अंक पाचवा - प्रवेश ४ था
नाटक लिहिणे किंवा रंगभूमीवर सादर करणे म्हणजे अवघड कला आहे, शिवाय त्यातील अभिनय जिवंत असावा लागतो.
रस्ता
[ तुळाजीराव पुढें व सट्व्या आणि दुसरे तीन मारेकरी मागें . ]
तुळाजी० - ( मारेकर्यास अंतरावर पण जवळच असें हुशारीनें राहण्यास सांगतो, आणि आपल्याशीं म्हणतो ) पुन: मी आपला धाकटा भाऊ तो धाकटा भाऊच ! कधींच याचा निकाल करुन टाकायचा. पण मीच चुकलों . असलीं कामें तशी तडाक्यासरशीं उडवून टाकली पाहिजेत. आज करुं, उद्या करुं , असें म्हट्लें कीं , चढलींच उरावर म्हणून समजावे. खरेंच धाकटा भाऊ म्हणजे शुध्द बेगारी असें समजले पाहिजे. नांवाचा मात्र भाऊ , बाकी मान काय , मरातब् काय , अधिकार काय, सर्व थोरल्या भावाला. धाकट्या भावाच्या वाट्याला काय ? तर याच्यावर देखरेख कर, त्याच्यावर देखरेख कर, अमक्याकडे जा , तमक्याकडे जा आणि यांनी खुशाल लोडाला टेंकून रहावें ! आपल्याला नाहीं बा खपत असला दुय्यमपणा. होईल तर एकटा मालक होईन . ही आतां आमच्या दादासाहेबांची स्वारी आली आहे, ही स्वस्थ बसेल म्हणतां ? पुढे पुढे करुन - लाळ घोटून त्या थेरड्याची मर्जी संपादन करुन घेतील, कीं वाजले मग आमचे बारा ! शिवाय तो जर जिवंत राहील तर दुसरीच एक भीति आहे. ती ही कीं , आम्हीं केलेल्या सोदेगिर्या तो बाहेर फोडणार , आमचें तोंड बंद होणार, आणि सर्वच लाट त्यांच्या हातीं लागणार ! छे ! तें कांहीं नव्हे. त्याला या जगांतून लंबा केलाच पाहिजे. आणि तो सुध्दां आजच्या आज . कारण , त्या पहिल्या बारावर कांही भरवसा ठेवतां येत नाहीं . तेव्हां ’ शुभं च शीघ्र .’ आपली तयारी कडेकोट आहे. त्याविषयीं कांहीं भीति नको. आला कीं उडविलाच. अरे हा आलाच वाट्तें - ( आपल्या लोकांस इषारा करतो. इतक्यांत चंद्रराव येतो व ते चवघे मारेकरी त्याच्या अंगावर धावतात. चंद्ररावाची व त्यांची झटापट चालते. इतक्यात आनंदराव आपल्या भावास घेऊन येऊन पोहोंचतो. ही मारामारी त्याच्या दृष्टीस पडतांच तो आपले लोक घेऊन धांवतो. मारेकरी पळून जाऊं लागतात; परंतू त्यांपैकीं एक आनंदरावाच्या हातीं लागतो. बर्याच जखमा लागल्यामुळें ज्याचें सर्वांग रक्तानें भरलें आहे असा चंद्रराव आनंदरावास ओळखून म्हणतो. )
चंद्रराव - जरी माझा जीव मला जड झाला होता तरी आपण तो वांचविलात याबद्द्ल आपला मी ऋणी आहे. परंतू त्यांच्या हातून मेलों असतों तर फार चांगलें झालें असतें . असो . अजून थोडें भोक्तृत्व आहे म्हणायचें .
आनंद० - ( आपल्या चाकर लोकांस ) हं , त्यांना नीट संभाळून घेऊन चला. ( सर्व निघून जातात. )
N/A
References : N/A
Last Updated : December 16, 2016
TOP