गुणी; क्रिया, क्रियावान्; जाति, व्यक्ति; विशेष, नित्यद्रव्य; यांचा समावायसंबंध. त्याला नाही. भेरीदंडादिवत् संयोगसंबंध. आत्म्याची द्रव्यांत गणना नाहीं, म्हणून हाही संबंध त्याला लागत नाहीं. रज्जुसर्पवत्, अध्यससंबंध. हा आत्मा आणि कोश यांना लागतो. कोशाचें आणि आत्म्याचें एकप्रत्ययविषयत्व होतें, म्हणून अन्योयाध्यास जाणावा. जेव्हां अन्नमयाचा अध्यास होतो तेव्हां मी देव, मनुष्य, स्त्री, पुरुष; मी जाहलों, आहें, मी वाढतों, माझा वाईट परिणाम जाहला, मी क्षीण जाहलों, मी मरेन; मी बाल, तरुण, वृद्ध; मी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र; मी ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ, संन्यसी; मी दीक्षित इत्यादि अन्नमय कोशाचे विकारधर्म आपल्यावर व आपले सच्चिदानंद धर्म अन्नमयावर आरोपित करितो. प्राणमयाशीं तादात्म्य जाहल्यावर मी भुकेलों, तान्हेलओं, तान्हेलों, मी बलवान्, बोलका, गंता, दाता, विसर्ग करणारा, मूक, पंगू षंढ इत्यादि प्राणमयाचे धर्म आपल्यावर व आपले प्राणमयावर आरोपित करितो. मनोमयतादात्म्यानें मी संकल्पविकल्पवान्, शोकमोहवान्, कामी, लोभी, श्रोता, स्प्रष्टा, रस घेणारा, हुंगणारा, बहिरा, अंधळा इत्यादि मनोमयधर्म आपल्यावर व आपले सच्चिदानंद मनोमयावर अरोपित करितो. विज्ञानमयतादात्म्यानें मी कर्ता, बुद्धिमान्, ऊहापोहकुशल, अवधानी, रोगी, द्वेषी, श्रोत्रिय, पंडित, विरक्त, भक्तिमान्, उपासक, ज्ञानी इत्यादि विज्ञानमयधर्म आपल्यावर व आपले विज्ञानमयावर लोटतो. आनंदमयाशीं तादात्म्य होतां मी भोक्ता, सुखी, संतुष्ट, सात्त्विक, राजस, तामस, मूढ, दुष्ट, शून्य, मोहित, अविवेकी, भ्रांत इत्यादि आनंदमयाचे धर्म आपणावर व आपले आनंदमयावर आरोपित करितो.
शिष्य :- हा अध्यास कां जाहला ?
गुरु :- मी, आत्मा निराळा व हे पंचकोश माझ्याहून निराळे, असा विचार न केल्यामुळें जाहला.
शिष्य :- कोश निराळे कसे ओळखावेत ?
गुरु :- जसें, हा पुत्र, ही स्त्री, हा पशु इत्यादि निराळे पहातात, त्याप्रमाणें हा देह, हा प्राण, हें मन, ही बुद्धि, हा आनंद: मी तर ( अशरीरं या श्रुतीनें ) देहरहित आहें. पुत्रादिकांचें विकार आपल्याला लागत नाहींत, असा निर्धार करावा.
शिष्य :- पुत्रादिक बाह्य दृष्टीनें दिसतात. कोश कसे दिसतील ?
गुरु :- बाह्यदृष्टि नेत्र, आंतर्दृष्टि बुद्धि. बाह्य दृष्टीनें न दिसणारे वीणास्वरादिक बुद्धीनें कळतात. एकत्र असलेलें दूधपाणी इतरांना पृथक् न करतां आलें तरी तें हंस करितो. तसें आंतर कोश नेत्राला न दिसले तरी बुद्धीनें उघड कळतील. तेव्हां बुद्धीनें विचार करून पाहिल्यावर रज्जुसर्पवत् हे पंचकोश आत्म्यावर आरोपित आहेत. आरोपित जें, तें मिथ्या.
शिष्य :- दोरीवर भासलेला सर्प दिवा घेऊन पाहिल्यावर नाहींसा होतो; आनि हें पंचकोश ज्ञानोत्तरही असतात. मग ते असत्य कसे ?
गुरु :- प्रातिभासिक सत्य, व्यावहारिक सत्य, आणि पारमार्थिक सत्य असें त्रिविध सत्य. जीवसृष्टि आणि ईशसृष्टि अशी दोन प्रकारची सृष्टि. रज्जुसर्पादि जीवसृष्टि, हें प्रातिभासिक सत्य. जीवसृष्ट्यधिष्ठान पंचभूतादि ईशसृष्टि, हें व्यावहारिक सत्य आणि याचें अधिष्ठान ब्रह्म, हें पारमार्थिक सत्य. सत्य, निर्बाध ज्ञानानें प्रातिभासिक नष्ट होतें. व्यवहार संपेपर्यंत व्यावहारिक राहतें. प्रातिभासिक आणि व्यावहारिक अध्यासानें समान आहे. पण सत्तेनें समान नाहीं. रज्जुसर्पवत् व्यावहारिक नष्ट होईल, तर गुरुशिष्यपरंपरा व ज्ञानी लोकांचा व्यव्हरही लोपेल, तर असें नाहीं. मृत्तिकेवर आरोपित घटाचें नामरूप बाधित केल्यावर मृत्तिका मात्र राहते. तसे पंचकोश ज्ञानानें बाधित केल्यावर केवळ सच्चिदानंद आत्मा अवशिष्ट राहतो.
अध्याय दहावा समाप्त.