अंक पाचवा - प्रवेश ३ रा

नाटक लिहिणे किंवा रंगभूमीवर सादर करणे म्हणजे अवघड कला आहे, शिवाय त्यातील अभिनय जिवंत असावा लागतो.


निजण्याची खोली
[ चंद्रराव पलंगावर निजला असतां दुर्गा येते.]
दुर्गा - अग बाई ! किती लवकर झोप लागली ही ! खरोखरीच किनई , आपण मोठे ,मोठे सुखी . कारण आपल्याला अशी चटकन झोप तरी लागते. मी मात्र आतां या झोपेलां अंतरलें . बरें , झोंपेनें जर सुख होतें , तर मग ज्याला पुष्कळ झोंप लागते तो फार सुखी समजायचा. आणखी मरणें म्हणजे अखंड झोंप घेणे. तेव्हां जो ही अखंड झोंप घेतो त्याच्या सुखाला अंतच नाहीं म्हणायचा.     (चंद्रराव उद्देशून )  पण संभाळ बरें ! आतां हा वणवा हां हां म्हणतां पसरेल. म्हणून मी आपल्याला सांगतें कीं , आपण पुन: जागेच होऊ नका. जितका माझ्यावर आपली निर्मळ प्रीति असेल तितकी आपल्याला उद्यां पीडा होणार. ( कांही वेळ थांबून ) या मूर्तीकडे पाहूं लागलें कीं , प्रत्यक्ष काळाचें देखील काहीं चालेनासें होतें , आणि पुन: प्रेमाचा उमाळा फुटायला लागतो. पुरे आतां . शेवटचे एकदा डोळे भ्ररुन पाहून घेतें म्हणजे झालें . पण कोण मी मेली निर्दय पहा ! ही अगदीं अखेरची भेट, आणि नुसत्या एकदां पाहण्यानें मनाचें समाधान होईल तरी कसें ? कडकडून मिठीच मारली पाहिजे. ( असें म्हणून चंद्ररावाच्या किंचित जवळ जाते व चपापून म्हणते. ) अग बाई ! कुणीकडे चाललें मी ? धांवा हो आनंदराव , धांवा लवकर ! मी आपली लाज गुडाळून ठेवून भलतेंच करायला निघालें ! असाल तिथून धांवा, आणखी आंवरुन धरा मला. ( मध्येच कांही ऐकलेंसें करुन ) ऐका हं . काय वाजलें तें ? दार वाजवीत आहे कुणी. मला वाटतें आनंदराव आले. कुणी का -
चंद्रराव - ( पलंगावर उठून बसून ) लाडके, ये.
दुर्गा - मलाच कुणी लाड्के म्हणून हांक मारीत आहे ?
चंद्रराव - किती वेळ अशी दुर दूर राहणार तूं ?
दुर्गा - ( दचकून ) अग बाई, हा पुरुषाचा शब्द ! माझ्या पलंगावर नी पुरुष कसा आला ? दुसरें कांहीं नाहीं . मेला या जगात चोहींकडें कसाईपणा माजला आहे. अरे मांगा , ’ किती वेळ दुर राहणार का ! ’ ही आलें घे जवळ . ( असें म्हणून खंजीर उपसते व म्हणते ) नवरे जर स्वर्गात जातात तर त्यांना स्वर्गात पाठविणारे कुठें जातात हें मला पहायचें आहे. ( हात उचलते. चंद्रराव घाबरुन उठतो. त्यास ओळखताच ती ओरडून म्हणते. ) अरे देवा ! हे कोण ?
चंद्रराव - लाडके , तुझ्या हातांत हा खंजीर ! आणि तो मला मारण्याकरितां ?
दुर्गा - ( खजील होऊन व हात खालीं करुन ) होय, आपल्यालाच मारण्याकरितां !
चंद्रराव - छे ! असें कधींच व्हायचें नाहीं .
दुर्गा - वेडाच्या भरांत मीं हें नरकाच्या दारांत पाऊल टाकलें होतें , पण आपल्यास पाहून - ( असें म्हणून दुर पळूं लागते. )
चंद्रराव - ( तिला धरण्याकरितां उठून ) लाडके ! मला पाहून तूं अशी कां बरें दुर दुर पळतेस ?
दुर्गा - माझ्यानें आपल्याकडे पहावत नाहीं हो ! देवा ! अरे मला एकदां भ्रमिष्ट तरी करुन टाक पुरी. [ असें म्हणून वेगानें पळून जाते.]
चंद्रराव - [ कोंडाऊ दुरुन येत आहे असें पाहून ] कोंडाऊ धांव लवकर ! ती पहा तिकडे गेली. धर तिला. [ कोंडाऊ जाते. ] अरेरे ! काय ही बिचारीची दशा झाली ! हिच्यापासून मला सुख तर नाहीच, पंण मात्र यातना भोगाव्या लागतात. मला आतां पहावें तिकडे भयाण दिसायला लागलें , माझें मन खचलें , चहूंकडून निराशाच बळावत चालली ! मी अगदीं मृत्यूच्या तोंडाशी येऊन पोहोंचलो. थोडक्याच वेळानें तो मला ’ आ’  करुन गिळून टाकणार , यांत शंका नाहीं ! असो. जोंपर्यत माझीं हीं इंद्रियें माझ्या स्वाधीन आहेत तोंपर्यत माझ्या लाडकीवर ’दया कर ’ म्हणून दयाघना परमेश्वराचा धांवा तरी करतों . [ असें म्हणून हात जोडतो, व वर दृष्टि करुन म्हणतो ] देवा ! तूं सर्वसाक्षी आहेस, तेव्हां तुला निराळें काय सांगायचें ? पण माझ्या लाडकीला या हालांतून लवकर मुक्त कर ; तसेंच , या तीव्र दु:खाच्या वेगामुळें अंतकाळापुर्वीच जर माझ्या बुध्दीला भ्रम पडून माझ्या हातून कांही अपराध घड्ला तर त्याची क्षमा कर. [ हें चाललें आहे, इतक्यांत कोंडाऊ येते. ]
कोंडाऊ - महाराज , बाहेर कोणास आला आहे. त्याच्या मनांतून आपल्याशीं काहीं बोलायचें आहे. नाव विचारलें तर कांही सांगत नाहीं
चंद्रराव - पण, लाडकी कुठें आहे ? तूं तिच्यामागून गेलीसना मघाशी?
कोंडाऊ - होय . त्यांच्यामागून गेलें , पण त्या मला सांपड्ल्या नाहीत , म्हणून दोन तीन ठिकाणीं पाहिलें . शेवटीं त्या देवघरांत बसलेल्या मी पाहिल्या. देवापुढें डोकें टेंकून स्वस्थ बसल्या आहेत. दोन चार हाका मारल्या तरी ओ देईनात.
चंद्रराव - बरें , तूं जा अगोदर तिच्यापाशीं जाऊन बैस. मी बाहेर कोण आला आहे त्याला भेटून तिकडेच येतो जा. ( कोंडाऊ जाते. ) हे माझे दोस्त सोमाजीराव आले असतील. या ठिकाणीं काय घोटाळा उडाला आहे याची त्यांना कल्पनासुध्दां नसेल बरें ! असो. वेळेवरच आले म्हणायचे. त्यांच्या स्नेहाचा कांहीं तरी उपयोग करुन घ्यावा आणि मग.... ( असें म्हणून जातो. )

N/A

References : N/A
Last Updated : December 16, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP