संत नामदेवांचे अभंग - भेट
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.
१.
तुझे पाय रूप डोळां । नाहीं देखिलें गोपाळा ॥१॥
काय करुं या कर्मासी । नाश होतो आयुष्यासी ॥४॥
जन्मा येऊनियां दु:ख । नाहीं पाहिलें श्रीमुख ॥३॥
लळे पुरविसी आमुचे । म्हणे जनी ब्रिद साचें ॥४॥
२.
वाट पाहतें मी डोळां । कां गा न येसी विठ्ठला ॥१॥
तूं वो माझी निज जननी । मज कां टाकियेलें वनीं ॥२॥
धीर किती धरूं आतां । कव घालीं पंढरिनाथा ॥३॥
मला आवड भेटीची । धनी घेईन पायांची ॥४॥
सर्व जिवांचे स्वामिणी । म्हणे जनी माय बहिणी ॥५॥
३.
येग येग विठाबाई । माझे पंढरीचे आई ॥१॥
भीमा आणि चंद्रभागा । तुझे चरणींच्या गंगा ॥२॥
इतुक्यासहित त्वां बा यावें । माझे रंगणीं नाचावें ॥३॥
माझा रंग तुझिया गुणीं । म्हणे नामयाची जनी ॥४॥
४.
आतां वाट पाहूं किती । देवा रुक्माईच्या पती ॥१॥
येईं येईं पांडुरंगे । भेटी देईं मजसंगें ॥२॥
मी बा बुडतें बहु जळीं । सांग बरवी ब्रीदावळी ॥३॥
राग न धरावा मनीं । म्हणे नामयाची जनी ॥४॥
५.
विठोबारायाच्या अगा लेकवळा । जाउनी कळवळा सांगा माझा ॥१॥
विठोबारायाच्या अगा मुख्य प्राणा । भेटवीं निधाना आपुलिया ॥२॥
अगे क्षेत्र माये सखे पंढरिये । मोकलीते पाय जीव जातो ॥३॥
विश्वाचिये माते सुखाचे अमृत । सखा पंढरिनाथ विनवी तरी ॥४॥
तूं मायबहिणी देवाचे रुक्मिणी । धरोनियां जनी घालीं पायीं ॥५॥
६.
कां गे निष्ठुर झालीसी । मुक्या बाळातें सांडिसी ॥१॥
तुज वांचोनिया माये । जीव माझा जावों पाहे ॥२॥
मी वत्स माझी माय । नये आतां करूं काय ॥३॥
प्राण धरियेला कंठीं । जनी म्हणे देईं भेटी ॥४॥
७.
माझिये जननी हरिणी । गुंतलीस कवणे वनीं ॥१॥
मुकें तुझें मी पाडस । चुकलें माये पाहें त्यास ॥२॥
चुकली माझिये हरिणी । फिरतसे रानोरानीं ॥३॥
आतां भेटवा जननी । विनवितसे दासी जनी ॥४॥
८.
धन्य ते पंढरी धन्य पंढरिनाथ । तेणें हो पतीत उद्धरिले ॥१॥
धन्य नामदेव धन्य पंढरिनाथ । तयानें अनाथ उद्धरिले ॥२॥
धन्य ज्ञानेश्वर धन्य त्याचा भाव । त्याचे पाय देव आम्हां भेटी ॥३॥
नामयाची जनी पालट पैं झाला । भेटावया आला पांडुरंग ॥४॥
९.
चिंतनीं चित्ताला । लावी मनाच्या मनाला ॥१॥
उन्मनीच्या सुखा आंत । पांडुरंग भेटी देत ॥२॥
कवटाळुनी भेटी पोटीं । जनी म्हणे सांगूं गोष्टी ॥३॥
१०.
देहाचा पालट विठोबाचे भेटी । जळ लवणा गांठीं पडोन ठेली ॥१॥
धन्य मायबाप नामदेव माझा । तेणें पंढरिराजा दाखविलें ॥२॥
रात्नंदिवस भाव विठठलाचे पायीं । चित्त ठायींचे ठायीं मावळलें ॥३॥
नामयाचे जनी आनंद पैं झाला । भेटावया आला पांडुरंग ॥४॥
११.
पुंडलिकें नवल केलें । गोपिगोपाळ आणिले ॥१॥
हेंचि देईं ह्रषिकेशी । तुझें नाम अहर्निशीं ॥२॥
नलगे आणिक प्रकार । मुखीं हरि निरंतर ॥३॥
रूप न्याहाळिन डोळां । पुढें नाचेन वेळोवेळां ॥४॥
सर्वांठायीं तुज पाठें । ऐसें देऊनि करीं साह्य ॥५॥
धांवा करितां रात्र झाली । दासी जनीसी भेट दिली ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : January 30, 2015
TOP