गवळण - २६ ते ३०
संत नामदेवांनी भक्ति-गीते आणि अभंगांची रचना करून समस्त जनता-जनार्दनाला समता आणि प्रभु-भक्तिची शिकवण दिली.
२६.
सोडीं कान्हा रवि दोर मथित्या देतें । बया मज तें दे आई मज तें दे डेरां घुमघुमतें ॥१॥
यशोदा उचलोनी कडे त्यासी घेउनी । दाविती चित्रशाळेतें ॥२॥
करीं कर धरुनी नेउनी अंगणीं । दावी कुप बावीतें ॥३॥
दावीत आरशांत । म्हणे पाहे कृष्णनाथ । मुखमुखा चुंबितें ॥४॥
चिमण्या ह्या गौळनी । आल्य अत्याहो मिळोनी । राधे उरीं मज तें दे ॥५॥
राधेसी म्हणे नामा । कृष्णासी तुझा प्रेमा । समजावियासी तें दे ॥६॥
२७.
भला तूं हरी कळलासी रडीवाला ॥धृ०॥
विधीचें अक्षर खरें हें असतां । अजासुताचे कां जाले हाल ॥१॥
पाराशरसुत वरचढ जाला । म्हणून कां त्वां फुगविले गाल ॥२॥
बळीनें तुज पाहे खरीद केलें । खर्चून तो धनमाल ॥३॥
नामा मनीं निर्भय गुरुवर कृपे । तुजलागीं देतो हे प्रतिख्याल ॥४॥
२८.
चिदानंद दोंदिल बाळ डोळस । कृष्ण खेळवीत निवे मानस ॥१॥
सये आन कांहीं या जीवा नावडे । चित्त गुंतलें तया सुखी न निवडे ॥२॥
देहा गेहा आठव नाहीं सर्वथा । स्थिति बाणली सहज रूप पाहतां ॥३॥
तेज सांवळें द्दष्टींत कोंदलें । तेणें प्रकाशें सबाह्य मन माझें वेधलें ॥४॥
वृत्तिसहित इंद्रियें परतलीं । कृष्णरूपीं मिळोनियां गेलीं ॥५॥
नामया स्वामी आदि परंपरा । आवडता आहे तो माझा सोयरा ॥६॥
२९.
चिदानंद दोंदिल बाळ सांवळें । कृष्ण पाहतां नयनीं मन मावळे ॥१॥
तें सुख कवणें वाचें बोलिजे । चित्त चैतन्य समरसें भोगीजे ॥२॥
परा परतली पश्यंति तन्मया । मध्यमा वैखरी पावली हो लया ॥३॥
आलिंगना लागुनी बाम्हा स्फुरती । देह न दिसे पाहतां कृष्णमूर्ति ॥४॥
तेथें आर्तीचा आनंदू गोठला । तो हा कृष्णरूपें अंकूर उठिला ॥५॥
नामया स्वामी सबाह्याभ्यंतरीं । गेले रसरंग गोकुळाभीतरीं ॥६॥
३०.
चिदानंद चिद्रूप चित्त चिन्मय । बाळ यशोदेचें आनंद अद्वय ॥१॥
सत्य अभिनव सुख याच्या दर्शनीं । मिठी पडली पाहतां रूप नययीं ॥२॥
द्दष्टीया डोळिया आड रिघोनी । तनु मनासी केली भुलवणी ॥३॥
आंत बाहेरी निज सुख वावरे । नित्य नूतन जीववूनी विसरे ॥४॥
आपरूपीं रूप सकळां केलें । गोपी गोपाळां धेनु वत्सां भुलविलें ॥५॥
नामया स्वामी आनंद उदधि । माजी बुडोनियां नेली देहबुद्धि ॥६॥
N/A
References : N/A
Last Updated : January 17, 2015
TOP